अशी जुळली गाठ. भाग - ३८
डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखनस्पर्धा
"सान्वी, माणसाच्या आयुष्यात अचानक काही गोष्टी अशा घडतात की कधी कधी त्याच्या हातात काहीच राहत नाही. नशीब जिकडे नेईल तिकडे त्याला जावंच लागतं." कबीर म्हणाला.
"हो हे तुम्ही अगदी बरोबर बोललात...." सान्वी पुढे काही बोलणार तोच तिच्या मोबाईलची रिंग वाजली. तिने पाहिलं तर श्रावणीचा काॅल होता. ती फोन रिसिव्ह करणार तोच कबीरने तिला अडवलं.
"सान्वी, आता नको ना फोन घेऊ. नंतर बोल... आता हा वेळ आपला आहे. मला बोलायचं आहे तुझ्याशी." कबीर म्हणाला.
"श्रावणीचा काॅल आहे कबीर, तिला आपण कुठे आहोत आणि कशासाठी आलो आहोत हे माहिती आहे, त्यामुळे तसंच काहीतरी कारण असल्याशिवाय ती फोन करणार नाही." सान्वी म्हणाली.
"ओह् असंय का.... मग कर रिसिव्ह." कबीर म्हणाला तसं सान्वीने फोन रिसिव्ह केला.
"हा श्रावणी, बोल ना..." फोन रिसिव्ह करताच सान्वी म्हणाली.
"वहिनी, अगं तुझे आई बाबा आलेत... तसं तू कुठे आहेस हे मी त्यांना सांगितले आहे पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसतेय. तुमचं झालं असेल तर घरी या, हवं तर नंतर परत कधीतरी जा." श्रावणी म्हणाली. आई बाबा आलेत हे ऐकून सान्वीला खुप आनंद झाला. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद कबीरलाही दिसत होता. तिने लगेच फोन ठेवला आणि कबीरला सांगू लागली.
"कबीर, माझे आई बाबा आलेत. चला ना आपण घरी जाऊ, मला तर ते आलेत हे ऐकूनच खुप आनंद झालाय. आज देवाने बहुतेक मला आनंदच आनंद द्यायचा आहे असं ठरवलं आहे वाटतं." सान्वी खुश होऊन म्हणाली.
"हो चल आपण जाऊया, आधी आई बाबांना भेटणं गरजेचं आहे. एकतर ते पहिल्यांदाच आलेत आणि त्यात नेमकं आपण घरी नाही हे बघून त्यांना उगाचच टेन्शन येईल." कबीर म्हणाला. मग ते दोघेही घरी जायला निघाले. थोड्या वेळातच ते दोघेही घरी पोहचले.
सान्वीने दारात पाऊल टाकताच तिच्या आईची तिच्यावर नजर पडली. ती आपल्या मुलीला डोळे भरून पाहत होती. सान्वीचं ते बदललेलं रूप, तिचा मेकअप केलेला चेहरा आणि चेहऱ्यावरचं हसू बघूनच आपली मुलगी इथे किती सुखात आहे, याचा अंदाज तिला आला. आईला बघताच सान्वी धावतच तिच्याकडे गेली आणि तिला मिठी मारली.
"आई, खुप आठवण येत होती तुम्हा दोघांची, बरं झालं तुम्ही मला भेटायला आलात." सान्वी म्हणाली.
"बाळा आम्हाला सुद्धा तुझी खुप आठवण येत होती, बरेच दिवस झाले तुझी भेट झाली नाही म्हणून तुला भेटायला आलो." आई म्हणाली.
"आई, बाबा, पण तुम्ही दोघं अचानक कसे काय आलात? मला काहीच कसं सांगितलं नाही." सान्वीने विचारलं.
"मीच त्यांना फोन करून बोलावलं होतं, खरं तर तुला सरप्राईज द्यायचं होतं पण आजच नेमकं तुझं आणि कबीरचं बाहेर जायचं ठरलं. तुम्ही बाहेर जाणार हे मलाही माहित नव्हतं." सविता म्हणाली.
"आमचं अचानक ठरलं." कबीर म्हणाला.
"बरं आई, बाबा तुम्ही बसा... मी आलेच चेंज करून येते आणि तुम्हाला जेवायला वाढते." सान्वी म्हणाली.
"आमचं जेवण झालंय, तुला जेवायचं असेल तर जा आणि जेवून घे." आई म्हणाली.
"आई, अगं आम्ही बाहेरूनच जेवून आलोय. हे मला डिनरला घेऊन गेले होते." सान्वी लाजून बोलली. तसं सगळेच हसू लागले.
"व्वा व्वा भारीच की मग... सान्वी बाळा, तुझा संसार छान चाललाय हे बघून खुप छान वाटतंय आम्हाला. आज आमच्या डोळ्यांनी पाहिलं तू किती सुखी आहेस." प्रभाकर पाटील म्हणाले.
"हो बाबा, मी खरंच खुप खुश आहे. मला इथे सगळेच खुप जीव लावतात आणि माझी काळजी सुद्धा घेतात." सान्वी म्हणाली.
"कधीच नेहमी खुश रहा, आम्हा आई बाबांना अजून दुसरं काय हवं असतं गं... मुलं खुश असली की आई बाबा पण खुश असतात." प्रभाकर म्हणाले.
"मला माहितीये तुम्ही खुप दिवसांनी तुमच्या मुलीला भेटला आहात, त्यामुळे तुम्हाला तिच्याशी खुप काही बोलावंसं वाटत असेल पण आता खुप उशीर झाला आहे. आता बाकीच्या गप्पा उद्या निवांत मारा, सान्वी... तुझ्या आई बाबांना गेस्ट रूममध्ये घेऊन जा आणि त्यांना आराम करू दे. एवढ्या लांबच्या प्रवासाची सवय नाहीये त्यांना, त्यामुळे ते थकले असतील." सविता म्हणाली तसं सान्वी त्या दोघांना गेस्ट रूममध्ये घेऊन गेली. तिथेच बेडवर त्यांची झोपायची व्यवस्था केली.
"आई, काही लागलं तर मला आवाज दे... नाही तर फोन कर, मी लगेच येईल."
"हो चालेल, जा आता तू पण झोप." आई म्हणाली. मग सान्वी बाहेर जायला मागे वळली तर प्रभाकर पाटील स्वतःच्या हाताने स्वतःचे पाय चेपत होते. ते बघून सान्वी लगेच त्यांच्याजवळ जाऊन बसली आणि त्यांच्या पायांवर हात ठेवले.
"बाबा… पाय दुखताय तर मला सांगायचं ना, तुम्ही असं स्वतःच का चेपताय?" सान्वी काळजीने म्हणाली.
"अगं, तू आताच बाहेरून आली आहे ना मग थकली असशील. त्यात दिवसभर घरात काम, वर आम्ही पाहुणे…" प्रभाकर पाटील म्हणाले.
"एवढं काही काम नसतं मला इथे आणि बाहेर काय मी थोडीच चालत गेली होती. आणि जरी मी थकली असली तरी तुमचे पाय चेपायला असा कितीसा वेळ आणि कष्ट लागणार आहे." सान्वी म्हणाली आणि त्यांच्या पायांना नीट आधार देत चेपायला लागली. ते क्षणभर काहीच बोलले नाहीत. सान्वीच्या हातांच्या स्पर्शात त्यांना मायेची आणि प्रेमाची ऊब जाणवत होती.
"सासरी आलीस पण आमची काळजी करणं सोडलं नाही, ती अजूनही तशीच आहे." प्रभाकर पाटील म्हणाले तसं सान्वीचं मन भरून आलं.
"तुम्ही माझ्यासाठी एवढ्या लांब आलात, मग मी तुमच्यासाठी एवढं करूच शकते ना, खरं तर आता मला इथे बसून मीच माहेरी आल्यासारखं वाटतंय." सान्वी म्हणाली. प्रभाकर पाटलांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यानंतर ती त्यांचे पाय चेपत चेपत त्यांच्या इतक्या गप्पा रंगल्या की त्यांना वेळेचं भानही नाही राहिलं.
इकडे कबीर रूममध्ये बसून सान्वीची वाट बघत होता. खरं तर त्याने आज तिला इशिता आणि त्याचा भुतकाळ सांगायचा होता, त्याने तसं बोलायला सुरुवात पण केली होती पण नेमकं त्याचवेळी श्रावणीचा फोन आला त्यामुळे त्याला काही सांगताच आले नाही. आता तो त्याच विचारात होता.
"आज सान्वीला इशिता बद्दल काहीच सांगता आलं नाही आणि आता तिचे आई बाबा आहे तोपर्यंत काही सांगताही येणार नाही... पण ठिक आहे एवढे दिवस गेले आता अजून थोडे दिवस जाऊदे, मग मी तिला सगळं सांगेल. पण ही सान्वी अजून येईना का? आजच मी तिला माझ्या मनातले प्रेम बोलून दाखवलं आणि नेमकं आजच तिने यायला उशीर केला." कबीर स्वतःशीच बोलत होता आणि सारखा सारखा दाराकडे बघत होता. पण सान्वी काही आलीच नाही. मग तो उठला आणि सारखा फेऱ्या मारू लागला. दर दोन मिनिटाला तो दाराबाहेर डोकावत होता आणि सान्वी आली का ते बघत होता.
बराच वेळ झाला तरी सान्वी आली नाही मग तो वैतागला आणि बेडवर येऊन आडवा झाला. सान्वीची वाट बघता बघता तो तसाच झोपी गेला.
सान्वीच्या बाबांचे पाय चेपता चेपता आणि त्यांच्याशी बोलता बोलता त्यांना झोप लागली. तसं सान्वी हळूच त्यांच्यापासून मागे झाली आणि उठली.
"आई, बाबांना आता छान झोप लागली आहे... तू पण झोप. मी जाते आता झोपायला." सान्वी हळू आवाजात बोलली तसं आईने मान हलवली आणि ती ही झोपली. मग सान्वीने दोघांच्याही अंगावर ब्लॅंकेट टाकलं आणि तिच्या रूममध्ये आली आणि पाहिलं तर कबीरला झोप लागली होती. ते बघून तिने कपाळावर हात ठेवला.
"अरे देवा... हे झोपले पण, यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. आमचं बोलणं अर्धवटच राहिलं. जाऊदे आता सकाळीच बोलू." सान्वी मनातच बोलली आणि सोफ्याकडे जाऊ लागली. पण परत तिची पावलं थांबली.
"कबीर माझ्यावर प्रेम करताय हे त्यांनी मला सांगितलंय तर आता मला सोफ्यावर झोपायची काय गरज आहे.... मी बेडवर झोपूच शकते." असा विचार करून सान्वी बेडवर बसायला लागली पण परत मागे झाली.
"नाही... नाही.... त्यांनी मला काहीच सांगितलं नाही तर मी लगेच बेडवर कशी झोपू शकते. मी स्वतःहून त्यांच्या बाजूला झोपली तर ते काय विचार करतील." सान्वी परत असाही विचार करू लागली. बेडवर झोपावं की सोफ्यावर या गोंधळातच ती बराच वेळ तशीच उभी राहिली. नंतर जेव्हा जास्तच झोप येऊ लागली तेव्हा ती सोफ्यावरच झोपली.
क्रमशः
लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा