अश्शी नणंद नको गं बाई.. भाग २

कथा नणंद भावजयीची
अश्शी नणंद नको गं बाई... भाग २



"पण मला नाही आवडत ते. मला सतत वाटत राहतं की ते मला हिणवत आहेत." काव्या अजूनही रूसली होती.

"मग तू कर ना काहीतरी काम. लाव ना थोडासा हातभार मला." रितेश बोलत होता.

"आणि पियुचं काय करू?"

"तू तिच्याकडे तरी कुठे लक्ष देतेस? दिवसभर ती अशीच फिरत असते. तू करतेस तरी काय? हाच प्रश्न मला पडलेला असतो."

"हेच म्हणते मी. हेच चालू असतं तुमचं. ताई येऊन गेल्या की ती किती करते आणि मी कसं काहीच नाही करत. त्याही घरी आल्या की फक्त सवालजबाब करत असतात. हे असंच का? ते तसंच का? ते काही नाही. मी इतके दिवस ऐकून घेतलं. आता नाही. परत मला कोणी बोलू दे. मी उलटं उत्तर देणार." काव्या हट्टीपणे म्हणाली.

"काय बोलू यावर. तसंही तू सांगून ऐकणार आहेस का? कर मग स्वतःचंच खरं." रितेश काव्याकडे पाठ करून झोपी गेलासुद्धा.

काव्या स्वतःशीच विचार करत बसली. पाच वर्ष झाली होती तिच्या लग्नाला. लग्न कसलं? तडजोड होती ती. वडिलांच्या आकस्मिक झालेल्या मृत्युमुळे आई दुःखात होती. नुकतीच ग्रॅज्युएट झालेली काव्या आणि तिच्या पाठी शिकणारा भाऊ पदरात. वर्षाच्या आत लग्न करायचे म्हणून आईने आलेल्या बर्‍यापैकी स्थळांपैकी रितेशचं स्थळ निवडलं. रितेश तसा नोकरीला बर्‍या ठिकाणी, दिसायला बरा, आईवडिलांचं स्वतःचं घर, लग्न झालेली बहिण. जास्त विचार न करताच आईने होकार कळवला. काव्या लग्न करून रितेशच्या घरी आली. इथे येताच तिला समजले की रितेशची नोकरी जरी बरी असली तरी तो एका नोकरीवर खूप काळ टिकत नव्हता. त्यामुळेच त्याला खूप जास्त पगार नव्हता. आईबाबाच घरातलं सगळं बघायचे. त्यांना मदत असायची मीराची. लहानपणापासून स्वतःच्या बळावर शिकलेल्या मीराचं सगळ्यांनाच कौतुक होतं. शिक्षण पूर्ण झाल्यावर वेगवेगळ्या परिक्षा देऊन चांगली नोकरी मिळवून तिथेही ती यशस्वी झाली होती. भरपूर पगार असलेली मीरा तो पगार आईवडीलांवर खर्च करायला मागेपुढे बघायची नाही. नेमकं हेच काव्याला खटकत होतं. मीराचं दर आठवड्याला घरी येणं, आईबाबांची औषधं भरून जाणं तिला आवडेनासं झालं होतं. पण यावर उपाय मात्र तिला सापडत नव्हता.


"पियु, काय तो अवतार गं केसांचा? इकडे ये.. मी केस छान बांधून देते. आई कुठे गेली?" मीराने पियुला विचारले.

"ती गेली आहे बाजारात. पण तू अचानक कशी?" वृंदाताईंनी विचारले.


"ते बाबांना कधीपासून लाडू खायचे होते ना? आमच्या ऑफिसमध्ये एक बाई आल्या होत्या. त्या घरीच करतात म्हणे. मी मागवून घेतले. ताजे आहेत." ते ऐकून वृंदाताईंच्या डोळ्यात पाणी आले. कधीपासून त्यांना डिंकाचे लाडू करायचे होते. पण सुक्यामेव्याचे चढते भाव त्यांना पाठी खेचत होते. ते लक्षात ठेवून मीराने नक्कीच कोणाकडून तरी बनवून घेतले असणार.

"हे ठेव.. आणि या हिरोईनला पण दे लगेच." मीरा पियुचे गाल ओढत म्हणाली.

"आत्तू.. दुखतं ना.." गाल फुगवत पियु म्हणाली. तेवढ्यात काव्या बाहेरून आली.

"आई.. आत्याने माझे गाल ओढले." पियुने आईकडे तक्रार केली. आधीच उन्हातून आल्याने वैतागलेली काव्या पियुची तक्रार ऐकून चिडली. इतके दिवस मीराबद्दलचा राग दुप्पट वेगाने उसळून वर आला.

"इतके दिवस आम्हाला बोलत होता ताई.. आता माझ्या लेकीला पण मारायला सुरुवात केली?" काव्या चिडून बोलू लागली.

"अगं मी फक्त.." मीराने बोलायचा प्रयत्न केला.

"बरोबर.. तुम्ही इथे पैसे देता ना? आम्ही मिंधे झालो आहोत तुमचे. तुम्ही जे कराल ते आम्ही सहन करायलाच हवे ना?" काव्या बोलत होती. ते ऐकून सगळे बघतच बसले. काव्याच्या मनात एवढं काही असेल असं कोणालाच वाटलं नव्हतं.


मीरा गाजवते का पैशांचा रूबाब? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all