अशी जुळली गाठ. भाग - ४३
डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखन स्पर्धा
"काय म्हणालास तू कबीर, मी तुझ्याशी गोड बोलण्याचं नाटक करत होती. एवढ्या वर्षांत तू मला एवढंच ओळखलं कबीर, मी तुझ्याशी गोड बोलण्याचं नाटक करत नव्हती. तुझ्या डोळ्यात मला सान्वी बद्दल प्रेम दिसत होते आणि तिच्या आयुष्यात एकदा जे झालं ते परत होऊ नये असं मला वाटत होतं. म्हणून मी स्वतः तुमच्या दोघांच्या मधून बाजूला होत होती. माझं नाटक नव्हतं ते, मी खरंच वागत होती आणि खरं तेच बोलत होती. तुझ्यावर अजूनही प्रेम आहेच माझं, मी ते नाकारत नाहीये... पण माझ्यापेक्षा सान्वीला तुझ्या प्रेमाची गरज आहे हे कळतंय मला. आणि कामाचं म्हणशील तर आजपर्यंत मी माझं काम इमानदारीने करत आली आहे. कधीच स्वतःचा स्वार्थ पाहिला नाही. तुझ्यासोबत मी कुठे कुठे आली आहे हे आठवून बघ जरा, कधीच कुठली कारणं सांगितली नाही. कधी ऊन, वारा, पाऊस पाहिला नाही. रात्री अपरात्री सुद्धा विश्वासाने मी तुझ्यासोबत कामानिमित्त बाहेर आली आहे आणि आज एक साधं कानातलं सापडलं नाही तर तू माझ्यावर संशय घेतोय. हीच तुझ्यालेखी माझी आणि माझ्या प्रेमाची किंमत आहे का!" इशिता खुप दुखावली होती त्यामुळे भडाभडा बोलत होती. पण कबीर तिचं बोलणं ऐकून एकदमच सुन्न झाला होता. त्याच्याकडे बोलायला शब्दच नव्हते. तो टेबलचा आधार घेऊन खुर्चीवर बसला.
"मग तुझं कानातले नेमकं तिथे कसं गेलं?" कबीरने शांतपणे विचारलं.
"तोच प्रश्न मलाही पडला आहे. ते शोधायचं सोडून तू मलाच दोषी ठरवून मोकळा झालायं. कबीर, तुझं नुकसान व्हावे असा विचार माझ्या स्वप्नात सुद्धा नाही येणार रे... माझ्या मनात जर तसं काही असतं तर मी आपल्याबद्दल कधीच सान्वीला सगळं सांगून मोकळी झाली असती. पण मी तसं केलं नाही, मला तुमच्या स्टोरीत व्हिलन नाही व्हायचं. आज तू जे बोललाय त्याने खुप दुखावली आहे मी. तुझ्या एक एक शब्दाने माझं काळीज चिरून निघालयं कबीर. माझ्या मनाला किती यातना होताय हे शब्दात नाही सांगू शकत मी तुला." इशिता दुखऱ्या आवाजात बोलली. कबीरला तर आता काय खरं आणि काय खोटं हेच कळेनासे झाले होते.
"यामागे कोणाचा हात आहे ते समोर येईलच. पण कोण असेल तो?" कबीर म्हणाला. त्याचवेळी शिंदेंनी दार उघडले आणि दारातूनच आवाज दिला.
"आता तरी येऊ का मी आत? कारण माझ्याकडे अजून इथे थांबायला जास्त वेळ नाहीये." शिंदे म्हणाले तसं कबीरने त्यांना आत यायला सांगितले.
"काय मग, मॅडमने सांगितले की नाही त्यांचं कानातलं तिथे कसं गेलं होतं!" शिंदे म्हणाले.
"नाही, ते तिलाही नाही माहित. आपल्याला इथलं कालचं सीसीटीव्ही फुटेज चेक करावे लागणार आहे. प्लीज तुम्ही अजून थोडा वेळ थांबता का?" कबीर म्हणाला तसं इन्स्पेक्टर शिंदे थांबायला तयार झाले. मग ते कालचं सीसीटीव्ही फुटेज चेक करू लागले. ते तिघेही अगदी बारीक लक्ष देऊन ते फुटेज चेक करत होते पण काल नेमकं दुपारपर्यंतचा डेटा त्यातून डिलीट झाला होता. ते बघून सगळेच शाॅक झाले.
"असं डेटा गायब होणं शक्यच नाही. हे कोणीतरी मुद्दाम केलंय." कबीर अगदी गंभीर होत म्हणाला.
"म्हणजे हे सगळं कोणी तरी जाणूनबुजून करतंय कबीर. काल माझं कानातलं इथेच पडलं असणार आहे आणि कोणीतरी मुद्दाम ते साईटवर नेऊन टाकलं असणार आहे. कोणीतरी मुद्दाम मला यात अडकवण्याचा प्रयत्न करतोय." इशिता म्हणाली.
"पण तुला अडकवून कोणाचा काय फायदा होणार आहे?" कबीर.
"हे मलाही माहित नाही, पण मी गुन्हेगार नाहीये. हे मी कसलीही शपथ घेऊन सांगू शकते." इशिता अजूनही ठामपणेच बोलत होती.
"मॅडम, हे कोणी केलंय ते आम्ही शोधूच... पण तुम्हाला आता आमच्यासोबत चौकशी साठी पोलिस स्टेशनला यावं लागेल." शिंदे म्हणाले. तसं इशिता रागाने त्यांच्याकडे बघू लागली.
"मी जर काही केलंच नाहीये तर मी कशाला तुमच्यासोबत येऊ?" इशिता म्हणाली.
"घाबरू नका, मी काही तुम्हाला अटक करत नाहीये. फक्त चौकशी करणार आहे." शिंदे म्हणाले.
"मी पण येतो तुमच्यासोबत." कबीर म्हणाला आणि तो ही पोलिस स्टेशनमध्ये गेला. तिथे त्या दोघांनाही काही प्रश्न विचारले नंतर परत जायला सांगितले. गाडीत इशिता कबीरशी अजिबात बोलत नव्हती. ती बोलली नाही म्हणून तो ही गप्पच राहिला.
ते दोघं ऑफिसमध्ये आल्यावर विक्रम पण आले होते. मग इशिताने स्वतः त्यांच्या कानावर ती गोष्ट घातली. त्यांचा इशितावर विश्वास होता त्यामुळे त्यांनी तिला काहीच विचारलं नाही. पण यामागचा खरा सुत्रधार कोण असणार आहे याचाच विचार ते करत होते.
संध्याकाळी घरी आल्यावरही कबीरच्या चेहऱ्यावर टेन्शन होतंच. सान्वी त्याच्यासाठी रूममध्येच चहा घेऊन आली आणि त्याच्याशी बोलू लागली.
"कबीर, हे घ्या चहा घ्या म्हणजे तुम्हाला फ्रेश वाटेल." सान्वी म्हणाली तसं त्याने चहा घेतला आणि तो पिऊ लागला.
"तुम्ही अजूनही मला टेन्शनमध्येच वाटताय. काय झालंय ते मला सांगण्यासारखे नाहीये का?" सान्वीने थोडं घाबरतच विचारलं.
"तसं काही नाहीये, ते मागे साईटवर प्राॅब्लेम झाला होता माहितीये ना तुला." कबीर म्हणाला.
"हो माहितीये, पण त्याचं नेमकं कसलं टेन्शन घेतलंय तुम्ही? सान्वीने विचारलं. तेव्हा कबीरने तिला सगळं सांगितलं. सगळं म्हणजे इशिताचं हरवलेलं कानातलं तिथे सापडलं, त्यानंतर इशिता जे बोलली ते सांगितले. त्याच्या बोलण्यावर सान्वी पण बारीक विचार करू लागली.
"कबीर, मला काय वाटतंय... हे काम इशिताचं नाहीये, दुसरंच कोणाचं तरी आहे आणि ते ज्याने कोणी केलंय ते मुद्दाम यात इशिताला अडकवायचा प्रयत्न करतंय." सान्वी म्हणाली.
"मलाही तसंच वाटतंय पण तो कोण आहे हे कसं शोधायचं?" कबीर म्हणाला.
"सोपं आहे, काल जसं इशिताचं कानातलं पडलं होतं तसंच तिची एखादी वस्तू परत ऑफिसच्या बाहेर टाकायची. आणि ती कोण उचलतयं याकडे लक्ष ठेवायचं!" सान्वी म्हणाली.
"पण ही आयडिया वर्क करेल? कारण जो कोणी आहे त्याचं ऑलरेडी हे करून झालंय." कबीर म्हणाला.
"माहिती नाही, पण एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. हवं तर यात मी तुम्हाला मदत करते. इशिताची पण आपल्याला यात मदत लागणार आहे." सान्वी म्हणाली तसं कबीरने तिला जवळ घेतले.
"साॅरी, काल तुझ्याशी बोललो नाही तर तुला खुप त्रास झाला असेल ना....!" कबीर म्हणाला.
"हम्म्म, त्रास तर खुप झाला पण माझ्याशी बोलला नाही म्हणून नाही झाला. तुमचा त्रास बघून मला त्रास होत होता." सान्वी म्हणाली. त्यावर कबीर फक्त शांतपणे तिच्याकडे बघत राहिला. तो असा बघत होता म्हणून सान्वीला खुपच हसायला येत होते. पण ती हसली नाही.
"काय झालं, असं का बघताय माझ्याकडे?" सान्वीने विचारलं.
"काही नाही, खरं तर हे दिवस तुझ्यासोबत हसत खेळत घालवायचे, एंजॉय करायचे आहे, पण नेमकं आताच हे असं होऊन बसलंय ना कशातच मन लागत नाहीये." कबीर म्हणाला.
"असूद्या काही हरकत नाही, आपण दोघं मिळून तुमचा प्राॅब्लेम साॅल्व्ह करू, एकदा की हे सगळं झालं की मग फक्त तुम्ही आणि मी, बाकी काहीच नाही." सान्वी जरा लाजून बोलली तसं कबीरने तिला मिठीत घेतलं. सान्वी सोबत बोलण्यामुळे कबीरचं जरा हलकं झालं होतं.
कबीरला पोलिसांचा फोन आला तेव्हा सान्वी तिथून गेली. खाली विक्रमही आले होते. त्यांना चहा वगैरे देऊन मग ती परत श्रावणीकडे गेली.
"श्रावणी, काय करतेस गं?" सान्वीने आत येताच विचारलं.
"काही नाही गं, अशीच बसली आहे. तू दादाशी बोलली का? त्याने तुला काही सांगितलं का?" श्रावणीने काळजीने विचारलं.
"हो बोलले ते माझ्याशी. काल नेमकं काय झालं ते सगळं सांगितलं त्यांनी मला. आता ते ठिक आहे, त्या संदर्भातच ते पोलिसांशी बोलताय. त्यांचं कामाचं बोलणं चालू आहे, म्हणून तर मी इकडे आली आहे." सान्वी म्हणाली आणि तिनेही कबीरने जे सांगितले होते ते श्रावणीला सांगितले. त्यानंतर तिने इशिताला फोन केला. इशितालाही तिने तिचा प्लॅन सांगितला. फोनवर बोलताना तिला इशिताचा आवाज दुखावलेला वाटत होता. ती थोडं तुटकपणेच सान्वीशी बोलत होती. पण सान्वीनेही तिला समजून घेतलं आणि कसलीही अढी न ठेवता ती तिच्याशी बोलली.
क्रमशः
लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा