#जलदलेखन स्पर्धा
विषय- संसारातील नणदेची भूमिका
शीर्षक:- अशी नणंद हवी
भाग-२
मागील भागात-
पण दिपूताई, आई शिकू देतील का मला? त्यांना तर मी घराबाहेर पाय ठेवलेलं पण चालत नाही. मग कसं जाऊ मी?" ज्योती स्वतःला सावरत डोळे पुसतं हुंदके देत तिला प्रश्नांवर प्रश्न विचारत होती.
आता पुढे:-
"वहिनी अगं, किती प्रश्न विचारतेस? त्याची काळजी तू करू नकोस. बाबा आणि मी आम्ही दोघे मिळून समजावू आईला. तू फक्त तुझ्या भविष्याचा विचार करं." ती तिच्या गालावर हात ठेवत तिला आश्वस्त करत तिला म्हणाली.
"दिपूताई, तुमचा व बाबांचा मला नेहमीच खूप आधार वाटतो. खूप थँक्यू, नेहमी सोबत राहण्यासाठी." ज्योती तिचा हात हातात घेत म्हणाली.
"ए वेडाबाई, मी तुझी मैत्रिण आहे आधी मग नंतर नणंद. मग मैत्रीत नो साॅरी, नो थँक्यू ! कळलं का रडूबाई? " ती तिचं नाक चिमटीत पकडून गालात हसत म्हणाली.
"हो, अशी नणंद हवी. " ज्योती रडता रडता हसत तिच्या गळ्यात पडत म्हणाली.
थोड्या वेळ काॅलेज, अभ्यास यावर गप्पा मारून दिपिका निघून गेली.
ती जाताच ज्योतीचे लक्ष भिंतीवर टांगलेल्या हसऱ्या चेहऱ्याच्या हरीशच्या चंदनाचा हार चढवलेल्या फोटोकडे गेले. त्याच्या आठवणीत नकळत आसवे तिच्या गालांवर ओघळली. तसं तर त्यांना फार सहवास लाभला नव्हता तरीही एक भावनिक नातं होतं, एक ओढ निर्माण झाली होती. तो तिला पाहायला आला होता आणि पहिल्याच कांदेपोहेच्या कार्यक्रमात ती त्याला खूप आवडली. मग लगेच एक दोन भेटी झाल्या आणि लग्न ठरलं. लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. सत्यनारायणाची पुजा झाली. सगळे त्या गडबडीत होते. त्यांची नजर चुकवून तो ज्योतीला सरप्राईज द्यायला म्हणून बाहेर पडला. तरी करूणाने त्याला हटकलं होतं पण लगेच आलोच असे म्हणून तो निघून गेला. त्या आधी त्याने दिपिकाला कोठे जाणार आहे बाबतीत सर्व सांगितले होते. येताना त्याचा अपघात झाला आणि त्यातच तो मरण पावला.
सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या ज्योतीवर तर आभाळच कोसळले होते. अगदी सैरभैर झाली होती ती या घटनेने. करूणाला लोक ज्योतीबद्दल काही बाही बोलू लागले. कुणी म्हणे पोरीचा पायगुण चांगला नाही तर कोणी म्हणे पोरीने आल्या आल्याच पोरीने हरीशला गिळलं. या बोलण्याचा खोलवर परिणाम करूणाच्या मनावर झाला. मुलाच्या निधनाच्या दुःखात ज्योतीलाही पतीच्या निधनाचे दुःख असेल हे ती विसरली. तिला अपशकुनी, पांढऱ्या पायाची म्हणून प्रत्येकवेळी तिचा अपमान करायची, खडे बोल सुनवायची. दिपिकाने या काळात तिला खूप आधार दिला होता. तिचे बाबा सुरेशही तिला मुलीसारखी वागणूक द्यायचे.
माहेरीही बेताची परिस्थिती, पुन्हा पाठच्या दोन बहिणी लग्नाच्या होत्या. आपल्यामुळे त्यांना त्रास नको म्हणून तिने हरीशच्या निधनानंतरही सासरीच राहणे पसंद केले. हे सगळे तिला एका चलचित्रासारख तिच्या डोळ्यांसमोर तरळून गेले. पुन्हा कंठ दाटून आला ; पण दिपिकाचे बोलणे आठवून तिने आसवे पुसून स्वतःला मजबूत ठेवण्याची खूणगाठ बांधली.
