अशी जुळली गाठ. भाग - ४८
डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखन स्पर्धा.
कबीर रूममध्ये आला तेव्हा सान्वी खिडकीतून बाहेर बघत होती. त्याला तिचा अर्धवट चेहरा दिसला पण त्यावरूनही ती अजूनही लाजतेय हे त्याच्या लक्षात आले. त्याने पाहिलं तर ती तिच्याच विचारात खिडकीबाहेर बघत होती. तो आत आलेला पण तिला समजलं नाही. कबीरही मग तिला कळू नये म्हणून चोर पावलांनी हळूहळू चालत आला आणि डायरेक्ट तिला पाठीमागून मिठी मारली. तसं ती दचकली. ती मोठ्याने ओरडणार तोच दुसऱ्याच क्षणी तिने कबीरला पाहिलं.
"काय हो तुम्ही, घाबरले ना मी." सान्वी म्हणाली आणि तिनेही त्याला मिठी मारली.
"आपल्या रूममध्ये मी सोडून अजून कोण येणार आहे आणि घाबरले हा शब्द तुझ्या तोंडी शोभत नाही, तू वाघीण आहे... वाघीण, आणि कायम अशीच वाघीण म्हणूनच रहा." कबीर म्हणाला.
"हो पण असं अचानक एकदमच जवळ आल्यावर भिती वाटणारच ना!" सान्वी.
"हो, पण मला सांग... तू लगेच रूममध्ये का निघून आली?" कबीरला माहित होतं तरीही त्याने मुद्दामच विचारलं.
"मग काय, ही श्रावणी पण ना... कुठेही काहीही बोलतेय. मला कसं तरीच वाटलं ते ऐकून." सान्वी म्हणाली, अजूनही ती लाजतच होती.
"बरं आता लाजून झालं असेल तर मला खरंच सिरियसली बोलायचं आहे तुझ्याशी." कबीर म्हणाला.
"हो बोला की!" सान्वी म्हणाली मग त्याने तिला बेडवर बसायला सांगितलं. तो ही तिच्या बाजूलाच बसला.
"आपल्याला फिरायला जायचं आहे, तू सांग तुला कुठे जायला आवडेल?" तिला ऑकवर्ड वाटायला नको आणि ती लाजू नये म्हणून कबीरने मुद्दामच हनिमून शब्द टाळला. त्याने विचारल्यावर ती पण विचार करू लागली. मग पटकन तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले.
"मला काश्मीरला जायला आवडेल." सान्वी म्हणाली.
"अरे व्वा, माझ्याही मनात हेच ठिकाण होतं. ठरलं तर मग, आपण काश्मीरलाच जाऊ." कबीर म्हणाला.
"कबीर, खरं सांगू का मी अजून फ्लाईटने कधी प्रवासच केला नाही. त्यामुळे थोडी भिती वाटतेय मला." सान्वी म्हणाली.
"मी आहे ना तुझ्यासोबत, मी असल्यावर तुझी भिती अशी पळून जाईल आणि आपण आता काश्मीरला जातोय पण नंतर मी तुला परदेशात घेऊन जाणार आहे, ही तर सुरुवात आहे पण पुढे आपल्याला खुप फिरायचे आहे." कबीर म्हणाला.
"तुम्ही सोबत असाल तर माझी कुठेही यायची तयारी आहे." सान्वी म्हणाली.
"मी कायम तुझ्यासोबत असणार आहे. आता छान आराम कर, उद्या आपण शाॅपिंगला जाऊ." कबीर म्हणाला आणि परत तिला मिठीत घेतले. मग दोघेही एकमेकांच्या मिठीत झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी दुपारीच कबीर घरी आला आणि सान्वीला घेऊन शाॅपिंगला गेला. तिच्यासाठी लागणारे ड्रेस वगैरे सगळं काही त्याने घेतलं. दोघांनीही भरपूर शाॅपिंग केली. रात्री बाहेरूनच डिनर वगैरे करून ते घरी आले. परंतु दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांच्या बॅग वगैरे सगळं पॅकिंग करून ठेवल्या. काश्मीरला जायची त्यांची सगळी तयारी झाली.
****************
कबीर संध्याकाळी घरी आला तेव्हा सान्वी रूममध्ये बॅगा घेऊनच बसलेली होती. तिला असं बसलेलं बघून कबीर आत आला आणि तिच्याजवळ बसला.
"हे काय, तू बॅग्ज अशा घेऊन का बसली आहे?" कबीरने विचारलं.
"आपल्याला उद्या सकाळी लवकर जायचं आहे ना, म्हणून आता परत एकदा सगळं चेक करून बघत होती, चुकून काही राहायला नको ना..." सान्वी म्हणाली तसं कबीरला हसूच आलं.
"अगं, आपण बॅग भरतानाच सगळं आठवणीने भरलं होतं ना... मग आता परत कशाला चेक करत बसली." कबीर म्हणाला.
"असु द्या काही नाही होत, तुम्ही जा आणि फ्रेश होऊन या मी तुमच्यासाठी काॅफी आणते." सान्वी म्हणाली तसं कबीर फ्रेश व्हायला गेला. मग सान्वीही त्याच्यासाठी काॅफी घेऊन आली. दोघांनी मस्त गप्पा मारत काॅफीचा आस्वाद घेतला.
रात्री जेवणं झाल्यावर सविता कबीर आणि सान्वीला एवढ्या सुचना देत होती की कबीर त्या सुचना ऐकून कंटाळला होता.
"आई, किती वेळा तेच तेच सांगशील, आता मी काय लहान आहे का?" कबीर वैतागून म्हणाला.
"तू लहान नाहीये हे मलाही माहित आहे, पण सान्वी पहिल्यांदा एवढ्या लांब जाणार आहे म्हणून तिची काळजी वाटतेय. तिला निट सांभाळून ने आणि सांभाळून आण." सविता म्हणाली त्यावर कबीरने मान हलवली. मग नंतर सगळेच झोपायला गेले.
सकाळी लवकर जायचं होतं म्हणून कबीरने मोबाईल मध्ये अलार्म लावला आणि झोपला. खरं तर दोघांनीही डोळे बंद केले होते, पण दोघांनाही झोप लागत नव्हती. उद्या काश्मीरला जायची जास्तच आतुरता होती. काश्मीरला जायची स्वप्न बघता बघताच उशिरा कधीतरी त्यांना झोप लागली.
सकाळी अलार्म वाजला तसं दोघेही एकाच वेळी उठले आणि अलार्म बंद करायला हात पुढे केला. तसं दोघांनाही हसू आले. मग सान्वीनेच तो बंद केला.
"कबीर, खरं सांगू का खुप दिवसांपासून काश्मीर बघायची इच्छा होती पण आज केवळ तुमच्यामुळे माझी इच्छा पुर्ण होतेय." सान्वी म्हणाली.
"हो पण वेळेत गेलो तर ती इच्छा पुर्ण होईल, आता बोलण्यात वेळ घालवायला नको. पटकन आवरून घेऊ म्हणजे आपल्याला लवकर निघता येईल." कबीर म्हणाला तसं सान्वी उठली आणि अंघोळीला गेली.
थोड्या वेळातच दोघेही तयार होऊन बॅगा घेऊन खाली आले. सविता आणि विक्रम उठलेलेच होते. त्या दोघांनी त्यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांचा निरोप घेऊन ते घराबाहेर पडले. ड्रायव्हर त्यांना एअरपोर्टवर सोडायला आला होता. तिथे पोहचल्यावर दोघेही वेटींग एरियात येऊन बसले. थोड्या वेळाने फ्लाईटची अनाउन्समेंट झाली. मग ते दोघेही फ्लाईट मध्ये बसले. फ्लाईट मध्ये बसताच सान्वीने कबीरचा हात घट्ट पकडून ठेवला. तिला सवय नव्हती त्यामुळे ती खुप घाबरली होती. तरीही कबीरकडे बघून चेहऱ्यावर हसू आणत होती.
जेव्हा फ्लाईटने उडान घेतलं तेव्हा सान्वीच्या पोटात गोळाच आला. खरं तर ती घाबरट नव्हती पण फ्लाईट मध्ये बसायची पहिलीच वेळ असल्याने कितीही मन घट्ट केले तरी तिला घाबरायला होत होतं. शेवटी तिने डोळे मिटून घेतले. ती घाबरली आहे हे कबीरला समजलं मग त्याने तिला एका हाताने जवळ घेतलं आणि धीर दिला. जसं जसं फ्लाईट वरती जात होते. तसतसी तिची भिती हळूहळू कमी झाली. मग तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. थोड्या वेळाने तिला जाणवलं की आपण घाबरत होतो पण यात घाबरण्यासारखं काहीच नाहीये. मग तिचंच तिला हसू आलं.
कबीरचा हात अजूनही तिच्या खांद्यावर होता. तो हात तिला सुरक्षिततेची जाणीव करून देत होता. ती खिडकीबाहेर बघू लागली तर तिला बाहेरचं दृश्य खुप छान वाटले. ढग अगदी पांढऱ्या चादरीसारखे पसरलेले दिसत होते. ते बघून ती खुप खुश झाली.
"कबीर, बाहेर बघा ना, ढग किती सुंदर दिसताय!" सान्वी म्हणाली तसं कबीर हलकसं हसला.
"मी कधीपासून तेच बघतोय, आता तू बघ. मी तुला बघतो." कबीर तिच्याकडे बघत मिश्कीलपणे हसत बोलला. तसं ती लाजून पुन्हा बाहेर बघू लागली.
"थोड्यावेळापूर्वी किती घाबरले होते मी. पण आता खरंच खूप छान वाटतंय." सान्वी म्हणाली.
"म्हणजे आता पुढचा प्रवास सोपा जाणार आहे." कबीर म्हणाला. त्यावर ती पुन्हा खिडकीबाहेर पाहू लागली. विमान वरती जात असताना खाली सगळं लहान होत चाललं होतं. ते सान्वी अजूनच उत्सुकतेने बघत होती.
बाहेर बघता बघता आणि कबीरशी गप्पा मारता मारता ते कधी काश्मीरला श्रीनगरमध्ये पोहचले हे सुद्धा तिला कळलं नाही.
श्रीनगरला पोहचताच कबीरने तिथे त्यांच्यासाठी गाडी मागवली. गाडी येताच ते दोघेही गाडीत बसले आणि त्यांनी बुक केलेल्या बोट हाऊसवर गेले. तिथे गेल्यावर बोट हाऊस बघून सान्वी खुप खुश झाली.
दोघेही तिथे आल्यावर फ्रेश झाले. मग थोड्या वेळातच कबीरने दोघांसाठी जेवण ऑर्डर केलं. जेवण करून दोघांनी संध्याकाळपर्यंत छान आराम केला. संध्याकाळी सान्वीला जाग आली तेव्हा तिने पाहिलं तर कबीर खुप गोळा होऊन झोपला होता. त्याला असं बघून त्याला थंडी वाजत असेल हे तिच्या लक्षात आले. मग तिने ब्लॅंकेट घेतलं आणि ते त्याच्या अंगावर टाकू लागली. तोच कबीरला जाग आली आणि त्याने तिचा हात ओढला.
असं ब्लॅंकेट टाकण्यापेक्षा तुच माझ्याजवळ झोपली तर माझी थंडी लवकर कमी होईल." कबीर म्हणाला तसं ती त्याच्याकडे बघू लागली. त्याचवेळी तो ही तिच्याकडे एकटक बघत होता त्यामुळे तिची नजर आपोआप खाली झुकली.
क्रमशः
लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा