Login

अशी जुळली गाठ. भाग - २

कबीरच्या आयुष्यात नकळत पणे आलेल्या वादळाला तो कसा सामोरा जाईल
अशी जुळली गाठ. भाग - २

डिसेंबर - जानेवारी २०२५ - २६ दिर्घ कथा लेखन स्पर्धा


संध्याकाळ होत आली त्याचवेळी कबीर आणि त्याचे आई बाबा ऋग्वेदच्या गावी पोहचले. गाडीतून खाली उतरल्यावर सविताची बहिण निलिमा धावतच त्यांच्याकडे आली.

"हे काय ताई, किती उशीर केला यायला!" निलिमा म्हणाली.

"मुंबई पासूनचा प्रवास आहे ना गं मग थोडा उशीर होणारच ना!" सविता.

"मावशी, ऋग्वेद कुठे आहे?" कबीरने विचारलं.

"तो तयार होतोय, आता हळदीचा कार्यक्रम चालू होईल. तुम्ही सगळे चला आत..." निलिमा म्हणाली आणि त्यांना सगळ्यांना आत घेऊन गेली. कबीर ऋग्वेदकडे गेला तर श्रावणी तिच्या मावस बहीणी आणि मामे बहिणी एकत्र जमल्या होत्या तिकडे गेली.

"हाय ऋग्वेद, कसा आहेस?" कबीरने ऋग्वेदकडे जाताच सेक हॅण्ड करत विचारलं.

"मी मस्त, तू कसा आहेस?" ऋग्वेदने विचारलं पण त्याचा आवाज हसरा नव्हता, त्याच्या चेहऱ्यावर कसली तरी चिंता दिसत होती. कबीरला ते लक्षात आले पण आजूबाजूला मोठी माणसं असल्याने कबीरला सध्या त्याच्याशी काहीच बोलता येत नव्हते.

थोड्या वेळातच हळदीचा कार्यक्रम चालू झाला. कबीर बघत होता ऋग्वेदच्या डोक्यात दुसरंच काही तरी चाललं होतं. पण आता त्याला विचारण्याची ही वेळ नव्हती म्हणून तो गप्प राहिला.

हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत बरेच जण डीजेच्या तालावर नाचत होते. कबीरला त्या गोंधळाची सवय नव्हती त्यामुळे त्याचं डोकंच दुखायला लागलं. मग तो तिथे न थांबता सरळ झोपायला गेला.

सकाळी उठल्यावर त्याच्या लक्षात आले ऋग्वेदशी बोलणं झालंच नाही. म्हणून तो आवरून पटकन बाहेर गेला. बाहेर सगळ्यांचा चहा नाष्टा चालू होता. तो आला आणि ऋग्वेदच्या बाजूला बसला.

"ऋग्वेद, तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं ना..." कबीरने विचारलं.

"हो चल, आपण थोडावेळ बाहेर जाऊ आणि तिथेच बोलू!" ऋग्वेद म्हणाला. मग ते दोघेही बाहेर जाऊ लागले तोच निलिमाने त्यांना पाहिलं आणि लगेच अडवले.

"कबीर, ऋग्वेद, तुम्ही दोघं आता कुठे चाललात?" निलिमाने विचारलं.

"मावशी, एक काम आहे... आम्ही पाच मिनिटातच येतो." कबीर म्हणाला.

"पाच मिनिटे म्हणाल आणि एक तास घालवाल, ते काही नाही तुम्ही आता कुठेच जायचं नाही. थोड्या वेळातच आपल्याला नवऱ्या मुलीच्या घरी जायचं आहे. तुमच्यामुळे उगाच वऱ्हाड निघायला उशीर होईल. तेव्हा गप्प बसा इथे. एकदा लग्न झालं की मग कुठे जायचं तिकडे जा!" निलिमा म्हणाली. कबीर आणि ऋग्वेदने खुप प्रयत्न केले पण त्यांना तिथून जाऊच दिलं नाही. ऋग्वेद नाराज होऊन तसाच बसला.

काही वेळाने लग्नासाठी सगळे नवऱ्या मुलीच्या घरी जायला निघाले. पुर्ण प्रवासात ऋग्वेदच्या मोबाईल वर सारखे कोणाचे तरी फोन येत होते. पण तो ते घेत नव्हता. ते बघून कबीरने त्याला विचारलंच.

"ऋग्वेद, अरे किती काॅल येताय तुला पण तू तर एकदाही रिसिव्ह करत नाहीये, नेमकं कोण एवढं काॅल करतंय तुला?" कबीर.

"दादा, तू पण ना काहीपण प्रश्न विचारतोय. त्याला आता दुसरं कोण फोन करणार आहे सान्वी वहिनीच फोन करत असेल." श्रावणी म्हणाली. त्यावर त्याच्या दुसऱ्या बहिणी पण त्याच्यासोबत होत्या त्या ही ऋग्वेदला चिडवू लागल्या पण त्याच्या चेहऱ्यावर जरा सुद्धा हसू नव्हते. त्याचा गंभीर चेहरा बघून कबीरला वेगळाच डाऊट आला. आता जेव्हा ऋग्वेद एकटा भेटेल तेव्हा त्याच्याशी बोलायचं कबीरने ठरवलं.

लग्नाच्या ठिकाणी गेल्यावर ऋग्वेदचं छान स्वागत करण्यात आले. वर पक्षाची सोय एका रूममध्ये केली होती. ऋग्वेद तिकडेच गेला आणि त्याला तयार व्हायला सांगण्यात आले. तो जेव्हा चेंजींग रूममध्ये गेला तेव्हाच कबीर पण त्याच्या सोबत गेला.

"ऋग्वेद, नक्की काय झालयं ते सांग मला... मी कालपासून बघतोय तुझ्या चेहऱ्यावर थोडा सुद्धा आनंद दिसत नाहीये. हे लग्न तुझ्या मनाविरुद्ध होतंय का?" कबीरने विचारलं. त्यावर ऋग्वेदने एक दिर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात करणार तोच त्याच्या मोबाईलवर मॅसेज आला. तो मॅसेज वाचून ऋग्वेद पुर्ण घामाघूम झाला.

"कबीर, मला आता लगेच इथून निघावं लागणार आहे. प्लीज मी परत येईपर्यंत तू इथलं बघून घे!" ऋग्वेद घाबरतच बोलला.

"अरे पण काय झालयं आणि तू कुठे चाललाय ते तरी सांग!" कबीर म्हणाला.

"आता माझ्याकडे काहीच सांगायला आणि बोलायला वेळ नाहीये, प्लीज मला जाऊदे इथून. माझं आता इथून जाणं खुप गरजेचं आहे." ऋग्वेद म्हणाला.

"अरे पण आता तुझं लग्न आहे, थोड्या वेळातच लग्नाचा मुहूर्त आहे आणि लग्न सोडून कुठे जातोय तू?" कबीरने विचारलं. त्याला ऋग्वेदचं नेमकं काय चाललंय तेच कळत नव्हते.

"मला सगळं समजतंय पण असं समज की कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे! मी जर आता गेलो नाही तर खुप मोठा अनर्थ होऊ शकतो." ऋग्वेदचं ते वाक्य ऐकून कबीरही घाबरला. आता ऋग्वेदला अडवण्यात काहीच अर्थ नाही हे त्याला कळून चुकले होते.

"पण जाणार कसा आहेस तू? बाहेर सगळेच बसलेले आहे, तुला कोणी जाऊ देईल असं नाही वाटत मला!" कबीर म्हणाला.

"मी मागच्या बाजूने जातो. तू फक्त इथलं सगळं सांभाळून घे." ऋग्वेद म्हणाला आणि लगेच खिडकीतून बाहेर डोकावून बघू लागला तर बाहेर बरेच पाहुणे होते. दाराच्या बाहेर तर सगळेच नातेवाईक बसले होते त्यामुळे दारातून जाणंही शक्य नव्हते आणि खिडकीतून जाणेही शक्य नव्हते. तो डोक्याला हात लावून विचार करत होता तोच समोर त्याला एक बॅग दिसली. त्याने पटकन ती घेतली आणि त्यात काय आहे ते पाहिलं तर त्यात धोतर आणि सदरा होता. ते बघून कबीरही गोंधळला.

"ऋग्वेद, काय करतोय तू हे! असं कोणाच्या बॅगला हात लावणं चुकीचे आहे." कबीर म्हणाला.

"आता ही वेळच अशी आहे की काय चुक आणि काय बरोबर हा विचार करायला सुद्धा माझ्याकडे वेळ नाहीये. मी जर आता इथून गेलो नाही तर खुप मोठा प्राॅब्लेम होईल. मला हे धाडस करावंच लागणार आहे." ऋग्वेद म्हणाला त्याचवेळी त्याच्या मोबाईल वर फोन आला. यावेळी त्याने फोन उचलला.

"मी लगेच येतोय, मी तिथे येईपर्यंत तू काहीही वेडंवाकडं करणार नाहीये. माझी शपथ आहे तुला!" ऋग्वेद म्हणाला आणि त्याने फोन ठेवला आणि घाईघाईने ते धोतर अंगाभोवती गुंडाळले आणि कपड्यांच्या वरतूनच तो सदरा घातला. तो पुढे जाणार तोच दार वाजल्याचा आवाज आला तसं त्याने स्वतःच्या कपाळावर हात मारला.

"कबीर, प्लीज दार उघडू नको... मला जाऊदे इथून, मी गेल्यावर दार उघड." ऋग्वेद अगदी कळकळीची विनंती करू लागला पण दाराचा आवाज काही बंद होत नव्हता. शेवटी नाईलाजाने कबीरने दार अर्धवट उघडलं आणि पाहिलं तर श्रावणी आणि तिच्या सोबत काही मुली होत्या.

"दादा, आम्हाला आत येऊ दे ना... आम्हाला ऋग्वेद दादा कसा तयार झाला आहे ते बघायचं आहे." श्रावणी म्हणाली.

"तो चेंज करतोय,  त्याचं झालं की मी तुम्हाला बोलावतो." कबीर म्हणाला तसं श्रावणीचा हिरमोड झाला. ती कबीरला अजून नको ते प्रश्न विचारत होती आणि त्याचं डोकं भांडावून सोडत होती. शेवटी त्याने कसं बसं तिला कटवलं आणि परत दार बंद करून घेतले आणि मागे वळला तर मागे ऋग्वेद नव्हता. मग त्याने बाथरूममध्ये पाहिलं तर तो तिथेही नव्हता. त्या रूमला मागच्या बाजूला खिडकी होती आणि ती उघडी होती. कबीरने तिथून बाहेर पाहिलं तर त्याला ऋग्वेद जाताना दिसला. तो इतक्या लवकर एवढ्या दूर पोहचला त्यामुळे त्याला आवाज देणंही शक्य नव्हतं.

तो टेन्शनमध्ये डोक्याला हात लावून बसला त्याचवेळी त्याला इशिताचा फोन आला. आता हिचा फोन नाही उचलला तर ही परत काळजी करत बसेल असा विचार करून त्याने तिचा फोन घेतला.

"मला विसरलास ना तू तिकडे गेल्यावर!" इशिता लाडीकपणे बोलली.

"नाही गं... खरं तर आता तुझीच आठवण येत होती पण इथे पण लग्नाची गडबड चालू आहे ना म्हणून फोन करता आला नाही." कबीर म्हणाला.

"बरं ठिक आहे तू छान लग्न एन्जॉय कर आणि मला फोटो पाठव, मलाही बघायचं आहे माझा कबीर त्याच्या भावाच्या लग्नात कसा दिसतोय." इशिता म्हणाली.

"हो चालेल पाठवतो, आता ठेऊ का फोन... मला ऋग्वेद आवाज येतोय." कबीर म्हणाला तसं ती पण हो म्हणाली मग त्याने फोन ठेवला आणि त्याचवेळी दार वाजवल्याचा आवाज आला. आता दार उघडायला जायची त्याची हिंमतच होत नव्हती.

क्रमशः

लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all