दिपिका व सुरेश यांनी महतप्रयासाने करूणाला समजावले. तेव्हा कुठे तिने ज्योतीला पुढे शिकण्याची परवानगी दिली. पण त्यातही तिने अट ठेवली की तिने घरातील सर्व करूनच काॅलेजमध्ये जायचं. ते त्यांनी मान्य केलं. असंही दिपिका तिला त्यात मदत करणार होतीच त्यामुळे तिने जास्त आढेवेढे न घेता ज्योतीच्या बाजूने ती अट मान्य केली.
दिपिका व ज्योती सारख्या वयाच्या होत्या. दिपिका स्वभावाने मोकळी, समजूदार व हसतमुख होती. कोणाशीही पटकन मैत्री करणारी, बोलकी त्या उलट ज्योती शांत व अबोल, पटकन न मिसळणारी. तरीही दोघीचे छान सूत जुळले. ते म्हणतात ना मैत्रीत काहीच आड येत नसतं. अगदी दोन विरुद्ध टोक एकत्र येतात. तसेच यांचे झाले. योगायोगाने दोघी एकाच काॅलेजमध्ये एकाच वर्गात पदवीचे शिक्षण घेणार होत्या. याचा आनंद दोघींनाही झाला. येणे-जाणे ,खाणे-पिणे सर्व एकत्र असायचे. दोघी अगदी बहिणीसारख्या, मैत्रिणी होत्या. त्यांच्याकडे पाहून वाटत नव्हतं की त्या नणंद भावजय आहेत.
दिवसामागून दिवस जात होते. थोड्या दिवसांत दिपिकाच्या साथीने ज्योतीही काॅलेजमध्ये छान रूळली. तिथेही तिचे मित्र मैत्रिणी झाले.
दिपिकाचा बालमित्र हर्ष, तो ही याच काॅलेजमध्ये शिकत होता. ती त्याला भाऊ मानत होती. दर वर्षी ती त्याला राखी बांधत असायची. तो तिला हरीश सारखाच वाटायचा. तोही तिच्याशी भावासारखा वागायचा. त्याला ज्योती खूप आवडतं होती. एवढ्या लहान वयात तिच्यासोबत इतकं वाईट घडलं याचं त्याला खूप वाटायचं. तिचा शांत, लाघवी स्वभाव त्याला भावला. त्यातही तिचं खंबीर राहण्याचं त्याला खूप कौतुक वाटायचे. त्याच्या नजरेतील ज्योतीबद्दल प्रेम व आदर दिपिकाने हेरला. यावर तिने त्याच्याशी बोलायचं ठरवलं.
दिपिकाचा सुमित हा खूप चांगला मित्र होता. त्या दोघांची मैत्रीचं पुढे प्रेमात रूपांतर झालं. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला नोकरी मिळाली की तो दोन्ही घरी त्यांच्याबद्दल बोलणार होता.
दिपिकाने सुमितला हर्षच्या मनात ज्योतीबद्दल काय आहे हे जाणून घ्यायला सांगितले. कारण हे चौघे आता अगदी जीवलग मित्र बनले होते. त्यामुळे सगळे एकेरी संबोधन करायचे.
घरी असल्यावर ज्योती करूणासमोर दिपिकाला अहो जावो बोलायची. इतर वेळी अरे तुरे बोलणं असायचं.
एकदा संधी पाहून सुमितने हर्षला ज्योतीबद्दल विचारले. तेव्हा त्याने त्याचं तिच्यावर खूप प्रेम असून तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा दिपिकाही सोबत होती. ज्योती पुन्हा एकदा आपलीच वहिनी होणार या गोष्टीचा तिला खूप आनंद झाला.
"भाई, मला खूप आनंद होतोय की तू माझ्या ज्योतीच्या जीवनात हर्ष घेऊन येतोस." ती हर्षचा हात हातात घेऊन अतिशय आनंदाने म्हणाली.
"हा, मग माझं नावच हर्ष आहे म्हटल्यावर हर्ष आणणारच ना. ज्योती माझ्या जीवनात प्रकाश आणणार तर मी हर्ष देऊच शकतो ना." तो मिश्किलपणे तिच्या डोक्यावर टपली मारत म्हणाला.
पण आता सगळ्यात अवघड गोष्ट होती ती म्हणजे ज्योतीला या लग्नाला मनापासून राजी करणं आणि करूणाने त्यासाठी परवानगी देणे. आता हे आव्हान दिपिका व सुरेशने त्यांच्या खांद्यावर घेतली.
क्रमशः
देईल का ज्योती लग्नाला होकार? करूणा देणार का परवानगी या लग्नाला?
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा