Login

अश्शी सासू सुरेख बाई

सासू आणि सून यांच्या नात्यामधले सुरेख वर्णन
अश्शी सासू सुरेख बाई

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
संघ - सोनल शिंदे


"पूर्वा, झाला काय ग शिरा तयार? चला आवरुया पटकन, नाहीतर उशीर होईल जेवायला. बाकीच्यांना घरी पण जायचं आहे ना!"
सासूबाई हॉलमधून सरळ किचनमध्ये येत बोलत होत्या.


पूर्वा आणि कार्तिकचे आठवडाभर आधी लग्न झालेले; त्यामुळे सासरी पूर्वा पहिल्यांदा काहीतरी बनवणार होती. पहिला पदार्थ म्हणजे गोडधोडच काहीतरी बनवाव लागणारं; म्हणून सासूबाईंनी तिला आधीच विचारले होते, की कोणता पदार्थ बनवणार म्हणजे मग तसे समान तिला काढून द्यायला. पूर्वाने शिरा बनवणार असे सांगितले; त्यामुळे सासूबाईंनी सगळी तयारी करून दिली होती आणि त्या बाहेर जाऊन बसलेल्या.

बराच वेळ होऊन गेलेला, पण तरीही आतून कसलाच सुगंध येत नव्हता की पूर्वा बाहेर येत नव्हती; त्यामुळे मग सासूबाई स्वतः उठून किचनकडे वळल्या आणि पूर्वाला विचारत होत्या.

"झाला का शिरा? चल पटकन बाहेर घेऊन जाऊया."
सासूबाई पाठमोऱ्या उभ्या असलेल्या पूर्वाला म्हणाल्या.


"ते.. आई.. मी!"
पूर्वा त्यांच्यापासून तोंड लपवत होती आणि बोलताना देखील अडखळत होती. तिला असे बघून सासूबाईंना काय समजायचे ते समजले. ती रडत असावी बहुतेक; म्हणून त्या हळूच तिच्याजवळ आल्या.


"अगं पूर्वा काय हे? अशी रडतेस काय?"
त्यांनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवून विचारले तशी ती आणखीनच रडायला लागली.

"आई, मला ते.. शिरा."
पूर्वा अजूनही बोलताना अडखळत होती.

कढईमध्ये चिकट काहीतरी बनवून ठेवलेले दिसत होते. त्याच्याकडे बघून सासूबाईंना कळून चुकले, की पूर्वाला जास्त काही बनवता येत नाही. ती रडत आहे हे बघून त्यांनाही वाईट वाटले. पहिल्याच दिवशी आपली नवीन सून रडायला नको; म्हणून त्यांनी अगदी शांततेत घेतलं सगळं आणि तिला आधार द्यायचं ठरवलं.


"तुला नाही जमते का शिरा बनवायला? अग मग त्यात इतकं काय रडण्यासारखं?"
सासूबाईंनी पूर्वाकडे बघत हसून म्हटले. पूर्वाला त्यांच्या अशा हसण्याचे आश्चर्य वाटले. तिला वाटले आपल्याला काही जमत नाही; म्हणून सासूबाई चिडतील. पहिल्याच दिवशी आपण माती खाल्ली म्हणून आपले हसू होईल, पण इकडे तर भलतेच झाले होते.

"आई, मला खरंच नाही बनवता येत शिरा. मी आधी प्रयत्न केला होता शिरा बनवण्याचा तेव्हा नीट जमला, म्हणजे माझ्या मम्मीने शिकवला होता.. पण इथे तसा का होत नाहीये काय माहिती?" 
पूर्वाने घाबरत का असेना, पण सगळं खरं खरं सांगून टाकले.


"मी शिकवेन तुला, पुन्हा एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. तिकडे तुझ्या माहेरी छान झाला असेल, पण इकडे तुझ्यासाठी हे किचन सुद्धा नवीन आहे ना! होते असे कधी कधी. हळूहळू जमेल तुलाही छान शिरा बनवायला. मी सांगते तसे कर, चालेल तुला?"
सासूबाईंनी अगदी प्रेमाने तिला विचारले, तसे पूर्वाच्या चेहऱ्यावर गोड हसू आले.


"थँक्यू आई, मला खरंच खूप भीती वाटतं होती. हे सगळं सामान बघून कुठून आणि कशी सुरुवात करू तेच समजत नव्हते. यूट्यूबवर रेसिपीचे व्हिडिओ पाहिले, पण तरीही मला त्यातले काहीच जमले नाही."
रडणे बंद होऊन पूर्वा आता मनमोकळेपणाने बोलत होती.

"आता ती कढई बाजूला ठेवून दे आणि नवीन कढईमध्ये आपण शिरा बनवूया."
सासूबाईंनी ट्रॉलीमधून नवीन कढई काढून दिली.

"मी शिकेन आई सगळं, तुम्ही मला सांगत जा आणि मी तसे करत जाईन."
पूर्वा त्यांच्याकडे बघून बोलली, पण सासूबाईंना तिच्या मनातली चलबिचल समजत होती.

"हे बघ, हे तूप आधी वितळवून घ्यायचं कढईमध्ये मग त्यात वाटीभर रवा घालून चांगला खरपूस भाजायचा. त्यानंतर त्यात हे कापून ठेवलेले काजू बदाम पिस्त्याचे काप घालायचे म्हणजे ते ही रव्यासोबत छान भाजले जातात. नंतर त्यात गरम केलेलं दोन वाटी दूध घालायचं आणि मग नंतर साखर घालायची. शेवटी वेलची पावडर घातली की आपला शिरा तयार."
सासूबाई पूर्वाला अगदी सोप्या पध्दतीने सांगत होत्या.

सासूबाई सांगतील तसे पूर्वा करत जात होती. त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरचं शिरा अप्रतिम झाला होता. पूर्वा सुद्धा अगदी खुश झाली होती.

"आपण मनापासून केलं, की सगळं अगदी छान आपल्याला हवं तसं होतं."
सासूबाई तिच्याकडे बघत बोलत होत्या.

"हो आई, तुम्ही इतक्या प्रेमाने मला शिकवले मग छानच झाला असणार शिरा."
डोळ्यात पाणी येतं होते, पण तरीही पूर्वा हसून बोलत होती.

"आई, आम्हाला निघायला उशीर होईल. तुमचं सासू सूनेच गॉसिप झालं असेल तर आपण बाहेर जाऊया का?"
आर्या म्हणजे त्यांची मुलगी. भावाचे लग्न म्हणून माहेरी चांगली पंधरा दिवसांची सुट्टी घेऊन आलेली, पण आता सासरी निघायला पाहिजे म्हणून आईंने नव्या सूनबाईंच्या हातचे खाऊनच सासरी जा असा आग्रह केला होता.

"अगं आता आम्ही येणारच होतो बाहेर. बघ झाला आमचा शिरा तयार."
असे म्हणून आईने तिला शिऱ्याची कढई दाखवली, पण बाजूला झाकून ठेवलेल्या कढईमध्ये काय आहे? याची उत्सुकता तिला लागून होती आणि पुढे येत तिने ते झाकण उघडुन पाहिले.

"अगं हे काय? दोन्ही कढईमध्ये शिरा?"
आर्या आश्चर्याने म्हणाली. पूर्वा बिचारी खाली मान घालून उभी होती. ती काही बोलणार तिच्या आधीच आई बोलली.

"अगं आधी केलेला तिने शिरा, पण त्या शिऱ्याला नजर लागली."
आईंनी पूर्वाची बाजू सांभाळून घेतली.

"अच्छा!"
असे म्हणून आर्याला कळून चुकले, की पूर्वाला शिरा बनवायला जमला नाही म्हणून आईने पुन्हा बनवला.

"बरं चला चला, पूर्वा तू ही कढई बाहेर घेऊन जा आम्ही येतोच."
आईंनी तिला बाहेर जायला सांगितले तशी ती शिऱ्याची कढई घेऊन गेली.

"आई, हिला साधा शिरा पण बनवता येत नाही?"
आर्या डोळे मोठे करून बोलू लागली.

"अगं मग त्यात काय इतकं, शिकेल ती पण हळूहळू."
आई पूर्वाच्या बाजूने बोलत होती.

"हम्म्म, मला धपाटे घालून घालून शिकवले तू.. आणि इथे मात्र सुनेच्या बाजूने बोलते."
आर्या इतकुस तोंड करत बोलू लागली.

"चालायचंच, नवीन आहे ती आपल्या घरात. आपण तिला सांभाळून नको का घ्यायला? तू माझी लेक आहेस.. तुला मी चांगली बदडून शिकवू शकते, पण ती परक्या घरची लेक. तिला तुझ्यासारखे थोडीच ओरडून शिकवणार!"
आई आता आर्याला समजावून सांगू लागल्या.

"हे बरंय तुझं, लेक आणि सूनेमध्ये तूच फरक करतेय. बघ हा आई."
आर्या पुन्हा लटका राग धरून बोलली.

"मग काय करायला पाहिजे. तिला पहिल्याच दिवशी ओरडायला हवे होते का? अगं घाबरली आहे ती आधीच, मग अशा वेळेस आपण थोडासा धीर द्यायला पाहिजे. आपल्यात चांगली रुळली की जमेल तिला सगळे, पण तोपर्यंत आपण तिची काळजी घेतलीच पाहिजे की नाही?"
आई अगदी प्रेमाने समजून सांगत होत्या.

"हो, अगदी बरोबर. तुझ्यासारखी अशी सुरेख सासू मिळायला भाग्य लागतं."
आर्या आईंकडे बघून हसू लागली तशी आईची नसलेली कॉलर मात्र ताठ झाली होती.


"बरं बरं, चला आता. नाहीतर दादा उगाच चिडायचा, माझ्या बायकोला आल्या आल्या कामाला लावले म्हणून."
असे म्हणून आर्या खुदकन हसली.


"अरे दोघी माय लेकी बाहेर येणार आहे की नाही? आणखी किती वेळ वाट बघायची आम्ही."
बाहेर वाट बघत बसलेला कार्तिक बोलला.

"कार्तिक आज तुला तुझ्या बायकोच्या हातचे खायला मिळणार; त्यामुळे मला आता सुट्टी मिळणार आहे."
आईंनी हसतच त्याला बोलले, तशी पूर्वा पण त्याच्याकडे बघून हसली.


पूर्वा भरपूर शिकलेली नोकरी करणारी, चांगल्या मोठ्या घरातली एकुलती एक मुलगी. तिच्या घरात बहुतेक सगळ्याच कामाला नोकर चाकर होते; त्यामुळे तिला कामं करण्याची संधी कधी मिळालीच नाही. लग्न होऊन सासरी आली, तरी तिला फारसे काही जमत नव्हते. किचनमध्ये तर ती स्वतः हुन पाणी गरम करायला सुद्धा कधी गेली नव्हती, पण इकडे सासरी तसे नव्हते. इतर सगळ्या कामांना मावशी असायच्या, पण स्वयंपाक हा घरातल्या बाईनेच करायला पाहिजे असे होते. पूर्वाला तर हे सगळं नवीन होतं. नवीन घर, नवा संसार, नवी माणसे; त्यामुळे थोडे दिवस झाले, की ती सुद्धा करायला लागेल हळूहळू घरातली कामे.. असे समजून सासूबाई तिला जास्त काही करायला सांगत नव्हत्या.


"अगं ह्या बाहेर काम करणाऱ्या मुली अशाच असतात. त्यांना घरातले काहीच काम येत नाही. नुसतं नट्टापट्टा करायचा आणि पर्स हलवत ऑफिसला निघायचं, इतकंच येत त्यांना. बाकीचं बघायला आपण असतोच त्यांच्या मागे, म्हणून त्या निवांत फिरतात."
सासूबाईंची मैत्रीण त्यांना मंदिरात भेटल्यावर सांगत होती.


"नाही ग, माझी पूर्वा तशी नाही. मी शिकवीन तिला मग करेन ती सगळे. आपण काय आज आहे उद्या नाही. पुढे त्यांनाच तर बघायचे आहे सगळे; त्यामुळे आपण आहोत तोपर्यंत करायचं."
सासूबाई त्यांच्या सुनेची बाजू सांभाळत बोलत होत्या.


"पण मी म्हणते तू आतापासूनच अशी जास्त लाडावून ठेवू नको सुनेला, नंतर खूप त्रास होतो मग आपल्यालाच."
मैत्रिणीचे सल्ले काही संपत नव्हते.


"काय गं तू पण, आपण सुद्धा नवीन लग्न करून आलो तेव्हा अशाच होतो की! पण नंतर शिकलोच ना आपण सगळं करायला."
हसत हसत दोघींचे बोलणे झाले आणि दोघी आपापल्या घरी गेल्या.

घरी आल्याबरोबर पूर्वा नुकतीच ऑफिसमधून घरी आलेली दिसत होती. तिने सासूबाईंना बघताच पाणी आणून दिले.

"आई, आज जेवायला काय बनवायचं आहे?"
पूर्वाने स्वतः हून तयारी दाखवली होती कामाची; त्यामुळे सासूबाई तर भलत्याच खुश झाल्या.

"अगं तू पण आताच ऑफिसमधून घरी आलीस ना! बस जरा वेळ माझ्याजवळ."
असे म्हणून त्यांनी पूर्वाला जवळ बसवून घेतले.

दोघी सासू सूना एकमेकांना समजून घेत वेळ देत होत्या. घरातल्यांच्या आवडीनिवडी सांगत होत्या. कार्तिकला काय काय आवडतं? याची माहिती त्या देत होत्या. पूर्वा पण नवऱ्याचा विषय निघाला, की अगदी लक्ष देऊन ऐकायची. पूर्वा जरी नोकरी करणारी होती, तरी तिला घरकामात पण मदत करायला आवडत होते.. आणि म्हणूनच सासूबाईंनी कधी तिच्यावर राग धरला नाही की तिला नोकरी सोडायला सांगितले नाही.


"आई, एक विचारू तुम्हाला?"
पूर्वाने सासूबाईंना हळूच विचारले.

"हो विचार की, माझ्याशी बोलायला इतकं काय घाबरतेस? मी काय खाणार आहे का तुला?"
सासूबाईं हसतच तिच्याकडे बघून बोलल्या तशी ती नॉर्मल झाली.

"मला किचनमधले काहीच येत नाही, तुम्ही मला रोज जमेल तसे शिकवतात आणि त्यातही मी अनेक चुका करत असते."
पूर्वा बोलत होती आणि सासूबाई ऐकत होत्या.

"बरं मग."
सासूबाई तिच्याकडे बघून बोलल्या.

"म्हणजे तुम्हाला माझा राग येत असेलच ना! मी घरात वेळ देत नाही. सकाळी उठले की तुम्ही बनवलेला डबा घेते आणि ऑफीसला निघून जाते. संध्याकाळी पण घरी आल्यावर मी लवकर किचनमधे येत नाही. माझे ऑफिसचे काहीतरी काम असले तरच मी असा उशीर करते म्हणा, पण तरीही तुम्हाला असेच वाटत असेल ना, की घरात सून आली तरीही मलाच सगळं करावं लागतय."
पूर्वाने घाबरत घाबरत मनातले सगळे बोलून दाखवले.


"हे बघ पूर्वा, तुला असं स्वतः हून वाटतं आहे; त्यामुळे मी काहीच बोलत नाही. हा.. पण तुला याची जाणीव होतेय हेच माझ्यासाठी खूप आहे. अग इतरांच्या सूनांच बघते मी, त्या अगदी तुझ्यासारख्याच ऑफिसला जातात आणि घरी आल्यावर धड बोलतही नाही घरातल्या लोकांशी, निदान तू तसे तरी करत नाही. तू अजून नवीन आहेस इथे, लग्नाला आता कुठे महिना होत आला असेल.. मग तुझ्याकडुन मी इतक्या अपेक्षा कशा करू शकते? मी सुद्धा समजू शकते, की आजकाल बाहेर नोकरी करणे म्हणजे काही सोप्पं काम नाहीये. तू बाहेर सुद्धा काम करतेस आणि घरी आल्यावर कधी कधी तर माझ्या आधी किचनमध्ये जाऊन उभी असतेस फोन घेऊन, ते मोबाईलमध्ये बायका काय काय बनवायला शिकवत असतात ते व्हिडिओ बघत असतेस."
सासूबाई बोलत होत्या आणि पूर्वा त्यांचं ऐकत होती.

"आई तुम्हाला खरचं राग नाही ना आला माझा?"
पूर्वा अजूनही घाबरून बोलत होती.

"अगं राग कशाला यायला हवा? तू काही वाईट थोडीच करत आहे. उलट तुला चांगल करता यावं म्हणून तू व्हिडिओ बघत असते, ते कळते मला. आणि तुला नाहीच जमले तर मी आहेच की इथे. आणि आता मला बिलकुल घाबरायच नाही. जे काही असेल ते बिनधास्त बोलायचं. आता आपल्याला कायमस्वरुपी हे सासू सुनेचे नाते सांभाळायचे आहे. हा.. पण मला तुझ्या एका गोष्टीचा राग आलेला आहे."
सासूबाईंनी असे म्हणताच पूर्वा पुन्हा घाबरली.

"आई, तुम्हाला माझ्या कोणत्या गोष्टीचा राग आलाय?"
पूर्वा आश्चर्यचकित होऊन बोलली.

"ते फोनमध्ये तू एकटीच डोकं घालून बघत असतेस, मलाही दाखव की कधीतरी!"
असे म्हणून त्या जोरजोरात हसायला लागल्या तशी पूर्वा पण खळखळून हसली.

"खरचं थँक्यू आई, तुम्ही खूप छान आहात. मी खूप नशीबवान आहे, की मला तुमच्यासारखी सासूबाई मिळाली."
पूर्वा खूप आनंदाने बोलली.


"अंह.. मला तुझी सासूबाई नाही, तर आई व्हायला जास्त आवडेल."
सासूबाईंनी असे म्हणताच पूर्वा त्यांना बिलगली आणि त्यांनी सुद्धा तिच्या पाठीवर मायेने हात फिरवला.


आजकालच्या मुली चांगले शिकून नोकरी करतात. मोठ्या पदावर काम करतात. त्यांचे ऑफिसमधले काम अगदी चोखपणे सांभाळतात, मग कधी कधी घरातले कामही त्यांनीच केले पाहिजे असा अट्टाहास न ठेवलेला बरा. कधीतरी त्यांनाही वाटते आपल्याला आयते ताट मिळावे. ऑफिस, घर, मुलं.. हे सगळं सांभाळताना तारेवरची कसरत होते. हे सगळं त्या स्वतः च्या घरासाठीच तर करत असतात. कित्येक जणींना तर चार घास निवांत बसून खाता सुद्धा येत नाही, मग आपणच त्यांना थोडं समजून घेतलं तर बिघडलं कुठे?