अशी जुळली गाठ. भाग - ५४
डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखनस्पर्धा.
संध्याकाळी चांगली झोप झाल्यामुळे रात्री सान्वीला झोपच येत नव्हती, मग कबीरने टीव्हीवर छान मराठी पिक्चर लावला आणि ते दोघेही पिक्चर बघू लागले. पिक्चर बघताना सान्वी त्यात छान रमून गेली होती. मग मध्येच तिला तिच्या आई बाबांची आठवण आली. तसं तिने कबीरकडे विषय काढला.
"कबीर, ऐका ना... एवढी आनंदाची बातमी आहे तर माझ्या आई बाबांना सांगू या का ती?" सान्वीने विचारलं.
"हो सांग, पण लगेच नको सांगू. अजून थोडे दिवस थांब, तुला चांगलं बरं वाटलं की मग सांग. आताच सांगितलं आणि तू पटकन तुझ्या तब्येतीबद्दल बोलून गेली तर त्यांनाही टेन्शन येईल." कबीरचं म्हणणं सान्वीला पटलं, मग तिनेही थोडे दिवस थांबायचा विचार केला.
सान्वीची तब्येत नाजूक असल्यामुळे घरात सगळेच तिची काळजी घेत होते. तिला पुर्णपणे बेडरेस्टच होती. कबीर दिवसभर तिच्यासोबतच राहत होता. तिची छान काळजी घेत होता. तिला वेळोवेळी हाॅस्पीटलमध्येही घेऊन जात होता.
हळूहळू सान्वीच्या तब्येतीत सुधारणा होत होती. आता तिला तीन महिने पुर्ण झाले होते आणि चौथा महिना लागला होता. तिला जे जे खायची इच्छा होत होती ते सगळं मिळत होतं. सगळेच ती कशी आनंदी राहिल याच्याकडे लक्ष देत होते.
आताही कबीर तिच्या बाजूलाच बसला होता आणि त्याचं काम चालू होतं. त्याने मोबाईलमध्ये पुर्ण दिवसभराचे अलार्म सेट करून ठेवले होते. अलार्म वाजला तसं त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला.
"सान्वी, जेवणाची वेळ झाली आहे. मी आलोच तुझ्यासाठी जेवण घेऊन येतो." कबीर म्हणाला.
"मला कंटाळा आलाय हो एका जागी बसून, साधं जेवायला पण बाहेर येऊ देत नाही तुम्ही. मलाही सगळ्यांसोबत बसून जेवायचं असतं. आजच्या दिवस येऊद्या ना मला." सान्वी म्हणाली.
"अजिबात नाही, तुला आज एक दिवस येऊ दिलं की तू रोजच म्हणशील. अजून थोडे दिवस तरी या रूममध्येच राहावं लागणार आहे." कबीर म्हणाला तसं ती नाराज झाली. मग कबीर बाहेर गेला. त्यानंतर थोड्या वेळातच सगळेच एकत्र तिच्या रूममध्ये आले.
"हे बघ, तुला सगळ्यांसोबत जेवायचं आहे ना... मग सगळेच इथे जेवायला आले आहे." कबीर म्हणाला तसं सान्वी हसून सगळ्यांकडे बघू लागली.
"तुम्ही सगळे खरंच इथे जेवणार आहात?" सान्वीने विचारलं.
"हो आजपासून रोज रात्रीचं जेवण सगळे इथे तुमच्या रूममध्येच करणार आहे." सविता म्हणाली. मग कबीरने टेबल घेतला आणि तो व्यवस्थित सेट करून सगळे जेवायला बसले.
"सान्वी, आता तीन महिने पुर्ण झाले आहे, आता तुझ्या आई बाबांना सांगू आपण. तुझी चोर ओटी पण भरावी लागेल." सविता म्हणाली.
"हो आई, मी सकाळी करते बाबांना फोन." सान्वी म्हणाली. सगळ्यांसोबत गप्पा मारत जेवल्यामुळे तिला खुप छान वाटत होते.
दुसऱ्या दिवशी सकाळीच सान्वीने तिच्या बाबांना फोन केला आणि सांगितलं. त्यांना चोर ओटीचंही आमंत्रण दिलं. तिचे आई बाबा पण ते ऐकून खुप खुश झाले. ते उद्याच येत असल्याचे त्यांनी तिला सांगितले. उद्या आई बाबा येणार म्हणून ती खुप खुश झाली आणि फोनवर बोलून झाल्यावर लगेच कबीरला सांगू लागली.
"कबीर, आई बाबा उद्याच येणार आहे. त्यांना खुप आनंद झाला ही बातमी ऐकून, पण लवकर नाही सांगितलं म्हणून आई जरा नाराज वाटली." सान्वी.
"हो पण त्यांना आधी सांगितलं असतं तर अजून काळजी वाटली असती, असुदे आईची नाराजी जास्त दिवस नाही राहत. आपल्याला आज चेकअप साठी जायचं आहे, लवकर जावं लागेल, आज सोनोग्राफी पण करणार आहे." कबीर म्हणाला.
"हो चालेल, मी आवरते पटकन मग जाऊ आपण." सान्वी म्हणाली आणि तयार व्हायला गेली. दोघेही थोड्या वेळातच हाॅस्पीटलमध्ये गेले.
तिथे गेल्यावर सान्वी खुर्चीवर बसली. तिने हातातली फाईल घट्ट धरली होती. तीन महिने पूर्ण झाले होते, पण तिच्या मनातली भीती अजूनही कमी झाली नव्हती. प्रत्येक चेकअप तिच्यासाठी जणुकाही एक परीक्षाच होती.
"घाबरू नकोस, सगळं काही ठिक होईल." कबीर तिच्या शेजारी बसत म्हणाला. तसं सान्वीने हलकंसं हसण्याचा प्रयत्न केला, पण मनातली काळजी काही कमी झाली नाही. थोड्या वेळाने नर्स आली आणि तिला सोनोग्राफी रूममध्ये घेऊन जाऊ लागली, कबीरही तिच्या सोबतच होता. आत जाताच सान्वीचा श्वास थोडा वाढला. ती बेडवर झोपताच कबीरने तिचा हात घट्ट पकडून ठेवला.
डॉक्टरांनी स्क्रीनकडे पाहत प्रोब हलवला आणि तिकडे बघताच कबीरशी बोलू लागले.
डॉक्टरांनी स्क्रीनकडे पाहत प्रोब हलवला आणि तिकडे बघताच कबीरशी बोलू लागले.
"बाळाचे हार्टबीट छान आहे." डॉक्टरांचं बोलणं ऐकताच कबीरने दिर्घ श्वास घेतला. ते ऐकून सान्वीच्याची डोळ्यांत पाणी आलं.
"सगळं व्यवस्थित चालू आहे, पहिले तीन महिने क्रॉस करणं खूप महत्वाचं होतं. आता रिस्क थोडी कमी झाली आहे, पण तरीही काळजी घ्यावी लागणारच आहे. बेडरेस्ट चालूच ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रवास अजिबात नाही करायचा." डॉक्टरांनी सांगितले, त्यांच्या बोलण्यात काळजी होतीच, पण सगळं व्यवस्थित आहे हे ऐकून थोडा धीरही आला होता.
हाॅस्पिटलमधून बाहेर पडल्यावर सान्वीने कबीरचा हात धरला आणि त्याच्याकडे बघू लागली.
"आज पहिल्यांदाच… थोडं हलकं वाटतंय." सान्वी म्हणाली.
"हो, अशीच नेहमी काळजी घेतली तर सगळं छानच होईल." कबीर म्हणाला.
"आपल्या बाळासाठी मी सगळा त्रास सहन करेल." सान्वी म्हणाली. नंतर दोघेही घरी गेले.
घरी आल्यावर सवितानेही त्यांना विचारलं तर सगळं ठिक आहे हे ऐकून तिलाही आनंद झाला. नंतर सान्वी आराम करायला गेली.
************
आज सान्वीचे आई बाबा येणार असल्यामुळे ती खुप खुश होती आणि त्यांची वाट बघत होती.
संध्याकाळी चारच्या दरम्यान ते दोघंही आले. त्यांना भेटून सान्वीला खुप आनंद झाला.
"सान्वी, कशी आहेस बाळा?" आईने विचारलं.
"आई, मी ठिक आहे, इथे सगळेच माझी खुप काळजी घेताय." सान्वी म्हणाली.
"मी काय म्हणतेय सविता ताई, आता आम्ही आलोच आहोत तर उद्या सान्वीला आमच्यासोबत घेऊनच जातो. तसंही तीन महिने पुर्ण झाल्यावर चोर ओटी माहेरीच भरायची असते." सान्वीची आई म्हणाली.
"चोर ओटीची सगळी तयारी मी करून ठेवली आहे, आपण उद्याच ती भरून घेऊ!" सविता म्हणाली.
"कशाला पण, तुम्ही एवढं करताय ना तिच्यासाठी, मग आम्हालाही थोडं फार करूद्या." सान्वीची आई म्हणाली तेव्हा खरं तर सविताला सान्वीला नेऊ नका सांगायचं होतं पण कसं सांगू हे कळेना, कबीरलाही काही बोलता येईना. मग सान्वीच बोलली.
"नाही आई, मी नाही येणार तुमच्यासोबत. आता तुम्ही आलाय ना मग आपण घरातल्या घरातच चोर ओटीचा कार्यक्रम करून घेऊ." सान्वी म्हणाली.
"अगं का पण?" तिच्या आईने परत विचारलं. आता मात्र सान्वीला खरं सांगणं भागच होतं.
"आई बाबा, माझी प्रेग्नंसी थोडी कॉम्प्लिकेटेड आहे. त्यात विकनेसही खुप आहे. डॉक्टरांनी बेडरेस्ट सांगितली आहे आणि प्रवास करायला नाही सांगितलं. प्रवास केला तर त्याचा परिणाम बाळावर आणि माझ्या तब्येतीवर पण होईल. खरं तर माझी अवस्था खुप नाजूक होती त्यामुळेच तुम्हाला एवढे दिवस मी काही सांगितले नव्हते." सान्वी म्हणाली तसं ते दोघेही घाबरले.
"सान्वी, एवढा त्रास होतोय तुला आणि आम्हाला एका शब्दाने सुद्धा सांगावंसं वाटलं नाही का तुला! अगं आई बाबा आहोत आम्ही तुझे." प्रभाकर पाटील काळजीने बोलले.
"तुम्हाला काही टेन्शन नको म्हणून नव्हते सांगितले, पण इथे खरंच सगळे माझी खुप काळजी घेताय. तुम्हाला माहितीये का मला दिवस गेल्यापासून कबीर ऑफिसला सुद्धा नाही गेले. चोवीस तास माझ्याजवळच असतात आणि आई... त्या तर माझे प्रत्येक हट्ट पुरवतात." सान्वी म्हणाली.
"अगं पण तरीही सांगितलं असतं तर आम्हीही आलोच असतो ना..." आई म्हणाली.
"तुम्ही आल्या असत्या ते माहीती आहे आम्हाला, पण खरंच आम्हाला भिती वाटत होती. त्यामुळे नाही सांगितले, मग उगाच तुम्हाला पण आशा लागून राहीली असती." सविता म्हणाली.
"तुम्हाला काय म्हणायचं आहे ते आता कळतंय मला, नका काळजी करू सगळं व्यवस्थित होईल. आता मी आली आहे ना, मी अजिबात इथून कुठेही हलणार नाही." सान्वीची आई म्हणाली.
"आई, असं नको बोलू... तू जर इथे थांबली तर घरी खुप आबाळ होईल. शेती आहे, गाई आहेत. माझ्याकडे लक्ष देताना त्यांचे हाल होतील." सान्वी म्हणाली.
"हो सान्वी बरोबर बोलतेय आई, तुम्हाला राहायचं असेल तर आम्हाला काही प्राॅब्लेम नाहीये, पण तुमचं घरचं नाही मॅनेज होणार. तुम्हाला जेव्हा सान्वीची आठवण येईल तेव्हा मला फोन करा, मी लगेच तुमच्यासाठी गाडी पाठवेल." कबीर म्हणाला. तसं सान्वीच्या आईने मान हलवली. ती मुलीच्या काळजीपोटी राहायचं बोलली होती, पण तिलाही माहित होतं आपण इथे राहिलो तर गावी खुप नुकसान होईल.
क्रमशः
लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा