Login

अशी जुळली गाठ. भाग - ३९

कबीर आणि सान्वीच्या अबोल प्रेमाची कहाणी
अशी जुळली गाठ. भाग - ३९

डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखनस्पर्धा.

सकाळ होताच सान्वीला जाग आली आणि त्यावेळी तिच्याजवळ कोणीतरी असल्याचं जाणवलं म्हणून तिने डोळे उघडून पाहिलं तर तिला तिच्या पोटावर हात दिसला म्हणून तिने तसंच मान वळवली आणि बाजूला पाहिलं तर कबीर होता आणि तो चक्क तिला मिठीत घेऊन झोपला होता, आणि ते दोघेही बेडवर होते. त्याला एवढं जवळ बघून तिचं हृदय जोरजोराने धडधडायला लागलं. ती बेडवर आहे हे बघून तिलाही आश्चर्य वाटले.

"मी तर रात्री सोफ्यावर झोपली होती मग इथे बेडवर कशी काय आली?" सान्वी मनातच बोलली आणि पटकन कबीर पासून बाजूला होऊ लागली पण कबीरने तिला स्वतःकडे ओढून घेतलं. तो तिला उठूच देत नव्हता.

"कबीर, सोडा ना मला... उशीर होईल परत सगळं आवरायला." सान्वी म्हणाली.

"तू माझ्यापासून कितीही सुटायचा प्रयत्न कर, पण मी तुला सोडणारच नाही." कबीर म्हणाला.

"मी ही तुम्हाला सोडून कुठेही पळून जात नाहीये, पण आता जाऊद्या मला. आई बाबा उठले असतील त्यांना काय हवं ते बघावं लागेल." सान्वी म्हणाली तसं कबीर तिच्यापासून थोडा बाजूला झाला. मग ती ही उठून बसली.

"काय हो... मी तर सोफ्यावर झोपली होती ना, मग इथे कशी आली?" सान्वीने विचारलं तसं कबीर हलकसं हसला.

"मी आणलं तुला उचलून आणि बेडवर झोपवले." कबीर म्हणाला.

"मग मला काहीच कसं कळलं नाही!" सान्वी.

"कसं कळेल, चांगली गाढ झोपेत होतीस तू. आता तुला सोफ्यावर झोपायची गरज नाही, आजपासून तुझी झोपायची जागा इथे माझ्याजवळ आहे." कबीर म्हणाला आणि तिच्याकडे मिश्कीलपणे बघत राहिला. त्याची नजर बघून तिने लगेच खाली नजर झुकवली.

"असं बघू नका... मला एकदमच पोटात गोळा आल्यासारखं होतंय." सान्वी म्हणाली.

"आता या सगळ्याची तुला सवय करून घ्यावी लागणार आहे. आता फक्त बघतोच आहे पण अजून खुप काही बाकी आहे." कबीर म्हणाला आणि तो हळूहळू तिच्या चेहऱ्यावर त्याचा चेहरा नेऊ लागला तोच सान्वी पटकन मागे झाली आणि तिथून पळू लागली.

"तुला जिकडे पळायचे तिकडे पळ, शेवटी पळून झाल्यावर माझ्याकडे येणारच आहे." कबीर हसत म्हणाला तसं सान्वी लाजली आणि फ्रेश व्हायला गेली. मग कबीरने इशिताला फोन केला. एवढ्या सकाळीच त्याचा फोन बघून ती सुद्धा खुश झाली.

"हॅलो... गुड मॉर्निंग, आज चक्क सकाळी सकाळीच तुला माझी आठवण आली. माझं नशिबच म्हणायचं." इशिता हसून म्हणाली.

"मला चिडवून झालं असेल तर कामाचं बोलू का आता मी!" कबीर शांतपणे बोलला.

"ओ... साॅरी, कधी कधी माझ्या लक्षात राहत नाही मग मी अशी पटकन काहीतरी बोलून जाते." इशिता म्हणाली.

"इट्स ओके... बरं ऐक, मला आज ऑफिसला यायला थोडा उशीर होईल. तोपर्यंत तू नीट लक्ष दे. कदाचित आपल्याला दुपारनंतर साईटवर जावं लागेल त्यामुळे तुला घरी जायला उशीर होऊ शकतो." कबीर म्हणाला.

"आता आणि साईटवर कशाला जायचं आहे?" इशिताने विचारलं.

"पोलिस येणार आहे तिथे, त्या जागेवर काही पुरावा वगैरे भेटतोय का ते शोधणार आहे. आता जोराने तपास सुरू करावा लागणार आहे. जेवढ्या लवकर गुन्हेगार सापडेल तेवढ्या लवकर आपल्याला त्या जागेवर नवीन बांधकाम करता येईल." कबीर म्हणाला.

"बरोबर बोलतोय तू... पण तिकडचं सगळं तर तुझे बाबा बघणार होते ना मग आपण का जायचं आहे?" इशिता.

"त्याचं काय झालं... रात्री सान्वीचे आई बाबा आलेत, आता ते पहिल्यांदाच आलेत तर बाबांना कसं ऑफिसला येता येईल! आणि मी सुद्धा त्यामुळेच थोडा लेट येणार आहे." कबीर म्हणाला.

"बरं ठिक आहे, तू नको कामाचं टेन्शन घेऊ. मी करेन सगळं मॅनेज." इशिता म्हणाली आणि तिने फोन ठेवला. कबीरनेही मग हसतच फोन ठेवला. त्याला इशिताचा खुप अभिमान वाटत होता. तिने आहे ती परिस्थिती स्विकारली आणि मनात कुठलीही अढी ठेवली नाही याचा त्याला खुप आनंद झाला होता. तो मनातल्या मनातच तिचं कौतुक करत होता. त्याच्या मनात इशिताच्या अशा चांगल्या वागण्याचे विचार चालू होते. तो त्या विचारात असताना त्याच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आलं आणि नेमकं त्याचवेळी सान्वी फ्रेश होऊन आली. ती कबीरला असं एकट्याला हसताना बघून जरा गोंधळली.

"काय हो... एवढं एकटेच गालातल्या गालात काय हसताय, कुठल्या गर्ल फ्रेंडचा विचार करताय की काय!" सान्वीने हसतच विचारलं तसं कबीर विचारातून बाहेर आला आणि तिच्याकडे बघू लागला.

"एवढी सुंदर बायको समोर असताना कोणी गर्लफ्रेंडचा विचार कसा करेल." कबीर म्हणाला.

"नसाल करत तर तुमच्यासाठी तेच चांगलं आहे. तुमच्या आयुष्यात मी सोडून दुसरं कोणी असणं मला सहनच होणार नाही. म्हणजे इथून मागे कोणी असती तर ते तुम्ही सांगितलं असतं पण इथून मागे जशी कोणी नव्हती तशीच इथून पुढेही मला मी सोडून दुसरी कोणी नकोय." सान्वी हसून बोलली पण तिच्या आवाजात एक करारीपणा होता. तो कबीरला चांगलाच जाणवला. तिचं बोलणं ऐकून कबीरची बोलतीच बंद झाली.

"मी आलोच फ्रेश होऊन येतो. तोपर्यंत तू आई बाबांकडे बघून ये." कबीर म्हणाला तसं सान्वी लगेच तिच्या आई बाबांकडे गेली. कबीर मात्र घाबरून तिथेच बसून होता.

"बापरे कसली डेंजर आहे ही सान्वी, मी खुप मोठी चुक केली आहे. जेव्हा तिने मला विचारलं होतं तेव्हाच तिला इशिता बद्दल सगळं सांगायला हवं होतं. आता जर मी इशिता बद्दल काही सांगितले तर ही मला माफ करणारच नाही. त्यापेक्षा हिला काही सांगायलाच नको, असंही इशिता बद्दल कोणालाच काही माहीत नाही आणि आता इशिता पण माझ्याकडे त्या नजरेने बघत नाही, त्यामुळे ही गोष्ट कधीच कोणाला माहिती होणार नाही. आता इशिता आणि माझा भुतकाळ हा भुतकाळच राहूदे आणि तो तसाच मनाच्या कोपऱ्यात बंद राहूदे." कबीर स्वतःशीच बोलला आणि फ्रेश व्हायला गेला.

सान्वी तिच्या आई बाबांकडे आली तेव्हा त्यांचं सगळंच आवरलं होतं आणि ते बसून होते.

"हे काय तुमच्या अंघोळी वगैरे सगळं आटोपलं पण... काय आई बाबा तुम्ही पण ना... आता इथे काय काही कामं आहेत का... मस्त निवांत उठायचं होतं ना!" सान्वी म्हणाली.

"अगं आता एवढ्या वर्षांची सवय आहे ती कशी जाईल. रोजच्या सवयीने जाग आलीच बघ!" आई म्हणाली.

"बरं बसा तुम्ही, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते." सान्वी म्हणाली.

"अगं आमचा चहा झालाय. मघाशीच सविता ताईंनी आम्हाला चहा आणून दिला. त्यांनीही इथेच आमच्यासोबत चहा घेतला." आई म्हणाली.

"अरे देवा म्हणजे मलाच उशीर झाला वाटतं उठायला. मी आलेच जरा नाष्ट्याचं बघते. नाष्टा झाला की मग तुम्हाला आवाज देते. मग या तुम्ही." सान्वी म्हणाली आणि बाहेर गेली. ती दाराच्या बाहेर थोडी पुढे गेली तोच कशात तरी तिचा पदर अडकला म्हणून ती तो काढू लागली आणि त्याचवेळी तिच्या कानावर तिच्या आई बाबांच्या बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. तसं सान्वी तिथेच उभी राहून त्यांचं बोलणं ऐकू लागली.

"एक बोलू का हो?" सान्वीची आई सान्वीच्या बाबांना म्हणाली.

"बोल ना...." प्रभाकर पाटील म्हणाले.

"सान्वीच्या सासरची माणसं सगळी खुप चांगली आहे, तिचे सासू सासरे तिची खुप काळजी घेताय. अगदी स्वतःच्या मुलीप्रमाणे तिला जपताय. एवढंच नाही तर कबीर राव सुद्धा तिला खुप जपताय. काल आपण आलो तेव्हा ते दोघेही एकत्रच बाहेरून आले. एवढं सगळं असताना सुद्धा सान्वीच्या चेहऱ्यावरचा आनंद मला असा उसना का वाटतोय काय माहीत!" आईने तिच्या मनात असलेली शंका बोलून दाखवली. बाहेर जेव्हा सान्वीने हे बोलणं ऐकलं तेव्हा तिचे डोळे पाणावले. आपल्या आईला असं का वाटतंय हाच प्रश्न तिच्या मनात आला. पण परत बाबा काय म्हणताय हे ती ऐकू लागली.

"तू काहीही विचार करतेय म्हणून तुला तसं वाटतंय, आपली मुलगी खरंच खूप सुखात आहे. ती आपल्या घरी आली होती तेव्हा पण तू पाहिलं होतं ना... तेव्हा तिला आनंदी बघून तू किती खुश होती. आताही तसंच तिचा आनंद बघ आणि भलते सलते विचार करू नकोस, नाही तर आपल्या मुलीच्या आनंदात आपल्यामुळेच विरजण पडायचं." सान्वीचे बाबा म्हणाले. त्यावर आई काही बोलणार तोच त्यांनी तिला थांबवलं आणि नीट समजून सांगितले तेव्हा तिनेही तो विषय तिथेच थांबवला.

क्रमशः

लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all