अशी जुळली गाठ. भाग - १८
डिसेंबर-जानेवारी २०२५-२६ दिर्घ कथालेखन स्पर्धा.
"काही गोष्टी अशा असतात ऋग्वेद, ज्या मनातच दाबून ठेवलेल्या बऱ्या असतात. मनातलं ओठांवर आलं तर त्याचा स्फोट व्हायला वेळ लागणार नाही." कबीर दुखऱ्या आवाजात बोलला.
"ऋग्वेद, मी तुझा भाऊ आहे तसाच मित्र सुद्धा आहे. मला सांगितलं तर मी तुला काहीतरी मदत करू शकेल!" ऋग्वेद.
"नाही ऋग्वेद, आता वेळ निघून गेली आहे त्यामुळे सांगण्यात काहीच फायदा नाही. उगाच तुला काही सांगितले तर मी ती गोष्ट विसरणार नाही आणि तू ही आयुष्यभर मनात गिल्ट घेऊन राहशील, त्यापेक्षा राहूदेच. चल आता आम्हाला निघायला हवं बराच उशीर झाला आहे आता." कबीर म्हणाला तसं ऋग्वेदने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
"कबीर, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव. वेळ ही सगळ्या गोष्टींवर औषध असते. त्यामुळे जास्त विचार करू नको. सान्वी खुप चांगली मुलगी आहे, ती तुला खुप सुखी ठेवेल बघच तू." ऋग्वेद म्हणाला तसं कबीरने मान हलवली. त्याच्या मनात खुप काही होतं पण त्याने ऋग्वेदला ते सांगितलंच नाही.
थोड्या वेळातच कबीर त्याच्या आई बाबांना आणि मावशी काकांना घेऊन ऋग्वेदच्या घरी गेला.
सान्वी आणि श्रावणी दुपारच्या वेळी जेवण करून मस्त गप्पा मारत बसल्या होत्या. त्याचवेळी सान्वीची आई तिथे आली आणि त्यांच्याजवळ बसली. त्या दोघींना निवांत बोलता यावं म्हणून श्रावणी लगेच उठली.
"वहिनी, तू आता तुझ्या आई सोबत छान गप्पा मार. मी जरा समीर काय करतोय ते बघून येते." श्रावणी म्हणाली आणि तिथून गेली.
"सान्वी, तू मंदिरातून आल्यापासून मी बघतेय तू कसल्यातरी विचारात आहे. आता श्रावणी सोबत बोलताना सुद्धा तुझ्या चेहऱ्यावर हसू दिसत नव्हते. तुला ऋग्वेद राव परत समोर दिसले म्हणून त्यांचा विचार करतेय की काय?" आईने काळजीने विचारलं. शेवटी आईचं मन ते... मनात विचार येणारच.
"नाही गं आई... मी त्यांचा विचार नाही करत, मी गुरूजींच्या बोलण्याचा विचार करतेय." सान्वी म्हणाली.
"गुरूजींच्या बोलण्याचा.... म्हणजे? असं काय म्हणाले ते?" आईने विचारले. तेव्हा सान्वीने गुरूजी काय बोलले ते सगळं तिच्या आईला सांगितलं. ते ऐकून ती पण काळजीत पडली.
"याचा अर्थ असा आहे तुम्हा दोघांनाही संकटाचा सामना करावा लागणार आहे. सान्वी... बाळा, जपून रहा गं... आणि कबीर रावांची पण काळजी घे. गुरूजी जे बोलतात ते कधीच खोटं होत नाही, मी तुझ्या लग्नाच्या आधी पण त्यांच्याकडे गेले होते तेव्हाही त्यांनी मला असंच काहीतरी सांगितलं होतं." सान्वीची आई म्हणाली.
"म्हणजे लग्नात असं काही घडणार आहे ते तुला आधीपासूनच माहीत होतं." सान्वीने आश्चर्याने विचारले.
"नाही गं... तेव्हा गुरूजी म्हणाले होते की लग्न होईल पण प्रवासाची दिशा बदलेल. मला तेव्हा त्यांच्या बोलण्याचा काहीच अर्थ कळला नव्हता. पण नंतर कळला. आता काळजी घे बाई तू, सगळं काही तुझ्याच हातात आहे." सान्वीची आई म्हणाली.
"आई, मी घेईन काळजी... तू आता त्यावरून परत आणखी काळजी करत बसू नकोस." सान्वी म्हणाली. त्यावर तिच्या आईनेही मान डोलावली. नंतर थोडा वेळ बोलून सान्वी झोपायला गेली. त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला एक छोटीशी झोपडी सारखी खोली होती. तिथे हवा छान थंडगार यायची त्यामुळे ती खोली सान्वीची आवडती जागा होती. दुपारी झोपायचं असलं की ती तिथेच निवांत झोपायची. मग तिची आई पण तिच्या कामाला गेली.
श्रावणी बराच वेळ समीर सोबत गप्पा मारत होती. संध्याकाळ होत आली तरी कबीर आणि त्याचे आई बाबा आले नव्हते म्हणून श्रावणीने कबीरला फोन केला.
"हा बोल श्रावणी..." कबीर म्हणाला.
"दादा, किती वेळ झाला तुम्हाला तिकडे जाऊन. तुम्ही पुर्ण दिवसच तिकडे घालवला, मी खुप बोअर झाली आहे आता. या लवकर तुम्ही सगळे." श्रावणी म्हणाली.
"पंधरा मिनिटांत पोहचतोय आम्ही तिकडे, बाकी आम्ही आल्यावर आपण बोलू." कबीर म्हणाला आणि त्याने फोन ठेवला. मग श्रावणी पण त्या तिघांची वाट बघू लागली.
कबीर म्हटल्याप्रमाणे ते बरोबर पंधरा मिनिटात घरी आले. ते आत येताच सान्वीचे आई बाबाही तिथे आले.
"तुम्हाला भरपूर वेळ लागला तिकडे, काही वाद तर नाही ना झाले तुमच्यात?" प्रभाकरने काळजीने विचारलं.
नाही... नाही, खरं तर आम्ही त्यांच्यातलेच सगळे वाद मिटवून परत आलो. आता जे झालं ते झालं वाद घालून काही फायदा नाही!" विक्रम म्हणाले.
"बाबा, मी काय म्हणतो.... आता सगळं काही व्यवस्थित झाले आहे ऋग्वेद पण भेटला, इथेही सगळ्यांना भेटलो. आता आपण निघायचं का मुंबईला परत?" कबीरने विचारलं.
"कबीर, आपला आजचा प्रवास झाला. कालचाही दिवस प्रवासातच गेला. आता माझी प्रवास करायची अजिबात इच्छा नाहीये, आपण रात्री इथेच छान आराम करू आणि उद्या सकाळी निघू." विक्रम म्हणाले.
"उद्याचा एक दिवस राहिले असते तर बरं झालं असतं. तुम्हाला आमची शेती तरी दाखवता आली असती. शेतीतून काही भाजीपालाही देता आता असता." सान्वीची आई म्हणाली.
"आता खरंच नको, आता खुप कामं आहेत. आम्ही नंतर निवांत कधीतरी येऊ, मग हवं तर जास्त दिवस राहू. पण आता उद्या निघायला हवं." विक्रम म्हणाले.
"बरं ठिक आहे पण पुढच्या वेळी नक्की जास्त दिवसांचा प्लॅन करून या." प्रभाकर पाटील म्हणाले.
"हो नक्की येऊ... श्रावणी, तू आणि कबीर जा. आपल्या बॅग वगैरे व्यवस्थीत भरून ठेवा." सविता म्हणाली तसं ते दोघेही उठले आणि आतल्या खोलीत गेले.
"दादा, इथलं वातावरण किती छान आहे ना... मला तर इथून जायची अजिबात इच्छा नाहीये. असं वाटतंय की अजून काही दिवस इथेच रहावं." श्रावणी तिच्या कपड्यांच्या घड्या घालता घालता म्हणाली.
"तुझी इच्छा असेल तर तू राहू शकते. हवं तर मी तुला मावशीकडे नेऊन सोडतो." कबीर म्हणाला.
"ना... बाबा... माझं एमबीए चं ॲडमिशन बाकी आहे. मला पुढच्या आठवड्यात तिकडे बोलावलं आहे. नाही तर खरंच राहिली असती." श्रावणी म्हणाली.
"तू... आणि आम्हाला सोडून राहणं तरी शक्य आहे का! आम्ही आज मावशीकडे गेलो नाही तर तू इथे कंटाळली, तुझ्यासोबत सान्वी होती तरीही तुला एवढा कंटाळा आला, तेव्हा आम्ही कोणीच नसल्यावर तू राहूच शकत नाही." कबीर म्हणाला.
"हो हे खरं आहे... मी कधीच नाही राहू शकणार तुमच्याशिवाय." श्रावणी म्हणाली.
"हो आणि आम्हीही तुला राहू देणार नाही." कबीर म्हणाला आणि त्याचे कपडे बॅगमध्ये भरू लागला. त्यानंतर त्याने सान्वीचा ड्रेस घेतला आणि घडी मारताना त्याला सान्वीची आठवण झाली तेव्हा त्याने श्रावणीला विचारलं.
"श्रावणी, सान्वी कुठे आहे गं? आल्यापासून मला दिसलीच नाही!" कबीरने विचारलं तसं श्रावणी हलकसं हसली आणि त्याच्याकडे बघू लागली.
"दादा, ती बायको आहे तुझी. तू आल्यापासून ती इथे नाहीये आणि तुला आताशी तिची आठवण आली आहे." श्रावणीच्या बोलण्यात आणि हसण्यात एक वेगळीच उदासीनता होती.
"श्रावणी, आमचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं आहे हे तुलाही माहीत आहे. मला हे सगळं स्विकारायला थोडा तरी वेळ जाईल ना... नाही आलं माझ्या पटकन लक्षात, पण आता तरी सांगणार आहे का ती कुठे आहे ते?" कबीरने विचारलं.
"ती तिच्या आवडत्या ठिकाणी मस्त झोपली आहे. अजूनही मॅडमची झोप झाली नाही. आता एवढी झोपली आहे, त्यामुळे रात्री तिला झोप लागणार आहे की ती तुझं डोकं खात राहणार आहे कोणाला माहिती." श्रावणी म्हणाली. तसं कबीर तिच्याकडे डोळे मोठे करून बघू लागला.
"माझं कशाला डोकं खाईल ती!" कबीर म्हणाला.
"ते ही बरोबर आहे, तसंही तुझं डोकं खायला तुला डोकं कुठे आहे?" श्रावणी हसून म्हणाली तसं कबीर तिच्या फटका मारायला लागला पण श्रावणी लगेच तिथून पळू लागली.
"आता मला पकडूनच दाखव तू." श्रावणी पळता पळता बोलली.
"मला चॅलेंज देतेस का... आता पकडतोच की नाही बघ." कबीर म्हणाला आणि तो ही तिच्या मागे मागे पळू लागला. पळता पळता श्रावणीला धूर दिसला म्हणून तिने समोर पाहिलं तर समोर आग लागली होती ती बघून श्रावणी जोरात किंचाळली.
क्रमशः
लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा