अशी जुळली गाठ. भाग - ५५
डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखनस्पर्धा.
"सान्वी, मी आलेच... तू तुझ्या आई बाबांसोबत छान निवांत गप्पा मारत बस. काही हवं असलं तर मला आवाज दे." सविता म्हणाली आणि तिने कबीरलाही बाहेर चल म्हणून खुनावलं. मग तिच्या नंतर कबीरही रूमच्या बाहेर आला आणि लगेच सविताला विचारू लागला.
"आई, तू मला बाहेर जायला का सांगितलं?" कबीर.
"सान्वीचे आई बाबा एवढ्या दिवसांनी आलेत ना... मग जरा त्यांना तिच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारू दे की, आपणं असताना त्यांना सगळं मनसोक्त बोलता येईल असं नाही." सविताचं म्हणणं कबीरलाही पटलं. तो ही बऱ्याच दिवसांपासून बाहेर गेला नव्हता त्यामुळे तो पण जरा फिरायला म्हणून घराबाहेर पडला.
सान्वी तिच्या आई बाबांसोबत गप्पा मारण्यात चांगलीच गुंग होऊन गेली होती. ती बोलताना कबीर आणि त्याच्या आई बाबांबद्दल इतकं भरभरून बोलत होती की ते ऐकून तिच्या आई बाबांना सुद्धा खुप आनंद झाला.
सान्वी तिच्या आई बाबांशी गप्पा मारत असताना श्रावणी आली आणि दारातूनच तिने सान्वीला आवाज दिला.
"वहिनी, हे बघ... मी तुझ्यासाठी काय आणलं आहे!" श्रावणी एकदम उत्साहाने दाखवतच आत आली. तिच्या हातात चिंचा बघून सान्वी सुद्धा खुप खुश झाली.
"अरे व्वा, चिंच कुठे भेटली तुला?" सान्वीने विचारलं.
"तुला हवी होती ना मग मी आणली, आणि हो मी ही मार्केट मधून नाही आणली. माझ्या मैत्रिणीच्या घरी चिंचेचं झाड आहे, तिच्याकडून मागवली आहे." श्रावणी म्हणाली.
"थॅंक्यू सो मच श्रावणी." सान्वी म्हणाली.
"अगं हो चिंचेवरून आठवलं, मी तुझ्यासाठी लोणचं आणलं आहे. थांब हं आठवलयं तर लगेच काढून ठेवते." सान्वीची आई म्हणाली. लोणचं म्हटल्यावर सान्वीच्या तोंडाला अजूनच पाणी सुटलं. तिच्या आईने लोणच्याची बरणी तिच्या हातात देताच सान्वीने झाकण उघडलं आणि त्याचा वास घेऊ लागली. त्या वासाने तिला लोणचं खायची खुप इच्छा झाली, मग तिने त्यातून एक लोणच्याची खाप घेतली आणि तोंडात टाकली.
"व्वा... आई, किती मस्त बनवलं आहे तू लोणचं." सान्वी म्हणाली आणि चव घेऊन घेऊन ते लोणचं खाऊ लागली. तिचे आई बाबा तिच्या आनंदी चेहऱ्याकडे बघत मनातून खुप खुश झाले.
***************
सान्वीच्या चोर ओटीचा कार्यक्रम अगदी घरच्या घरीच होता, पण तरीही श्रावणीने तिचा खुप छान मेकअप केला. हिरव्या कलरच्या साडीत सान्वी अजूनच सुंदर दिसत होती.
सान्वीचं औक्षण करून तिची ओटी भरली, त्यानंतर तिचे खुप सारे फोटो काढले. कबीर सोबतही तिचे बरेच फोटो काढले. कार्यक्रम छान झाला म्हणून सान्वी खुप खुश होती.
सान्वीचे आई बाबा तिच्याजवळ चांगले आठ दिवस राहिले, त्यानंतर ते तिचा निरोप घेऊन घरी गेले. ते जाताना सान्वीला खुपच भरून आले होते.
आई बाबा गेल्यावर सान्वीला घर नुसतं रिकामं वाटत होतं. ती एकटीच उदास होऊन बसली होती. कबीरला तिची मनस्थिती समजत होती. मग त्याने त्याचा लॅपटॉप तसाच सरकवला आणि तो तिच्याजवळ बसला आणि तिच्याशी बोलू लागला.
"आई बाबा गेले म्हणून वाईट वाटतंय ना!" कबीर म्हणाला तसं तिने त्याला मिठी मारली.
"हो, ते होते तर किती छान वाटत होतं, घर अगदी भरल्या सारखं वाटत होतं." सान्वी म्हणाली.
"आपलं बाळ आलं की मग मी स्वतः तुला तुझ्या आई बाबांच्या घरी घेऊन जाईन, मग तुला हवं तेवढे दिवस तू रहा. तुला कोणीच अडवणार नाही." कबीर म्हणाला तसं सान्वी हलकसं हसली.
"हो ती तर मी जाणारच आहे, मलाही आता तिकडच्या घराची, तिथे घालवलेल्या क्षणाची आठवण येतेय. गावच्या वातावरणात आपल्या बाळाला सुद्धा खुप छान वाटेल." सान्वी म्हणाली. कबीर पुढे काही बोलणार तोच त्याला एक फोन आला, मग त्याने तो रिसिव्ह केला. फोनवर बोलून झाल्यावर तो सान्वीकडे बघू लागला.
"सान्वी, मला एक खुप महत्वाची मिटिंग आहे. खरं तर ती मिटींग बाबाच अटेंड करणार होते पण त्यांना अर्जंट एक काम आलंय त्यामुळे साईटवर जावं लागतंय. मला जावं लागेल मिटींगला." कबीर म्हणाला.
"अहो, मग ठिक आहे ना... जा तुम्ही, तसंही मी इथे एका जागीच बसून आहे आणि आई आहेच की माझ्याकडे लक्ष द्यायला." सान्वी म्हणाली तसं कबीरने तयारी केली आणि मिटींगला जाऊ लागला. जाताने त्याने सविताला सांगितलं. सविता लगेच सान्वीकडे आली आणि तिच्याशी गप्पा मारू लागली.
गप्पा मारता मारता सान्वीला अचानक काहीतरी आठवलं तसं तिने सविताला विचारलं.
"आई, यांचे लहानपणीचे काही फोटो असतील तर दाखवता का? मला बघायचं आहे हे लहानपणी कसे दिसत होते." सान्वी म्हणाली.
"आहे की त्याच्या फोटोंचा स्वतंत्र अल्बमच आहे, त्यात त्याचे लहानपणीचे फोटो तर आहेच, पण त्यासोबत काही काॅलेजचे, पिकनिकचेही फोटो आहेत." सविता म्हणाली.
"हो का? पण कबीर मला कधीच त्याबद्दल बोलले नाही." सान्वी म्हणाली.
"म्हणजे तुला कबीरने कधीच त्याचे कोणतेच फोटो दाखवले नाही?" सविताने विचारलं. सान्वीला त्याच्या फोटो बद्दल माहिती नाही हे ऐकून सविताला आश्चर्यच वाटलं.
"नाही, आमचा कधी तसा विषयही निघाला नाही. त्यामुळे कदाचित त्यांच्याही ते लक्षात आले नसेल." सान्वी म्हणाली.
"थांब, मी देते तुला तो अल्बम. त्याच्या कपाटातच असतो तो." सविता म्हणाली आणि ती कबीरचं कपाट बघू लागली, पण तिला कुठेही तो अल्बम दिसला नाही. ती बराच वेळ शोधत होती हे बघून सान्वीने आवाज दिला.
"आई, काय झालं? नाही सापडत का? नसेल सापडत तर जाऊद्या, कबीर आले की मग मी त्यांनाच विचारेल." सान्वी म्हणाली.
"अगं नाही, बघते मी... मला काय वाटतं की त्याने कदाचित स्टडी रूममध्ये ठेवला असेल. मी आलेच, तिकडे आहे का बघून येते." सविता म्हणाली आणि स्टडी रुममध्ये गेली. ती गेल्यावर सान्वीचे लक्ष कबीरच्या लॅपटॉपकडे गेले. कबीर गडबडीत लॅपटॉप तसाच ओपन ठेवून गेला होता. म्हणून तिने तो लॅपटॉप घेतला आणि तो ठेवून देणार तोच तिच्या मनात विचार आला कबीरने या लॅपटॉप मध्ये काही फोटो ठेवले असतील का? तो विचार मनात येताच ती बघू लागली. तर त्यात सगळं कामाशी संबंधितच दिसत होतं. पण थोडं खाली स्क्रोल करताच तिला एक ‘फोटो’ नावाचा फोल्डर दिसला. मग तिने तो ओपन केला आणि त्यातले फोटो बघू लागली तर त्यात सगळे कबीर आणि इशिताचेच फोटो होते. ते फोटो बघून तिला थोडं विचित्रच वाटलं पण कामानिमित्त बाहेर गेल्यावर काढले असतील अशी तिने मनाची समजूत काढली आणि पुढे बघू लागली. पण तेवढ्यात सविताचा आवाज आला.
"सान्वी, हे बघ भेटला अल्बम. आता छान निवांत फोटो बघत बस, मी आहे बाहेरच. तुला काही हवं असलं तरी मला आवाज दे, मी लगेच येईल." सविता म्हणाली आणि बाहेर गेली. ती गेल्यावर सान्वीने लॅपटॉप ठेवून दिला आणि अल्बम घेऊन फोटो बघू लागली. त्यात सुरवातीला कबीरचे लहानपणीचे फोटो होते. ते बघून तिच्या मनात तिच्या बाळाचे विचार आले.
"आमचं बाळ कबीर सारखंच दिसायला हवं, कबीर लहानपणी किती छान दिसत होते, अगदी गोंडस बाळासारखे... तसं तर ते आताही छान दिसताय." सान्वी हसून स्वतःशीच बोलली. नंतर फोटो बघता बघता अचानक तिला एका फोटोखाली काहीतरी जाडसर जाणवलं तेव्हा तिने त्याच्या खाली हात लावून बघितलं तर फोटोखाली फोटो होता. मग तिने खालचा फोटो काढला आणि बघू लागली. तर तो फोटो बघून तिला खुप मोठा धक्का बसला. तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. ती परत परत तो फोटो बघत होती. पण नंतर तिने स्वतःला सावरलं आणि पुढे अजून काही भेटतंय का ते बघू लागली. तर तिला अजून बरेच तसे फोटो भेटले. त्यानंतर अल्बमच्या एका पानावर एक चिठ्ठी होती. ती तिने घेतली.
चिठ्ठी उघडताना तिचं हृदय धडधडायला लागलं होतं तरीही तिने हिंमत एकवटून ती चिठ्ठी घेतली आणि वाचू लागली. ती चिठ्ठी वाचून तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती एकदम सुन्न झाली. काय बोलावं, कसं रिऍक्ट व्हावं तिला काहीच कळत नव्हते. तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले आणि त्याचसोबत रागही उफाळून आला. तिने त्याच रागात मोबाईल घेतला आणि कबीरला फोन करू लागली.
क्रमशः
लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा