Login

अशी जुळली गाठ. भाग - ५१

कबीर आणि सान्वीच्या अबोल प्रेमाची कहाणी
अशी जुळली गाठ. भाग - ५१

डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखनस्पर्धा.

सविताने बनवलेल्या जेवणाचा स्वाद सगळीकडे दरवळत होता. तिने आज सगळे पदार्थ सान्वी आणि कबीरच्या आवडीचे बनवले होते.

जेवायला बसताच कबीरने सविताचं भरभरून कौतुक केलं. चारच दिवस घरापासून लांब होता, पण ते चार दिवस सुद्धा त्याला जास्त वाटत होते. आज तो छान मनसोक्तपणे जेवला.

"आई, खरंच तुझ्या हातच्या जेवणाची सर कशालाही नाही, आज खरोखर मन तृप्त झाले." कबीर म्हणाला.

"माझ्या जेवणाचं एवढं कौतुक केलं तर तुझ्या बायकोला राग येईल बरं!" सविता हसून म्हणाली.

"नाही आई, मला नाही राग येणार. खरं तर आज माझं सुद्धा मन तृप्त झाले आहे तुमच्या हातचं जेवण करून. प्रत्येक आईच्या हाताला चव तर असतेच, पण त्यापेक्षा जास्त त्यात माया आणि प्रेम असते." सान्वीच्या या वाक्याने सवितालाही मनातून खूप छान वाटले.

जेवण झाल्यावर कबीरने स्वतःहून विक्रमकडे कामाचा विषय काढला. मग ते ही त्याला कामाच्या अपडेट देऊ लागले.

"कबीर,‌ तुझं काम झालंय. मी तुझ्यासाठी पीएची नेमणूक केली आहे. आजपासूनच मी पीएला जाॅईन व्हायला सांगितले होते. आज मी सगळी माहिती आणि कामाचं स्वरूप समजून सांगितले आहे. आता बाकी उद्या तू ऑफिसला आल्यावर काय बोलायचे आहे ते बोलून घे." विक्रम म्हणाले.

"कोण आहे ती?" कबीरने विचारलं.

"ती नाही... तो आहे." विक्रम म्हणाले.

"म्हणजे?" कबीर.

"म्हणजे मी तुझा पीए म्हणून एका मुलाची निवड केली आहे. नील जगताप नाव आहे त्याचं, तो हुशार तर आहेच शिवाय प्रामाणिक पण आहे आणि खुप मेहनती आहे." विक्रम म्हणाले.

"तुम्ही त्याची निवड केली आहे म्हणजे हुशार तर असणारच, त्यात काही वादच नाही." कबीर म्हणाला.

"बरं आता तुमच्या कामाच्या गप्पा पुरे झाल्या आता, प्रवासाने दमले असाल झोपा आता. उद्या सकाळी परत काम आहेच, ते काही चुकणार नाही." सविता म्हणाली तेव्हा त्यांनी त्यांच्या गप्पा बंद केल्या आणि सगळे झोपायला गेले.

**************

सान्वी अंघोळ करून आली आणि केस मोकळे सोडून आरशासमोर येऊन उभी राहिली. तिचे ओले केस तिने मागे केले. तसं त्या केसांचं पाणी कबीरच्या चेहऱ्यावर पडलं आणि त्याला जाग आली मग तो उठला आणि त्याने पाठीमागून येऊन तिला मिठी मारत आरशातून तिच्याकडे बघू लागला.

"गुड मॉर्निंग माय स्वीट वाईफ." कबीर हसतच म्हणाला.

"व्हेरी गुड मॉर्निंग, या रूममधली आजची माॅर्निंग खरंच खुप गोड झाली माझी." सान्वी म्हणाली.

"ती कशी काय?" कबीर.

"कारण तुमचा एवढा हसरा आणि गोड आवाज कानावर पडला." सान्वी म्हणाली.

"तो आता रोजच पडणार आहे, पण खरं सांगू का आज तुला सोडून ऑफिसला जावसंच वाटत नाहीये." कबीर म्हणाला तसं सान्वी हसली.

"मग नका जाऊ, बाबांना सांगा की मी आज नाही येत." सान्वी म्हणाली.

"म्हणजे बाबा मला कायमचंच घरी राहायला सांगतील." कबीर.

"एवढं कळतंय ना, मग जा पटकन आवरा. नाही तर उशीर होईल, तोपर्यंत मी तुमच्या नाष्ट्याचं बघते." सान्वी म्हणाली आणि बाहेर गेली.

कबीरला आज खरंच ऑफिसला जायची इच्छा होत नव्हती, पण तरीही तो ऑफिसला गेला. तिथे गेल्यावर इशिताची आठवण आली, पण परत त्याने तिचे विचार बाजूला ठेवले आणि नवीन आलेल्या पीएची ओळख वगैरे करून घेतली आणि त्याला कामाचं स्वरूप समजून सांगितले.

जसजसे दिवस जात होते तसं कबीर आणि सान्वी मधलं प्रेम छान फुलत चाललं होतं. ऑफिसमध्ये नील खुप मेहनत घेत होता त्यामुळे कबीरही इशिताला पुर्ण विसरून गेला होता. अनयलाही शिक्षा झाली होती. कबीरचं जे बांधकाम रखडलं होतं ते ही चालू झालं होतं.

कबीर ऑफिसमध्ये काम करत असताना त्याला श्रावणीचा फोन आला. पण कामात असल्यामुळे त्याने तो रिसिव्ह केला नाही. पण श्रावणीच ती.... ती काही त्याने फोन उचलल्याशिवाय गप्प राहणार नव्हती. ती परत परत त्याला फोन करत होती. शेवटी वैतागून त्याने फोन रिसिव्ह केला.

"काय झालं? एवढी कुठे आग लागली आहे, सारखा सारखा फोन करतेय, मी फोन उचलत नाही म्हणजे कामात आहे एवढं साधं कळत नाही का तुला!" फोन रिसिव्ह करताच कबीर रागाने म्हणाला.

"आग लागली नाहीये, पण आता मी जे काही सांगतेय ते जर ऐकलं नाही तर चांगलीच आग भडकेल आणि त्या आगीत तुझं काय होईल हे सांगता येणार नाही." श्रावणी म्हणाली.

"म्हणजे?" कबीरने गोंधळून विचारलं.

"म्हणजे, उद्या तुझ्या बायकोचा आणि माझ्या लाडक्या वहिनीचा बर्थडे आहे हे तुला माहीत आहे का?" श्रावणी म्हणाली तसं कबीरने डोक्याला हात लावून आठवायचा प्रयत्न केला पण त्याला काही सान्वीची जन्म तारीख आठवत नव्हती.

"तू खरं सांगतेय, उद्या खरंच सान्वीचा बर्थडे आहे?" कबीरने विचारलं तसं श्रावणीने स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला.

"दादा, अरे आठ महिने झाले तुमच्या लग्नाला आणि तुला तुझ्या बायकोचा वाढदिवस माहीती नाही, असा कसा नवरा आहेस तू!" श्रावणी म्हणाली.

"मला खरंच माहिती नव्हते, श्रावणी तू मला वाचवलंस... नाही तर माझं काही खरं नव्हतं. मी आताच तयारीला लागतो, उद्याचा दिवस सान्वीसाठी एकदम खास झाला पाहिजे." कबीर म्हणाला.

"हो पण मला तुझ्याकडून गिफ्ट हवं आहे." श्रावणी म्हणाली.

"बर्थडे सान्वीचा आहे ना मग तुला कशाला गिफ्ट!" कबीर.

"माझ्यामुळे तू वहिनीच्या रागापासून वाचला आहे, मी तुझं एवढं मोठं काम केलं आहे मग मला गिफ्ट हवंच, तू जर दिलं नाही तर मी वहिनीला सगळं खरं सांगून टाकेल." श्रावणी म्हणाली.

"हा ठिके ठिके, देतो तुला गिफ्ट... आता ठेव फोन." कबीर म्हणाला आणि फोन ठेवला. सान्वीला बर्थडेला काय गिफ्ट द्यायचं याचा विचार तो करत होता तोच त्याला काहीतरी आठवलं तसं तो नीलला सांगून बाहेर गेला.

संध्याकाळी घरी आल्यावर तो बर्थडे बद्दल सान्वी सोबत काहीच बोलला नाही. त्याने घरातही सगळ्यांना तिच्या बर्थडेचा विषय काढायचा नाही असे सांगून ठेवले.

रात्रीच्या वेळी सान्वी रूममध्ये खिडकीतून बाहेर बघत होती. कबीर मुद्दाम लॅपटॉप घेऊन कामात खुप बिझी आहे असं दाखवत होता. पण तिरक्या नजरेने तिच्याकडेच बघत होता.

"उद्या माझा बर्थडे आहे, हे घरात कोणालाच माहीत नाही वाटतं. काय करू? कबीरला सांगू का उद्या माझा बर्थडे आहे." सान्वी स्वतःशीच मनातल्या मनात बोलली आणि कबीरला सांगायचं ठरवून त्याच्या जवळ येऊन बसली.

"कबीर, ऐका ना उद्या माझा...." सान्वी पुढे काही बोलणार तोच कबीरने तिला अडवले.

"सान्वी, प्लीज मला आता खुप काम आहे. तुला जे काही बोलायचं आहे ते सकाळी बोल. माझं काम मला काही करून आज रात्रीच पुर्ण करायचं आहे. एका रो हाऊसचा प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट माझ्यासाठी खुप महत्वाचा आहे, प्लीज मला काम करू दे." कबीर म्हणाला तसं सान्वीचा चेहराच उतरला.

"मला फक्त दोनच मिनिटं बोलायचं आहे तुमच्याशी." सान्वी म्हणाली. तिच्या आवाजाचा स्वर दुखरा होता. तो ऐकून कबीरलाही वाईट वाटले. त्याला खरं तर तिला दुखवायचं नव्हतं पण आता ती काय सांगणार आहे हे त्याला कळलं होतं म्हणून तो तिचं ऐकून घेत नव्हता.

"सान्वी, प्लीज मला डिस्टर्ब करू नको. हवं तर उद्या पाहिजे तेवढा वेळ मी तुझं म्हणणं ऐकून घेईल पण आता मला काम करू दे. तू झोप शांतपणे, म्हणजे मी माझं काम करू शकेल." कबीर म्हणाला तसं सान्वी नाराज झाली आणि झोपून घेतलं.

बऱ्याच वेळाने तिला झोप लागली. तिला झोप लागली आहे याची खात्री करून मगच कबीरने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि त्याच्या कामाला लागला. ते झाल्यावर तो सान्वीजवळ येऊन झोपला.

सकाळी कबीरला सान्वीच्या आधीच जाग आली होती, पण तो मुद्दाम तसाच डोळे मिटून शांत पडून सान्वी उठण्याची वाट बघू लागला.

थोड्या वेळातच सान्वी उठली आणि उठून बसताच तिचं लक्ष समोरच्या टेबलावर गेलं. तसं ती आश्चर्याने त्या टेबलकडे बघू लागली. तिला समोर जे दिसतंय ते खरंच खरं आहे की स्वप्न हेच कळत नव्हते. ती परत परत डोळे चोळून समोर बघत होती. तिला असं बघून कबीरला खुप हसायला येत होते. पण तो त्याचं हसू आवरत तिच्याकडे बघत होता.

क्रमशः

लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all