Login

अशी जुळली गाठ. भाग - ५०

कबीर आणि सान्वीच्या अबोल प्रेमाची कहाणी
अशी जुळली गाठ. भाग - ५०

डिसेंबर-जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखनस्पर्धा.

सान्वीला सकाळी जाग आली तेव्हा तिने डोळे उघडले आणि तिला रात्रीचे क्षण आठवले तसं तिच्या चेहऱ्यावर लाजरं हसू आलं. ती उठून बसणार तोच कबीरने तिला जवळ ओढलं आणि घट्ट मिठी मारली.

"कशाला उठायची गडबड करतेय, आता इथे आपण दोघंच आहोत. कामाचं टेन्शन नाही की कसलं टेन्शन नाही. झोप अजून थोडावेळ." कबीर म्हणाला तसं तिही त्याच्या मिठीत पडून राहिली.

"इथलं वातावरण किती छान आहे ना, किती शांत वाटतंय इथे." सान्वी म्हणाली.

"मला तर तू जिथे जिथे सोबत असशील तिथलं वातावरण माझ्यासाठी शांतच असणार आहे." कबीरच्या वाक्यावर सान्वी खळखळून हसली. थोडावेळ दोघं तसेच ब्लॅंकेट मध्ये पडून गप्पा मारत होते. नंतर उठून दोघेही फ्रेश वगैरे होवून बाल्कनीत जाऊन बसले. बाल्कनीतून सकाळचा देखावा खुप सुंदर दिसत होता. तिथे बसूनच दोघांनी ब्रेकफास्ट केला.

ब्रेकफास्ट झाल्यावर दोघेही छान तयार होऊन फिरायला म्हणून बाहेर पडले. तिथला जवळपासचा परीसर फिरून नंतर ते शालीमार बाग आणि निशात बाग पाहायला गेले. कबीर आणि सान्वीने कधी एकत्र फोटो काढले नव्हते, त्यामुळे आता फिरताना कबीर कधी दोघांचे, तर कधी सान्वीचे एकटीचे फोटो काढत होता. त्याला सारखं फोटो काढताना बघून सान्वीला हसायलाच येत होते.

"कबीर, किती फोटो काढताय तुम्ही! बसं झालं की आता!" सान्वी म्हणाली.

"असुदेत, आपण इथे फिरलो याच्या आठवणी या फोटोत कायम राहतील. जेव्हा जेव्हा आपण हे फोटो बघू तेव्हा तेव्हा आपल्याला इथे घालवलेले सोनेरी क्षण आठवतील." कबीरचं म्हणणं तिलाही पटलं. मग ते बराच वेळ तिथे फिरले. नंतर दुपारी जेवणाची वेळ झाली तेव्हा हॉटेलमध्ये छान काश्मिरी जेवण केलं. जेवण झाल्यावर परत त्यांच्या बोट हाऊस मध्ये आले आणि आराम केला.

संध्याकाळी परत ते दोघं बुलेव्हार्ड रोडवर फिरायला गेले.  सूर्य हळूहळू अस्ताला जात होता. आकाशात केशरी, गुलाबी रंगांची उधळण झाली होती. तो देखावा खुप सुंदर वाटत होता. सान्वी थांबून तो देखावा पाहू लागली. त्यावेळी कबीरने लगेच मोबाईल मध्ये तिचा फोटो काढला. नंतर हळूहळू अंधार पडायला लागला मग ते परत बोट हाऊसवर आले.

सान्वी बेडवर बसली आणि त्याचवेळी पुर्ण दिवस तिच्या डोळ्यासमोरून गेला. मनाला एक वेगळेच समाधान वाटत होते. ती हसून कबीरकडे बघू लागली.

"कबीर, काश्मीर खूप सुंदर आहे… पण माझ्यासाठी आजचा दिवस त्याहूनही जास्त सुंदर आहे." सान्वी म्हणाली. तसं कबीर तिच्या शेजारी येऊन बसला.

"हो कारण आपण दोघं एकत्र आहोत." कबीर म्हणाला आणि त्याने जेवढे फोटो काढले होते ते तिला दाखवू लागला. मग थोड्या वेळातच त्यांनी जेवण केलं. रात्र परत एकमेकांच्या मिठीत घालवली.

सकाळ होताच कबीरने सान्वीच्या गालावर हात ठेवत तिला आवाज दिला.

"सान्वी उठतेस का, आज आपल्याला गुलमर्ग बघायला जायचं आहे." कबीर म्हणाला तसं सान्वीने दोन्ही हातांनी त्याला विळखा घातला.

"कबीर, आज जरा जास्तच थंडी वाजतेय." सान्वी म्हणाली.

"हे काश्मीर आहे, इथे थंडी तर वाजणारच ना... मग आपण फिरायचं नाही का?" कबीर.

"असं कुठे म्हणाले मी, पण थोडा वेळ थांबा ना." सान्वी म्हणाली.

"बरं तू झोप अजून थोडावेळ, तोपर्यंत मी माझं आटोपून येतो." कबीर म्हणाला आणि फ्रेश व्हायला गेला. थोड्या वेळाने सान्वीही उठली. फ्रेश होऊन तिने ड्रेसवर स्वेटर घातला. केस मोकळे सोडले आणि छान हलकासा मेकअप केला. मागे वळली तसं कबीर तिलाच एकटक बघत राहिला.

"आज थंडीपेक्षा जास्त काहीतरी बोचतंय मला…" कबीर तिच्याकडे बघत मिश्कीलपणे म्हणाला.

"काय?" तिने गोंधळून विचारलं.

"तुझं सुंदर दिसणं!" कबीर म्हणाला तसं ती लाजली आणि हलकेच त्याच्या खांद्यावर थाप मारली.

"काहीपण...." सान्वी लाजून बोलली.

"काहीपण नाही, खरं तेच बोलतोय." कबीर म्हणाला.

"बरं चला आता, फिरायला जायचं आहे ना!" सान्वी म्हणाली.

"हो हो चल." कबीर म्हणाला तसं ते बाहेर पडले मग ड्रायव्हरसोबत ते गुलमर्गकडे निघाले. रस्ता जसजसा पुढे जात होता तसतशी दरी खोल होत होती, पाइनची उंच झाडं, मध्येच दिसणारे लाकडी घरं, बर्फाची पातळ चादर पसरलेली माळराने… हे सगळं सान्वी खिडकीतून बाहेर पाहत होती आणि जणू प्रत्येक दृश्य डोळ्यांत साठवून ठेवत होती.

गुलमर्गला पोहोचताच सान्वीचा श्वासच थांबला. समोर पसरलेलं शुभ्र सौंदर्य, दूरवर बर्फाच्छादित डोंगर, आणि थंड हवेत तरंगणारी धुक्याची पातळ चादर… सगळंच स्वप्नवत होतं. ते बघून ती खुप खुश झाली.

नंतर ते गोंडोला राईडसाठी रांगेत उभे राहिले. केबल कार वर जाऊ लागली तशी खाली दिसणारी हिरवळ आणि पांढरा बर्फ एकमेकांत मिसळत गेला. मग सान्वी थोडी घाबरून कबीरचा हात पकडून बसली.

"भिती वाटतेय का?" कबीरने विचारलं.

"नाही… पण तुमचा हात धरून बसायला छान वाटतंय." सान्वी म्हणाली. थोड्या वेळातच ते वरती पोहचले.

वरती पोहोचल्यावर थंडी जास्तच जाणवत होती. पण तिथला नजारा बघून त्या थंडीची एक वेगळीच मजा वाटत होती. थोडा वेळ त्यांनी बर्फात चालणं, फोटो काढणं, लहान मुलांसारखं बर्फ उचलून एकमेकांवर फेकणं. हे सगळं एंजॉय केलं. सान्वीचा तो खळखळून हसणारा आवाज गुलमर्गच्या शांततेत अजूनच खुलून गेला. तिचं हसणं बघून कबीर तिच्याकडे बघत राहिला.

"देवा, हे हसू कायम असंच राहू दे." कबीर तिच्याकडे बघत मनातच म्हणाला.

****************

पुढचे दोन दिवस काश्मीरला छान फिरून, एकमेकांसोबत वेळ घालवून त्या आनंदाची शिदोरी सोबत घेऊन ते आज घरी निघाले. निघताना दोघांचाही पाय निघत नव्हता पण जड पावलांनी त्यांनी काश्मीरला निरोप दिला.

कबीर आणि सान्वी घरी येणार म्हणून सविता खुप आनंदात होती. तिने त्यांच्या औक्षणाची तयारी सुद्धा करून ठेवली होती.

संध्याकाळी दोघं घरी आल्यावर त्यांनी तिला दारातच अडवले आणि त्यांचं औक्षण केले. ते बघून कबीरला छान वाटलं.

"आई, हे औक्षण वगैरे करायची काहीच गरज नव्हती." कबीर हसून म्हणाला.

"असूदे, तेवढंच मला समाधान. आज तुमचे दोघांचे आनंदी चेहरे पाहून मला खुप छान वाटतंय." सविता म्हणाली. मग ते दोघेही आत आले. त्यांना बघताच श्रावणी तिथे आली आणि त्यांना प्रश्न विचारून पार भांडावून सोडलं. सान्वी हसून तिला सगळी उत्तरं देत होती, पण हळूहळू कबीरला तिच्या प्रश्नांचा कंटाळा येऊ लागला.

"एकाच वेळी सगळे प्रश्न विचारणार आहे की नंतरच्याला पण काही ठेवणार आहे." कबीर म्हणाला.

"दादा, प्रश्नांची उत्तरे नाही दिली तरी चालतील, पण माझ्यासाठी काही गिफ्ट वगैरे आणलं आहे की नाही, की फक्त फिरूनच आला." श्रावणी म्हणाली.

"सगळ्यांसाठी गिफ्ट आणले आहे, हे बघ या बॅगमध्ये आहेत सगळे गिफ्ट, तूच उघडून बघ." सान्वी म्हणाली आणि तिने श्रावणीकडे बॅग दिली. मग ती ही सगळे गिफ्ट बघू लागली. एवढे गिफ्ट बघून श्रावणी खुप खुश झाली.

"वहिनी, हे सगळं तुच घेतलं असशील. दादा असं काही घेणार नाही हे माहितीये मला." श्रावणी म्हणाली. तसं कबीर तिच्याकडे डोळे मोठे करून बघू लागला.

"म्हणजे मी तुझ्यासाठी कधीच काही घेत नाही का?" कबीर म्हणाला. त्यावरून त्या दोघांची तू तू मैं मैं चालू झाली. सविता मात्र हसून त्या दोघांकडे बघत होती.

"आज खरं घराला घरपण आल्यासारखं वाटलं, नाही तर चार दिवस घरात एवढी शांतता होती की या घरात कोणी राहतच नाही असं वाटत होतं." सविता म्हणाली. तसं कबीर तिच्या जवळ गेला आणि तिचा हात हातात घेतला.

"आई, आम्ही तुला आणि या घराला सोडून कधीच कुठे जाणार नाही आणि गेलो तरी तुझ्या आणि घराच्या ओढीने लवकर परत येऊ." कबीर म्हणाला तसं सविताचे डोळे पाणावले आणि चेहऱ्यावर हलकसं हसू आलं.

"फ्रेश होऊन या तुम्ही, तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा ठेवते." सविता म्हणाली.

"हो चालेल, पण आई... आजचं जेवण तुझ्या हातचं हवं आहे, चार दिवस बाहेरचं खाऊन खरंच कंटाळा आला आहे मला!" कबीर म्हणाला.

"हो आज लताला आराम, मीच बनवते जेवण." सविता म्हणाली तसं ते दोघेही त्यांच्या रूममध्ये आले. दार उघडून दारातूनच दोघं आत बघू लागले.

"बाहेर कितीही फिरलो, कितीही एंजॉय केला तरी आपल्या घराची सर कशालाच येत नाही, हो ना कबीर." सान्वी आत बघत म्हणाली.

"हो कारण बाहेर सगळ्या गोष्टी पैशाने विकत घेतो. त्या सगळ्या कितीही नाही म्हटलं तरी कृत्रिमच असतात, पण घरी तसं नसतं. घराच्या भिंतीत मायेची ऊब असते आणि ती उबच आपल्याला एकत्र बांधून ठेवते." कबीर म्हणाला. मग दोघेही आत आले आणि फ्रेश होऊन खाली गेले.

क्रमशः

लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all