अशी जुळली गाठ. भाग - ४१
डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखन स्पर्धा.
तो फोटो बघून एकाच वेळी कबीरला राग, दुःख, वेदना आणि विश्वासघात अशा भावना दाटून आल्या. कसं रिऍक्ट व्हावं आणि काय बोलावं हेच त्याला कळत नव्हते. तो गपकन खाली बसला. दोन्ही हातांनी डोकं गच्च पकडून ठेवलं होतं. आज पहिल्यांदाच त्याला हरल्यासारखे वाटत होते. आतून पुर्णपणे तुटून पडला होता तो.
कबीरला एवढं तुटलेलं बघून सान्वीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिलाही त्याला असं बघायची सवय नव्हती. तिच्या डोळ्यात खाळकन पाणी आलं. ती खाली बसली आणि त्याचा हात हातात घेतला.
"कबीर, काय झालयं सांगा ना मला. मला तुम्हाला असं बघून खुप काळजी वाटतेय." सान्वी विचारत होती पण तो काहीच सांगेना. सांगणार तरी कसं होता, आज त्याचा त्याच्याच जवळच्या व्यक्तीने खुप मोठा विश्वासघात केला होता. ती परत परत विचारच होती पण तरीही तो काहीच बोलला नाही. डोळ्यात पाणी दाटून आले होते.
"कबीर, प्लीज काहीतरी बोला... एकतर आई बाबा बाहेर गेलेय, माझ्या मनात नको नको ते विचार येताय. तुम्ही काही बोलला नाही तर मी तरी काय समजायचं!" सान्वी अगदी रडकुंडीला आली होती. तरीही तो काहीच बोलला नाही. त्याच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हते. शेवटी ती धावतच श्रावणीकडे गेली.
"श्रावणी...." सान्वीचा तो रडवेला आवाज ऐकून श्रावणी पण घाबरली.
"वहिनी, काय झालंय? तू एवढी काळजीत का दिसतेय?" श्रावणीने काळजीने विचारलं.
"क... बी... र..." ती पुढे काही बोलूच शकली नाही. आता मात्र श्रावणी खुपच घाबरली.
"दादाचं काय वहिनी...? काहीतरी बोल..." श्रावणी म्हणाली तसं सान्वीने बाहेरच्या दिशेने हात केला. मग श्रावणीने तिला बाजूला केलं आणि पायऱ्यांवरून धावतच खाली आली. तिच्या मागोमाग सान्वी सुद्धा आली. श्रावणीने समोर कबीरला टेन्शनमध्ये बघून तिलाही टेन्शन आले.
"दादा, काय झालंय? काही प्राॅब्लेम आहे का?" श्रावणीने विचारलं पण कबीरने तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. त्याच्या मनात आता काय चालू होतं ते त्याचं त्यालाच माहीत होतं. तो काहीच बोलत नाही हे बघून श्रावणीने सान्वीकडे पाहिलं. मग सान्वी पुढे आली आणि परत विचारू लागली.
"तुम्ही काहीच बोलू नका, पण आई बाबा ठिक आहे का... त्यांच्यासोबत काही घडलं नाही ना एवढंच मला सांगा." सान्वी म्हणाली.
"ते ठिक आहे, ऑफिसमध्ये एक प्राॅब्लेम झालाय. मी स्टडी मध्ये आहे. प्लीज मला डिस्टर्ब करायला कोणीही येऊ नका." कबीर कसं बसं स्वतःला सावरत बोलला आणि स्टडी रूममध्ये गेला. तो गेल्यावर या दोघीही एकमेकींकडे बघू लागल्या.
"श्रावणी, नेमकं काय झालं असेल गं...? तुला काही अंदाज आहे का?" सान्वीने विचारलं.
"काय घडलं असेल याचा अंदाज नाही लावता येत. पण कुठलंही संकट आलं तरी दादा एवढं टेन्शन कधीच घेत नाही. एवढं तर मी त्याला ओळखते." श्रावणी म्हणाली.
"आपण इशिताला फोन करून बघूया का? कदाचित तिला काही तरी माहिती असेल." सान्वी म्हणाली.
"नको, दादा तुला काही सांगत नाही, मलाही काही सांगितले नाही मग तिला तरी कसं काही माहिती असेल." श्रावणी म्हणाली.
"मग आता काय करायचं आपण?" सान्वी म्हणाली.
"आई बाबा घरी येईपर्यंत शांत राहणंच ठिक आहे. ते आल्यावर बघू आपण." श्रावणी म्हणाली. तसं सान्वी खाली बसली. तिचे डोळे पाणावलेले होते.
"कबीर घरी आले तेव्हा खुप खुश होते. माझ्याशी सुद्धा छान बोलले... पण अचानक एक फोन आला आणि त्या फोन मुळे ते पुर्णच हादरून गेले." सान्वी म्हणाली.
"नेमकं काय झालं असेल काय माहीत, पण मला खात्री आहे की दादा सगळं काही ठिक करेल. तू नको टेन्शन घेऊ." श्रावणी सान्वीला धीर देत होती पण तिलाही टेन्शन आले होते. बराच वेळ दोघीही तशाच बसून होत्या.
रात्री जेवणाची वेळ झाली तेव्हा विमल मावशी त्यांना जेवायला बोलवायला आली. पण दोघींची जेवायची इच्छा नव्हती. सान्वी उठली आणि कबीरला जेवायला बोलवायला गेली आणि तिने पाहिलं तर स्टडी रूमचं दार आतून बंद होतं. मग तिने बाहेरूनच कबीरला आवाज दिला.
"कबीर, जेवायला चला ना..." सान्वीने दोन वेळा आवाज दिला तेव्हा कबीरने दार उघडले.
"मला भुक नाहीये, तुम्ही जेवून घ्या आणि प्लीज परत मला आवाज द्यायला येऊ नकोस." त्याचा आवाज गहिवरलेला होता पण त्याही अवस्थेत तो सान्वीशी अतिशय नम्रपणे बोलला. त्याचा त्रास आणखी वाढू नये म्हणून सान्वी पण जास्त वेळ न थांबता तिथून निघून गेली.
"दादा येतोय का जेवायला?" श्रावणीने विचारलं. तसं सान्वीने नकारार्थी मान हलवली.
"तो नाही म्हणाला आहे म्हणजे तो जेवणारच नाही. तो जेवणार नसेल तर मलाही जेवायची इच्छा नाहीये." श्रावणी म्हणाली.
"मुलींनो, तुमचं काय झालंय मला माहित नाही पण असं भरल्या घरात उपाशी राहू नये. घरात मोठी माणसं कोणीच नाहीये. त्यामुळे तुमची जबाबदारी माझ्यावर आहे. मी स्वयंपाक केलाय, तुम्ही कोणीच जेवलं नाही आणि ते जेवण वहिनींनी पाहिलं तर मी त्यांना काय उत्तर देऊ!" विमल मावशी म्हणाली. त्या जेवायला तयार नव्हत्या पण तरीही तिने त्यांना जबरदस्तीने जेवायला दिलं. दोघींनी कसं बसं थोडं फार खाल्लं.
त्यांची जेवणं झाल्यावर कबीरचे आणि सान्वीचे आई बाबा बाहेरून आले. त्या चौघांच्याही चेहऱ्यावर हसू होतं. ते बोलत बोलतच आत आले. त्यांचा आवाज ऐकताच श्रावणी आणि सान्वीने चेहऱ्यावर खोटं हसू आणलं.
"अरे तुम्ही दोघी अजून इथेच बसल्याय, गप्पा चालल्या आहेत वाटतं." सविता त्या दोघींना बघून म्हणाली. तसं दोघींनी चेहऱ्यावर हसू आणत एकसाथच मान हलवली.
"पण कबीर कुठे आहे? दिसत नाही तो!" विक्रम म्हणाले.
"त्यांचं जरा महत्वाचं काम चालू आहे त्यामुळे ते स्टडी रूममध्ये आहे." सान्वीने सांगितलं. त्याचं काय काम चालू असेल या विचाराने विक्रमही जरा गोंधळले. पण सान्वीचे आई बाबा असल्यामुळे त्यांनी काही विचारलं नाही.
"आई, बाबा कसं वाटलं तुम्हाला फिरून?" सान्वीने चेहऱ्यावर हसू आणत विचारलं.
"छान वाटलं, आज खुप दिवसांनी बाहेर फिरलो. गावी कामामुळे कुठे फिरणंही होत नाही. पण आता सकाळी जायला हवं आम्हाला." प्रभाकर पाटील म्हणाले.
"हे काय बाबा, आताच आला नाही तर लगेच चाललात पण तुम्ही! अजून दोन दिवस राहिला असता ना..." सान्वी म्हणाली.
"नाही गं... मुलीच्या सासरी जास्त दिवस नसतं राहायचं, इथे आलो तुला भेटलो. तुझा सुखी संसार पाहिला आणि मन समाधानी झालं. आता नको अडवू आम्हाला. एकतर घरी समीर एकटाच आहे. त्याला एकट्याला सोडून कसं राहणार." प्रभाकर पाटील म्हणाले. मग सान्वीनेही जास्त जबरदस्ती केली नाही.
"तुम्ही सकाळी जाणार आहे ना मग आई, मला आज तुझ्याजवळ झोपायचं आहे. झोपू ना मी...." सान्वी म्हणाली आणि तिने लगेच तिच्या आईला मिठी मारली. तिचे डोळे पण भरून आले.
"बरं झोप बाई... पण हे काय लगेच डोळ्यात पाणी. वेडी आहेस तू.... अगं आम्ही उद्या जरी थांबलो तरी नंतर जावं लागणारच आहे ना...." आई म्हणाली. तसं सान्वीने डोळे पुसले.
"तुम्ही दमला असाल ना... चला झोपायला, सकाळी परत लवकर उठावे लागेल." सान्वी म्हणाली आणि त्यांच्यासोबत ती गेस्ट रूममध्ये जाऊ लागली तोच विक्रमने तिला थांबवलं.
"सान्वी, त्यांना जाऊदे पुढे... माझं जरा एक काम आहे तुझ्याकडे, तेवढं झालं की मग तू जा." विक्रम म्हणाले तसं तिचे आई बाबा पुढे गेले आणि सान्वी थांबली.
"कबीर नक्की कुठे आहे?" विक्रमने विचारलं.
"ते स्टडी रूममध्ये आहे, काम करताय!" सान्वी म्हणाली.
"आता त्याला काहीच काम नाहीये हे माहिती आहे मला. काय झालयं ते सांग!" विक्रम म्हणाले.
"काय झालंय ते त्यांनी सांगितले नाही पण असं काहीतरी झालंय त्यामुळे ते दुखावले गेले आहे आणि रागावले सुद्धा आहे. मी खुप विचारलं पण त्यांनी काहीच सांगितलं नाही." सान्वीने सांगितलं.
"बरं ठिक आहे मी बघतो जा तू!" विक्रम म्हणाले तसं सान्वी तिथून गेली. आई बाबांशी थोडं फार बोलून मग ते झोपले पण सान्वीला काही झोप येत नव्हती. ती फक्त डोळे मिटून पडली होती. तिच्या डोक्यातून काही केल्या कबीरचे विचार जात नव्हते.
क्रमशः
लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा