Login

अशी जुळली गाठ. भाग - ५२

कबीर आणि सान्वीच्या अबोल प्रेमाची कहाणी
अशी जुळली गाठ. भाग - ५२

डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखनस्पर्धा.

सान्वी बेडवरून उठली आणि धावतच टेबलकडे गेली. तिथे कबीरने त्या दोघांची फोटो फ्रेम लावली होती आणि तिची डिझाईन सुद्धा खुप सुंदर होती. तिने ती फ्रेम हातात गेली नंतर सगळ्या रूमभर नजर फिरवली. तर भितींवर सुद्धा काही त्या दोघांचे तर काही सान्वीचे फोटो लावले होते आणि फुगे सुद्धा लावले होते. त्यांचे ते सगळे फोटो काश्मीरला काढलेले फोटो होते. एका भिंतीवर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सान्वी असंही लिहीलं होतं. ते बघून सान्वी खुश होऊन कबीरकडे बघू लागली.

"कबीर, तुम्हाला माहिती होतं... आज माझा बर्थडे आहे!" सान्वी म्हणाली तसं कबीर हलकसं हसला आणि तिच्याजवळ आला.

"हो माहिती होते, म्हणून तर तुला सरप्राईज दिलं आणि हे सरप्राईज द्यायचं होतं म्हणूनच रात्री तुझ्याशी बोलायचं आणि तुझं बोलणं ऐकायचं टाळत होतो. त्यासाठी खरंच साॅरी." कबीर म्हणाला.

"एवढं छान सरप्राईज दिलं ना... मग चला केलं तुम्हाला माफ." सान्वी हसून म्हणाली.

"अजून एक सरप्राईज बाकी आहे, पण ते तुला संध्याकाळी मिळेल." कबीर.

"अजून काय सरप्राईज आहे आता, तुम्ही दिलेलं हे सरप्राईजच खुप आहे माझ्यासाठी. किती छान वाटताय हे फोटो, खरं सांगू का कबीर या फोटोंमुळे आता ही रूम अजून छान वाटायला लागली आहे. पण तुम्हाला हेच गिफ्ट द्यावं हे कसं काय सुचलं?" सान्वी.

"तुझ्या आईने विचारलं होतं होतं ना तुला, या रूममध्ये आपल्या दोघांचा एकही फोटो नाहीये. ते मी ऐकले होते. म्हणून मग ठरवलं की तुला हेच गिफ्ट द्यायचं." कबीर म्हणाला.

"किती विचार करता हो तुम्ही माझा!" सान्वी म्हणाली.

"तो मी करतोच, पण आता मला आवरायला हवं. तुझा बर्थडे आहे, पण मला सुट्टी नाहीये." कबीर हसतच बोलला आणि फ्रेश व्हायला गेला.

थोड्या वेळातच दोघेही खाली आले. खाली येताच विक्रम, सविता आणि श्रावणी तिघांनीही एकत्रच तिला बर्थडे विश केलं. ते बघून तर ती अजूनच खुष झाली.

"म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत होतं, आज माझा बर्थडे आहे." सान्वी म्हणाली.

"हो मग, आमच्या सुनबाईचा बर्थडे आहे आणि आम्ही विसरणार असं होईल का? ये इथे बस... तुझं औक्षण करते." सविता म्हणाली तसं सान्वी बसली. सविताने औक्षण केले म्हणून सान्वी खुप खुश झाली.

"आई, आजचा वाढदिवस खुप स्पेशल आहे. कारण तो तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवला." सान्वी म्हणाली.

"वहिनी, आजची संध्याकाळ तर अजून स्पेशल असणार आहे, संध्याकाळी केक कट करायचा आहे आणि तुझे...." श्रावणी पुढे काही बोलणार तोच कबीरने तिचं तोंडच दाबले. आणि तिच्याकडे रागाने बघू लागला.

"तुला सांगितलं होतं ना, गप्प बसायचं. आता तोंड उघडलं तर मारच खाशील." कबीर हळू आवाजात बोलला आणि तिच्या तोंडावरचा हात काढला. त्याने सांगितले होते म्हणून श्रावणी पुढे काही न बोलता गप्पच राहिली.

संध्याकाळी लवकर घरी यायचं म्हणून कबीर आणि विक्रम दोघेही लवकरच ऑफिसला गेले. सान्वीचा बर्थडे होता म्हणून सविताने तिला दिवसभर कुठल्याही कामाला हात लावू दिला नाही.

संध्याकाळी कबीर घरी आला आणि त्याने दारातूनच सान्वीला आवाज दिला, ती पण त्याच्या आवाजाने लगेच तिथे आली.

"काय हे कबीर, दारातूनच आवाज देताय आत तरी या." सान्वी म्हणाली.

"तुझ्यासाठी सरप्राईज घेऊन आलोय बघायचं आहे का तुला?" कबीर म्हणाला तसं तिचा चेहरा लगेच खुलला आणि काय सरप्राईज असेल याचे कुतूहल तिच्या चेहऱ्यावर दिसू लागले.

"हो बघायचं आहे, तुम्ही सकाळी बोलल्यापासून मी त्या सरप्राईजचाच विचार करतेय." सान्वी म्हणाली तसं कबीर दारातून बाजूला झाला आणि त्याच्या मागे उभे असलेले तिचे बाबा तिला दिसले. त्यांना बघून सान्वी खुपच खुश झाली आणि धावतच त्यांच्याकडेच गेली.

"बाबा, तुम्ही... तुम्ही आलाय यावर माझा विश्वासच बसत नाहीये." सान्वी त्यांचा हात हातात घेत बोलली.

"तुझा वाढदिवस आहे म्हटल्यावर यावचं लागलं. त्यात कबीर रावांनी खुपच आग्रह केला. मग त्यांचं मन नाही मोडता आलं." प्रभाकर पाटील म्हणाले.

"पण तुम्ही एकटेच आलात, आईला पण आणायचं होतं ना..." सान्वी म्हणाली.

"अगं घरी कामं आहेत ती टाकून नाही येता येत, तुला माहितीये ना घरची परिस्थिती कशी आहे. आता समीरही नाही त्यामुळे घर टाकून येता येत नाही." प्रभाकर म्हणाले.

"बरं असूद्या, तुम्ही आलात हे सुद्धा छानच आहे." सान्वी म्हणाली आणि त्यांना आत बोलावलं. मग बराच वेळ ती त्यांच्याशी गप्पा मारत होती.

श्रावणीने घरात थोडंसं डेकोरेशन केलं होतं. केक पण आणला होता. सविताने तिच्यासाठी छान अम्ब्रेला ड्रेस मागवला होता. तिने सान्वीला तो घालून यायला सांगितले. केक कटींग करून झाल्यावर सान्वीने सगळ्यांचे आभार मानले. तिच्या बाबांना बोलावलं म्हणून कबीरचे स्पेशल आभार मानले.

घरातल्या घरात पण छान पद्धतीने सान्वीचा बर्थडे झाला. बर्थडे झाल्यावर तिचे बाबा पण दुसऱ्या दिवशीच त्यांच्या गावी गेले.

***************

दुपारच्या वेळी सान्वी एकटीच घरी होती. सविता कामानिमित्त बाहेर गेली होती आणि श्रावणी काॅलेजला गेली होती. लता मावशी होत्या, पण त्या त्यांच्या कामात होत्या. सान्वीला खुपच अस्वस्थ वाटत होतं आणि चक्करही येत होते. उलटी झाल्यासारखं वाटत होतं पण उलटी होत नव्हती, नुसती मळमळ होत होती. म्हणून ती किचनमध्ये आली आणि लिंबू सरबत करू लागली. त्याचवेळी तिला घेरी आली आणि चक्कर येऊन खाली पडली. तिच्या हातात असलेला ग्लास खाली पडल्यामुळे त्याचा आवाज झाला. त्या आवाजानेच लता मावशी धावतच आल्या. सान्वीला पडलेलं बघून त्या खुप घाबरल्या. त्या तिला खुप उठवायचा प्रयत्न करत होत्या पण सान्वी उठतच नव्हती. शेवटी त्यांनी घाबरून कबीरला फोन केला आणि तिच्या बद्दल सांगितलं.

सान्वीची तब्येत बिघडली आहे हे ऐकून कबीर लगेच घरी आला. तो घरी येईपर्यंत लता मावशींनी तिला कसं बसं उठवलं होतं आणि लिंबू सरबतही दिला होता.

"सान्वी, काय झालं तुला? अचानक कशी काय चक्कर आली?" कबीरने काळजीने विचारलं.

"माहिती नाही, पण मला खुप थकल्यासारखं झालंय आणि मळमळ होतेय. अजिबात बरं वाटत नाहीये." सान्वी म्हणाली.

"मग मला हे सकाळीच सांगायचं ना, मी तुला सकाळीच हाॅस्पीटलमध्ये घेऊन गेलो असतो." कबीर म्हणाला.

"कबीर, आता बोलण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आताच तिला दवाखान्यात घेऊन जा. कधीपासून बघतेय मी सान्वीला किती त्रास होतोय ते." लता मावशी म्हणाल्या तसं कबीरने मान हलवली आणि सान्वीला घेऊन हाॅस्पीटलमध्ये गेला.

तिथे गेल्यावर डाॅक्टरांनी तिचं चेकअप केलं, नंतर कबीरशी बोलू लागले.

"तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबा, यांच्या काही टेस्ट कराव्या लागतील. त्या झाल्या की मी सांगतो तुम्हाला!" डॉक्टर म्हणाले.

"डॉक्टर, काही सिरियस नाहीये ना...." कबीरने घाबरतच विचारलं. एकतर हे हाॅस्पीटल वगैरे याची त्याला कधी सवय नव्हती त्यामुळे तो खुप घाबरला होता.

"मी सांगतो ना तुम्हाला, तुम्ही बाहेर बसा." डॉक्टर म्हणाले तसं कबीर नाईलाजाने बाहेर गेला. तो बाहेर वेटींग एरियात फेऱ्या मारत होता त्याचवेळी विक्रमचा फोन आला. त्याने घाईघाईने फोन उचलला.

"कबीर, काय झालयं? सान्वी ठिक आहे ना?" विक्रमने विचारलं.

"बाबा, मला काहीच कळत नाहीये.... डॉक्टर म्हणताय की काही टेस्ट कराव्या लागतील. ते असं का म्हणाले असतील, मला तर खुप भिती वाटतेय." कबीर अगदी लहान मुलासारखा बोलत होता. त्यात त्याला सान्वी मागच्या वेळी आगीत अडकली होती तेव्हाचा प्रसंगही आठवत होता त्यामुळे तो अजूनच घाबरला होता. विक्रम त्याला समजावू लागले.

"कबीर, एवढं घाबयायची काही गरज नाहीये. दररोजच्या कामामुळे या बायका स्वतःच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे मग असा अशक्तपणा येतो. तुझ्या आईला पण पहीलं नेहमी असंच व्हायचं, काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित असेल. हवं तर मी पण येतो तिकडे." विक्रमच्या बोलण्याने कबीरला थोडा धीर आला. त्यांना माहीत होतं कबीर किती हळवा आहे आणि हाॅस्पीटलमधलं बघायची किंवा कोणाला आजारी बघायची त्याला सवय नव्हती हे ही माहित नव्हते त्यामुळे त्यांनी हातातलं काम बाजूला ठेवलं आणि ते सुद्धा हाॅस्पीटलमध्ये आले.

क्रमशः

लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all