Login

अशी जुळली गाठ. भाग - ४०

कबीर आणि सान्वीच्या अबोल प्रेमाची कहाणी
अशी जुळली गाठ. भाग - ४०

डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखन स्पर्धा.

समोरून कबीर येताना दिसताच सान्वीने डोळे पुसले आणि ती सरळ किचनमध्ये जाऊ लागली. तोच कबीरने तिला अडवले.

"काय गं अशी माझ्याकडे न बघताच का पुढे चालली आहे?" कबीरने विचारलं.

"नाष्टा बनवायचा आहे ना म्हणून..." सान्वी एकदम शांत आवाजात बोलली आणि पुढे गेली. कबीरला तिच्या आवाजात काहीतरी वेगळंच जाणवलं. पण त्याचवेळी त्याला कामाचा फोन आला तेव्हा त्याने तो रिसिव्ह केला. नंतर सान्वीचे आई बाबा पण बाहेर आले. सगळ्यांनी एकत्र नाष्टा केला. थोड्या फार गप्पा झाल्या. मग सान्वी तिच्या आई बाबांना त्यांचा पुर्ण बंगला दाखवू लागली.

सगळ्यांच्या रूम बघून झाल्यावर सान्वी त्यांना तिच्या रूममध्ये घेऊन आली. सगळं घर बघून तिच्या आई बाबांच्या चेहऱ्यावर खुप आनंद दिसत होता.

"सान्वी, मस्तच घर आहे गं तुमचं! घर कसलं अगदी मोठा महालच आहे. किती वेळ लागला एवढं मोठं घर बघायला आम्हाला. आणि ही तुमची रूम पण छान आहे." आई म्हणाली तसं सान्वी हलकसं हसली. नंतर तिची आई सगळ्या रूमचं निरिक्षण करू लागली. तेव्हा तिला एक गोष्ट खटकली.

"सान्वी, तुमचा दोघांचा फोटो नाही का रूममध्ये? नाही म्हणजे हल्ली ठेवतात असे फोटो वगैरे म्हणून विचारलं." आईच्या बोलण्यावर सान्वी पण जरा गडबडली. पण तरीही तिने उत्तर दिलंच.

"आई, तुला माहितीये ना आमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं आहे ते... त्यावेळी फोटोही धड काढले नाही, त्यानंतर परत फोटो काढायला वेळही मिळाला नाही आणि आता मी आणि हे बाहेर फिरायला जाणार होतो पण त्यांच्या ऑफिसमध्ये एक प्राॅब्लेम झाला. त्यामुळे नाही जाता आलं. तो प्राॅब्लेम साॅल्व्ह झाला की मग आम्ही फिरायला जाणार आहोत ना मग तेव्हाच छान फोटो काढू आणि इथे लावू. तुम्ही पुढच्या वेळी याल ना तेव्हा तुम्हाला दिसतील मग आमचे फोटो." सान्वी त्यांना पटवून देत होती. खरं तर त्यांचं नातंच कबीरने मान्य केले नव्हते त्यामुळे फोटो काढलेच नव्हते. पण आता इथून पुढे ते कबीर नक्की काढेल हा विश्वास तिला होता.

"सान्वी, तुझं खरंच सगळं सुरळीत चालू आहे का गं? की आम्हाला दाखवायला म्हणून तू आनंदी राहतेय." तिच्या आईला राहवलंच नाही म्हणून तिने विचारलं.

"आई, काही पण काय विचारतेय तू. अगं मी खरंच खुप खुश आहे. उलट तुम्ही आणि मी आधी विचार सुद्धा केला नव्हता तेवढी मी खुश आहे. तुला माझ्याकडे बघून मी दुःखी आहे असं वाटतंय का!" सान्वी म्हणाली.

"नाही गं, तू खुशच दिसतेय पण माझ्याच मनात विनाकारण रुखरुख लागून आहे." आई म्हणाली. मग सान्वीने तिला ती खुश असल्याचा तिला विश्वास दिला. ती बोलत असताना कबीर आत आला आणि सान्वीला आवाज दिला.

"सान्वी, मी ऑफिसला चाललोय." कबीर म्हणाला.

"काय हो तुम्ही, आज एक दिवस गेला नाही तर नाही चालणार का!" सान्वी म्हणाली.

"खरं तर आई बाबा आलेत म्हणून माझी सुद्धा जायची इच्छा नव्हती पण आज साईटवर जावं लागणार आहे." कबीर म्हणाला.

"बरं ठिक आहे, पण लवकर या घरी." सान्वी.

"हो आणि तू पण आई बाबांकडे छान लक्ष दे, त्यांना काय हवं ते बघ." कबीरचं ते काळजीचं बोलणं ऐकून त्यांच्याही मनाला समाधान वाटले. मग कबीर सान्वीला सांगून ऑफिसला जाऊ लागला. जाताना तो सारखा मागे वळून सान्वीकडे बघत होता. तेव्हा तिच्या बाबांनी तिच्या आईला दाखवलं. तेव्हा जरा तिचं मन शांत झालं.

****************

कबीर ऑफिसला आला तेव्हा इशिताचं कामच चालू होते.  तो येताच ती त्याला काही अपडेट्स देऊ लागली. नंतर बोलता बोलता कबीरचं लक्ष तिच्या कानाकडे गेलं तेव्हा त्याने विचारलं.

"इशिता, एकाच कानात कानातले घालायची नवीन फॅशन निघाली आहे की काय." कबीरने हसतच विचारलं.

"काहीही काय... अशी कुठे फॅशन असते का कबीर?" इशिता म्हणाली.

"मग दुसऱ्या कानात काहीच का नाही घातलं?" कबीरने विचारलं तसं तिने तिच्या दोन्ही कानांना हात लावला. तर खरंच तिच्या एका कानात कानातलं नव्हते.

"मी सकाळी आली तेव्हा तर होतं... मला वाटतं की ते कुठे तरी पडलं असेल." इशिता म्हणाली आणि तिने दुसरं कानातलं काढून पर्समध्ये ठेवलं.

"माझं सोड, तू मला काहीतरी सांगणार होता!" इशिता म्हणाली.

"कुठे काय काहीच नव्हतो सांगणार मी." कबीर.

"अरे असं काय करतोयस, काल नाही का तू बाहेर गेला आणि लगेच पाच मिनिटात परत आला." इशिताने त्याला आठवण करून दिली तेव्हा त्याच्या लक्षात आले की तो श्रावणीला फोन करायला गेला होता. मग तो इशिताला सांगू लागला.

"ऍक्च्युली काल मला सान्वीला सरप्राईज द्यायचं होतं मग मी श्रावणीला फोन केला आणि तिला हाॅटेलमध्ये घेऊन यायला सांगितलं. काल मी तिला सगळं सांगितलं. खरं तर मी कधी आमच्या नात्याचा स्विकार करतोय याचीच ती वाट बघत होती. त्यामुळे काल माझ्या मनातलं ऐकून खुप खुश झाली ती." कबीर म्हणाला.

"अरे व्वा चांगलंय की मग, पण आपल्याबद्दल नाही सांगितलं का तू तिला?" इशिता.

"खरं तर सांगणार होतो पण नाही सांगता आलं, पण आता आपला भुतकाळ भुतकाळच राहूदे असं वाटतंय मला." कबीर म्हणाला.

"नाही कबीर, तू अशी चुक करू नकोस. पुढे जाऊन तिला माहित झाले तर याचे परीणाम खुप वाईट होतील. तेव्हा आताच तिला विश्वासात घेऊन सगळं सांगून टाक." इशिता म्हणाली.

"नाही, प्लीज आता इथून पुढे तो विषय नकोच. तू माझी चांगली मैत्रीण म्हणून रहा आणि मागचं तू ही विसरून जा आणि मी ही विसरून जातो. आपण दोघांनी नाही सांगितले तर कोणालाच माहीत होणार नाही." कबीर म्हणाला त्यावर इशिता पुढे काही बोलणार तोच त्याने तिला अडवलं.

"प्लीज, आता तो विषय बंद... चल आपल्याला साईटवर जायचं आहे." कबीर म्हणाला तसं इशिताही नाईलाजाने शांत झाली आणि त्याच्यासोबत साईटवर गेली.

साईटवर पोलिसांनी आज परत सगळीकडे शोधाशोध सुरू केली. पण आजही तिथे काही संशयास्पद दिसले नाही. बराच वेळ त्यांची शोधाशोध चालू होती. पण काहीच हाती लागेना.

"कबीर सर, आता संध्याकाळ झाली आहे तुम्ही जाऊ शकता, आम्ही आमचा तपास सुरू ठेवतो. आम्हाला जर काही माहिती मिळाली तर आम्ही तुम्हाला कळवतो." पोलिस म्हणाले तसं कबीर आणि इशिता तिथून घरी यायला निघाले. कबीरने इशिताला तिच्या घरी सोडलं आणि तो ही घरी गेला.

कबीर घरी आल्यावर त्याने सन्वीला आवाज दिला तेव्हा ती लगेच बाहेर आली.

"खुप उशीर झाला तुम्हाला यायला." सान्वीने विचारलं.

"हो आज जरा जास्तच काम होतं. पण हे काय आई बाबा कुठे आहेत? कोणीच कसं दिसत नाही." कबीरला घरात कोणीच दिसलं नाही म्हणून त्याने विचारले.

तुमचे आई बाबा आणि माझे आई बाबा फिरायला गेले आहे. रात्री उशिर होणार आहे त्यांना घरी यायला." सान्वी म्हणाली.

"अरे व्वा, छान आहे की मग!" कबीर हसतच बोलला.

"हो ना, त्यानिमित्ताने माझ्या आई बाबांनाही मुंबई बघायला मिळेल." सान्वी म्हणाली.

"आणि आपल्याला एकांत!" कबीरने तिला एका हाताने जवळ घेतलं आणि बोलला तसं तिने लाजून त्याच्या छातीवर डोकं टेकवले. तिचं लाजणं बघून तो ही हसला.

"माझं सगळं आयुष्य तुझं लाजणं बघण्यातच जाणार आहे बहुतेक." कबीर म्हणाला.

"काहीही बोलता तुम्ही." सान्वी म्हणाली.

"हे बघ आता हे सुद्धा तू लाजूनच बोलतेय." कबीर म्हणाला.

"तुम्ही जर सारखं असं बोलत राहिलात तर मी लाजणार नाही तर काय होईल." सान्वी म्हणाली.

"बरं आता यापुढे नाही म्हणणार. मग तर झालं..." कबीर म्हणाला त्याचवेळी त्याला एक फोन आला. तो फोन रिसिव्ह करणार तोच सान्वीने त्याचा मोबाईल घेतला.

"आताच आलाय ना तुम्ही, मग नो फोन्स, नो काॅल्स. ओन्ली मी." सान्वी अगदी लाडीकपणे बोलली.

"हो पण कोणाचा फोन आहे ते तरी मला बघू दे." कबीर म्हणाला आणि त्याने पाहिलं तर इन्स्पेक्टर शिंदेंचा फोन होता.

"साॅरी सान्वी, पण हा काॅल खुप महत्वाचा आहे. तो मला घ्यावाच लागेल." कबीर म्हणाला आणि त्याने काॅल रिसिव्ह केला.

"हा शिंदे सर, बोला..." कबीर म्हणाला.

"कबीर सर, आम्हाला इथे एक वस्तू सापडली आहे. मी तुम्हाला तिचा फोटो पाठवतो. तुम्हाला ती ओळखू येतेय का बघा!" शिंदे म्हणाले तसं कबीर हो म्हणाला आणि शिंदेनी पाठवलेला फोटो तो बघू लागला. तो फोटो बघून त्याचा विश्वासच बसत नव्हता. तो परत परत एकदम झूम करून तो फोटो बघत होता.

क्रमशः

लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"