अश्शी नणंद नको गं बाई.. अंतिम भाग

कथा नणंद भावजयीची
अश्शी नणंद नको गं बाई... भाग ४


आठपंधरा दिवसातच रितेशचा पगार संपून गेला होता. पियुची फी भरणं अजून बाकी होतं. नाईलाजाने काव्याने मीराला फोन लावला.

"हॅलो ताई.."

"बोल काव्या.."

"तुम्हाला भेटायचं होतं."

"ये ना घरी.."

"घरी नको. बाहेर कुठे चालेल का?"

"तू सांग. मी येते."

काव्याचा फोन ठेवताच मीरा विचारात पडली. 'आता काय बरं बोलायचं असेल हिला?' ठरल्याप्रमाणे संध्याकाळी काव्या मीराला भेटायला पोहोचली.

"काय घेणार चहा की कॉफी?" मीराने विचारले.

"काही नको.."

"इथे हॉटेलमध्ये बसायचे असेल तर काहीतरी घ्यायलाच पाहिजे ना? सांग पटकन."

"कॉफी चालेल." मीराने ऑर्डर दिली. ती काव्याचे निरीक्षण करत होती. काव्या चेहर्‍यावरून वैतागलेली दिसत होती.

"हं बोल.. काय काम होतं?"

"ताई.. ते.. मला माफ करा. मी तुम्हाला तोडून बोलायला नको होतं." काव्याने बोलायला सुरुवात केली.

"मी विसरले ते.. पुढे बोल."

"ताई.. मग ती मदत?" काव्याने अडखळत विचारले. मीराच्या चेहर्‍यावर खिन्न हसू उमटले.

"काव्या.. मी माझ्या भावाला अडचणीत नाही बघू शकत. किंवा कोणतीच बहिण नाही बघू शकत. तुला काय वाटलं मी पैसे दिले नसतील? पण आईबाबा आणि रितेश नाही म्हणाले." ते ऐकून काव्याचा चेहरा उतरला.

"त्यांना काय समजतं? किती खर्च असतात." काव्या पुटपुटली.

"तुला काय वाटतं ते त्यांना समजत नसेल? आईबाबा काही करू शकत नाहीत. पण तुझ्याकडून तुला काही करता येत नाही?" मीराने विचारले.

"मी काय करणार?"

"हेच तर.. तुला मी बोललेलं आवडत नाही. पण माफ कर. आता बोलल्याशिवाय रहावत नाही. त्यादिवशी तू आम्हाला वाटेल तसं बोललीस. आम्ही ऐकून घेतलं. पण परिस्थिती सुधारण्यासाठी तू कधी काही केलेस? रितेशची नोकरी सोडली तर बाकी तुला काय त्रास आहे? रहायला हक्काचे घर आहे, सासूसासरे चांगले आहेत, नवरा निर्व्यसनी आहे. आणि नोकरीबाबत कल्पना तुझ्या आईला दिली होती. रितेश हुशार नाही, त्याचवेळेस त्याला कोणीही बोललेलं आवडत नाही. म्हणून तो नोकऱ्या बदलत राहतो. याचा विचार करूनच बाबांनी आहे नाही तेवढा पैसा घरात घातला. कमीतकमी त्याच्या डोक्यावर छत रहावं म्हणून. मी तुमचा आर्थिक भार कमी करायचा प्रयत्न करते आहे. पण तू काय करतेस? तू कधी केलास विचार नोकरीचा? आज इतके वर्ष राहते आहेस म्हणजे तुला संसार करायचा आहे. पण त्या संसाराची जबाबदारी घ्यायला नको? आणि मी बोलते असं म्हणतेस.. मी आपली माणसे समजून चुका सांगत होते ना?"

"तुमचं बरोबर आहे.. पण मी पियुला सोडून नोकरी.." काव्याच्या तोंडातून कसेबसे शब्द निघाले.

"मी नाही माझ्या मुलांना सोडून कामाला जात. पियु काय तुझी एकटीची मुलगी आहे? आईबाबा कधी तिला बघत नाही का?"

"मला कोण देईल नोकरी?" काव्याच्या शंका संपत नव्हत्या.

"नोकरीच कर असं नाही. पण स्वतःच्या पायावर उभं रहायचा प्रयत्न तरी करशील की नाही. तुला काय म्हणायचे आहे की कोणी तुला मदत करणार नाही?"

"माझ्या चुका पदरात घालून कराल मला मदत ताई?" काव्याने विचारले.

"ताई म्हणतेस ना? मग विचारतेस का? हक्काने सांगायचं. तुला सांगू, तुमचं लग्न झालं तेव्हा मला वाटलं होतं तुझ्या रूपाने मला छानशी मैत्रिण मिळणार आहे. पण तू स्वतःला एका कोशात गुंडाळून घेत राहिलीस. नशीब आता या निमित्ताने तरी तू बोलायला आलीस."

"ताई, खरंच कराल मला मदत?" काव्याच्या डोळ्यात पाणी होते.

"हो गं.. आपला भाऊ सुखाने रहावा हिच फक्त इच्छा आहे माझी. बस्स.." मीराने काव्याच्या हातावर थोपटले. कॉफीचे बिल देऊन दोघी तिथून बाहेर पडल्या. एका नवीन नात्याची रूजवात करून.



नणंद भावजय बर्‍याच ठिकाणी दिसून येते ते विळ्याभोपळ्याचे नाते. नणंद वर्चस्व गाजवते असे आरोप होतात. खूपदा नणंदेनी केलेली मदत दिसत नाही पण तिचे बोलणे दिसते. त्या दोघींच्या नात्यावर लिहिलेली एक कथा.

🎭 Series Post

View all