Login

अशी जुळली गाठ. भाग - ४९

कबीर आणि सान्वीच्या अबोल प्रेमाची कहाणी
अशी जुळली गाठ. भाग - ४९

डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखन स्पर्धा.

"सान्वी, तुला खरंच आवडतो का गं मी...." कबीरने तिच्याकडे बघत तिला प्रश्न विचारला. तसं ती हलकंसं हसत त्याच्याकडे बघू लागली.

"आज अचानक असा प्रश्न का विचारावासा वाटला तुम्हाला?" सान्वी म्हणाली.

"आपल्या लग्नाला इतके दिवस होऊन सुद्धा मी तुझ्यापासून दूर पळत राहिलो, तुला कधी माझा राग आला नाही का?" कबीर.

"अजिबात नाही, तुम्ही माझ्यासाठी जे केलंय ते मी कधीच विसरू शकत नाही कबीर. त्यामुळे तुमचा राग करणं शक्यच नाही." सान्वी म्हणाली.

"पण तरीही मी चुकलोच ना!" कबीरच्या बोलण्यात अपराधीपणाची भावना होती.

"आता हे असले प्रश्न आणि विचार काहीच डोक्यात आणायचं नाही. आपण इथे एंजॉय करायला आलो आहे ना मग तेच करू आणि इथून परत जाताना खुप सारा आनंद आणि समाधानाची शिदोरी सोबत घेऊन जाऊ." सान्वी म्हणाली. तसं कबीर काही क्षण तिच्याकडे तसाच बघत राहिला. तिच्या चेहऱ्यावर ना कसली तक्रार दिसत होती, ना कोणत्या अपेक्षेचं ओझं… फक्त शांत आणि प्रेमळ भाव होते.

"तू एवढं शांतपणे मला समजून घेतलं याचं खरंच मला खुप कौतुक वाटतंय." कबीर म्हणाला. त्यावर सान्वी हसली.

"मी समजून घेतलं नसतं तर आपल्या आयुष्यात हा एवढा आनंदाचा क्षण आला नसता." सान्वी म्हणाली तसं तो तिच्या शेजारी सरकला. थंड वाऱ्याची झुळूक येताच त्याने तिलाही ब्लॅंकेट मध्ये घेतलं आणि दोघेही तसेच बसून खिडकीबाहेरचं दृश्य बघत होते.

"कबीर, आता बाहेर अंधार पडलाय. उठा आणि छान गरम गरम पाण्याचा शाॅवर घ्या म्हणजे तुम्हाला फ्रेश वाटेल." सान्वी म्हणाली.

"हो त्याशिवाय खरंच माझी थंडी जाणार नाही." कबीर म्हणाला आणि फ्रेश व्हायला गेला. मग सान्वी बाल्कनीत गेली आणि बाहेर बघू लागली.

कबीर फ्रेश होऊन आल्यावर तो ही तिथेच आला आणि बाल्कनीत खुर्चीवर बसला. मग सान्वीही फ्रेश व्हायला गेली. ती गेल्यावर कबीर शांतपणे बाहेर बघू लागला त्याचवेळी त्याच्या मनात इशिताचा विचार आला.

"आज आमचं नातं खऱ्या अर्थाने पुढे जातंय तर मी सान्वीला इशिता आणि माझ्याबद्दल सांगावं का?" असा विचार कबीरच्या मनात आला. पण परत सान्वीने जर आपल्याला समजून घेतलं नाही आणि ती रागावून कुठे निघून गेली तर या अनोळखी शहरात तिला कुठे शोधायचं? असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात येऊ लागले. मग इशिता अशीही कायमची निघून गेली आहे तर आता तिचा विषय नकोच हाच निर्णय शेवटी त्याने घेतला आणि सान्वीच्या आवाजाने तो भानावर आला.

"काय हो एवढा कसला विचार करत होता की मी आलेली पण तुम्हाला कळलं नाही." सान्वी म्हणाली तेव्हा कबीर तिच्याकडे बघू लागला.  तिने आज पहिल्यांदाच गुडघ्यापर्यंत वनपिस घातला होता. त्यात ती खुप सुंदर दिसत होती. त्याची तिच्यावरून नजरच हटत नव्हती. तिचं रूप बघून त्याच्या मनातले सगळेच विचार भर्रकन उडून गेले. तो लगेच उठला आणि तिच्याजवळ गेला.

"सान्वी, खुप सुंदर दिसतेय तू." कबीर म्हणाला आणि तिला जवळ घेत हळूच तिच्या कपाळावर ओठ टेकवले. त्याच्या ओठांचा तो पहिला वहिला स्पर्श होता. त्या स्पर्शाने सान्वीच्या अंगावर शहारे आले, ती लाजून मागे झाली.

"तुम्हाला आता काही सुप वगैरे मागवायचं आहे की डायरेक्ट जेवणारच आहात!" सान्वीने लगेच जेवणाचा विषय काढला.

"ते बघतो मी, पण आता तरी माझ्यापासून दूर पळू नकोस. नाही तर इथे आल्याचा आपला काहीच फायदा होणार नाही." कबीर तिचा हात ओढत म्हणाला.

"मी तुमच्यापासून दूर पळत नाहीये, पण आता खरंच भुक लागली आहे, काहीतरी गरमागरम खावंसं वाटतंय, गरम काहीतरी पोटात गेलं तर जरा थंडी कमी वाटेल." सान्वी म्हणाली.

"ठिक आहे मग आपण जेवणच ऑर्डर करू, आता सुप मागवलं तर जेव‌ण जाणार नाही." कबीर म्हणाला आणि त्याने जेवण ऑर्डर केलं. थोड्या वेळातच वेटर त्यांची जेवणाची ऑर्डर देऊन गेला.

सान्वी जेवायला सुरूवात करणार तोच कबीरने तिला घास भरवला. मग तिनेही त्याला घास भरवला. हसत गप्पा मारत त्यांचं जेवण झालं. नंतर मग कबीरने घरी आई बाबांना फोन केला. त्यांच्याशी बोलून झाल्यावर बेडरूममध्ये गेला. मग सान्वी पण त्याच्या मागे गेली.

बेडरूममध्ये पाऊल टाकताच सान्वी खुश होऊन सगळीकडे बघू लागली. ती बेडरूम पुर्ण फुलांनी सजवली होती. पलंगाच्या हेडबोर्डवर फुलांची नाजूक माळ लावलेली होती. बाजूच्या टेबलावर सुगंधी मेणबत्त्या लावल्या होत्या. संपुर्ण बेडरूममध्ये फुलांचा आणि त्या मेणबत्याचा वास दरवळत होता. सान्वी खुश होऊन तो सुवास नाकात भरुन घेत होती. खिडकीजवळ हलके, पांढरे पडदे लावले होते आणि वाऱ्याने ते हळूच हलत होते.

एका कोपऱ्यात छोटंसं फुलांचं बास्केट ठेवलेलं होतं, सान्वीला बघताच कबीर त्या बास्केट जवळ गेला आणि तिच्यावर फुलांची उधळण करू लागला. तसं सान्वी हसू लागली.

"काय हे कबीर...." सान्वी म्हणाली.

"तुझं या बेडरूममध्ये स्वागत आहे." कबीर म्हणाला तसं ती हळूच त्याच्या जवळ आली.

"थॅंक्यू सो मच कबीर, खुप छान सरप्राईज दिलं तुम्ही मला. हे सगळं खुप आवडलं मला." सान्वी म्हणाली आणि तिने त्याला मिठी मारली आणि तिला दोन्ही हातांवर उचललं आणि बेडवर घेऊन गेला. ती अजूनही त्याच्या हातांवरच होती, त्यामुळे दोघांचेही चेहरे अगदीच जवळ आले होते. दोघांमधलं अंतर जणू श्वासाइतकंच उरलं होतं. त्याचे श्वास तिच्या कानापर्यंत जात होते. त्यामुळे तिचं शरीर थरथरत होतं, पण तरीही तिला तो क्षण हवाहवासा वाटत होता. त्याच्या मिठीत तिला जणू स्वर्ग सुखाचा आनंद वाटत होता. तर त्याच्या नजरेत न बोललेलं प्रेम होतं. क्षणभर दोघेही स्तब्ध झाले आणि एकमेकांच्या नजरेत बघू लागले. त्या मेणबत्तीच्या प्रकाशात त्यांचे डोळेच जणू काही सगळं बोलत होते. ती वेळ जणू काही त्यांच्यासाठी थांबली होती. त्याने अलगद तिच्या गालाला स्पर्श केला आणि त्याच वेळी तिचं हृदय धडधडू लागलं.

ती नजर खाली झुकवणार, तेवढ्यात त्याने तिची हनुवटी हलकेच वर उचलली. आता त्यांच्या श्वासांची ऊब एकमेकांत मिसळली. हळूहळू दोघांमधलं अंतर कमी होत गेलं. त्याने हळूच तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. तोच तिचे हात त्याच्या पाठीवर विसावले. दोघेही एकमेकांच्या मिठीत एकमेकांचा स्पर्श अनुभवत होते. स्पर्शापेक्षा भावना जास्त बोलल्या जात होत्या. ते आज फक्त मनानेच नाही तर शरीराने सुद्धा एक झाले आणि त्यांच्यातलं सगळंच अंतर दूर झालं. आज खऱ्या अर्थाने त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात झाली.

क्रमशः

लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all