Login

अशी जुळली गाठ. भाग - ३७

कबीर आणि सान्वीच्या अबोल प्रेमाची कहाणी
अशी जुळली गाठ. भाग - ३७

डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखन स्पर्धा.

"काहीच उपयोग नाही झाला म्हणजे? तुम्ही मला एवढं तुमच्या मनातलं सांगितलं... मग अजून कसला उपयोग करून घ्यायचा होता तुम्हाला? मला कळेल अशा भाषेत बोलाल का तुम्ही?" सान्वीने विचारलं.

"हो मग काय... मी माझ्या मनातलं सगळं काही तुला सांगितलं, तुला I love you  बोललो पण तू कुठे काय बोललीस. मला वाटलं की सुद्धा मला I love you म्हणशील... पण तसं काहीच झालं नाही. म्हणणार तरी कसं म्हणा... तुझ्या मनात माझ्याविषयी प्रेमच नसेल." कबीर खोटं खोटं चेहरा उदास करत तिच्याकडे बघत बोलला. पण त्याचं बोलणं ऐकून सान्वी खुप लाजली. तिने मान खाली घातली. तिच्या गालांवर लाजरे भाव स्पष्ट दिसत होते. तिचे ओठ सुद्धा नकळत रूंदावले होते. ती काही बोलणार, तोच कबीर तिच्या जवळ सरकला.

"बघितलंस? तू अजूनही काहीच बोलत नाहीये, मी आपलं उगाच अपेक्षा करत होतो." कबीर मुद्दाम गंभीर होत म्हणाला.

"तुम्ही ना… जाणीवपूर्वक मला बोलायला लावताय." सान्वी हळू आवाजात लाजत बोलली. तिची नजर अजूनही खालीच होते.

"हो… कारण मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. मी सांगितलं आहे आता बोलायची वेळ तुझी आहे." कबीरचा आवाज आता थोडा शांत झाला होता. तो फक्त एकटक तिच्याकडे बघत होता.

सान्वीने क्षणभर डोळे मिटले. ती बोलायचा प्रयत्न करत होती पण तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं.

"कबीर, प्रेम व्यक्त करायला शब्दांची गरज असते, असं काही नाहीये, प्रेम असेल तरच ते शब्दांत सांगता येतंच असं नाही… काही गोष्टी मनातच खूप खोल रुजलेल्या असतात. मग त्या कृतीतून आपोआप दिसतातच." सान्वी अगदी प्रेमळ आवाजात बोलली. ते ऐकून कबीर थोडा स्तब्ध झाला. तिच्या त्या एका वाक्यातच त्याला हवं ते उत्तर मिळालं होतं. तो हलकंसं हसला आणि म्हणाला,

"मग ठीक आहे… आज नाही बोललीस तरी चालेल. पण एक दिवस… मला ते शब्द तुझ्या तोंडून नक्की ऐकायला मिळणार." ते ऐकून सान्वी पुन्हा लाजली. पण यावेळी तिच्या लाजेमागे एक शांत, गोड भावना दडलेली होती. कबीर अजूनही तिच्याकडेच बघत होता. तो मागे वळणार तोच तिने त्याचा हात धरला.

"कबीर, खरं सांगू का मला शब्दांत बोलायची तशी सवय नाहीये. पण मी न बोलता सुद्धा तुम्ही माझ्या मनातलं ओळखू शकता हे मला माहीत आहे." सान्वी म्हणाली त्याचवेळी कबीरने तिला मिठी मारली. मागच्या वेळी जेव्हा त्याने तिला पहिल्यांदा मिठी मारली होती तेव्हा तिचे हात तसेच हवेत होते. पण आता सान्वीचे हात त्याच्या पाठीवर विसावले होते.

"कबीर, मी तुमची ही मिठी खुप मिस करत होती. मला नेहमी वाटायचं की तुम्ही मला रोज असं प्रेमाने मिठीत घ्यावं. आज माझी ती इच्छा पुर्ण झाली. तशी तुम्ही याआधी मला मिठी मारली होती पण तेव्हा त्यातल्या भावना वेगळ्या होत्या आणि आताच्या भावना वेगळ्या आहेत." सान्वी म्हणाली.

"एवढं सगळं छान छान बोलते मग ते शब्द बोलायला काय हरकत आहे!" कबीर म्हणाला.

"म्हणजे तुम्हाला आज माझ्या तोंडून ऐकायचंच आहे तर...!" सान्वी म्हणाली.

"हो पण तुला मनापासून म्हणायचं असेल तर..." कबीर म्हणाला.

"I love you Kabir...." सान्वी एका दमात बोलली आणि ओंजळीत चेहरा झाकून घेतला. कबीरने ते ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. पण तरीही तो तिची फिरकी घेऊ लागला.

"काय यार सान्वी तू.... तू एवढं पटकन बोलली की मला निटसं ऐकायलाच आलं नाही." तो खोटं खोटं उदास चेहरा करून बोलला.

"तुम्ही खरंच खुप लबाड आहात, गोड गोड बोलून बरोबर मनातलं सगळं काढून घेता. आता मी नाही परत बोलणार." सान्वी म्हणाली तसं त्याने परत तिचे दोन्ही हात त्याच्या हातात घेतले.

"तुला परत परत काय पण एकदाही बोलायची काही गरज नाहीये, आपलं लग्न झाल्यापासून मी बघतोय, तुझ्या डोळ्यात माझ्यावर असलेलं प्रेमच दिसतंय." कबीर म्हणाला.

"हो पण आता फक्त प्रेमाने आणि बोलण्याने माझं पोट भरणार नाही. मला खरंच खुप भुक लागली आहे हो." सान्वी म्हणाली. रात्री जेवणाची वेळ झाली होती त्यामुळे तिला आता खरंच भुकेची जाणीव झाली होती. एकतर संध्याकाळी इकडे यायचं होतं त्यामुळे त्या गडबडीत तिने काही खाल्लंही नव्हते. त्यामुळे जरा जास्तच भुक लागली होती.

"साॅरी, माझ्या लक्षातच आले नाही. मी जेवण ऑर्डर करतो, बाकी राहिलेलं बोलणं आपण जेवल्यानंतर बोलू." कबीर म्हणाला आणि त्याने काॅल करून जेवणाची ऑर्डर दिली. थोड्या वेळातच वेटर त्यांची जेवणाची ऑर्डर घेऊन आला. कबीर जेवायच्या आधी सान्वीला स्वीट भरवू लागला.

"आतापासून खऱ्या अर्थाने आपल्या संसाराची सुरुवात होतेय, मग ती सुरूवात गोडाने करू या!" असे बोलून कबीरने तिला गुलाबजाम भरवला. मग तिनेही त्याला गुलाबजाम भरवला पण तो भरवत असताना ती खुप लाजत होती.

"तुला एवढं लाजता येतं हे नव्हतं माहिती मला. किती लाजतेय तू, रोज अशीच लाजत राहिली तर मग माझं कसं व्हायचं!" कबीर हसत म्हणाला.

"बसं झालं की आता, अजून किती चिडवाल मला." हे ही ती लाजूनच बोलली. त्यावर कबीर गालातल्या गालात हसला.

"ओके... आता नाही चिडवणार." कबीर म्हणाला. मग दोघेही जेवण करू लागले. जेवण झाल्यावर परत दोघांच्या गप्पा चालू झाल्या.

"जेवण आवडलं का तुला?" कबीरने विचारलं.

"हो आवडलं, जेवण जेवढं छान होतं तेवढीच माझी आजची संध्याकाळ पण छान गेली. मी खुप खुश आहे. खरंच आजचा दिवस माझ्यासाठी खुप स्पेशल आहे. तुम्ही दिलेलं हे सरप्राईज खुप आवडलं मला." सान्वी म्हणाली.

"माझ्याही आयुष्यातला हा खास आणि सुंदर क्षण आहे. आणि तो मला अजून सुंदर बनवायचा आहे. त्यासाठी मी काहीतरी आणले आहे. ते तुला आवडेल की नाही माहित नाही पण तरीही मला तुला द्यायचं आहे." कबीर म्हणाला.

"आता एवढं सगळं केलंय ना माझ्यासाठी, मग अजून काही कशाला!" सान्वी म्हणाली.

"तू बघ तर आधी काय आहे ते.... बघू हात पुढे कर." कबीर म्हणाला तसं सान्वीने काही न बोलता हात पुढे केला. कबीरने लगेच खिशातून एक अंगठी काढली आणि ती सान्वीच्या बोटात घातली. ती अंगठी बघून सान्वीला खुप आनंद झाला. ती खुश होऊन तिच्याच हाताकडे बघत राहिली. कबीरने तिच्या बोटात अंगठी घातली आणि थोडा पुढे झुकला. हळूच तिच्या त्या अंगठी घातलेल्या हातावर ओठ टेकवले. त्याच्या ओठांचा स्पर्श होताच सान्वीच्या अंगावर शहारे आले. तिने लगेच डोळे मिटून घेतले.

सान्वीचे डोळे मिटलेलेच होते. पण तिच्या ओठांवर नकळत एक हळूच हसू उमटलं. त्या एका क्षणात तिच्या मनात कितीतरी भावना एकाच वेळी दाटून आल्या. आनंद, विश्वास, आपलेपणा… सगळं काही.
कबीरने तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचा तो शांत भाव पाहून तो क्षणभर तसाच थांबला. त्याने हळूच तिचा हात घट्ट पकडला.

"सान्वी…" त्याने अलगद तिचं नाव घेऊन तिला आवाज दिला. तेव्हा तिने डोळे उघडले. त्या नजरेत प्रश्न नव्हते, फक्त भावनांची खोली होती. ती काहीच बोलली नाही, पण तिचा हात त्याच्या हातात अधिक घट्ट होत गेला.

"आवडली का अंगठी?" कबीरने विचारलं.

"हो खुप जास्त आवडली." सान्वी म्हणाली.

"सान्वी, माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे, हे पटलंय ना तुला!" कबीरने परत एकदा तिला विचारले.

"हो ते असल्याशिवाय तुम्ही एवढं केलंय का? पण तुमच्या मनात असा प्रश्न का आला?" सान्वीने विचारलं.

"मला तुला प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगायची आहे. तू मला समजून घेशील ना?" कबीरने विचारलं.

"हो कबीर, आता जे काही आहे ते आपल्या दोघांचं आहे. दोघांनी या नात्याला पुढे न्यायचं ठरवलं आहे. तुमचं माझ्यावर प्रेम आहे तसं माझंही तुमच्यावर प्रेम आहे. मग अशावेळी दोघांमध्ये आडपडदा कशाला हवा. आता आपण दोघंच एकमेकांसाठी आहोत आणि आपण एकमेकांसाठीच बनलो आहोत. तेव्हा एकमेकांना समजून घ्यायला हवं आणि सगळं एकमेकांना सांगायला हवं." सान्वी म्हणाली. तेव्हा कबीरनेही आता तिला सगळं काही खरं सांगायची त्याच्या मनाची तयारी केली.

क्रमशः

लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all