अशी जुळली गाठ. भाग - ४४
डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखन स्पर्धा.
विक्रम सकाळी चहा पिता पिता पेपर वाचत होते. त्याचवेळी कबीर आणि सान्वी तयार होऊन खाली आले. ते दोघं येताच विक्रम गोंधळून त्यांच्याकडे बघू लागले.
"हे काय तुम्ही दोघं कुठे बाहेर चाललाय की काय?" विक्रमने विचारलं.
"आम्ही ऑफिसला चाललोय बाबा, सान्वीचीही इच्छा होती यायची मग म्हटलं की तिलाही घेऊन जावं. तिच्या डोक्यात एक कल्पना आहे, बघू तिचा काही उपयोग होतोय का!" कबीर म्हणाला.
"होईल होईल, नक्कीच उपयोग होईल. शेवटी माझी सून गावच्या मातीत लहानाची मोठी झाली आहे, तिच्या आयडिया वर्क होणारच." विक्रम अभिमानाने बोलले. मग कबीर आणि सान्वी दोघेही त्यांचा आणि सविताचा निरोप घेऊन गेले.
गाडीत बसताच सान्वीने इशिताला फोन केला आणि घरून निघायला सांगितलं. मग ती पण घरून निघाली. थोड्या वेळातच कबीर आणि सान्वी ऑफिसच्या जवळ पोहचले. तसं सान्वीने गाडी थांबायला सांगितली.
"कबीर, मी इथेच उतरते आणि चालत येते. तिथे आपण दोघं एकत्र उतरल्यावर सगळेच बघतील मग मी कुठे जातेय याकडेच सगळ्यांचे लक्ष असेल." सान्वी म्हणाली तसं कबीरने गाडी थांबवली मग ती खाली उतरली आणि तिने तिचा चेहरा पुर्ण स्कार्फने कव्हर करून घेतला.
कबीर ऑफिसमध्ये आला आणि त्याने केबीनमध्ये येताच लगेच लॅपटॉप घेतला आणि तिथल्या सगळ्या परीसरातल्या सीसीटीव्ही वर लक्ष ठेऊन बसला.
इशिता येताच सान्वीने तिला फोन करून ती तिच्यावर लक्ष ठेवून आहे हे सांगितलं तसं इशिता आत जाऊ लागली तोच तिने मुद्दामच ओढणी सावरायचं नाटक केलं आणि त्याचवेळी तिची अंगठी खाली सोडली आणि तसंच इकडे तिकडे न बघता ती सरळ आत केबीनमध्ये गेली. कबीर सीसीटीव्ही बघत होता ते बघून ती पण सीसीटीव्ही बघू लागली. तर थोड्या वेळातच ऑफिसमधला एक जण तिची अंगठी उचलताना दिसला. ते ही त्याने ती अशा पद्धतीने उचलली की तो नेमकं काय करतोय हे कोणालाच कळले नाही पाहिजे. ते बघून दोघेही आश्चर्याने एकमेकांकडे बघू लागले.
"हा... हा तर विजय आहे. पण याने का ही अंगठी उचलली असेल?" इशिता म्हणाली.
"थांब तो पुढे काय करतोय ते बघू आपण." कबीर म्हणाला तसं तो अंगठी घेऊन बाहेर जाऊ लागला. इकडे सान्वी अगदी सावधपणे लक्ष ठेवून होती. तोच तिला एक माणूस ऑफिसच्या बाहेर पडताना दिसला. मग तिने लगेच त्याच्या नकळत त्याचा फोटो काढला आणि तो कुठे जातोय हे बघू लागली. तो बाईक वर थोडा पुढे जाताच सान्वीने कबीरला फोन केला. त्यानेही घाईघाईने तो रिसिव्ह केला.
"हा बोल सान्वी...." कबीर म्हणाला.
"एक माणूस आताच बाईक घेऊन बाहेर पडला आहे. तुम्ही दोघं लवकर या, आपल्याला त्याचा पाठलाग करावा लागणार आहे." सान्वी म्हणाली तसं कबीर आणि इशिता पटकन बाहेर आले.
"सान्वी, कुठल्या रस्त्याने गेला तो तू बघितलं का?" कबीरने विचारलं तसं तिने बरोबर तो गेलेल्या दिशेने बोट केलं आणि घाईघाईने तिने त्याचा फोटो दाखवला. तो फोटो बघून तो विजय असल्याची कबीरची खात्री झाली.
"म्हणजे तो साईटवरच गेला असेल, सान्वी... आम्हाला त्याच्या मागावर जावं लागेल. बाबा येईपर्यंत तू माझ्या केबिनमध्ये बसून रहा. तिथे कोणीच आलं नाही पाहिजे." कबीर म्हणाला आणि पटकन इशिताला घेऊन तो साईटवर जाऊ लागला. सान्वी पण लगेच त्याच्या केबीनमध्ये जाऊन बसली.
"इशिता, शिंदे सरांना फोन करून लगेच साईटवर यायला सांग." कबीरने गाडी स्टार्ट करताच इशिताला सांगितले तसं तिनेही शिंदेंना फोन केला. मग ते ही साईटवर यायला निघाले.
थोड्या वेळातच कबीर आणि इशिता साईटवर पोहचले. त्यांनी तिथल्या वाॅचमनला इथे कोणी आलंय का ते विचारलं पण वाॅचमनने त्यांना नाही म्हणून सांगितले. वाॅचमनची ती घाबरलेली नजर बघून तो खोटं बोलतोय हे कबीरला लगेच समजलं. पण त्याने तसं काही दाखवलं नाही.
"तुमच्याकडे मोबाईल आहे का? मला एक फोन करायचा आहे. आज मी माझा मोबाईल घरीच विसरलो." कबीर वाॅचमनशी खोटं बोलला. तसं त्याने लगेच कबीरला त्याचा मोबाईल काढून दिला. कबीरने तो घेतला आणि त्याच्या खिशात घातला. ते बघून वाॅचमन गोंधळला.
"सर, माझा मोबाईल द्या मला." तो वाॅचमन म्हणाला.
"मी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत तुम्हाला तुमचा मोबाईल भेटणार नाही. घाबरू नका, माझं काम झालं की मी तुम्हाला तुमचा मोबाईल देऊन टाकेल." कबीर म्हणाला आणि सरळ आत गेला.
बिल्डिंग कोसळलेली होती. त्यामुळे तिथे जागोजागी विटांचे ढिग होते. कबीर आणि इशिता तिथल्या परीसरात बघत होते तोच एका छोट्याशा भिंती जवळ त्यांना एक सावली दिसली. तसं दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. कबीरने इशिताला काहीच बोलू नकोस म्हणून इशारा केला आणि इशारा करूनच तिला भिंतीच्या दुसऱ्या बाजूने जायला सांगितले आणि कबीर दुसऱ्या बाजूने गेला. त्याने हात पुढे केला तोच भिंतीआड उभा असलेला विजय कबीरच्या हातून निसटला आणि पळू लागला. तसं कबीरने डोक्यालाच हात लावला.
"शिट यार... एवढा प्लॅन करून सुद्धा हा पळाला." कबीर वैतागून म्हणाला.
"तो जास्त लांब नाही गेला कबीर, तू पण पळ की त्याच्या मागे." इशिता म्हणाली आणि ती सुद्धा विजय मागे पळू लागली. मग कबीरही जोराने पळू लागला. दोघं दोन दिशेने पळत होते. दोन वेळा तो कबीरच्या हाताला येता येता राहिला. नंतर तो एकदम आत घुसला तेव्हा कबीर सुद्धा आत जाऊ लागला कबीरला तिथे एक लोखंडी रॉड दिसला तसा त्याने तो उचलला आणि त्याच्या मागे गेला.
कबीर आतल्या बाजूने दिसताच विजय उडी मारून बाहेर जाणार तोच कबीरने तो राॅड पुढे केला. तसं विजय खाली पडला. तो तडफडत उठत होता पण गुडघ्याला लागल्यामुळे त्याला धड उठताही येत नव्हते. मग कबीर त्याच्या जवळ येऊन उभा राहिला.
"तू इथून कितीही पळायचा प्रयत्न केला तरी काहीच उपयोग नाही कारण तुझं कारस्थान मला समजलं आहे." कबीर म्हणाला आणि त्याने त्याची काॅलर पकडून त्याला उभं केलं. त्याचवेळी पोलिस पण तिथे पोहचले.
"तुला आत यायची परवानगी कोणी दिली सांग?" कबीरने एकदम रागाने विचारलं. पण तो काहीच बोलला नाही. ते बघून शिंदे पुढे आले.
"हा असं तोंड उघडणार नाही, याला आमच्या ताब्यात द्या. मग बघा कसं तोंड उघडतोय. घाला रे याला बेड्या." शिंदे म्हणाले तसं हवालदार पुढे आले आणि विजयला बेड्या घालू लागले. पण तो त्यांच्याशी झटापट करू लागला.
"मी काहीच केलं नाहीये, त्यामुळे तुम्ही मला असं विनाकारण अटक करू शकत नाही." विजय म्हणाला तसं कबीरने त्याच्या सानकन कानाखाली आवाज काढला.
"हे बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही. मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की माझ्या स्टाफ पैकी कोणी माझ्याशी बेईमानी करेल. तू तर इथल्या वाॅचमनला सुद्धा तुझ्या बाजूने करून घेतलंय. तुला कल्पना सुद्धा नाहीये तू माझं किती मोठं नुकसान केलं आहे. नेमकं काय बिघडवलं होतं मी तुझं, तुला प्रत्येक वेळी हवी ती मदत करत आलोय. तुझी लायकी नसताना सुद्धा तुला चांगली पोस्ट दिली, याचा तू गैरफायदा घेतला. बोल का केलं तू हे असं? कुणाच्या सांगण्यावरून केलं सांग पटकन." कबीर चिडून बोलला पण तो विजय नुसताच ढिम्म उभा होता. त्याच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हते. शिंदेंनी पण त्याला विचारलं पण तो काहीच बोलत नव्हता.
"तुला काहीच बोलायचं नाहीये ना, ठिक आहे नको बोलू. पण आता तुझी सुटका नाही. इन्स्पेक्टर घेऊन जा याला आणि याला जेवढी कठोर शिक्षा देता येईल तेवढी द्या." कबीर म्हणाला तसं शिंदेंनी त्यांच्या माणसांना विजयला घेऊन जायला सांगितलं. मग त्यांनीही विजयला बेड्या घातल्या आणि घेऊन गेले.
"कबीर सर, काळजी करू नका... आता गुन्हेगार सापडला तर आहेच. त्याच्याकडून कसं वदवून घ्यायचं ते मला चांगलंच माहीत आहे. उद्या सकाळी तुमच्या समोरच मी त्याला तोंड उघडायला लावतो की नाही बघाच तुम्ही." शिंदे म्हणाले आणि निघून गेले. ते गेल्यावर कबीर आणि इशिता गेटवर आले. त्याचवेळी कबीरने वाॅचमनला त्याचा मोबाईल त्याला दिला.
"उद्यापासून तुम्हाला इथे कामावर यायची गरज नाही. मला तुमच्यासारख्या बेईमान लोकांची गरज नाही." कबीर म्हणाला. तसं वाॅचमन घाबरून त्याच्याकडे बघू लागला. आता त्याला त्याची नोकरी जाणार या विचारानेच टेन्शन आले होते. त्या टेन्शनने तो पुर्ण घामाघूम झाला.
(आता हा विजय कोण असेल... त्याचा हेतू काय असेल? हे कळेलच, पण तोपर्यंत तुम्ही गेस करा आणि कमेंट करून सांगा. बघू कोण बरोबर सांगतंय)
क्रमशः
लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा