अशी जुळली गाठ. भाग - ४
डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखन स्पर्धा
"बाबा, हे कसं शक्य आहे, मी असा अचानक कसा काय लग्न करू. ऋग्वेद माझा भाऊ आहे आणि त्याचं लग्न ज्या मुलीशी आहे तिच्याशी लग्न करणं म्हणजे ही चुक आहे आणि ती चुक मी करणार नाही." कबीरने सरळ लग्नाला नकार दिला.
"तुला मी विचारतच नाहीये, सांगतोय. इथे जे घडलंय त्यात ऋग्वेदची जेवढी चुक आहे ना तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त तुझी चुक आहे. त्यामुळे आता तुला हे लग्न करावंच लागेल." विक्रम म्हणाले.
"काही झालं तरी मी हे लग्न करणार नाही, ज्या मुलीला मी ओळखतही नाही... तिच्याशी मी लग्न करणार नाही." कबीर म्हणाला.
"नसशील तिला ओळखत, पण तिच्या आई बाबांकडे बघ जरा... त्यांच्या डोळ्यातले अश्रू बघ, विचार कर... आज त्यांच्या जागी आम्ही असतो आणि त्या मुलीच्या जागी आपली श्रावणी असती तर... तुला काय वाटलं असतं. त्या मुलीची काहीच चुक नसताना तिला हे सगळं भोगायला लागत आहे आणि मला ते अजिबात आवडलेलं नाहीये." विक्रम म्हणाले तसं कबीर विचार करू लागला. आता सान्वीच्या बाजूने विचार केल्यावर कबीरला तिची दया येऊ लागली आणि तो स्वतःलाच दोषी समजू लागला. पण तरीही तिच्याशी लग्न करायला त्याचं मन तयार नव्हते. तो तर इशिताशी लग्न करण्याचं स्वप्न बघत होता.
"कबीर, आता ही वेळ विचार करण्याची नाहीये. निर्णय घेण्याची आहे, आज जर हे लग्न झालं नाही तर हा समाज सान्वीला सुखाने जगू देणार नाही आणि तिला दुःख झाले तर तिची हाय लागेल तुला, दुसऱ्यांना दुःख देऊन आपण कधीच सुखी राहू शकत नाही. तेव्हा या लग्नाला तयार हो." सविता म्हणाली.
"आई, पण यात खरंच माझी चुक नाहीये. हवं तर मी सान्वीची सगळी जबाबदारी घ्यायला तयार आहे. तिला आपण आपल्यासोबत घेऊन जाऊ. मी तिचं आयुष्य सावरेल पण मला या बंधनात अडकू नका." कबीर म्हणाला.
"ते एवढं सोपं नाहीये कबीर, तू तिला कोणत्या हक्काने इथून घेऊन जाणार आहे. लग्न न करता तिला घेऊन गेलास तर तिची अजून बदनामी होईल. तुला माझी शपथ आहे तुला हे लग्न करावंच लागेल." विक्रम म्हणाले.
"आणि मी नाहीच केलं तर?" कबीरने विचारलं तसं विक्रम त्याच्याकडे रागाने बघू लागले.
"तर तुला आमच्यासोबत मुंबईला येता येणार नाही. एवढंच नाही तर तुला ऑफिसमध्ये सुद्धा पाय देता येणार नाही. ऋग्वेदला इथून जाऊ देऊन तू एक चुक केली आहे आता सान्वी सोबत लग्न करायला नाही म्हणून तू दुसरी चुक करू नको. नाही तर माझा आणि तुझा संबंध संपला." विक्रम म्हणाले. त्यांनाही असं बोलताना वाईट वाटत होते पण कबीरच्या एका चुकीमुळे त्यांना कोणाच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ द्यायचं नव्हतं. त्यांनाही एक मुलगी होती त्यामुळे मुलीच्या बापाचं आपल्या मुलीसाठी काळीज कसं तुटतं हे त्यांना चांगलंच कळत होतं.
"ठिक आहे, मी तयार आहे या लग्नाला पण एकदा सान्वीला विचारा ती माझ्याशी लग्न करायला तयार आहे का!" कबीरने त्याच्या मनाविरुद्ध त्याचा निर्णय सांगितला तसं प्रभाकर पाटील यांचा चेहरा खुलला. गावकऱ्यांची कुजबुज पण थांबली.
"माझी मुलगी नाही म्हणणार, चला आपण लगेच लग्न लावून देऊ." प्रभाकर पाटील म्हणाले तसं विक्रमने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला.
"पाटील साहेब, हे लग्न होईलच पण एकदा तुमच्या मुलीला विचारा. उगाच तिच्यावर अन्याय व्हायला नको." विक्रम म्हणाले तसं घाईघाईने प्रभाकर सान्वी कडे गेले. त्यांचा तो खुललेला चेहरा पाहून सान्वी आणि तिच्या आईच्या चेहऱ्यावर पण हसू आले. सान्वी लगेच घाईघाईने उठली.
"बाबा, ऋग्वेद आले का?" सान्वीने अधीरतेने विचारलं.
"नाही बाळा, ऋग्वेदराव नाही आले आणि ते येतील अशी अपेक्षा सुद्धा करू नकोस. त्यांना परत यायचं असतं तर ते इथून गेलेच नसते." प्रभाकर म्हणाले.
"ते आले नाही मग तुमच्या चेहऱ्यावर हा आनंद कसला दिसतोय?" सान्वीने विचारलं. तेव्हा त्यांनी तिला कबीर बद्दल सांगितलं. आता तिला तिची इच्छा गरजेची वाटत नव्हती. तिच्या आई बाबांना टेन्शन नको म्हणून तिने लगेच लग्नाला होकार दिला.
कबीरची इच्छा नसताना सुद्धा तो ही लग्नाला उभा राहिला. थोड्या वेळातच दोघांमध्ये अंतरपाट धरला. त्याच्या आड आणि मनात काय चालू होतं ते त्या दोघांनाच माहित होतं. कबीरचा चेहरा तर अगदी निस्तेज झाला होता. त्याच्या मनात फक्त इशिताचे विचार चालू होते. हे लग्न केल्यानंतर तिच्या समोर उभं राहणं सुद्धा त्याला शक्य नव्हतं. मनात सारखं तिला दिलेलंच प्राॅमिस आठवत होतं.
मंगलाष्टके पुर्ण झाली, सात फेरे पण झाले. कबीरने सान्वीच्या गळ्यात मंगळसूत्र घाले पर्यंत ऋग्वेद यायला हवा असं त्याला वाटत होते. पण लग्नाचे सगळे विधी झाले तरीही ऋग्वेद आला नाही.
पाठवणीची वेळ येईपर्यंत संध्याकाळ झाली होती. सान्वी तिच्या आई बाबांच्या गळ्यात पडून रडत होती. त्यावेळी सविताने तिला धीर दिला. प्रभाकर पाटील विक्रम समोर हात जोडून उभे राहिले.
"आज फक्त तुमच्यामुळेच आमची इज्जत वाचली आणि लोकांची तोंडं बंद झाली. विक्रमराव मी आयुष्यात कधीच तुमचे उपकार विसरणार नाही." प्रभाकर पाटील म्हणाले.
"पाटील साहेब, उपकाराची भाषा नका करू... मी सुद्धा एक बाप आहे. आपल्या मुलीच्या बाबतीत काहीच वाईट घडू नये हे प्रत्येक बापाला वाटतंच. तुम्ही काळजी करू नका, आम्ही सान्वीला आमच्या मुली सारखंच जपू." विक्रम म्हणाले तसं प्रभाकर पाटलांच्या मनावरचं दडपण दूर झालं.
आता निघायची वेळ झाली तसं सविता निलिमाकडे गेली आणि तिच्याशी बोलू लागली.
"निलिमा, सान्वीचा गृहप्रवेश करावा लागेल. तो तुझ्या घरी केला तर चालेल का?" सविताने विचारलं.
"आजिबात नाही, तुझ्या मुलामुळे आमची खुप नाचक्की झाली आहे. यापुढे तुम्ही आमच्या कोणत्याच कार्यक्रमाला नाही आले तर बरं होईल. आज माझ्या हसत्या खेळत्या कुटुंबाला माझ्याच बहिणीच्या मुलाची नजर लागली हे मी कधीच विसरणार नाही." निलिमा बोलली आणि जयवंतरावांना आवाज देऊन ती तिथून निघून गेली. ती गेल्यावर सविता विक्रमकडे वळली.
"आता आपण काय करायचं? सान्वीला घेऊन कुठे जायचं?" सविताने विचारलं.
"आपण आपल्या घरीच जाऊ तसंही इथून मुंबईचा प्रवास चार ते पाच तासांचा तर आहे. त्यात एवढं विचार करण्यासारखं काय आहे!" विक्रम म्हणाले तसं प्रभाकर आजची रात्र त्यांना त्यांच्याकडेच राहायला सांगत होते पण त्यांना ते पटलं नाही. ते सगळेच त्यांचा निरोप घेऊन मुंबईला त्यांच्या घरी यायला निघाले.
दिवसभर सगळेच शरीराने आणि मनाने थकले होते त्यामुळे सगळ्यांना गाडीत झोप लागली पण सान्वीला मात्र काही केल्या झोप लागत नव्हती. ऋग्वेदने असं का केलं, का आपल्याला फसवलं, हेच विचार तिच्या मनात चालू होते. आता मन दुःखी असूनही तिच्या डोळ्यातून अश्रू येत नव्हते ते ही कधीच सुकले होते. ती गाडीतून बाहेर बघत होती. बाहेर जसा अंधार होता तसाच तिच्या मनातही अंधार होता.
पहाटेच्या वेळी ते सगळे घरी पोहचले. एवढ्या पहाटे पोहचून सुद्धा सविताने तिचा गृहप्रवेश केला. घरात पाऊल टाकताच तिने सगळीकडे नजर फिरवली. तिच्या कल्पनेपेक्षाही तो बंगला खुप मोठा आणि सुंदर होता. एवढा मोठा बंगला तिने पहिल्यांदाच पाहिला होता. ते बघून तिला अजूनच दडपण आलं होतं. या घरात आपला टिकाव लागेल का? कबीर आपल्याला बायकोचं स्थान देईल का?" असे एक ना अनेक विचार तिच्या मनात चालू होते. जेव्हा सविताने तिच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा ती विचारातून बाहेर आली.
"ही माझी मुलगी आहे श्रावणी, आता तिच्या सोबत तिच्या रूममध्ये जा आणि छान आराम कर. तू खुप थकली आहे त्यामुळे सकाळी उठायची घाई करू नकोस." सविता म्हणाली. तिचा प्रेमळ आवाज ऐकून सान्वीचं मन भरून आलं. तिला तिच्या कुशीत शिरून खुप रडावसं वाटत होतं पण तिने स्वतःला सावरलं आणि भरल्या डोळ्यांनी फक्त मान डोलावली आणि श्रावणी सोबत तिच्या रूममध्ये गेली आणि तिथेच झोपली. आता मात्र तिचे डोळे जड झाले होते त्यामुळे तिला पटकन झोपही लागली.
क्रमशः
लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा