अशी जुळली गाठ. भाग - ५३
डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखनस्पर्धा.
"काय झालं कबीर? डॉक्टरांनी काही सांगितलं का?" विक्रम हाॅस्पीटलमध्ये येताच त्यांनी कबीरला विचारलं.
"नाही अजून, सान्वीला सलाईन लावलं आहे. ती सुद्धा खुप घाबरली आहे, मी आत्ताच तिला बघून आलो तिचा डोळा लागला आहे." कबीर म्हणाला. त्याचवेळी नर्स बाहेर आली आणि तिने कबीरला आवाज दिला.
"तुम्हाला डॉक्टरांनी बोलावलं आहे." नर्सने सांगितले आणि ती निघून गेली. तसं कबीर आणि विक्रम दोघेही एकाच वेळी आत गेले. त्यांना डॉक्टरांनी बसायला सांगितलं.
"डॉक्टर, झाल्या का सगळ्या टेस्ट? काय रिपोर्ट आहे सांगाल का?" कबीरने विचारलं.
"टेस्ट झाल्या आहेत. सान्वी मॅडम प्रेग्नंट आहे, पण..." डॉक्टर पुढे काही बोलणार तोच कबीर आणि विक्रम खुश होऊन लगेच बोलू लागले.
"खरंच? सान्वी खरंच प्रेग्नंट आहे?" दोघांनीही आश्चर्याने विचारले. कबीर पुढे काही बोलणार तोच डॉक्टरांनी लगेच हात वर करत त्याला थांबवलं.
"हो हे खरं आहे, पण… ही प्रेग्नन्सी थोडीशी नाजूक आहे." डॉक्टर म्हणाले त्याच क्षणी कबीरच्या चेहऱ्यावरचा आनंद मावळला.
"नाजूक म्हणजे नेमकं काय डॉक्टर?" कबीरने विचारलं.
"सान्वी मॅडमचं प्रोजेस्ट्रोन लेव्हल सध्या अपेक्षेपेक्षा कमी आहे, त्यामुळे गर्भ टिकवण्यासाठी त्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल." डॉक्टर त्या दोघांना नीट समजून सांगू लागले. पण ते ऐकून कबीर खुप घाबरला.
"म्हणजे काही धोका आहे का?" कबीरने विचारलं.
"धोका असं नाही, पण आता या स्टेजला थोडंही दुर्लक्ष झालं तर ब्लीडिंग किंवा मिसकॅरेजचा रिस्क वाढू शकतो. म्हणूनच आम्ही औषधं सुरू करतोय, त्यातल्या त्यात त्यांचं हिमोग्लोबिन सुद्धा कमी आहे. त्यामुळे सुरवातीचे तीन ते चार महिने खुप काळजी घ्यावी लागणार आहे. पूर्ण बेड रेस्ट, स्ट्रेस तर अजिबातच नाही. काम, प्रवास, जड वस्तू उचलणं हे सगळं बंद म्हणजे बंद." डॉक्टर म्हणाले. कबीरला तर ते ऐकून खुप टेन्शन आले होते. पण विक्रमने त्याला धीर दिला.
"कबीर, कामाची काळजी करू नकोस. प्रोजेक्ट मी सांभाळतो. तू फक्त सान्वीकडे लक्ष दे आणि तिची काळजी घे.
"तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका, औषधं वेळेवर घेतली, आराम केला आणि सकारात्मक विचार करत राहिलात तर सगळं नीट होईल." कबीरची भिती बघून डॉक्टरांनी सुद्धा धीर दिला. पण त्या क्षणी त्याला जाणवलं की आनंदाबरोबरच आता भीती आणि जबाबदारी दोन्हीही आपल्या आयुष्यात येऊन उभ्या राहिल्या आहेत, आता त्या पार पाडाव्याच लागतील.
सान्वीचं सलाईन संपल्यावर डॉक्टरांनी तिलाही सगळं व्यवस्थित समजून सांगितलं. तिलाही ते ऐकून खुप टेन्शन आले होते.
"कबीर, आपल्याला बाळ होणार आहे... पण त्यासाठी किती काय काय करावं लागणार आहे. माझ्या आयुष्यात कोणतंही सुख असं सहज नाहीच का?" सान्वी रडवेल्या सुरात बोलली. तसं कबीरने तिचा हात घट्ट पकडला आणि तिला डोळ्यांनीच धीर दिला, पण बोलायला शब्द काही सुचत नव्हते
"सान्वी, आता तुला जास्त खंबीर व्हायला हवं. मनात कसलेही विचार आणू नकोस, फार मोठा प्राॅब्लेम नाहीये. फक्त बेडरेस्ट घ्यायची आहे ना मग तू ती घे, तुझी काळजी घ्यायला आम्ही सगळे आहोत. तुला काहीच कमी पडणार नाही याची खात्री मी देतो तुला." विक्रमच्या शब्दांनी तिला धीर आला. कबीरने तिचा हात हातातच ठेवला आणि तिला गाडीत बसवलं. मग ते तिघेही घरी आले.
घरी आल्यावर कबीरने सान्वीला सोफ्यावर बसवलं आणि लता मावशीला आवाज देऊन पाणी आणायला सांगितले. त्या ही घाईघाईने आल्या आणि सगळ्यांना पाणी दिलं.
"मावशी, आई आली नाही का अजून?" कबीरने विचारलं.
"नाही, मी त्यांना फोन केला होता पण त्यांचा फोन नाही लागला. त्यांची यायची वेळ झाली आहे, आता येतीलच त्या." लता मावशी म्हणाल्या.
थोड्या वेळाने विक्रम उठले आणि कबीर कडे बघू लागले.
"कबीर, तू थांब घरीच... मी जातो ऑफिसला, तसंही आता उशीरच झाला आहे, पण तरीही जाऊन येतो मी परत. आणि पुढचे काही दिवस तू घरीच रहा आणि घरून जमलं तर काम कर, नाही जमलं तर नाही केलं तरी चालेल... पण आता साध्वी पेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नाहीये." विक्रम म्हणाले.
"साॅरी बाबा, माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खुप त्रास होतोय." सान्वी म्हणाली.
"सान्वी, मी पहिल्यापासून तुला माझी मुलगी म्हणूनच बघत आलोय, मुलीचा आई बाबांना कधीच त्रास होत नसतो आणि एक गोष्ट लक्षात ठेव... या सगळ्या त्रासानंतर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खुप मोठा आनंद येणार आहे. एकदा की माझी नात घरात आली की सगळा त्रास दूर होईल आणि आनंदी आनंद घेऊन येईल." विक्रम म्हणाले तसं कबीर आणि सान्वी एकमेकांकडे हसत बघू लागले. त्यांना मुलगी हवी आहे हे त्यांच्या बोलण्यातून लगेच समजलं.
विक्रम बाहेर जायला म्हणून दाराकडे वळले तर सविता आत येत होती. या दोघांना घरी पाहून तिलाही काळजी वाटली.
"तुम्ही दोघं आता या वेळी घरी? आणि सान्वी, तू अशी का बसली आहे? काय झालंय मला कळेल का?" सविताने काळजीने विचारलं.
"सान्वीची तब्येत बिघडली होती म्हणून आम्हाला दोघांनाही यावं लागलं." कबीर म्हणाला.
"काय? मग मला का नाही सांगितले? काय होतंय सान्वी तुला?" सविता घाईघाईने सान्वी जवळ गेली आणि विचारलं.
"आई, तू आताच बाहेरून आली आहे, शांतपणे बस... मग मी सांगतो तुला!" कबीर म्हणाला तेव्हा सविता सान्वीच्याच बाजूला बसली. मग कबीरने सविताला सगळं काही सविस्तर सांगितले. ते ऐकून सविताला आनंद झालाच, पण त्यासोबतच सान्वीची काळजी सुद्धा वाटू लागली. पण ती काळजी तिने चेहऱ्यावर दाखवली नाही. आता आपल्यालाच खंबीर व्हायला लागणार आहे हे सविताला जाणवलं होतं.
"आपल्या घरात बाळ येणार आहे, सान्वी प्रेग्नंट आहे ना मग ही आनंदाची बातमी आहे. आणि काळजीचं काय घेऊन बसलात, मी आहे ना... मी सान्वीला अगदी फुलासारखं जपेल. तिला हवं ते सगळं एका जागेवर देईल. तुम्ही कोणीच काळजी करू नका, आजपासून माझं बाहेर जाणं बंद." सविता म्हणाली आणि तिने लता मावशीला मीठ मोहरी आणायला सांगितलं आणि तिने सान्वीची दृष्ट काढली.
"सान्वी, अजिबात घाबरायचं नाही बाळा... तू जेवढं स्वतःचं मन स्ट्रॉंग ठेवशील तेवढं तुझं शरीर स्ट्रॉंग राहिल. मी आहे ना मग कसलंच टेन्शन घेऊ नकोस. आईच्या मायेने मी तुझं सगळं करेल." सविता म्हणाली तसं सान्वीचे डोळे भरून आले.
"किती नशीबवान आहे ना मी, माझे आई बाबा जवळ नाही, पण तुम्ही त्यांच्यासारखी किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त काळजी घेताय माझी." बोलताना सान्वीच्या डोळ्यातले अश्रू गालांवर ओघळले. ते सविताने लगेच पुसले.
"आता डोळ्यात पाणी आलं हे शेवटचं, इथून पुढे अजिबात डोळ्यात पाणी आणायचं नाही. जा आता छान आराम कर. कबीर, तू तिला तुमच्या रूममध्ये घेऊन जा. मी काहीतरी खायला बनवून आणते." सविता म्हणाली आणि किचनमध्ये गेली. मग विक्रमही ऑफिसला गेले.
कबीर सान्वीला घेऊन रूममध्ये आला आणि तिला बेडवर बसवलं. तिच्या नजरेत अजूनही अपराधीपणाची भावना होती.
"कबीर, माझ्यामुळे तुम्हाला तुमचं काम, तुमचे प्रोजेक्ट सगळं बाजूला ठेवावं लागणार आहे. मला खुपच कसं तरी वाटतंय." सान्वी म्हणाली.
"तुझ्यामुळे नाही, आपल्या दोघांच्या बाळासाठी. तू उगाच भलते सलते विचार करू नको आणि तसंही मला रोज सकाळी तुझा चेहरा पाहिला की ऑफिसला जायची इच्छाच व्हायची नाही, असं वाटायचं की सतत तुझ्यासमोर बसून तुझ्याशी तासनतास गप्पा मारत राहाव्यात. आता या कारणामुळे माझी ती इच्छा पुर्ण होणार आहे." कबीर म्हणाला तसं सान्वी हलकसं हसली.
"बघा हं... नंतर हाच चेहरा सतत बघून बघून तुम्हाला कंटाळा येईल." सान्वी हसून म्हणाली.
"अजिबात नाही, हा चेहरा बघताना मला कधीच कंटाळा येणार नाही." कबीर तिच्याकडे प्रेमाने बघत बोलला आणि तिला मिठीत घेतलं.
थोड्या वेळातच सविताने तिच्यासाठी खायला करून आणलं, सान्वीने खाऊन औषधं घेतली आणि झोपून घेतलं. कबीर तसाच तिच्याजवळ बसून होता.
संध्याकाळी श्रावणी घरी आली आणि तिलाही ही बातमी कळली, तिलाही आनंद झाला होता... पण सान्वीची काळजी वाटत होती. तिच्या काळजीने ती तिच्याकडे गेली आणि दारातून पाहिलं तर सान्वी झोपली होती मग ती हळूच आवाज न करता आत गेली आणि तिला बघून परत बाहेर आली.
सान्वीला संध्याकाळी झोपायची सवय नव्हती पण आता तिचा चांगला डोळा लागला होता त्यामुळे कबीरनेही तिला उठवलं नाही. तिला छान आराम करू दिला.
क्रमशः
लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा