Login

अशी जुळली गाठ. भाग - ५७

कबीर आणि सान्वीच्या अबोल प्रेमाची कहाणी
अशी जुळली गाठ. भाग - ५७

डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखनस्पर्धा

"अहो sss काय झालं? काय म्हणाले शिंदे? तुम्ही एवढं का घाबरलाय?" विक्रमला घाबरलेलं बघून सविताने विचारलं. विक्रम काही बोलणार तोच त्यांनी सान्वीकडे पाहिलं. तिच्यासमोर त्यांना काहीच बोलता येत नव्हते म्हणून त्यांनी सविताला बाहेर यायला सांगितलं.

"श्रावणी, तू इथे सान्वी जवळ थांब. ऑफिसमध्ये एक प्राॅब्लेम झाला आहे मी आणि सविता जरा जाऊन येतो." विक्रमने खोटंच सांगितलं आणि सविताकडे बघून ते बाहेर गेले. ते खोटं बोलत होते हे तिला कळत होतं मग ती त्यांच्यामागे आली आणि विचारू लागली.

"अहो, आता तरी सांगा काय झालयं ते?" सविताने काळजीने विचारलं. तसं त्यांनी एक दिर्घ श्वास घेतला आणि तिच्याकडे बघू लागले

"कबीरचा ॲक्सिडंट झालाय." विक्रम बोलताच सविताच्या पायाखालची जमीनच सरकली, तिला एकदमच घेरी आली, पण विक्रमने तिला आधार दिला. मग ती घाबरून त्यांच्याकडे बघू लागली.

"काय? तो… तो ठीक आहे ना?" बोलताना तिचा आवाज थरथरत होता.

"हो… सुदैवाने जास्त काही लागलं नाही. कार स्लिप झाली होती, पण एअरबॅग उघडली. त्यामुळे पुढचा धोका टळला. पण थोड्या जखमा आहेत… नशीब चांगलं की तिथे इन्स्पेक्टर शिंदे होते आणि त्यांनी कबीरला ओळखलं आणि लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. आपल्याला आता तिकडे जायला हवं आणि सान्वीला ही गोष्ट कळायला नकोय, नाही तर तिची तब्येत अजून बिघडेल." विक्रम म्हणाले. त्यांचं बोलणं ऐकताच सविताने एक दीर्घ श्वास घेतला, तिच्या डोळ्यांत नकळत पाणी तरळलं. एक नजर सान्वी जिकडे होती तिकडे टाकली आणि ती विक्रमसोबत बाहेर पडली. थोड्या वेळाने ते दोघेही कबीर ज्या हाॅस्पीटलमध्ये होता तिकडे गेले. तिथे गेल्यावर शिंदे आय सी यू च्या बाहेरच त्यांना भेटले. मग ते लगेच कबीरची चौकशी करू लागले.

"सर, कबीर कसा आहे आता?" शिंदेंना बघताच विक्रमने विचारलं.

"ते ठिक आहे, माझं डाॅक्टरांशी बोलणं झालंय, तुम्हाला हवं असेल तर तुम्हीही बोलून घ्या." शिंदे म्हणाले.

"पण हा ॲक्सिडंट झालाच कसा?" विक्रमने विचारलं.

"त्यांच्या गाडीचा स्पीड खुप जास्त होता, आणि ते स्वतः ड्राईव्ह करत होते. गाडी स्लिप झाली आणि समोरच्या गाडीलाही चांगलाच धक्का बसला, पण नशीब चांगलं म्हणून कबीर सर ठिक आहे." शिंदेंनी माहिती दिली.

"थॅंक्यू सो मच, तुम्ही तिथे होतात आणि कबीरला वेळेवर इथे घेऊन आलात तुमच्यामुळे त्याला लवकर उपचार मिळाले." विक्रम म्हणाले त्यानंतर ते कबीरला बघायला गेले.

आय सी यू मध्ये जाताच समोर बेडवर कबीर दिसला तसं त्या दोघांचे पाय थरथरले. हातावर पट्ट्या, कपाळावर छोटंसं बॅंडेज होतं, तो शुद्धीत होता, या दोघांना बघताच त्याच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आलं.

"कबीर, कसा आहेस तू? असा कसा काय ॲक्सीडेंट झाला रे? तुला अजून कुठे लागलं नाही ना....." सविता एक एक विचारत होती, बोलताना डोळ्यात पाणी पण येत होतं.

"आई, मी ठिक आहे... सान्वी कशी आहे? तिला काही त्रास तर नाही होत ना!" कबीरने काळजीने लगेच सान्वी बद्दल विचारले.

"ती ठिक आहे, आम्ही तिला आणि श्रावणीला काहीच सांगितलं नाही. तू तिची काळजी करू नकोस, स्वतःची काळजी घे आणि लवकर बरा हो." विक्रम म्हणाले. ते दोघेही तिथेच त्याच्याजवळ थांबून होते.

बराच वेळ झाला तरी विक्रम आणि सविता आले नाही म्हणून श्रावणीने सान्वीला सांगून बाहेर वेटींग एरियात येऊन विक्रमला फोन केला. त्यांनी कबीर बद्दल तिला सांगितले, पण ते सान्वीला सांगू नकोस हे ही सांगितले. फोन ठेवल्यावर श्रावणीच्या मनात एक शंका आली मग सान्वीकडे गेली आणि तिला विचारू लागली.

"वहिनी, एवढं सगळं चांगलं असताना आज अचानक तुझी तब्येत कशी काय बिघडली? दादा आणि तुझं काही भांडण वगैरे झालं होतं का?" श्रावणीने विचारलं.

"श्रावणी, तुला एक विचारू का? खरं खरं सांगशील का?" सान्वीने विचारलं.

"हो विचार!" श्रावणी.

"कबीर आणि इशिताचं अफेअर होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहीत होते का?" सान्वीने विचारताच श्रावणीला ते अजिबात खरं वाटलं नाही. वाटणार तरी कसं होतं, घरात कोणालाच काही माहीत नव्हते.

"वहिणी, तुला कोणी सांगितलं हे? त्या दोघांमध्ये असं काहीच नव्हतं. तुला कोणीतरी चुकीचं सांगितले आहे." श्रावणी म्हणाली.

"नाही श्रावणी, हे खरं आहे. मी स्वतः त्या दोघांचे फोटो, त्यांचे लव्हलेटर पाहिले आहे आणि कबीरने सुद्धा मला असं काही नाहीये असं सांगितलं नाही." सान्वी म्हणाली.

"म्हणजे यावरून तुमच्यात वाद झाले आहे वाटतं!" श्रावणी म्हणाली.

"हो..." सान्वी म्हणाली आणि तिने ती कबीरला काय बोलली तिला कसं माहित झालं ते सगळं श्रावणीला सांगितले. ते ऐकून श्रावणी थोडावेळ शांत झाली आणि नंतर सान्वीशी बोलू लागली.

"दादाचा भुतकाळ काय होता तो आम्हाला कोणालाच माहीत नाही, पण त्याचा वर्तमान आणि भविष्य तू आहेस हे आम्हाला माहीत आहे. वहिनी, खरं तर यात दादाचीही चुक नाहीये. तू दादाला दोष द्यायला नव्हता पाहिजे कारण तुमचं लग्न अचानक झालं होतं, तिथे ना दादाची मर्जी विचारली होती ना तुझी मर्जी विचारली होती, पण लग्न झाल्यापासून दादा तुझ्याशी प्रामाणिक आहे. तसं नसतं तर त्याने इशिताला इथून जाऊच दिलं नसतं. तू त्याला बोलण्याआधी थोडा तरी विचार करायला हवा होता. त्याला किमान घरी तरी येऊ द्यायचं होतं, मग त्याच्याशी बोलायचं होतं. म्हणजे तुझी तब्येत बिघडली नसती." श्रावणी म्हणाली. खरं तर कबीरचा ॲक्सिडंट सान्वीमुळेच झाला असं श्रावणीला मनापासून वाटत होते, पण तिने तसं बोलून दाखवलं नाही.

"त्यांना माझ्या तब्येतीची एवढी काळजी असती तर ते आत्तापर्यंत इथे आले असते!" सान्वी म्हणाली.

"तुला खरंच असं असं वाटतंय की त्याला तुझी काळजी नाहीये, माफ कर वहिनी... पण आज तुझं वागणं मला अजिबात नाही आवडलं. दादाला तुझी काळजी नसती तर एवढ्या दिवसांपासून तो त्याचं काम सोडून तुझ्याजवळ बसून राहिला नसता. आता तो आला नाही म्हणजे काहीतरी कारण असेल असा विचार नाही आला का तुझ्या मनात! आणि अजून एक गोष्ट, तुला वाटतंय ना त्याने इशिता बद्दल तुला काहीच सांगितलं नाही, तर त्याने ते मुद्दाम लपवून ठेवलं असेल असं नाही वाटत मला, त्याला कदाचित तुला सांगायचं असेल पण काही कारणाने सांगू शकला नसेल किंवा मग त्याला ते सांगणं महत्वाचं वाटलं नसेल कारण त्याच्यासाठी तू महत्वाची आहे." श्रावणी एवढं सगळं बोलल्यावर सान्वी तिच्या बोलण्याचा विचार करू लागली.

सान्वी जेव्हा कबीरच्या बाजूने विचार करू लागली तेव्हा हळूहळू तिचा राग कमी होत चालला होता, पण मनात अजूनही एकच विचार होता की कबीर आपल्याला भेटायला का आला नाही.

थोड्या वेळातच डॉक्टर आले आणि त्यांनी सान्वीला आजची रात्र इथेच ॲडमिट म्हणून रहावं लागेल असं सांगून गेले. त्यांना विक्रमनेच तसं सांगितलं होतं, कारण ते कबीर जवळ होते आणि रात्री कबीर घरी नसेल तर सान्वी सारखं त्याच्याबद्दल विचारत राहिल. त्यापेक्षा ती हाॅस्पीटलमध्ये तरी शांत राहिल असा विचार करून त्यांनी तिला तिथेच ठेवलं.

रात्र झाल्यावर सविताही सान्वी जवळ येऊन थांबली. विक्रम तिकडे कबीर जवळ थांबले होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी कबीरला डिस्चार्ज मिळाला. त्याला घेऊन ते घरी आल्यावर मग सविताही सान्वीला घेऊन घरी आली. सान्वी घरी येईपर्यंत तिला सविताने कबीर बद्दल काहीच सांगितलं नव्हतं.

क्रमशः

लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all