Login

अशी जुळली गाठ. भाग - ४५

कबीर आणि सान्वीच्या अबोल प्रेमाची कहाणी
अशी जुळली गाठ. भाग - ४५

डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखन स्पर्धा.

"साहेब, असं नका बोलू... मी फक्त पैशासाठी त्या माणसाला आत जाऊ दिले. बाकी यात माझा कुठलाही स्वार्थ नव्हता." वाॅचमन हात जोडून गयावया करू लागला.

"पैसे घेतले तरीही स्वार्थ नव्हता म्हणाताय. तुम्हाला किती पैसे हवे होते ते सांगायचं ना मला, मी दिले असते तुम्हाला पैसे. पैशांसाठी चुकीच्या माणसाला मदत करायची काय गरज होती." कबीर म्हणाला.

"एकदा चुक झाली माझी पण परत अशी चुक पुन्हा नाही होणार, पण मला कामावरून काढून टाकू नका. हे काम गेलं तर मी रस्त्यावर येईन." वाॅचमन हात जोडून म्हणाला.

"हा विचार आधी करायचा होता. आता बोलून काही फायदा नाही, माणूस एक चुक पुन्हा पुन्हा करू शकतो. आता तुमच्यावर माझा विश्वास नाही, त्यामुळे मी तुम्हाला कामावरून काढून टाकतोय." कबीर म्हणाला आणि लगेच गाडीत जाऊन बसला. इशिताही त्याच्या सोबत होती पण ती शांतच होती. आता कबीरला खुप अपराध्यासारखे वाटत होते.

"रागावली आहे माझ्यावर?" कबीरने तिच्याकडे न बघताच विचारलं.

"मी रागावली नाहीये कबीर, दुखावली आहे. तू माझ्यावर संशय घेऊ शकतो हा विचारच मला सहन होत नाहीये." इशिता म्हणाली.

"साॅरी, खरंच साॅरी... माझ्याकडून खुप मोठी चुक झाली." कबीर म्हणाला. पण इशिताची पुढे बोलायची इच्छाच नव्हती. ती पुन्हा शांत बसून बाहेर बघत होती.

ऑफिसमध्ये येताच कबीर आणि इशिता दोघेही विक्रमकडे गेले. कबीरने त्यांना पहिलं सान्वी बद्दल विचारलं.

"बाबा, सान्वी कुठे आहे?"

"ती थोड्या वेळापूर्वीच घरी गेली, काळजी करू नकोस मी तिला एकटीला नाही पाठवलं. माझी गाडी पाठवली आहे तिला सोडवायला." विक्रम म्हणाले त्यानंतर तिकडे काय घडलं ते कबीरने त्यांना सगळं सांगितलं. ते ही विजयचे कारणामे ऐकून हैराण झाले.

"हे डोकं त्याचं एकट्याचं नाहीये कबीर, त्याला कोणाची तरी साथ असणार आहे. त्याशिवाय तो असं करू शकणार नाही. काही झालं तरी आपल्याला त्याला बोलतं करावं लागणार आहे." विक्रम म्हणाले.

"सर, आता खरा गुन्हेगार सापडला आहे त्यामुळे मी निर्दोष आहे हे सिद्ध झालंय. मी आजपासून इथे काम करू शकणार नाही. असंही काही दिवसांनी मी जाॅब सोडणारच होती. मग आताच सोडला तर काय हरकत आहे." इशिता म्हणाली तसं कबीर तिच्याकडे बघू लागला.

"प्लीज इशिता, असं नको बोलू. तुझी गरज आहे इथे, तुझ्याशिवाय कुठलंही काम होणं शक्य नाही." कबीर म्हणाला.

"ते काहीही असो पण मी आता थांबणार नाही, आज जसे माझ्यावर आरोप झाले तसेच यापुढे झाले तर ते मला सहन होणार नाही. त्यापेक्षा मी इथून गेलेलीच बरी." इशिता म्हणाली. त्यावर विक्रमने सुद्धा तिला खुप अडवायचा प्रयत्न केला पण इशिता थांबलीच नाही. ती लगेचच तिथून निघून गेली. ती गेल्यावर कबीरला जबरदस्त धक्का बसला तो शांतपणे खाली बसला. बोलायला त्याच्याकडे शब्दच नव्हते.

"कबीर, ती आता रागात आहे, तिचा राग शांत झाला की मग येईल परत." विक्रम म्हणाले.

"नाही बाबा, मला तिचा स्वभाव चांगलाच माहित आहे. ती नाही येणार परत." कबीर म्हणाला.

"तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासाठी दुसरी पीए बघतो. ती पण इशिता सारखीच." विक्रम म्हणाले. ते फक्त कामाचा विचार करत होते पण कबीरचे विचार त्यांच्या विचारांच्या पलिकडे होते. प्रेम या भावनेने जरी त्याने तिच्याकडे बघायचं सोडलं होतं तरी एक मैत्रीण म्हणून त्याला ती हवी होती. त्यामुळे त्याला खुप वाईट वाटत होते.

"दुसरी दुसरीच असेल बाबा, ती इशिता नसेल." कबीर म्हणाला आणि तिथून उठला आणि सरळ त्याच्या केबिनमध्ये आला. आत येताच त्याने खुर्चीवर अंग टाकून दिले. इशिता गेल्यामुळे तो खुप डिस्टर्ब होता. त्याचं कामात लक्षही लागत नव्हते. समोर पाहिलं की त्याला तिचा चेहरा नजरेसमोर दिसायचा. खुप अस्वस्थ होता तो. शेवटी त्याने इशिताला फोन केला. पण तिचा फोन स्विच ऑफ येत होता. तिने मुद्दामच स्विच ऑफ करून ठेवला असेल हे त्याच्या लक्षात आले होते. मग त्याने परत सान्वीला फोन केला. तिने लगेच त्याचा काॅल रिसिव्ह केला.

"काय झालं कबीर? तो माणूस पकडला गेला का?" सान्वीने विचारलं.

"हो पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे पण त्याने हे का केलं ते नाही सांगितलं, पण लवकरच सांगेल तो." कबीर तिच्याशी बोलत असताना त्याच्या आवाजातली उदासीनता सान्वीला जाणवली. तिलाही त्याचा आवाज ऐकून त्याची काळजी वाटू लागली.

"तो माणूस पकडला आहे, मग तुमचा आवाज असा का येतोय?" सान्वीने विचारलं.

"इशिताने जाॅब सोडला, आम्ही साईटवरून आलो आणि ती लगेच घरी निघून गेली. माझ्यामुळेच गेली ती, मी तिच्यावर संशय घ्यायला नको होता." कबीर म्हणाला.

"आता ती एवढे दिवस तुमच्यासोबत काम करत होती म्हटल्यावर ती नाहीये तर तुम्हाला वाईट वाटणारच... पण तिचंही काही चुकलंय असं नाही वाटत मला, शेवटी तिच्या आत्मसन्मानाचा प्रश्न होता. तुम्ही कुठलीही शहानिशा न करता तिच्यावर आरोप करायला नको होते." सान्वी म्हणाली.

"हो ना माझं चुकलंच पण तिने असं निघून जायला नको होतं. मी फोन करतोय तर तिने मोबाईल सुद्धा स्विच ऑफ करून ठेवलाय." कबीर म्हणाला.

"थोडा वेळ गेला की मग होईल तिचा राग शांत." सान्वी म्हणाली आणि बराच वेळ कबीरला समजावू लागली. तेव्हा कुठे कबीरचा मुड ठिक झाला.

श्रावणी काॅलेजवरून आल्यावर तिने सान्वीला आवाज दिला. तिच्या आवाजाने सान्वी पण बाहेर आली.  तिला लवकर आलेलं बघून सान्वी आश्चर्याने तिच्याकडे बघू लागली.

"काय गं आज तू लवकरच आली?" सान्वीने विचारलं.

"आज कोणी नव्हतेच जास्त, बरेच जण लवकर गेले मग मी पण आली. माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या फिरायला जाऊया, पण मी नाही म्हटलं." श्रावणी म्हणाली.

"अगं मग जायचं होतं ना...." सान्वी.

"कशाला... त्यापेक्षा मी इथेच तुझ्यासोबत छान वेळ घालवेल. तेवढंच तुला पण छान वाटेल, मी आलेच चेंज करून येते. मग आपण सोबतच जेवू आणि छान गप्पा मारू." श्रावणी म्हणाली.

"हो चालेल, आज आई पण बाहेर गेल्या आहेत. तेवढीच तुझी सोबत होईल." सान्वी म्हणाली तसं श्रावणी तिच्या रूममध्ये गेली आणि चेंज करून थोड्या वेळातच परत आली. सान्वीने पण दोघींसाठी जेवण वाढून घेतलं.

"वहिनी, खरं तर आज ना असं मस्त काहीतरी चमचमीत खायची इच्छा झाली होती माझी." श्रावणी समोरचं जेवण बघून म्हणाली.

"अय्या हो का.... मग आल्या आल्याच सांगायचं ना, मी काहीतरी बनवलं असतं!" सान्वी म्हणाली.

"आता असूदे... आता हेच खाऊया आपण, मग पाच वाजता मी आपल्यासाठी मस्त पिझ्झा ऑर्डर करते." श्रावणी म्हणाली तसं सान्वीने मान डोलावली. मग दोघीही जेवू लागल्या.

"सकाळी तू दादा सोबत गेली होती ना मग काय झालं तिकडे?" श्रावणीने विचारलं.

"हो गेली होती ना, जसा आम्ही प्लॅन केला होता तसंच झालं आणि तो जो कोणी होता, त्याला पकडलं सुद्धा. पण या सगळ्यात इशिता नाराज झाली. तिने अचानकच जाॅब सोडला. त्यामुळे तुझे दादा पण नाराज झाले." सान्वी म्हणाली.

"अगं मग बरंय ना, आता तिच्या जागेवर तू जा दादाची पीए म्हणून." श्रावणी म्हणाली तसं सान्वी हसून तिच्याकडे बघू लागली.

"काहीही काय, मला नाही जमणार ते काम. मी आपली दिवसभर माझ्या घरातल्या कामांमध्ये रमते तेवढंच पुरेसं आहे मला. एकतर कबीर खुप चिडखोर आहे, तुझ्या भावाला घरात सहन करतेय तेवढंच बसं झालं. तिथे ऑफिसमध्ये दिवसभर माझं डोकं चक्रावून टाकतील ते." सान्वी म्हणाली.

"ए काहीही काय बोलतेय गं.... माझा दादा असा आहे का?" श्रावणी म्हणाली.

"तसे नाहीये ते पण खरंच मला नाही जमणार ते त्यामुळे तू प्लीज कोणाच्या डोक्यात हा विचार घालू नकोस." सान्वी म्हणाली.

"बरं मी नाही कोणाला सांगणार, पण मला सांग ज्या माणसाला पकडलं तो माणूस कोण होता?" श्रावणीने विचारलं.

"मी माझ्या मोबाईल मध्ये त्याचा फोटो काढला आहे, थांब मी तुला दाखवते." सान्वी म्हणाली आणि तिने तिचा मोबाईल घेतला आणि त्या माणसाचा फोटो श्रावणीला दाखवू लागली. श्रावणी पण तो फोटो बघू लागली. तिने आधी बारीक नजरेने नाही पाहिला. पण जेव्हा सान्वी मोबाईल मागे घेऊ लागली तेव्हा श्रावणीने परत हात पुढे केला.

"थांब... वहिनी, मला परत एकदा तो फोटो बघू दे." श्रावणी म्हणाली आणि ती फोटो अगदी न्याहाळून बघू लागली. त्या माणसाला कुठे तरी पाहिल्यासारखं तिला वाटत होतं त्यामुळे ती त्या फोटोकडे बघत त्याला नेमकं कुठे पाहिलं होतं हे आठवू लागली. तिच्याकडे बघून सान्वी पण गोंधळली. श्रावणीचं नेमकं काय चाललंय ते काही तिला कळेना.

क्रमशः

लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all