अश्शी नणंद नको गं बाई..

कथा नणंद भावजयीची
अश्शी नणंद नको गं बाई...


"अरे, काय हे? घर आहे की पसारा?" खेळण्यावर पाय पडल्यामुळे वैतागलेली मीरा ओरडली.

"सॉरी हं ताई.. ते पियुने खेळता खेळता तसंच खेळणं टाकलं." आतल्या खोलीतून बाहेर येत काव्या म्हणाली.

"अगं पण मग उचलायचं ना लगेच. मला लागलं म्हणून ठिक आहे. आईबाबांना लागलं असतं तर किती महागात पडलं असतं." मीरा काव्याला समजावत म्हणाली.

"हो ताई.." काव्या आत जायला वळली.

"नाहीतर एक काम करू. दोघी मिळून पटकन घर आवरून टाकू." मीरा ओढणी बाजूला ठेवत म्हणाली.

"तू काय इथे घर आवरायला येतेस का?" वृंदाताई आणि महेशराव आत येत म्हणाले.

"तेच तर मी म्हणत होते.." काव्या म्हणाली.

"असं नाही गं आई. पण ही एकटी तरी किती करणार? मी मदत करते तिला. घर किती अस्ताव्यस्त झालं आहे." मीरा म्हणाली.

"ऑफिसमधून परस्पर आलीस ना? बस आधी शांतपणे. मी चहा देते, तो घे. घर आवरायचं नंतर बघू." वृंदाताई मीराला दरडावत म्हणाल्या.

"मी ठेवते चहा." काव्या आत गेली. ती आत जाताच मीराने पर्समधून औषधं काढली.

"आईबाबा, ही तुमची औषधं आणि हे थोडे पैसे."

"मीरा, याची दरवेळेस काय गरज आहे?" महेशराव नाराजी दाखवत म्हणाले.

"खूप गरज आहे बाबा. तुम्हीच म्हणता ना, मी मुलामध्ये आणि मुलींमध्ये भेदभाव करत नाही. मग रितेशनी आणलेली औषधं जशी घेतली असती तशीच ही पण ठेवून घ्या."

"अगं पण मला नाही पटत हे. राघवला काय वाटेल? लग्नाला इतकी वर्ष झाली तरी तू आम्हाला मदत करते आहेस."

"बाबा, आज मी जी नोकरी करते आहे ते तुम्ही शिकवलं म्हणूनच.. त्यात राघवचा काय संबंध? तसेही मी त्या घरात काही कमी पडू देत नाहीये. मग तो का मला ओरडेल?"

"तुझ्याशी बोलण्यात कोण जिंकेल? खरंच कौतुक वाटतं गं तुझं मीरा. घर, माहेर आणि सासर सगळं व्यवस्थित सांभाळतेस." वृंदाताई कौतुकाने म्हणाल्या.

"चहा.." काव्या कप पुढे करत म्हणाली.

"पियु कुठे गेली गं?" मीराने विचारले.

"असेल कुठेतरी भटकत." वृंदाताई तुटकपणे म्हणाल्या. त्यावर काहीच न बोलता काव्या आत गेली.

"मी निघते.." चहा संपवून मीरा उठली.

"लगेच?"

"हो.. घरी नील आणि प्रिशा वाट बघत असतील."

"घर आवरायला थांबणार होतीस ना?" महेशराव म्हणाले.

"हो.. पण आता नाही ना आवरायचे. मी निघते. औषधं वेळेवर घेत जा. आणि संपली की मला सांगा. काव्या निघते गं मी." बोलता बोलता मीरा निघाली सुद्धा. संध्याकाळी रितेश आल्यावर जेवणं शांतपणेच झाली. काहीतरी बिनसलं आहे हे रितेशला जाणवलं. पण तो ही ऑफिसमधून दमून आला होता. त्यामुळे त्यानेही विषय काढला नाही. रात्री सगळं समजेलच याची त्याला खात्री होतीच. तसेच झाले. रात्री काव्या खोलीत आली तीच धुसफुसत.

"पियु कुठे आहे?" रितेशने विचारले.

"झोपली आहे तुझ्या आईशेजारी." काव्या चिडून म्हणाली.

"त्यात चिडण्यासारखे काय आहे?" रितेशने विचारले.

"या घरात ना सगळेच तसे आहेत. तुम्हाला ना मला फक्त मी किती दुष्ट आहे हे दाखवायला आवडतं."

"ताई आली होती वाटतं?" रितेशने विचारले.

"हो.. आणि मग काय लेकीचे दिवे ओवाळणे सुरू होते."

"काव्या, अशी काय चिडतेस? ताई सगळं करते म्हणून आईबाबांना तिचं कौतुक वाटतं गं." रितेश काव्याचा हात हातात घेत म्हणाला. "आता माझं बघ ना.. ना धड चांगली नोकरी ना धड पगार. हे घर घेण्यात आईबाबांनी होती नव्हती ती पुंजी वापरली. बाबांचं तुटपुंजं पेन्शन. अश्या परिस्थितीत ताई त्या दोघांच्या औषधांचा आणि बाकीचा खर्च उचलते. मग त्यांना तिचं कौतुक वाटणारच ना."



चुकतंय कोण? मीरा, आईबाबा की काव्या? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. या कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेचा कोणत्याही प्रकारे उपयोग करण्यास लेखिकेची परवानगी आवश्यक.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all