Login

अशी जुळली गाठ. भाग - ५

कबीर आणि सान्वीच्या जबरदस्तीने झालेल्या लग्नाची कहाणी
अशी जुळली गाठ. भाग - ५

डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घ कथालेखन स्पर्धा

सकाळी कबीरला जाग आली आणि तो उठून बसला. इशिताला फोन करायला त्याने मोबाईल घेतला आणि तिचा नंबर डायल करू लागला. तोच त्याला काल त्याचं सान्वीशी झालेलं लग्न आठवलं आणि त्याने लगेच रागाने जोरात मोबाईल फेकून दिला. मोबाईलचे तुकडे तुकडे झाले पण त्याला त्याची पर्वा नव्हती. तो बाथरूममध्ये गेला आणि शाॅवर ऑन करून किती तरी वेळ त्याखाली तसाच उभा राहिला. काही केलं तरी काल जे झालं ते तो विसरू शकत नव्हता, अर्थात ते विसरण्यासारखंही नव्हते.

त्याच्या मनात फक्त इशिताचे विचार येत होते, ती त्याच्यासाठी जीव की प्राण होती आणि आता हे लग्न करून एक प्रकारे तिचा विश्वास घातच केला आहे असे त्याला वाटत होते. आता आपण इशिता समोर कसं जायचं आणि काल झालेलं लग्न जर तिला माहित झाले तर ती काय करेल, असे अनेक विचार त्याच्या डोक्यात चालू होते. काही केल्या मनातलं आणि डोक्यातल्या विचारांचं वादळ थांबत नव्हते.

कबीर कसं बसं बाथरूम मधून बाहेर आला. आता त्याला घरात थांबायची सुद्धा इच्छा नव्हती. तो लगेच ऑफिसला यायची तयारी करू लागला.

सान्वी सुद्धा झोपेतून उठल्यावर तिचीही तिच अवस्था होती. उठल्यावर तर एक क्षण तिला आपण कुठे आहोत हेच लक्षात आले नाही, तिच्या बाजूला झोपलेल्या श्रावणीकडे बघताच तिला कालचा दिवस आठवला. ऋग्वेद ऐनवेळी तिला धोका देऊन निघून गेला हे आठवून तिला रडू येत होते. तिने खुप प्रयत्न केला पण ती तिचं रडणं थांबवू शकली नाही. तिच्या रडण्याच्या आवाजाने श्रावणीला जाग आली आणि तिने सान्वीकडे पाहिलं तर तिला तिच्याबद्दल खुप वाईट वाटत होते. ती उठली आणि तिचा हात हातात घेत तिला धीर देऊ लागली.

"वहिणी, तुझ्या मनात आता काय चालू असेल ते मी समजू शकते. तुझ्या बाबतीत ऋग्वेद दादा खुप चुकीचे वागलाय, तुला लग्नाची स्वप्नं दाखवून ऐनवेळी तो गायब झाला. पण खरं सांगू का... ज्या माणसाला आपली किंमत नाही ना त्या माणसाचा विचार करून त्रास करून घेण्यात काहीच उपयोग नाही." श्रावणी म्हणाली.

"तुम्ही बरोबर बोलताय... पण काल जे झालं ते नाही विसरू शकत मी! माझ्या आई बाबांना किती काय काय ऐकून घ्यावं लागलं. का वागले असेल ऋग्वेद असं माझ्याशी? का एवढी मोठी फसवणूक केली त्यांनी माझी? जर त्यांना हे लग्न करायचं नव्हतं तर त्यांनी आधी का नाही सांगितलं. असं मधूनच मैदान सोडून का गेले?" सान्वी म्हणाली.

"तो असं का वागला असेल हे त्याचं त्यालाच माहीत, पण तू आता त्याचा विचार करू नको, त्याने जाताना तुझा आणि इतर कोणाचाही विचार केला नाही मग तू तरी कशाला त्याचा विचार करतेय, आता तू कबीर दादाची बायको आहे. त्याच्या मनात तुला कसं स्थान मिळेल याचा विचार कर, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न कर आणि तुझं आयुष्य सुखकर करण्यासाठी प्रयत्न कर, बाकी मागचं सगळं विसरून जा!" श्रावणीने तिला सांगितले त्यावर तिने मान डोलावली पण सान्वीसाठी ते सगळं विसरून जाणं एवढं सोपं नव्हतं.

सविता सगळ्यांची वाट बघत डायनिंग एरियात बसली होती. थोड्या वेळातच श्रावणी सान्वीला घेऊन तिथे आली. सविताने आपुलकीने तिची चौकशी केली.

"सान्वी, झोप लागली का गं तुला इथे? नाही म्हणजे हे विचारणंही चुकीचे आहे. पण तू आम्हाला परकं समजू नकोस. तुला इथे कसलाही त्रास होणार नाही ही आमची जबाबदारी आहे." सविता म्हणाली.

"आई, तुम्ही सगळे खरंच खूप चांगले आहात. आज तुमच्यामुळेच मला नवीन आयुष्य मिळतंय, तुम्ही नसता तर काय झालं असतं याचा विचार सुद्धा करवत नाही." सान्वी म्हणाली.

"आता छान ब्रेकफास्ट कर आणि तुला हवं तर परत आराम कर... आणि हो तुझ्या आई बाबांना फोन करायला विसरू नकोस, बिचारे तुझी काळजी करत असतील. तू त्यांच्याशी बोलली तर त्यांना बरं वाटेल." सविता म्हणाली.

"हो थोड्या वेळाने करते मी त्यांना फोन!" सान्वी म्हणाली. मग विक्रम येताच ते पण ब्रेकफास्ट करायला बसले. पण समोर कबीर दिसला नाही म्हणून त्यांनी विचारले.

"कबीर उठला नाही का अजून?"

"माहिती नाही ओ... मी त्याच्या रूमकडे गेलीच नाही!" सविता म्हणाली त्याच वेळी कबीर खाली आला आणि तो कोणाशीही न बोलता सरळ बाहेर जाऊ लागला. तोच सविताने त्याला अडवलं.

"थांब कबीर, कुठे चाललाय तू?"

"ऑफिसला!" त्याने एका शब्दातच उत्तर दिलं. पुढे काही बोलायची त्याची इच्छाच नव्हती.

"मग सांगून जायची काही पद्धत आहे की नाही." सविता म्हणाली.

"आता मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगूनच करायची का? माझ्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय तुम्ही घेतला आहे ना मग आता तरी मला मनाप्रमाणे जगू द्या! प्रत्येक गोष्ट तुम्ही सांगाल तशीच करायला मी लहान नाहीये आता." कबीर रागाने चिडून मोठ्या आवाजात बोलला. आज पहिल्यांदाच त्याच्या आई बाबांशी तो या भाषेत बोलत होता. त्याचं ते बोलणं ऐकून सान्वीच्या अंगाचा थरकाप होऊ लागला. ब्रेकफास्ट करत असलेले तिचे हात पण स्थीर झाले आणि तिने खाली मान घातली. वर बघायची पण तिची हिम्मत होत नव्हती. पण त्याचा तो चढलेला आवाज विक्रमला आजिबात नाही आवडला.

"आवाज खाली कबीर, तू तुझ्या आईशी बोलतोय याचं भान ठेव जरा... आणि आज ऑफिसला जायची गरज नाहीये, तुझं लग्न झालंय पण आपल्याला काही विधी करता आले नाही, मग संध्याकाळी छोटीशी पुजा तरी घालू." विक्रम म्हणाले. आता कबीरला कळून चुकले होते की आपण कुठल्याही गोष्टीला विरोध करून काहीच फायदा नाही.

"पुजा संध्याकाळी आहे ना मग मी दुपारपर्यंत येईल घरी." कबीर म्हणाला आणि सरळ घराबाहेर पडला. तो गेल्यावर घरात पुन्हा शांतता पसरली. इच्छा नसतानाही सगळे समोरचा ब्रेकफास्ट संपवू लागले. त्यात सविताने पुजेचा विषय काढला मग ते पुजेच्या तयारी बद्दल बोलू लागले.

थोड्या वेळातच लता खाली आली आणि तिने सविताला आवाज दिला.

"वहिनी, हे बघा कबीर सरांच्या रूममध्ये मला काय भेटलं!" लताने कबीरचा तुटलेला मोबाईल दाखवला तो सविताने हातात घेतला आणि विक्रमकडे बघू लागली.

"अहो sss हा तर कबीरचा मोबाईल आहे, हा कसा काय तुटला असेल?" सविता म्हणाली तेव्हा त्यांनीही तो हातात घेऊन बघितला आणि परत बाजूला ठेवून दिला. ते काहीच बोलले नाही पण कबीरने तो रागाने फेकला असेल हे त्यांच्या लक्षात आले होते.

कबीर ऑफिसला आल्यावर त्याच्या केबिनमध्ये गेला आणि डोकं गच्च पकडून बसला. आता त्याला त्याच्या मनात चाललेलं वादळ कोणाला तरी सांगावेसे वाटत होते. त्याचवेळी त्याला त्याच्या मित्राची आठवण आली. त्याला फोन करायला तो मोबाईल बघू लागला त्याचवेळी त्याने मोबाईल फेकून दिल्याचे त्याला आठवलं आणि त्याला अजूनच पश्चात्ताप होऊ लागला. त्याने रागाने टेबलवर असलेली फुलदाणी उचलली आणि तो ती फेकणार तोच इशिता आत आली. तिला बघून त्याने ती तशीच परत ठेवली. पण आता तिला नजर द्यायची त्याची हिम्मत होत नव्हती. ती मात्र त्याला बघून भलतीच खुश होती.

"हाय कबीर, यार काय मस्त सरप्राईज दिलं तू मला... मला वाटलं होतं की तू अजून गावीच असशील पण तू तर लवकर आलास. किती आनंद झालाय तुला बघून हे मी तुला सांगू शकत नाही. तुला माहितीये का मी बाहेर तुझी गाडी पाहिली तसं धावतच इथे आली. आय एम सो हॅपी, आजचा माझा दिवस खुप छान जाणार आहे. आय लव्ह यू कबीर, मला वाटलंच होतं तू मला सोडून जास्त दिवस गावी राहू शकत नाही. म्हणूनच लगेच आलास ना.... माझी आठवण येत होती ना तुला." इशिताने खुश होऊन त्याला घट्ट मिठी मारली. पण त्याचे दोन्हीही हात तसेच हवेत तरंगलेले होते. तो एकदमच स्तब्ध झाला होता. काय बोलावं आणि काय नाही त्याला काहीच कळत नव्हते, डोकं पुर्ण सुन्न झाले होते. इशिताकडे बघायची सुद्धा हिंमत होत नव्हती.

क्रमशः

लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

0

🎭 Series Post

View all