अश्रुंची किंमत (अंतिम भाग५ )

कथा मालिका
अश्रुंची किंमत ५
अनेक प्रश्न तिच्या भोवती पिंगा घालत होते. बघू या तिच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात का?

पुढे.....

शारदा आणि साकार दवाखान्यात पोहोचतात. तो लगेच सृष्टीला भेटायला जातो. शारदा सुध्दा तिच्या केबिनमध्ये निघून जाते.

डॉ. रविला ती लगेच बोलावून घेते.

"डॉ. रवि काय म्हणतात सगळे पेशंट."

"मॅडम सगळे ठीक आहेत. फक्त निशांत सरांचे डोके दुखत आहे."

"आपण औषधी बदलून देऊ या. त्यांना फार जास्त लागले आहे. रिकव्हर होण्यासाठी थोडा वेळ लागणारच. चला आधी रांऊडवर जाऊ या."

"मॅडम एक विचारू? आज तुम्ही जरा लवकर आल्या आणि निशांत सरांची ट्रीटमेंट सुरू झाल्यापासून जास्तच अस्वस्थ वाटत अहात. साॅरी मॅडम , मी जरा जास्तच पर्सनल प्रश्न विचारत आहे. "
शारदाने एक कटाक्ष टाकताच रवि साॅरी बोलला.

ती काहीही न बोलता प्रत्येक पेशंटची आस्थेने चौकशी करत होती. शेवटी ती निशांतच्या खोलीत आली. शारदाचा आवाज कानावर पडताच निशांत सुध्दा अस्वस्थ झाला. तिने स्मिता कडे चौकशी केली. रोज सकाळ संध्याकाळ निशांतला तपासायच्या निमित्ताने त्याची आणि माझी भेट होऊ लागली. पण आम्ही दोघांनी आमची मर्यादा सोडली नाही. कोणत्याही प्रकारे पुर्वी आम्ही एकमेकांना ओळखत होतो. ही बाब कोणाच्याही लक्षात येऊ दिली नाही. हळुहळु निशांतच्या तब्येतीत फरक पडला होता. त्यामुळे आठ दिवसांनी निशांतला डिस्चार्ज देण्यात आला.'

पुढची तारीख देऊन तिने परत भेटायला बोलावले.
निशांतला बरं व्हायला जवळपास महिना लागला. एके दिवशी तो अचानक स्वतः भेटायला आला.

'निशांत तू इथे का आला आहे?"

"तुला भेटायला? कारण आपण बाहेर भेटू शकत नाही. आता माझ्याजवळ योग्य कारण आहे. त्यामुळे कोणाला शंका येणार नाही.‌ "

"पण का? "

"माझ्या साठी तू एक पेशंट आहे. त्यामुळे जास्त पर्सनल होऊ नको. तू जे केलस ना. ते मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. तुझ्याविषयी माझ्या मनात काहीच सिमटम नाही."

"साॅरी... शारदा तुला आठवत मी अचानक निघून गेलो होतो. पण त्यावेळी माझे जाणे गरजेचे होते. माझ्या वडीलांना हार्ट अटॅक आला होता आणि त्यांची शेवटची इच्छा होती. त्यांच्या डोळ्यासमोर माझे लग्न झालेले बघायचे होते. त्यांनी त्यांच्या एका मित्राला वचन दिले होते. बाबांची तब्येत सिरियस झाली होती. मी कोंडीत अडकलो होतो. माझा निर्णय मला घेताच आला नाही. त्यामुळे मला नाईलाजाने स्मितासोबत लग्न करावे लागले. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी माझे बाबा हे जग सोडून गेले. मी हतबल झालो होतो. तुला सांगायला मला वेळच मिळाला नाही."

"मला अश्रु देऊन तू आनंदाने संसार सुरू केला. पण माझ्या आई वडिलांनी देखील माझ्या मागे लग्नाची भुणभुण सुरू केली. तुझी वाट बघून मी दमले होते. नाईलाजाने मी सुध्दा लग्नाला उभे राहिले."

"अग तुझ्या अश्रुंची किंमत मी आजही मोजत आहे. तुझी तडफड मला समजत होती. तुझा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता. त्यामुळे मी तिचा मनापासून स्वीकार केला नव्हता. कारण तिचेही एका दुसऱ्या मुलावर प्रेम होते. परंतु, ती प्रेग्नंट आहे हे कळताच त्याने लग्नाला नकार दिला. जणु ही शिक्षा माझ्याच वाट्याला का यावी ? आम्ही जवळपास दोन वर्षांनंतर एकमेकांच्या जवळ आलो. आमचा एक मुलगा पण आहे‌. पण अजून तो लहान आहे.

"मग सृष्टी..."

"सृष्टी ही त्या दोघांची मुलगी आहे. लग्नाच्या आधीच ती प्रेग्नंट होती. ही गोष्ट तिने आणि तिच्या घरच्यांनी लपवून ठेवली. माझ्या घरी तर खूप आनंद झाला होता. त्यांना वाटले माझच बाळ आहे. नाईलाजाने मला सृष्टीचाही स्वीकार करावा लागला. तुझ्या अश्रुंची किंमत मी भोगली आहे शारदा. मी तुला खूप दुखवले आणि खूप रडवले सुध्दा. पण आयुष्याचे जहाज कधी भरकटेल सांगताच येत नाही. आपल्याला आपल्या निर्णयावर ठाम राहता आले नाही की अशी फरफट होते. खरच मी खूप खूप अपराधी आहे तुझा."

काही क्षण शांततेत गेले. "मला वाटत आपले आयुष्य नदीचे दोन किनारे आहेत. त्यांना जवळ आणण्याचा कधीच प्रयत्न करू नये." शारदा

"पण आपल्या मुलांच्या रुपाने आपण एकमेकांना परत भेटलो आणि मला तुझी माफी मागायची संधी मिळाली आणि हिंमत सुध्दा."

" तुझ्या अश्रुंची किंमत मी कधीच चुकवू शकणार नाही. डोळ्यातले पाणी पुसत तो निघून गेला."

शारदा मात्र कोणी कोणाच्या अश्रुंची किंमत चुकवली या व्यूह चक्रात अडकली‌.

©® अश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all