अशी जुळली गाठ. भाग - ५८
डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखनस्पर्धा.
सान्वीला घरी घेऊन आल्यावर सविताने तिला सोफ्यावर बसवलं आणि शांतपणे तिच्याशी बोलू लागली.
"सान्वी, तुला मी जे सांगतेय ते शांतपणे ऐकून घे, अजिबात टेन्शन घेऊ नको." सविता जेव्हा हे बोलली तेव्हा ती असं का बोलतेय हे सान्वीला कळेनाच. ती काही सांगायच्या आधीच सान्वी थोडीशी घाबरली.
"आई, तुम्ही नेमकं काय सांगणार आहात? काही झालंय का?" सान्वीने घाबरतच विचारलं.
"हो काल कबीरचा ॲक्सिडंट झालाय, पण घाबरू नकोस तो ठिक आहे... थोडंसं खरचटलं आहे फक्त, तू घाबरशील म्हणून आम्ही कोणीच तुला सांगितलं नाही." सविता एवढं शांतपणे बोलत होती. म्हणजे एवढं गंभीर नसावं असं सान्वीला वाटलं, पण तरीही तिला कबीरची काळजी वाटत होती.
"आता कुठे आहे ते? खरंच खुप काही लागलं नाही ना त्यांना?" सान्वीने काळजीने विचारलं.
"तो रूममध्येच आहे, खरं तर मी तुला तिकडेच घेऊन जाणार होती, पण त्याला अचानक समोर बघून तुला टेन्शन यायला नको म्हणून आता सांगितलं. चल आपण तुमच्या रूममध्ये जाऊ." सविता म्हणाली तसं सान्वी घाईघाईने उठली. कधी एकदा कबीरला समोर बघतेय असं झालं होतं तिला.
सविता आणि सान्वी दोघीही रूममध्ये येताच कबीर उठून बसला. सान्वीने त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्या हातावर पट्ट्या आणि कपाळावर बॅंण्डेज होतं. ते बघून सान्वी घाबरली.
"किती लागलंय तुम्हाला, कसा काय झाला ॲक्सिडंट?" बोलताना सान्वीच्या डोळ्यात पाणी दाटून आले. तिचा आवाजही गहीरा झाला.
"घाबरू नकोस, एवढं काही नाही झालंय. छोटीसीच जखम आहे." कबीर म्हणाला तसं सान्वी त्याच्याजवळ जाऊन बसली. त्या दोघांना बोलता यावं म्हणून सविता तिथून बाहेर गेली. ती गेल्यावर सान्वीने हलकेच त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
"माझ्यामुळेच तुमची अशी अवस्था झाली आहे. मी फोनवर तुमच्याशी त्या विषयावर बोलायलाच नको होते." सान्वी म्हणाली.
"तुला माहिती झालं हे एका अर्थी बरंच झालं. सान्वी, मला तुझ्यापासून काहीच लपवून ठेवायचं नव्हते. तुला आठवतंय का मी श्रावणीला तुला हाॅटेलमध्ये घेऊन यायला सांगितलं होतं. तेव्हाच मी तुला सांगायचा प्रयत्न केला होता, पण तुझे आई बाबा आले त्यामुळे सांगायचं राहूनच गेलं. नंतर सांगायचं ठरवलं होतं, पण नंतर इशिताच नोकरी सोडून गेली. मग जर तिच राहिली नाही तर सांगायचा विषयच नाही असं वाटलं मला." कबीर म्हणाला. तेव्हा तिलाही हाॅटेलमध्ये असतानाचं त्याचं ते वाक्य आठवलं.
"हो बरोबर आहे तुमचं, पण ते सगळं चुकीच्या पद्धतीने माझ्या समोर आलं ना, म्हणून मला सहन झाले नाही." सान्वी म्हणाली.
"हो पण मी खरं सांगतोय सान्वी, मी तुला फसवलं नाही. तसं तर मी इशिताला सुद्धा नाही फसवलं. आपलं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय माहितीये ना तुला. प्लीज मला दोषी समजू नकोस." कबीर म्हणाला.
"आता मला मीच दोषी वाटायला लागले आहे कबीर, मीच तुमच्या दोघांच्या मध्ये आले. माझ्यामुळे तुमच्यात दुरावा आला." सान्वी म्हणाली.
"असं नको बोलूस, आपल्या नशिबात जे असतं तेच होतं. देवाने वरती आपली गाठ बांधली होती म्हणून हे सगळं जुळून आलं. आता मागचं सगळं विसरून जाऊ आणि नव्याने सुरूवात करू. एक गोष्ट मनापासून सांगतोय... माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे आणि मी तुझ्यासोबत खुप खुश आहे. प्लीज मला तुझ्यापासून दूर करू नको." कबीर म्हणाला.
"नाही सोडून जाणार, मलाही तुम्ही हवे आहात. मी सुद्धा तुमच्याशिवाय राहू शकत नाही. काल दिवसभर हाॅस्पीटलमध्ये मी तुमची वाट बघत होते. कोणाला काही बोलली नाही, पण तुम्ही आला नाहीत तर माझ्या मनात नको नको ते विचार येत होते. तुम्हाला गमावण्याची भिती वाटत होती." सान्वी म्हणाली.
"मलाही माहित नव्हतं, नाही तर मी अशा अवस्थेतही तुला भेटायला आलो असतो. घरी आल्यावर बाबांकडून कळलं." कबीर म्हणाला.
"आता आराम करा आणि कसलाच विचार करू नका." सान्वी म्हणाली.
"आता विचार करणारही नाही आणि कसले विचार मनातही येणार नाही, आज खरंच खुप मोकळं वाटतंय आणि खुप मोठं ओझं उतरल्या सारखे वाटतंय." कबीर म्हणाला.
"एक विचारू का?" सान्वी म्हणाली.
"एकच काय, तुला सगळं काही विचारायचा आणि जाणून घ्यायचा अधिकार आहे, तेव्हा जे काही विचारायचं आहे बिनधास्त विचार!" कबीर म्हणाला.
"तुमचं आणि इशिताचं एकमेकांवर प्रेम होतं, मग ही गोष्ट तुम्ही घरी का नाही सांगितली. कारण इशिता तर सर्व गुण संपन्न होती आणि तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करत होती मग तरीही तुम्ही का नाही सांगितले? तुम्हाला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं का?" सान्वीला श्रावणी सोबत बोलल्या पासून हाच प्रश्न पडला होता.
"आम्ही दोघंही योग्य वेळेची वाट बघत होतो. ऋग्वेदच्या लग्नाला गावी जायच्या दिवशीच आमचा विषय झाला होता, गावावरून आल्यावर दोघांनीही घरी सांगायचं असं आमचं ठरलं होतं, पण पुढे काय झाले हे तुला माहीतच आहे." कबीर म्हणाला.
"इशिता तुमच्यावर रागावली नाही का?" सान्वी.
"रागावली होती, पण तुझ्या बाबतीत काय झालं हे जेव्हा तिला कळलं तेव्हा ती स्वतःच आपल्या दोघांच्या मधून बाजूला झाली आणि माझा विषय सोडून दिला. खरं तर तिला आपल्या दोघांच्या मध्ये यायचं नव्हतं म्हणूनच तिने जाॅब सोडायचा निर्णय घेतला होता, पण बाबांनी तिला सहा महिने थांबवून घेतले. नंतर जेव्हा मी तिच्यावर आरोप केला तेव्हा तिला सहन झाले नाही. मग ती गेली ती परत आलीच नाही." कबीर म्हणाला. त्यावर सान्वीनेही काही प्रश्न विचारले नाही, पण इशिताच्या मनाचा मोठेपणा ऐकून तिला स्वतःलाच कसं तरी वाटत होतं. आपल्यासाठी तिने तिच्या प्रेमाचा त्याग केला आणि आपण मात्र अताताई पणा करून सगळंच बिघडवायला निघालो होतो. असा विचार मनात येताच तिला खुप गिल्ट वाटत होते.
"आता आराम करणार आहे की परत तोच विचार करून तब्येत बिघडून घेणार आहे." कबीर हलकसं हसत म्हणाला. तसं ती विचारातून बाहेर आली, मग दोघेही आराम करू लागले.
****************
सान्वीला सगळं माहिती झाल्यामुळे कबीरला आता ते ही टेन्शन नव्हते. हळूहळू त्याची तब्येत बरी होत होती आणि सान्वीही आता स्वतःची आणि कबीरची छान काळजी घेत होती. त्यामुळे तिची तब्येत पण चांगलीच ठणठणीत होती.
पुढच्या काही दिवसांत कबीर ऑफिसला जाऊ लागला. पण लवकर घरी यायचा आणि सान्वीकडेही लक्ष द्यायचा.
सान्वीला आता सातवा महिना लागला होता. पोटही चांगलेच दिसत होते आणि आराम असल्यामुळे तिचीही तब्येत वाढली होती.
सान्वी आरशात बघून स्वतःचंच निरिक्षण करत होती. तोच कबीर आला आणि हसून तिच्याकडे बघू लागला.
"काय झालं? एवढं काय निरखून बघतेय?" कबीरने विचारलं.
"मी जरा जास्तच जाड झालेय, असं नाही वाटत का तुम्हाला?" सान्वी म्हणाली.
"हो पण या दिवसात थोडी फार तब्येत होतेच. बाळ आल्यावर बघ, त्याच्यामागे पळता पळता आपोआप बारीक होशील." कबीर म्हणाला.
"तुम्हाला काय वाटतं मुलगा होईल की मुलगी?" सान्वीने विचारलं तसं कबीर गालातल्या गालात हसत तिच्याकडे बघू लागला. तिलाही त्याला काय हवं आहे हे ऐकण्याची उत्सुकता होती. त्यामुळे तो काय बोलतेय याकडेच तिचं लक्ष होतं.
क्रमशः
लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा