अशी जुळली गाठ. भाग - ५९
डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखन स्पर्धा.
"सान्वी, खरं सांगू का... आपल्याला मुलगाच पाहिजे किंवा मुलगीच पाहिजे असा काही माझा हट्ट नाही, मला दोन्हीपैकी काहीही चालेल. फक्त ते जन्माला येताना सुदृढ आणि निरोगी असावे. शेवटी तो किंवा ती कोणीही असले तरी ते आपलं दोघांचं प्रेमाचं प्रतीक असणार आहे." कबीर म्हणाला.
"किती छान विचार करता तुम्ही, तुमचे विचार ऐकून खुप छान वाटलं." सान्वी म्हणाली. कबीर पुढे काही बोलणार तोच दाराचा आवाज आला तसं त्या दोघांनी पाहिले तर सविता होती.
"आई, ये ना..." कबीर म्हणाला तसं सविता आत आली आणि तिने सान्वीच्या हातात दुधाचा ग्लास देऊन ती बसली.
"सान्वी, आता सातवा महिना लागला आहे तर आपण डोहाळे जेवण करायला हवं." सविता म्हणाली.
"आई, मला काय वाटतं की आपण जास्त गोंधळ घालायला नको, सान्वीची तब्येत पहिल्यापासूनच थोडी नाजूक आहे. तिला जास्त दगदग नाही सहन होणार. तर अगदी मोजक्या पाहुण्यांनाच कार्यक्रमाला बोलावू. हवं तर बाळ आल्यावर बारसं चांगलं मोठं घालू." कबीर म्हणाला.
"माझ्याही मनात तेच आहे, लगेच जास्त दिखावा नकोच करायला. पुढच्या आठवड्यातच डोहाळे जेवण करून घेऊ. सान्वीच्या आई बाबांना पण बोलावू, यावेळी निलिमालाही बोलवायचा विचार करतेय मी. बरेच दिवस झाले ती आलीच नाही." सविता म्हणाली.
"हो चालेल, तुला कसं नियोजन करायचं आहे ते कर आणि माझी काही मदत लागली तर सांग." कबीर म्हणाला.
"आई, आता मी पण ठिक आहे त्यामुळे मी ही तुम्हाला मदत करेल." सान्वी म्हणाली तसं सविता हसून तिच्याकडे बघू लागली.
"तू तुझी आणि बाळाची काळजी घे, हीच खुप मदत आहे मला." सविता म्हणाली.
"हो बरोबर बोलतेय आई, तुला काही करायची गरज नाही. आम्ही सगळे आहोत." श्रावणी आत येताच बोलली.
"तू आहेस म्हणजे टेन्शनच टेन्शन आहे. मदत करतेय की काम वाढवून ठेवतेय ते तुलाच माहित." कबीर तिला चिडवू लागला.
"आई, बघितलं ना... हा दादा कसा बोलतोय मला. जसं काय मी काहीच करत नाही." श्रावणी.
"ए, पण खरंच श्रावणीची हल्ली खुप मदत होतेय मला. आता जबाबदारीने वागायला शिकली आहे." सविता म्हणाली.
"आता खरं तर आपल्याला श्रावणीच्या लग्नाचंही बघायला हवं." कबीर आता सिरियसली बोलला.
"एवढ्या लवकर मी अजिबात लग्न करणार नाही, अजून एक वर्ष तरी माझ्या लग्नाचा विषय काढायचा नाही." श्रावणी म्हणाली.
"एक वर्षानेच करायचं आहे, पण आतापासूनच शोधाशोध करायला हवी ना म्हणजे मनासारखं स्थळ बघता येईल." सविता म्हणाली.
"हम्म, मग ठिक आहे." श्रावणी जरासं लाजून बोलली. तसं कबीर आणि सान्वी एकमेकांकडे हलकसं हसून बघू लागले. थोडा वेळ त्यांच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाविषयी चर्चा चालू होत्या, मग त्यांनी तिथे बसूनच सान्वीच्या आई बाबांना फोन करून यायला सांगितलं. त्यांच्याशी बोलून सान्वीलाही छान वाटलं, आई बाबा येणार म्हणून ती खुश झाली होती.
************
दुसऱ्या दिवसापासून घरात डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची तयारी चालू झाली. सान्वीला बाहेर खरेदीसाठी न नेता घरीच सगळं मागवलं होतं. सगळी तयारी झाली आणि बघता बघता डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा दिवसही उजाडला.
सकाळीच सान्वीचे आई बाबा आले होते, बाकीचेही थोडेफार पाहुणे आले होते त्यामुळे घर अगदी भरल्या सारखं वाटत होतं.
श्रावणी आत सान्वीला तयार करत होती, तिनेच सान्वीसाठी छान हिरव्या रंगाची साडी सिलेक्ट केली होती आणि कबीरलाही त्याच रंगाचा कुर्ता घ्यायचा आग्रह केला होता.
सान्वी तयार होऊन आरशासमोर उभी राहिली. हिरव्या साडीत ती खुपच सुंदर दिसत होती. फुलांचे दागिने तर तिच्यावर अगदीच खुलून दिसत होते. प्रेग्नंट असल्यामुळे चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आलं होतं, अगदी लक्ष्मी सारखं तिचं रुप दिसत होते. तिने हलकेच पोटावर हात ठेवला आणि श्रावणी कडे बघू लागली.
"श्रावणी, सगळं काही व्यवस्थित होईल ना गं... मला खुप भिती वाटतेय." सान्वी जरा घाबरतच बोलली.
"वहिनी, आजच्या चांगल्या दिवशी चांगलेच विचार करायचे म्हणजे सगळं चांगलं होईल." श्रावणी म्हणाली.
"कधी कधी खुप भिती वाटते, असं का होतं काय माहित!" सान्वी.
"तू काहीपण विचार करत असतेस म्हणून तुला भिती वाटते. चांगले विचार करत रहा म्हणजे भिती वाटणार नाही." श्रावणी म्हणाली. तसं सान्वी बेडवर येऊन शांत बसली. थोड्या वेळाने कबीरही तिथे आला आणि तिच्याकडे बघू लागला.
"अरे व्वा किती सुंदर दिसतेय सान्वी तू, पण या सुंदर चेहऱ्यावर काहीतरी कमी आहे." कबीर म्हणाला. तसं सान्वी गोंधळून पुन्हा पुढे सरकून आरशात बघू लागली.
"सगळं तर परफेक्ट आहे, मग तुम्हाला काय कमी वाटतंय?" सान्वीने विचारलं.
"स्माईल नाही ना तुझ्या चेहऱ्यावर." कबीर उदास होऊन बोलला तसं सान्वी हलकसं हसली.
"आता परफेक्ट आहे बघ. आता किती छान दिसतेय, पण मला सांग, एवढी उदास होऊन का बसली होती?" कबीर.
"मी सांगते दादा, वहिनी विनाकारण कसलाही विचार करत असते. म्हणून असं बसली होती." श्रावणी म्हणाली.
"सान्वी, आता फक्त दोन महिने राहिले आहे. मग आपलं बाळ आपल्या सोबत असणार आहे. तोपर्यंत कसलाही विचार करायचा नाही आणि कसलंही टेन्शन घ्यायचं नाही. सगळं काही छान होणार आहे." कबीरने तिला धीर दिला. नंतर तिचे छान फोटो काढले तेव्हा तिचं टेन्शन गेलं.
थोड्या वेळातच कबीर सान्वीला घेऊन खाली आला, खाली हाॅलमध्येही छान सजावट केली होती. सान्वीला बसायला पाळणाही लावला होता आणि तो छान फुलांच्या माळांनी सजवला होता.
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सान्वीचं औक्षण करून सुवासिनींनी तिची ओटी भरली. त्यानंतर बायका गाणी वगैरे म्हणाल्या आणि सगळ्या सान्वीकडे बघू लागल्या.
"सान्वी, आता मस्त एक उखाणा होऊन जाऊदे." सगळ्या एक सुरात बोलल्या तसं सान्वीने हसून कबीर कडे पाहिलं आणि उखाणा घेऊ लागली.
"नेसली हिरवी साडी, भरला हिरवा चुडा....
कबीरचे नाव घेते हाती येईल बर्फी किंवा पेढा...."
कबीरचे नाव घेते हाती येईल बर्फी किंवा पेढा...."
सान्वीने उखाणा घेतला आणि तिच्या समोर एक फुलांनी सजवलेलं ताट होतं त्यात दोन वाट्या होत्या त्यातली एक वाटी तिने उघडली तर त्यात बर्फी होती. ते बघून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. नंतर तिचे पाळण्यात बसून, हातात धनुष्य बाण घेऊन, फुलांची परडी घेऊन असे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो काढले.
डोहाळे जेवणाचा कार्यक्रम अगदी आनंदात आणि उत्साहात पार पडला त्यामुळे सगळेच खुष झाले.
डोहाळ जेवणाच्या दगदगीमुळे सगळे दमले होते. त्यामुळे दुसरा दिवस पूर्ण आराम करण्यात गेला. आलेले पाहुणेही दुसऱ्या दिवशीच गेले.
जसे जसे दिवस जातं होते तस तसं सान्वीचा त्रास थोडा थोडा वाढत होता.
आता सान्वीला नववा महिना लागला होता. नववा महिना लागल्यामुळे पोटही चांगलाच वाढलं होतं.. कबीर सगळी कामं सोडून चोवीस तास तिच्यासोबत राहत होता आणि तिची काळजी घेत होता. डिलिव्हरी जवळ आल्यामुळे दर आठ दिवसांनी चेकअप साठी जायला लागत होतं.
आताही कबीर सान्वीला चेकअपसाठीच घेऊन जाणार होता. त्यामुळे तो त्याचं आवरून फाईल वगैरे घेत होता. सान्वी आणि तो रूमच्या बाहेर येताच सान्वी देवघरात गेली आणि सगळं काही व्यवस्थित होऊदे म्हणून देवाकडे प्रार्थना करू लागली.
"कबीर, आता सान्वीचे दिवस भरत आले आहे. तू एकटाच नको जाऊ तिच्यासोबत, मी ही येते तुमच्यासोबत." सविता म्हणाली. मग कबीरही हो म्हणाला. खरं तर आता त्याची सुद्धा तीच इच्छा होती. त्यालाही कितीही नाही म्हटलं तरी टेन्शन आलंच होतं. थोड्या वेळातच ते तिघेही हाॅस्पिटलमध्ये गेले.
क्रमशः
लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा