Login

अशी जुळली गाठ. भाग - ५६

कबीर आणि सान्वीच्या अबोल प्रेमाची कहाणी
अशी जुळली गाठ. भाग - ५६

डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखनस्पर्धा.

कबीरची मिटींग झाली आणि तो घरीच येत होता. त्याचवेळी सान्वीचा फोन आला. तो ड्रायव्हिंग करत असल्यामुळे त्याने मोबाईल समोर ठेवून तो स्पीकरवर ठेवला.

"काय बायको, मी घरी नाहीये तर तुला माझी खुपच आठवण येतेय वाटतं." कबीर हसत म्हणाला. पण सान्वी अजिबात हसण्याच्या मुडमध्ये नव्हती.

"तुमची आठवण यायला तुमचं प्रेम खरं नाहीये तो फक्त दिखावा आहे हे आज चांगलंच कळलंय मला, खुप मोठा धोका दिलाय तुम्ही मला कबीर." सान्वीने रागाने बोलली, तिच्या आवाजावरून ती रडत होती हे कबीरच्या लक्षात आले, पण तिच्या अशा बोलण्याने त्याला धक्काच बसला.

"काय झालं सान्वी, तू आज अचानक असं का बोलतेय?" कबीरने विचारलं.

"तुमचं आणि इशिताचं एकमेकांवर प्रेम होतं का?" सान्वीने विचारताच कबीरला अजून एक धक्का बसला. त्याने डोक्यालाच हात लावला. सान्वीला हे कसं माहित झालं हा विचार त्याच्या मनात आला.

"सान्वी, हे बघ आता तुझी अवस्था नाजूक आहे. तू प्लीज मनात काहीच विचार आणू नकोस, मी घरी आल्यावर आपण शांतपणे बोलू." कबीर म्हणाला.

"नाही, मला आत्ताच बोलायचं आहे. मी तुम्हाला किती वेळा विचारलं होतं, पण तुम्ही काहीच सांगितलं नाही. तुम्ही मला फसवलं आहे, तुम्ही स्वतःहून मला हे सांगितलं नाही याचा अर्थ तुमच्या मनात पाप होतं. मी आता तुमच्या सोबत राहू शकत नाही, मी आताच माझ्या बाबांच्या घरी जातेय आणि ते ही कायमचं." सान्वी चिडून बोलली.

"हे बघ सान्वी, असा टोकाचा निर्णय घेऊ नको. आता आपल्यासाठी आपलं बाळ महत्वाचे आहे, अशा परिस्थितीत तू कुठेही जाऊ शकत नाही." कबीर म्हणाला.

"म्हणजे फक्त बाळ महत्वाचे आहे, मी महत्वाची नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा कबीर, या बाळावर तुमचा काहीच अधिकार नाही... हे फक्त बाळ माझं आहे." सान्वी म्हणाली.

"सान्वी, प्लीज शांत हो... तुला त्रास होईल, मी सांगतोय ना मी घरी आल्यावर बोलू आपण. मी तुला सगळं सांगतो." कबीर.

"काय सांगणार आहात तुम्ही, तिने कसे तुम्हाला लव्ह लेटर पाठवले होते ते, तुम्ही कसे ते ते जपून ठेवले ते. तुमचे दोघांचे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून काढलेले फोटो सुद्धा तुम्ही जपून ठेवले आहे, याचा अर्थ काय कबीर." सान्वी मोठमोठ्याने बोलत होती. बोलता बोलता तिचा श्वास अडकत चालला होता. एकदम धाप लागल्यासारखं झालं होतं. कबीरला आत्ता तिची आणि बाळाचीही काळजी वाटत होती.

"सान्वी, तुला त्रास होतोय आता... तू प्लीज माझ्यासाठी नाही पण स्वतःसाठी तरी शांत हो, मी अर्ध्या तासात घरी येतोय. मग आपण बोलू." कबीर म्हणाला.

"काय बोलणार आहात तुम्ही, तुमच्या या असल्या वागण्याचं समर्थन करणार आहात का? क... बी... र... तुम्ही.... खो... टा...." सान्वी श्वास घेत बोलत होती. तिचा आवाज अडखळत येत होता आणि तो अचानक बंद झाला. कबीरला खुपच टेन्शन आले. त्याने दोन वेळा आवाज दिला पण तिचा काहीच रिप्लाय आला नाही. आता मात्र कबीरला धडकीच भरली. तो सान्वीच्या काळजीने गाडी किती स्पीडने चालवत होता हे त्याचं त्यालाच कळत नव्हते.

इकडे सान्वी कबीरशी बोलता बोलता चक्कर येऊन पडली, तिच्या रूममधून धापकन आवाज आला तसं सविता काळजीने धावतच आत आली आणि पाहिलं तर सान्वी जमीनीवर पडलेली होती. तिला बघून सविताही खुप घाबरली. तिने लताला आवाज दिला, तोच लताही धावतच तिथे आली. दोघीही सान्वीला हलवून उठवत होत्या, पण सान्वी निपचित पडलेली होती. ती अजिबात डोळे उघडत नव्हती.

"लता, पटकन कबीरला फोन करून बोलावून घे." सविता घाबरून म्हणाली, पण परत तिने तिला अडवलं.

"नाही, नाही कबीरला नको फोन करू. यांना फोन कर, कबीरला सांगितलं तर तो घाबरेल." सविता म्हणाली तसं लता घाईघाईने खाली गेली आणि तिच्या मोबाईलवरून विक्रमला फोन करू लागली. त्याचवेळी श्रावणी आली आणि तिने लताला घाबरलेलं बघून लगेच विचारलं.

"लता मावशी, काय झालंय? तुम्ही एवढं का घाबरल्या आहात?" श्रावणी.

"सान्वीची तब्येत बिघडली आहे, म्हणून मी साहेबांना फोन करतेय." लता बोलताच श्रावणी पळतच सान्वीच्या रूममध्ये गेली आणि तिला बघून ती ही घाबरली.

"आई, वहिनीला अचानक काय झालं?" श्रावणीने विचारलं.

"माहिती नाही गं, पण ती फोनवर बोलतानाचा आवाज येत होता मला, पण मला वाटलं की ती कबीर सोबत बोलत असेल, दोघांची काहीतरी मस्करी चालली असेल. त्यामुळे मी ही एवढं लक्ष दिलं नाही आणि ती काय बोलत होती ते ही ऐकलं नाही. पण जेव्हा मला धापकन आवाज आला तेव्हा मी आत येऊन पाहिलं तर ही पडलेली होती." सविता म्हणाली.

"आई, आपण आताच तिला हाॅस्पीटलमध्ये घेऊन जाऊ, दादा किंवा बाबा यायची वाट बघत बसलो तर उशीर होईल." श्रावणी म्हणाली. सवितालाही तिचं म्हणणं पटलं. मग त्या दोघींनी कसं बसं तिला उठवलं आणि गाडीत घेऊन गेल्या.

गाडीत बसताच सान्वीने डोळे उघडले आणि रडू लागली.

"माझं बाळ, माझ्या बाळाला काही होणार तर नाही ना...." सान्वी थरथरत्या आवाजात बोलली.

"सान्वी, शांत रहा... काहीच नाही होणार.‌ तू फक्त तुझं रडणं थांबव आणि मनात देवाचं नामस्मरण करत रहा. देव तुझी प्रार्थना नक्की ऐकेल." सविता म्हणाली. खरं तर अचानक काय झालं हे तिलाही जाणून घ्यायचं होतं, पण सान्वीची अवस्था बघून तिने ते विचारायचं टाळलं.

थोड्या वेळातच त्या दोघीही तिला घेऊन हाॅस्पिटलमध्ये पोहचल्या. डॉक्टरांना सान्वीची कंडिशन माहिती होती त्यामुळे त्यांनी लगेच इमर्जंन्सी म्हणून तिला आत घेतलं आणि तिच्यावर उपचार सुरू केले.

सविता आणि श्रावणी दोघीही बाहेर टेन्शनमध्ये होत्या. सविताला खुप अपराध्यासारखे वाटत होते.

"कबीरने खुप विश्वासाने मला सान्वीवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. आजचा एक दिवस सुद्धा मी तिची नीट काळजी घेऊ शकले नाही, आता कबीरला काय सांगू!" सविता म्हणाली. तिला रडायला सुद्धा येत होते. सान्वीच्या या अवस्थेला ती स्वतःला जबाबदार मानत होती.

"आई, तू काहीच नाही केलंय, ज्या गोष्टी विधिलिखित असतात त्या आपण नाही टाळू शकत, प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नको." श्रावणी म्हणाली.

थोड्या वेळातच विक्रम पण तिथे आले आणि त्यांनी सान्वीची चौकशी केली. त्यांनाही सान्वीची काळजी वाटत होती. थोड्या वेळाने डॉक्टरांनी त्यांना आत बोलावलं तेव्हा ते तिघेही गेले.

"डॉक्टर, सान्वी कशी आहे?" सविताने विचारलं.

"त्यांना कसला तरी मानसिक ताण आलाय त्यामुळे त्यांचा बीपी वाढला आहे, सुदैवाने बाळ ठिक आहे... पण हे असं परत झालं तर त्यांच्या आणि बाळाच्या दोघांच्याही जिवाला धोका आहे." डॉक्टर म्हणाले.

"पुन्हा असं काही होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ." विक्रम म्हणाले. डॉक्टरांनी त्यांना सान्वीला भेटायची परवानगी दिली. तसं ते तिघेही सान्वीकडे गेले आणि तिला विचारले.

"सान्वी, बरं वाटतंय का आता?" सविताने विचारलं तसं सान्वीने फक्त मान हलवली. पण ती काहीच बोलली नाही.

"तुझी अवस्था किती नाजूक आहे हे माहितीये ना तुला, तरीही एवढं कसलं टेन्शन घेतलं तू? आपलं नशीब चांगलं म्हणून बाळ ठिक आहे, पण परत असं काही होऊ देऊ नकोस. तुला हवं ते आम्ही करू पण प्लीज तू कसलं टेन्शन घेऊ नकोस." सविता म्हणाली. तिच्या डोळ्यातली काळजी सान्वीला स्पष्ट दिसत होती, पण सान्वी सध्या काहीच बोलायच्या मनस्थितीत नव्हती. ती फक्त शांत पडून होती.

"अहो sss तुम्ही कबीरला फोन केला होता का?" सविताने विचारलं.

"कधीपासून त्याला फोन करतोय, पण त्याचा फोनच लागत नाहीये. या मुलांचं पण ना... गरजेच्या वेळी नेमका यांचा फोन बंद असतो." विक्रम थोडं वैतागून बोलले. थोडा वेळ सगळेच शांततेत होते. विक्रमच्या फोनच्या आवाजाने सगळे त्यांच्याकडे बघू लागले. त्यांनी मोबाईलमध्ये पाहिलं आणि ते आश्चर्याने सविताकडे बघू लागले.

"इन्स्पेक्टर शिंदे आता मला कशाला फोन करत असतील?" विक्रम म्हणाले.

"असेल काहीतरी काम, तुम्ही रिसिव्ह करून तर बघा!" सविता म्हणाली तसं त्यांनी फोन रिसिव्ह केला आणि बोलू लागले. तिकडून इन्स्पेक्टर शिंदेंनी जे काही सांगितलं ते ऐकून त्यांना घेरीच आल्यासारखं झालं. सविताने त्यांना पटकन आधार दिला. पण त्यांची अवस्था बघून ती सुद्धा घाबरली. सान्वीही घाबरून त्यांच्याकडे बघत होती, श्रावणीने सान्वीचा हात हातातच पकडून ठेवला आणि ती सुद्धा त्यांच्याकडे बघू लागली.

क्रमशः

लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all