Login

अशी जुळली गाठ. भाग - ४७

कबीर आणि सान्वीच्या अबोल प्रेमाची कहाणी
अशी जुळली गाठ. भाग - ४७

डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखन स्पर्धा.

"बोल पटकन, नुसता बघत काय राहिलाय. तुझ्यासाठी एवढा वेळ द्यायला माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये आणि तुझ्यासारख्या माणसासाठी वेळ वाया घालवावा इतकाही तू महत्वाचा नाहीये." कबीर रागाने बोलला.

"मी हे सगळं श्रावणीला आणि तुम्हाला धडा शिकवायचा म्हणून केलं!" शेवटी अनयने खरं सांगितलं. पण ते ऐकून श्रावणी त्याच्याकडे रागाने बघू लागली.

"असं काय बिघडवलं होतं मी तुझं की मला धडा शिकवायला तू आमचं एवढं नुकसान केलं." श्रावणी रागाने बोलली.

"काय बिघडवलं होतं? तुला आठवतंय का जेव्हा जेव्हा आपण भेटायचो तेव्हा तू माझ्याबद्दल कमी आणि तुझ्या या भावाबद्दलच जास्त बोलत होती. माझा दादा असा आहे, माझा दादा तसा आहे ऍव झालं तॅव झालं. सारखं आपलं फक्त भावाचच कौतुक, माझं कधीच एक शब्दानेही कौतुक केले नाही. मला ते सहनच होत नव्हते. म्हणून मी ठरवलं की तुझ्याशी गोड बोलून तुला तर फसवायचंच पण तुझ्या भावाला सुद्धा पुढे जाऊ द्यायचं नाही, पण तू नेमकं मला एक दिवस त्या कॅफेत माझ्या प्रेयसी सोबत पाहिलं, पण तरीही मला फरक पडला नाही. कारण मी आधीच तुझ्या भावाचं नुकसान केलं होतं आणि अजूनही करणार होतो पण...." अनय पुढे काही बोलणार तोच श्रावणीने त्याच्या कानाखाली वाजवली.

"तुला देवाने थोडी सुद्धा अक्कल नाही दिली का रे, मी दादाचं कौतुक करत होती ते तुला बघवलं नाही, पण तू हा विचार कधी केला का दादाचं कौतुक करता करता मी तुझं भविष्य उज्ज्वल करायचा सुद्धा विचार करत होती. तू त्याचा सारखा व्हावास असं वाटत होतं मला म्हणून मी तसं बोलत होती. पण तुझ्या डोक्यात मात्र वेगळंच काहीतरी चालू होते." श्रावणी म्हणाली.

"आता मला सांग, तू आणि तुझा भाऊ दोघांनी मिळून यात इशिताला अडकवायचा का प्लॅन केला?" कबीरने विचारलं.

"मला कळलं होतं की ती तिकडचं सगळं बघत होती म्हणून मी माझ्या भावाशी बोलून तिला त्यात अडकवायला सांगितले, ती अडकली असती तर मी यातून सहज सुटलो असतो असे मला वाटत होते. कारण माझा भाऊ तुमच्या ऑफिसमध्ये जाॅब करतोय ही गोष्ट मी श्रावणीला सांगितली नव्हती. त्यामुळे माझ्यापर्यंत कोणीच पोहचणार नाही असे मला वाटत होते." अनय म्हणाला.

"पण तसं काहीच झालं नाही, मी तुझ्या भावाला पाहिलं होतं त्यामुळे आज त्याचा फोटो पाहिला आणि मी तो लगेच ओळखला." श्रावणी म्हणाली.

"खरं तर तुला आमचं नुकसान करायचं काहीच कारण नव्हतं, पण तुझ्यासारखा विकृत माणूस काहीही करू शकतो. आता तुला मी सोडणार नाही. तुला पोलिसांच्या ताब्यात देणार म्हणजे देणारच." कबीर म्हणाला आणि त्याने लगेच पोलिसांना फोन करून घरी यायला सांगितले. फोन ठेवल्यावर अनय परत कबीरकडे बघून विकृतपणे हसू लागला.

"पोलिसांना बोलवलं आहे, पण हे सगळं मीच केलं आहे याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे, पोलिस मला कशाच्या आधारावर अटक करणार आहे हे तरी सांगा." अनय हसत म्हणाला. त्यावर कबीरचाही चेहरा थोडा उतरला पण इतक्या वेळ शांत असलेली सान्वी पुढे आली आणि ती अनय समोर उभी राहिली. त्याला तिच्या डोळ्यात जिंकल्याचे भाव दिसत होते.

"तुला काय वाटतं, खरंच आमच्याकडे पुरावा नसेल?" सान्वीने त्याला विचारलं. ती एवढी ठामपणे विचारत होती. ते बघून अनय जरा गडबडला. घरातलेही तिच्याकडे गोंधळून बघू लागले.

"मी ठामपणे सांगू शकतो, तुमच्याकडे माझ्या विरोधात कुठलाही पुरावा नाहीये." अनय म्हणाला पण त्याच्या आवाजात तेवढा ठामपणा नव्हता.

"आणि मी जर म्हटलं तर... माझ्याकडे पुरावा आहे, मग काय करशील." सान्वी म्हणाली तसं त्याने तिच्यावर हात उचलला, पण तिने तसाच त्याचा हात हवेत पकडला आणि तो जोरात पिरगळला.

"अम्महम्म, माझ्यावर हात उचलायची चुक करू नकोस. या हातात गावच्या मातीची ताकद आहे, ती तुला झेपणार नाही." सान्वी म्हणाली. तिने त्याचा हात पिरगळल्यामुळे तो जोरात विव्हळला. एकतर आधीच कबीरने मारलं होतं त्यात आता ही पण... तो सान्वीकडे घाबरूनच बघत राहिला. मग सान्वीने त्याच्या हाताला जोरात झटका दिला आणि त्याचा हात सोडून दिला.

"तू आता जे काही बोलत होता ना ते सगळं मी रेकॉर्ड केलं आहे, हाच तुझ्या विरोधात मोठा पुरावा आहे. खोटं वाटत असेल तर बघायचंय तुला, थांब दाखवतेच." असे बोलून सान्वी तो व्हिडिओ दाखवू लागली. त्याचवेळी अनय तिथून सटकायचा प्रयत्न करू लागला, पण सान्वीने पुढे पाय केला तसं तो धापकन जमीनीवर तोंडावरच पडला. तसं कबीरने त्याच्या शर्टची काॅलर पकडून त्याला उठवलं.

"तोंडावर पडायची भारी हौस आहे वाटतं तुला. आता जेलमध्ये जाऊन जेवढं तोंडावर पडायचं आहे तेवढं पडून घे." कबीर म्हणाला.

थोड्या वेळातच पोलिस आले आणि अनयला अटक करून घेऊन गेले. ते गेल्यावर कबीर सान्वीकडे आला आणि अभिमानाने तिच्याकडे बघू लागला.

"आज अनयला फक्त तुझ्यामुळे शिक्षा झाली, मी त्याला इथे घेऊन आलो पण ते रेकॉर्ड वगैरे करायचं माझ्या डोक्यातच नाही आलं, पण तू बरोबर सावधगिरीने ते केलं. आज बायको म्हणून तुझा जेवढा अभिमान वाटतोय ना तेवढाच एक स्त्री म्हणून सुद्धा तुझा खुप अभिमान वाटतोय. प्रत्येक स्त्रीने असंच खंबीर व्हायला हवं,‌ म्हणजे अनय सारखी माणसं अशी वागणार नाही." कबीर म्हणाला.

"हो वहिनी, आज तू तो फोटो काढला नसता आणि मला दाखवला नसता तर आपल्याला अनयचा खरा चेहरा कळलाच नसता." श्रावणी म्हणाली.

"श्रावणी, इथून पुढे तू सुद्धा जरा खमकं वागायला शिक. त्याने तुला फसवलं तेव्हाच खरं तर त्याला शिक्षा द्यायला हवी होती पण तेव्हा तू वेळेची वाट बघत बसली." कबीर म्हणाला.

"असू दे आता, असंही त्याला जी शिक्षा मिळायची होती ती मिळालीच." श्रावणी म्हणाली.

"हो ते तर आहेच, मी आणि बाबा पोलिस स्टेशनमध्ये जाऊन येतो. त्यांच्या काही फॉर्मेलिटी असतील त्या पुर्ण करुन येतो." कबीर म्हणाला तसं ते दोघेही पोलिस स्टेशनमध्ये गेले. तिकडून येता येता त्यांना संध्याकाळ झाली.

रात्री जेवताना सगळेच सान्वीचं कौतुक करत होते. त्याशिवाय खरा गुन्हेगार सापडला म्हणून सगळ्यांचं ओझंच उतरलं होतं. घरात छान आनंदाचं वातावरण होतं. अशातच विक्रमने विषय काढला.

"कबीर, आता सगळं काही ठिक झालंय आणि या काही दिवसांत तुलाही खुप मनस्ताप झालाय, मी काय म्हणतो तू आणि सान्वी चार दिवस कुठे तरी बाहेर फिरायला जाऊन या. तेवढंच तुला फ्रेश वाटेल आणि दोघांना एकत्र वेळही घालवायला मिळेल." विक्रम म्हणाले तसं कबीरने सान्वीकडे पाहिलं तर तिचा चेहरा खुलला होता. त्यालाही तिला घेऊन जायचंच होतं, तो काही बोलणार तोच श्रावणी पटकन मध्येच बोलली.

"म्हणजे दादा आणि वहिनी हनिमूनला जाणार!" श्रावणी बोलताच सविताने तिच्या पाठीवर एक फटका मारला.

"तुला कुठे काय बोलावं हे समजतं का गं... निदान आई बाबा समोर बसले आहे याचं तरी भान ठेव." सविता म्हणाली.

"काय चुकीचं बोलली ती, मला तर आवडेल हनिमूनला जायला." कबीर हसून म्हणाला तसं सान्वी खुप लाजली आणि तिथून उठूनच गेली. विक्रम मात्र शांतच राहिले.

"ए गधड्या, ते बघ तुझ्यामुळे ती लगेच लाजून उठून गेली.  तुम्ही फिरायला जाणार म्हणजे त्यातच सगळं आलं ना... मग एवढं स्पष्ट बोलायची काय गरज होती." सविता म्हणाली.

"आई, चालतं गं तेवढं.... आम्ही बोललो नसतो तर वहिनी बाहेर जायला तयार आहे की नाही हे कसं कळलं असतं. आता ती लाजून उठून गेली म्हणजे तिलाही दादा सोबत फिरायला जायचं आहे." श्रावणी म्हणाली.

"बरं तुमचं झालं असेल तर मी बोलू का आता?" विक्रम म्हणाले.

"हो बाबा बोला." कबीर म्हणाला.

"कुठे जायचं आहे ते सान्वी सोबत बोलून ठरव आणि दोन दिवसांनीच तुम्ही निघा, म्हणजे परत यायलाही उशीर होणार नाही." विक्रम म्हणाले.

"माझ्या डोक्यात जायचा प्लॅन होता पण इथे एक एक असं घडत गेलं की बाहेरही जाता आले नाही आणि सान्वीला वेळही देता आला नाही. पण आताही गेलो तर सगळा भार तुमच्यावर पडेल. त्यात इशिताही नाहीये." कबीर म्हणाला.

"मी करेन मॅनेज, तू नको टेन्शन घेऊ. तुम्ही बिनधास्त फिरून या." विक्रम म्हणाले तसं कबीर हो म्हणाला. मग त्यांचं बोलून झाल्यावर तो त्याच्या रुममध्ये गेला.

क्रमशः

लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all