अश्रुंची किंमत (भाग२)

कथा मालिका
अश्रुंची किंमत २

डॉ. शारदा निघून गेली. इकडे साकार आणि सृष्टी खूपच अस्वस्थ झाले होते.

जवळपास दीड दोन तासांनंतर शारदा बाहेर आली.

"आई, कसे झाले ऑपरेशन."

"ठीक आहे सगळ. त्यांना रूम मध्ये शिफ्ट करेल तेव्हा भेटू शकता. त्यांना शुध्दीवर येण्यासाठी थोडा वेळ लागेल. तेव्हा शांत रहा."

"आंटी तुमची फी..."

"ते नंतर बघू. आधी बाबांची काळजी घे."

शारदा केबिनमध्ये आली आणि खुर्चीवर बसताच डोळ्यात आलेले पाणी पुसतांना मनातल्या मनात भुतकाळात हरवून गेली.

"बर झाल माझ्या अश्रुंची किंमत आज तो भोगत आहे."

एक क्रूर हास्य आणि क्रूर विचार तिच्या हृदयात घाव करत होते.

"अरे मी पण काय भयंकर विचार करत आहे. सध्या तो बोलण्याच्याच काय पण बघण्याच्या
मन: स्थितीत सुध्दा नाही. मी एक डाॅक्टर आहे आणि असा क्रूर विचार माझ्या मनात डोकवायला सुध्दा नको."

"पण का?"
तिचे मन अशांत, अस्थिर झाले होते. "म्हणजे ही सृष्टी... "

"किती सुखात होतो आम्ही दोघे ! किती स्वप्न पाहिले होते आम्ही ! एकाच मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही शिकत होतो . तो सेंंकड इअरला होता. मी फस्ट इअरला प्रवेश घेतला आणि तो अचानक माझ्या समोर आला. त्याला बघताच मला खूप छान वाटायचे. त्याने तर माझ्या मनाचा ठावच घेतला. काही ना काही कारणाने आम्ही भेटू लागलो आणि आम्ही कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो ते कळलेच नाही. आम्ही एकमेकांच्या इतके प्रेमात आकंठ बुडालो होतो की आपल्या घरून नकार येईल. याचा कधीच विचार केला नाही. बघता बघता चार वर्षे उलटून गेली. तो शेवटच्या वर्षाला होता.

एके दिवशी अचानक निशांतच्या घरून फोन आला आणि तो मला काहीही न सांगता, न भेटता निघून गेला. मला वाटल तो आज परत येईल, दोन दिवसांत ,आठ दिवसांत परत येईल. पण तो बरेच दिवस परत आला नाही. खूप फोन केले. पण एकही फोन त्याने उचलला नाही. मला त्याचे गाव वगेरे काहीच माहिती नव्हते. त्याच्या सोबत असणारे त्यांचे मित्र सुद्धा काहीच सांगत नव्हते. त्याचे शेवटचे वर्ष वाया जाईल याची सतत भिती वाटत होती. माझ सुध्दा महत्वाचे वर्ष असल्यामुळे मी अभ्यासात लक्ष द्यायला सुरुवात केली. खरंतर या सगळ्यात थोडासा परिणाम माझ्या अभ्यासावर होत होता. पण आई वडीलांनी माझ्याविषयी काही स्वप्न पाहिली होती आणि ती मला पुर्ण करायची होती. कारण आमच्या प्रेमाविषयी जराशी जरी कुणकुण लागली असती तर माझं शिक्षण बंद झाले असते. काही दिवसांसाठी मी निशांतला ओळखत होते, मी कधी त्याच्यावर प्रेम केले आहे. हे विसरूनच गेली. पण परीक्षेच्या दरम्यान अचानक निशांत आला. तो एका वेगळ्याच रुपात.
मी त्याच्यासोबत किती बोलण्याचा प्रयत्न केला. पण तो मला टाळत होता. परीक्षेमुळे आमच्यात जास्त बोलणे झालेच नाही. त्याचा शेवटचा पेपर झाला. तो आता आपल्याला परत भेटणार नाही. ही जाणीव मला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे मी त्याच्याशी बोलायला गेले. तर ...

दरवाजावर नाॅक केले आणि तिच्या विचारांची तंद्री तुटली. डॉ. रवि आत आले.

"मॅडम, पेशंट शुध्दीवर आले आहे. '

"ओके, चला मी येते."

©® अश्विनी मिश्रीकोटकर






🎭 Series Post

View all