अशी जुळली गाठ. भाग - ४२
डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखन स्पर्धा
कबीर रात्रभर स्टडी रूममध्येच होता. त्यालाही रात्री झोप लागली नाही. पुर्ण रात्र तो फक्त त्या फोटोत पाहिलेल्या वस्तूचाच विचार करत होता. काही केलं तरी तो विचार त्याच्या डोक्यातून जात नव्हता. बाहेरच्या प्रकाशाने त्याला सकाळ झाल्याचे जाणवले. तेव्हा तो उठून खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. रात्रभर विचार करून करून डोकं भणभणायला लागलं होतं. त्यात झोप झाली नव्हती त्यामुळे अंगही दुखत होतं. नंतर सान्वीचा विचार मनात येताच तो त्याच्या रूममध्ये गेला. तर तिथे सान्वी नव्हती. मग त्याने अंघोळ वगैरे आटोपली आणि खाली गेला. तेव्हा सान्वी नुकतीच बाहेरून आली आणि त्याला समोर बघून त्याच्याकडे गेली.
"आता तरी बोलणार आहात का माझ्याशी? की अजूनही तुम्हाला काही बोलायचं नाहीये." सान्वीने कबीर जवळ येताच त्याला म्हणाली. तिला काही सांगितलं नाही म्हणून कबीरलाही खरं वाईट वाटत होते.
"साॅरी... काल माझ्यामुळे तुला खुप त्रास झाला ना, पण खरंच मी खुप टेन्शनमध्ये होतो त्यामुळे काहीच बोलू शकलो नाही." कबीर म्हणाला.
"असूद्या आता नका जास्त टेन्शन घेऊ, जे काही असेल ते होईल ठिक. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी नाष्टा आणते. रात्री काहीच खाल्लं नाही ना, भुक लागली असेल तुम्हाला!" सान्वी म्हणाली आणि किचनमध्ये जाऊ लागली तोच कबीरने तिला आवाज दिला. तेव्हा ती लगेच मागे वळली आणि त्याच्याकडे बघू लागली.
"मी जेवलो नाही म्हणजे तू पण जेवली नसेलच माहितीये मला, तुझाही नाष्टा घेऊन ये. आपण दोघं सोबतच नाष्टा करू." कबीर म्हणाला तसं तिने मान हलवली. मग त्याने तिच्या आई बाबांबद्दल विचारलं.
"तुझे आई बाबा उठले नाही का अजून?" कबीरने सगळीकडे नजर फिरवून पाहिलं तर त्याला ते दिसले नाही म्हणून त्याने विचारलं. तसं ती सांगू लागली.
"ते गेले गावी, बाबा त्यांना स्टेशनवर सोडायला गेलेत. हे काय आता त्यांना निरोप देऊनच मी आत आलीय." सान्वी म्हणाली.
"काय?? ते गेले पण... आणि तू मला सांगितलं सुद्धा नाही, किमान ते जाताना तरी मला आवाज द्यायला हवा होता तू!" कबीर म्हणाला.
"कसं सांगणार होते मी, तुम्ही काही बोलायच्या मनस्थितीत तरी होता का?" सान्वी म्हणाली.
"माझंच चुकलं, पण मी खरंच खूप टेन्शनमध्ये होतो. जाताना त्यांच्याशी बोलता नाही आलं, त्यांना किती वाईट वाटलं असेल." कबीर म्हणाला.
"असूद्या आता, जे झालं ते झालं... मी आई बाबांना सांगितले होते की तुम्ही थकला आहात आणि आराम करताय त्यामुळे त्यांना काही नाही एवढं वाटणार." सान्वी म्हणाली आणि थोड्याच वेळात त्यांच्यासाठी नाष्टा घेऊन आली. तो नाष्टा करायला बसला तेव्हा सविता पण आली. मग ते तिघेही एकत्र नाष्टा करू लागले. खरं तर सविताला काल काय झालं ते कबीरला विचारायचं होतं पण तो विषय काढला आणि परत त्याचा मुड खराब झाला तर तो नाष्टा करणार नाही म्हणून तिने तो विषय काढला नाही.
नाष्टा वगैरे झाल्यावर कबीर ऑफिसला गेला. ऑफिसला आल्यावर त्याला परत तो फोटो आठवला आणि त्याच्या चेहऱ्यावर राग जमा झाला. मग त्याने इन्स्पेक्टर शिंदेंना फोन केला आणि ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. थोड्या वेळातच इशिता पण आली आणि हसतच त्याच्याकडे बघू लागली.
"गुड मॉर्निंग कबीर..." इशिता म्हणाली आणि हसतच त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसली. पण कबीर काही तिला गुड मॉर्निंग बोलला नाही.
"इशिता, काल तुझं कानातलं हरवलं होतं ना... मग ते सापडलं का?" कबीरने शांतपणे विचारलं पण त्याच्या आवाजात काहीतरी वेगळेपणा जाणवत होता.
"नाही सापडलं, पण तू असं विचारतोय जसं काय ते सोन्याचं किंवा डायमंडचं होते. साधंसं तर होतं ते आणि आम्हा मुलींकडे असे कितीतरी कानातले असतात. कधी कधी तर मी एकदा घातलेले कानातले परत घालतही नाही. पण माझ्या कानातल्याचं तुला काय एवढं टेन्शन आलंय." इशिता हसून म्हणाली. त्यानंतर तो बराच वेळ तिच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत होता पण ती रोजच्या सारखीच नाॅर्मल वाटत होती.
थोड्या वेळातच केबीनच्या दारावर टकटक झाल्याचा आवाज आला तसं कबीरने आत यायला सांगितले. तेव्हा इन्स्पेक्टर शिंदे आत आले.
"कबीर सर, काल साईटवर सापडलेली वस्तू मी तुम्हाला दाखवायला घेऊन आलोय." शिंदे म्हणाले तसं इशिता आश्चर्याने त्यांच्याकडे बघू लागली.
"कुठली वस्तू सापडली साईटवर?" इशिताने विचारलं.
"शिंदे सर, जरा दाखवा हिला ती वस्तू!" कबीर म्हणाला तसं त्यांनी ती वस्तू एका प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅक करून ठेवली होती ती बाहेर काढली आणि इशिता समोर ठेवली. ती वस्तू बघून इशिताच्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिला खुप मोठा धक्का बसला.
"हे तर माझं कानातलं आहे कबीर, पण हे साईटवर कसं सापडलं?" इशिताने विचारलं.
"ते तुझं आहे ना मग तुलाच माहीत असणार. इशिता, खरं खरं सांग हे कानातले तिकडे गेलंच कसं..." कबीर म्हणाला तसं इशिता खुप गोंधळली. तिला कबीरचं असं बोलणं कळतच नव्हते. पण त्याच्या डोळ्यातला राग बघून इशिताचा श्वास क्षणभर अडखळला. तिने टेबलावर ठेवलेला पाण्याचा ग्लास घेतला आणि घोटभर पाणी प्यायली. मग बोलू लागली.
"कबीर, मला खरंच काही कळत नाहीये तू काय बोलतोयस. मी काल पूर्ण दिवस तुझ्या सोबतच होते. साईटवर सुद्धा तुझ्यासोबतच आली होती. आणि माझं कानातले तर तिकडे जायच्या आधीच हरवलं होतं. मग ते तिथे सापडण्याचा प्रश्नच येत नाही." इशिता ठामपणे म्हणाली.
"मग हे कानातलं तिथे कसं सापडलं?" कबीरचा आवाज आता अधिक गंभीर झाला होता.
"ते मला खरंच माहिती नाही कबीर." इशिता म्हणाली.
"इशिता खरं सांग... तू ऑफिसला यायच्या आधी साईटवर गेली होती का?" कबीरने विचारलं तसं इशिता त्याच्याकडे रागाने बघू लागली.
"तू माझ्यावर संशय घेतोय कबीर?" इशिताने रडवेल्या सुरात विचारलं. बोलताना तिचा कंठ दाटून आला होता.
"संशय नाही इशिता, मला उत्तर हवंय. का गेली होतीस तू तिकडे? खरं सांग..." कबीरने रागाने विचारलं.
"तू कितीही वेळा विचार, पण माझं उत्तर एकच असणार आहे... मी तिकडे गेली नव्हती." इशिता ठामपणे बोलली.
"पण मॅडम, साईटवर जायला तुम्ही सोडून इतर कोणालाही परवानगी नाहीये मग जर तुम्ही तिथे गेला नाही तर तुमचं कानातले तिथे कसं सापडलं?" आता इन्स्पेक्टर शिंदें सुद्धा इशिताला प्रश्न विचारू लागले.
"ते मला माहित नाही, पण मी तिकडे गेली नव्हती हे मी खरं बोलतेय." इशिता तिच्या वाक्यावर अजूनही ठाम होती.
"इशिता, शेवटचं विचारतोय तुला... खरं काय आहे ते सांग मला, आजपर्यंत मी सगळ्यात जास्त विश्वास कोणावर ठेवला असेल तर तो फक्त तुझ्यावर आहे. त्या साईटचं सगळं काही तूच बघत होती. यात जर तुझा हात असेल तर मी तुला कधीच माफ करणार नाही. तुला एक शेवटची संधी देतोय, माझ्याशी प्लीज खोटं बोलू नकोस. जेव्हापासून मी तुझ्या कानातल्याचा फोटो पाहिला आहे, तेव्हापासून मला किती त्रास होतोय याची तुला कल्पना सुद्धा नाहीये. रात्री जेवलो तर नाहीच पण रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही या विचाराने, खुप विश्वासाने मी तुझ्यावर ही जबाबदारी सोपवली होती आणि तू तर माझाच विश्वासघात केला." बोलताना कबीरला रागही येत होता आणि वाईटही वाटत होते. तो पाणी प्यायला आणि परत बोलू लागला.
"आता कळतंय मला इतके दिवस तू माझ्याशी एवढं गोड का बोलत होती ते? ते सगळं नाटक होतं तुझं. गोड बोलून तू माझ्या पाठीत खंजीर खुपसला, तुला बाबांनी नोकरी सोडू दिली नाही म्हणून तू हे सगळं केलं ना." कबीरचे ते शब्द इशिताच्या काळजावर घाव करत होते. तिला त्याचं असं बोलणं सहनच होत नव्हते.
"सर, तुम्ही पाच मिनिटे बाहेर थांबता का? मला कबीर सरांशी थोडं बोलायचं आहे!" इशिता शिंदेंना म्हणाली तसं ते कबीरकडे बघू लागले. मग कबीरने नजरेनेच त्यांना बाहेर जायला सांगितलं. मग शिंदेही बाहेर गेले. ते गेल्यावर इशिता कबीरकडे बघू लागली. तिच्या डोळ्यात पाणी तर होतेच पण चेहऱ्यावर दुःखाच्या छटाही होत्या.
क्रमशः
लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा