Login

अशी जुळली गाठ. भाग - ४६

कबीर आणि सान्वीच्या अबोल प्रेमाची कहाणी
अशी जुळली गाठ. भाग - ४६

डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखन स्पर्धा.

"श्रावणी, काय गं.... एवढा काय तो फोटो निरखून बघतेय." सान्वीने हसतच पण जरा गोंधळलेल्या नजरेने बघत विचारलं.

"वहिनी, मी या माणसाला कुठे तरी पाहिल्यासारखं वाटतंय, पण कुठे ते आठवत नाहीये मला." श्रावणी म्हणाली. त्यावर सान्वी पण तिच्याकडे आश्चर्याने बघू लागली.

"खरं सांगतेस की काय, कुठे पाहिलंय तू त्याला? कबीरच्या ऑफिसमध्ये की अजून बाहेर दुसरीकडे?" सान्वीनेही उत्सुकतेने विचारलं.

"नाही गं... ऑफिसमध्ये नाही, जर ऑफिसमध्ये पाहिलं तर एवढं लक्षात राहिलं नसतं. तिथे असे कितीतरी लोक आहेत. मी याला बाहेरच कुठे तरी पाहिलंय." श्रावणी म्हणाली आणि ती अजून डोक्याला ताण देऊन त्या माणसाला कुठे पाहिलंय ते आठवू लागली आणि तिला अचानक त्याला कुठे पाहिलं होतं ते आठवलं तसं ती एकदम ओरडली.

"हा... आठवलं, याचं नाव विजय आहे. वहिनी, मी आताच ऑफिसमध्ये जाऊन दादाला सगळं सांगणार आहे. आलेच मी." श्रावणी जेवता जेवताच उठून जाऊ लागली तोच सान्वीने तिला आवाज दिला.

"अगं आधी जेवून तर घे, मग आपण दोघी जाऊ." सान्वी म्हणाली.

"नाही वहिनी, माझं पोट भरलयं. मला पहिलं दादाकडे जायचं आहे." श्रावणी बोलता बोलताच बाहेर गेली सुद्धा. पण सान्वीला तिची खुप काळजी वाटत होती. श्रावणी गेल्यामुळे तिनेही जेवण अर्धवटच सोडलं.

श्रावणी गाडी घेऊन थोड्या वेळात ऑफिसला पोहचली सुद्धा. गाडीतून उतरली तशी ती धावतच कबीरच्या केबिनमध्ये जात होती. ती अशी धावत पळत सुटली होती त्यामुळे सगळेच तिच्याकडे बघत होते पण तिला काहीच फरक पडत नव्हता. ती केबिनमध्ये दार उघडून सरळ आत गेली.

दाराच्या आवाजाने कबीरने वरती मान करून पाहिलं तर श्रावणी होती. तिला असं अचानक आलेलं बघून कबीर लगेच उभा राहिला.

"हे काय श्रावणी, तू आता अचानक इथे कशी काय?" कबीरने विचारलं तसं ती खुर्चीवर बसली आणि पहिलं एक दिर्घ श्वास घेतला. धावत आल्यामुळे तिचा श्वास फुलला होता. तरीही ती बोलत होती.

"दादा, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे." श्रावणी म्हणाली तसं कबीरने तिच्या खांद्यावर हात ठेवला.

"हो सांग, पण त्याआधी थोडी शांत हो आणि पाणी पी. तुला किती दम लागलाय बघ, साधं बोलताही येत नाहीये तुला." कबीरने लगेच पाण्याचा ग्लास घेतला आणि तिला पाणी दिलं आणि ते तिला शांतपणे प्यायला सांगितलं. श्रावणी पाणी प्यायल्यावर जरा शांत झाली आणि कबीरला सांगू लागली.

"दादा, साईटवर जो प्राॅब्लेम झाला होता ना त्यात अनयचा हात आहे असं मला वाटतंय. वहिनीने मला त्या माणसाचा फोटो दाखवला. तो विजय आहे अनयचा भाऊ, त्यानेच मला मागे एकदा त्याची ओळख करून दिली होती." श्रावणी म्हणाली. ते ऐकून कबीरला धक्का बसला पण तरीही तो गोंधळला.

"अगं पण अनय आणि तुझ्यात हल्ली हल्ली वाद झाले, आगोदर तर तुमच्यात सगळं ठिक होतं ना आणि साईटवर काम चालू होऊन बरेच दिवस झाले होते. मग ते मटेरियल बदलण्यात अनयचा कसा काय हात असणार आहे?" कबीरला पडलेला प्रश्न त्याने श्रावणीला सांगितला.

"कदाचित तो आधीपासूनच माझी फसवणूक करत असेल आणि त्याला मी जेंव्हा दुसऱ्या मुलीसोबत बघितलं तेव्हा त्याचा खरा चेहरा माझ्या समोर आला असेल. पण माझी खात्री आहे की यामागे तोच खरा सुत्रधार आहे. त्यानेच ते सगळं मटेरियल चेंज केलं असेल. तू नीट विचार कर ना, त्या विजयची तुझ्याशी काही पर्सनल दुश्मनी आहे का!" श्रावणीचं बोलणं कबीरला पटलं होतं. त्याचवेळी त्याला अनयचा राग सुद्धा आला.

"पण आपलं नुकसान करून त्याचा काय फायदा होणार होता?" कबीर.

"ते मलाही माहित नाही, पण माझं मन मला सांगतंय की हे काम त्याचंच आहे." श्रावणी म्हणाली.

"आता हा अनय मला कुठे भेटेल, याचा काही अंदाज आहे का तुला?" कबीरने विचारलं.

"तो नेहमी त्याच कॅफेत पडलेला असतो. कदाचित आताही तिथेच असेल." श्रावणी म्हणाली.

"तू आता घरी जा, मी बघतो त्याचं काय करायचं ते!" कबीर म्हणाला आणि लगेच तो तिथून बाहेर पडला आणि सरळ श्रावणीने सांगितलेल्या कॅफे मध्ये गेला. श्रावणीने त्याला अनयचा फोटो दाखवला होता त्यामुळे कबीरला त्याला ओळखणं सोपं होतं.

कबीर कॅफेत गेला तेव्हा अनय तिथेच एका मुलीसोबत बसलेला होता. कबीरने कसलाही विचार न करता सरळ त्याची काॅलर पकडली आणि त्याला खेचत बाहेर आणू लागला. तिथले सगळेच लोक त्याच्याकडे बघत होते पण त्याला कोणाचीही पर्वा नव्हती.

"कबीर, काय करतोय हे सोड मला!" अनय म्हणाला तसं कबीरची पावलं थांबली आणि तो त्याच्यावर नजर रोखून बघू लागला.

"म्हणजे मी कोण आहे हे माहित आहे तर तुला. आता काय मी तुला सोडत नसतो. तुझ्यामुळे माझ्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आले, तुझ्यामुळे तिला किती त्रास झाला पण तिने मला अडवलं होतं म्हणून मी शांत होतो, पण आता नाही. आता बघच तू मी तुझी काय हालत करतो ते." कबीर रागाने बोलला आणि त्याला फरपटत घेऊन बाहेर आला आणि जबरदस्तीने त्याला गाडीत बसवले.

कबीरने विक्रमला फोन करून घरी यायला सांगितले आणि अनयलाही तो घरी घेऊन आला. तो त्याला घरी घेऊन आला तेव्हा श्रावणी पण घरी आलेली होती आणि विक्रम सुद्धा घरी आलेले होते.

"कबीर, काय आहे हे... कोण आहे हा? आणि याला इथे कशाला आणलंय?" विक्रमने विचारलं.

"हा अनय आहे, तोच अनय ज्याच्यामुळे माझ्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आले आणि हा तोच अनय ज्याच्या करतुदीमुळे मी इशितावर डाऊट घेतला आणि हाच तो... त्या विजयचा भाऊ आहे." कबीर म्हणाला तसं सगळ्यांनाच धक्का बसला. सान्वीने मात्र त्यावेळी सावधगिरी दाखवली आणि पटकन तिच्या मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केले.

"आता पटापट सगळं खरं खरं बोलायचं, माझं कन्ट्रक्शनचं काम चालू होते तिथे तुच हलक्या दर्जाचे मटेरियल टाकलं होतं ना, जे मटेरियल आम्ही मागवलं होतं ते तुच बदलवलं होतं ना!" कबीर म्हणाला.

"कुठलं मटेरियल, कुठलं कन्ट्रक्शन? मला यातलं काहीच माहिती नाही. तुम्ही काय बोलताय मला काहीच समजत नाही." अनय म्हणाला तसं कबीरने त्याच्या सानकन कानाखाली आवाज काढला.

"आता आठवलं असेल तुला, बोल पटकन. जर तू खरं बोलला नाहीस ना तुझी अशी हालत करेल ना इथून बाहेर पडूच देणार नाही मी तुला. अशा ठिकाणी डांबून ठेवेल ना, तुझा अत्ता पत्ता कोणालाच लागणार नाही. जिवंतपणी मरण काय असते ते दाखवेल मी तुला. मी तुला धड जगूही देणार नाही आणि धड मरूही देणार नाही. तिकडे तुझा भाऊ जेलमध्ये सडतोय आणि मी तुला इथे सडू देईल. तुला जर इथून सुखरूप बाहेर पडायचं असेल तर पटापट खरं काय ते सांग." कबीर म्हणाला पण अनय काही खरं बोलायला तयार नव्हता. शेवटी कबीरने त्याला असा तुडवला की त्याला तोंड उघडायलाच लावलं.

"मी सगळं खरं खरं सांगतो, पण मला मारू नका?" अनय हात जोडून विनवणी करू लागला. तेव्हा कबीर त्याला मारायचं थांबला.

"बोल पटकन आता, माझ्याकडे जास्त वेळ नाहीये." कबीर म्हणाला.

"ते मटेरियल वगैरे सगळं मीच बदललं होतं. तुमचं चांगल्या क्वालिटीचं मटेरियल मीच तिथून गायब केलं आणि हलक्या दर्जाचे मटेरियल तिथे नेऊन टाकले." अनयने शेवटी कबूल केले. पण ते ऐकून कबीरच्या डोळ्यात नुसत्या रागाच्या ज्वाला भडकत होत्या.

"तू काय केलंस ते कळतंय का तुला? तुझ्या अशा वागण्यामुळे किती लोकांचा जीव गेला असता याची तुला कल्पना तरी आहे का! किती तरी लोक तिथे साईटवर काम करत होते. त्यांच्या जीवाशी खेळलास तू. नशीब ही गोष्ट आमच्या लवकर लक्षात आली आणि तिथून सगळ्यांना जायला सांगितले, नाही तर केवढा मोठा अनर्थ घडला असता. कोणाला काही झालं असतं तर काय केलं असतं तू? दिले असते त्या लोकांचे प्राण परत!" कबीर रागाने लाल बुंद झाला होता आणि त्याला बोलत होता.

"चुक झाली माझी, ही शेवटची चुक... परत मी कधीच तुमच्या वाटेला जाणार नाही, पण आता मला इथून जाऊद्या." अनय म्हणाला.

"अजून पुर्ण बोलून कुठे झालंय तुला जाऊन द्यायला. तू हे का आणि कशासाठी केलं याचं उत्तर हवंय मला." कबीर म्हणाला तसं अनय लगेच गप्प झाला आणि खाली मान घालून घेतली. कबीरने त्याच्या हनुवटीला पकडलं आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघू लागला. अनय तर कबीरच्या डोळ्यातला राग बघूनच पुरता हादरला होता. आता खरं सांगितल्याशिवाय इथून आपली सुटका होणार नाही हे त्याला कळून चुकले होते.

क्रमशः

लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

0

🎭 Series Post

View all