Login

अशी जुळली गाठ. भाग - १

मावस भावाच्या लग्नाला चाललेल्या कबीरच्या आयुष्याला लागलेलं नवीन वळण
अशी जुळली गाठ. भाग - १

डिसेंबर - जानेवारी २०२५ - २६ दिर्घकथा स्पर्धा.

मोबाईलच्या कर्कश आवाजाने त्याला जाग आली. तसं तो डोळे चोळत उठून बसला आणि वैतागून मोबाईल हातात घेतला. पण स्क्रीनवरचं नाव बघून त्याच्या चेहऱ्यावर लगेच स्माईल आली आणि त्याची झोपही उडाली.

"हाय... गुड मॉर्निंग स्वीट हार्ट." तो हसतच तिला म्हणाला. ती होती त्याची प्रेयसी.... दोन वर्षांपासून दोघं रिलेशनशिप मध्ये होते. दोघांचं एकमेकांवर खुप प्रेम होतं. तो त्याच्या बाबांचा बिझनेस सांभाळत होता आणि ती त्याची पीए होती. त्यांचा कमर्शियल कंट्रक्शनचा बिझनेस होता. ती ऑफीसमध्ये त्याची प्रेयसी होती पण खऱ्या आयुष्यात त्यांनी कधीच एकमेकांना आपला जीवनसाथी मानलं होतं. फक्त ऑफिशीयली त्यांच्या नात्याला नाव द्यायचं बाकी होतं. आज तो ऑफिसला येणार नव्हता म्हणून तिने फोन केला होता.

"कबीर... हे काय तू अजून झोपेतच आहे, तू गावी जाणार आहे ना. मला वाटलं की एवढ्या वेळात तुझी तयारी पण झाली असेल." इशिता त्याचा तो आळसलेला आवाज ऐकून म्हणाली.

"अरे हो... मी तर विसरूनच गेलो होतो. बरं झालं तू आठवण करून दिली, मी आवरतो पटकन. तू फोन ठेव आता, आपण नंतर बोलू." कबीर म्हणाला आणि फोन कानापासून बाजूला नेऊ लागला तोच तिने त्याला अडवले.

"ए... थांब, नंतर बोलू काय... तू तिकडे तुझ्या मावस भावाच्या लग्नाला चाललाय, तिथे गेल्यावर तुला मला फोन करायला तरी वेळ भेटणार आहे का? आणि तिथे गेल्यावर तू त्या लोकांमध्ये रमून गेल्यावर तुला माझी आठवण सुद्धा येणार नाही." इशिता.

"तुझी आठवण येणार नाही, असं कधीच होणार नाही. माझ्या प्रत्येक श्वासात तू आहेस. त्यामुळे मी तुला विसरूच शकत नाही." कबीर प्रेमळ आवाजात बोलला.

"म्हणून तर आता मला तुझ्याशी बोलायचे आहे. मी काय म्हणतेय ऐक ना..." इशिता पुढे काही बोलणार तोच कबीरच बोलला.

"तू आता काय बोलणार आहे ते माहितीये मला. मी तुला प्राॅमिस करतो, आम्ही लग्नावरून आलो की लगेच मी आई बाबांशी आपल्याबद्दल बोलणार आहे. त्यांना आपल्याबद्दल सगळं सांगणार आहे. आता खुश ना... आता जाऊ का मी आवरायला." कबीरने तिला प्राॅमिस केलं म्हणून ती लगेच खुश झाली.

"मिस्टर कबीर विक्रम भोसले, तुम्हाला सगळंच कसं कळतं हो माझ्या मनातलं." इशिता.

"कारण माझं मन म्हणजेच तू आहेस." तो बोलला तसं तिने तिचा मोबाईल हृदयाशी धरला आणि फोन ठेवला. फोन ठेवल्यावर कबीरही हसतच मोबाईलकडे बघत राहिला. तोच त्याची आई आवाज देत आत आली.

"कबीर, हे काय तू अजून अंघोळ केली नाही आणि मोबाईल घेऊन बसलाय, आपल्याला अर्ध्या तासात निघायचं आहे. तिकडून निलिमाचे सारखे फोन चाललेय. संध्याकाळी हळद आहे तोपर्यंत आपण तिकडे पोहचायला हवं." सविताची बडबड चालू झाली. कबीरने लगेच मोबाईल खाली ठेवला आणि उठला.

"मी दहा मिनिटात तयार होऊन येतो आई, तू आणि बाबा तयार होऊन बसा." कबीर म्हणाला.

"तू आणि दहा मिनिटात... शक्य तरी आहे का?" सविता म्हणाली आणि नाही मध्ये मान हलवत खाली गेली. थोड्या वेळातच कबीर अंघोळ करून आला आणि आरशासमोर उभा राहून केस पुसू लागला तोच इशिताचा व्हिडिओ काॅल आला. त्याने हसत हसत तो रिसिव्ह केला. त्याने मोबाईल टेबलावर ठेवला आणि तिच्याकडे बघू लागला. तिने पाहिलं तर तो शर्ट लेस होता. त्याचं ते भारदस्त व्यक्तिमत्व बघून ती बोलायचंच विसरून गेली आणि फक्त त्याच्याकडे एकटक बघत राहिली.

कबीर दिसायला खुप हॅण्डसम होता. साडे सहा फुट उंची, जिमने कमावलेलं शरीर, त्याचे ते ओले आणि विस्कटलेले केस तिला अजून मोहित करत होते. तशी तीही काही कमी नव्हती. ती सुद्धा दिसायला सुंदर होती. अंगकाठी बारीक होती. तिच्या पाणेदार डोळ्यांत तो ही हरवून गेला होता. जेव्हा त्याच्या आईचा आवाज कानावर पडला तेव्हा तो भानावर आला.

"इशिता, खरं तर आता फोन ठेवायची अजिबात इच्छा नाहीये... पण माझा नाईलाज आहे." कबीर म्हणाला.

"माहिती नाही पण माझ्या मनाला नुसती हुरहूर लागली आहे. असं वाटतंय की तुला जाऊच देऊ नये. का कुणास ठाऊक पण मला असं वाटतंय की तू माझ्यापासून खुप दूर जातोय." इशिता खुप भावूक झाली.

"आज पहिल्यांदाच मी दोन ते तीन दिवसांसाठी चाललोय म्हणून कदाचित तसं वाटत असेल. खरं तर माझाही पाय निघत नाहीये पण नाही गेलो तर ऋग्वेदला वाईट वाटेल. माझा भाऊ कमी आणि मित्र जास्त आहे तो. त्याच्या लग्नाला न जाऊन कसं चालेल." कबीर म्हणाला.

"तू जा, पण लवकर ये मी तुझी वाट बघतेय!" इशिता म्हणाली.

"हो स्वीट हार्ट मी लवकरच येईल आणि आलो की पहिलं तुझ्याबद्दल आई बाबांना सांगेल. मग त्यांनी परवानगी दिली की आपलं सुद्धा लवकर लग्न होईल." कबीरने लग्नाचा विषय काढताच इशिता लाजली. पण परत तिचा चेहरा गंभीर झाला.

"पण तुझे आई बाबा आपल्या लग्नाला परवानगी देतील का?" तिने विचारलं.

"का नाही देणार, उलट खुश होतील ते. असंही बाबांना तुझ्या कामाची पद्धत खुप आवडते, आईला तुझा स्वभाव आवडतो. तेव्हा नाही म्हणण्याचा प्रश्नच नाही." कबीरच्या बोलण्याने तिला दिलासा मिळाला. कामाच्या निमित्ताने इशिताचं कधी कधी घरी येणं होत होतं त्यामुळे तिचा स्वभाव सगळ्यांनाच माहीत होता.

"तू म्हणतोय तसंच होऊदे. आता जा आणि लवकर ये आणि हो... तिथे गेल्यावर मला फोन करायला विसरू नकोस." इशिता.

"हो मला जसा वेळ मिळेल तसा मी तुला फोन करत राहिल." कबीर म्हणाला आणि त्याने फोन ठेवला. मग थोड्या वेळातच तयार होऊन तो सरळ बॅग घेऊन खाली गेला. तो जाईपर्यंत त्याच्या आई, बाबा आणि बहिणीचा ब्रेकफास्ट झाला होता.

"काय हे कबीर, किती उशीर केलास यायला... तुझी वाट बघता बघता आमचा ब्रेकफास्ट पण झाला." विक्रम भोसले म्हणजेच त्याचे बाबा त्याला बोलले.

"साॅरी बाबा, एक कामाचा काॅल होता म्हणून उशीर झाला. मी दोन मिनिटात ब्रेकफास्ट करतो मग निघूच आपण!" कबीर म्हणाला आणि लगेच ब्रेकफास्ट करायला बसला.

"दादा, नक्की कामाचाच फोन होता की गर्ल फ्रेंडचा फोन होता!" त्याची बहिण श्रावणी त्याला चिडवू लागली.

"तुला काय माहित गं... कोण होतं, तू काय बघायला आली होती का!" कबीर म्हणाला आणि त्यावरून दोघांची लुटुपुटूची भांडणं चालू झाली. ते बघून सविताने डोक्यालाच हात लावला.

"आता आधीच खाली उशीरा आलाय आणि भांडणात अजून वेळ घालव. त्यापेक्षा ना एक काम करा, तुम्ही दोघं येऊच नका, इथेच भांडत बसा. मी आणि हेच लग्नाला जातो." सविता म्हणाली.

"मला चालेल, तसंही इ...." कबीरने तोंडातला शब्द तोंडातच ठेवला. त्यावर श्रावणी पुढे काही बोलणार तोच सविताने तिला थांबवलं. मग कबीरने पटपट ब्रेकफास्ट केला आणि थोड्याच वेळात ते सगळे ऋग्वेदच्या लग्नाला जायला म्हणून गाडीत बसले.

गाडी चालू होताच कबीरच्या मोबाईल वर ऋग्वेदचा काॅल आला.

"कबीर, अरे निघालात की नाही तुम्ही अजून. यार इथे मी कधीपासून तुझ्या येण्याची वाट बघतोय." ऋग्वेद म्हणाला.

"हे काय आताच गाडीत बसलोय. आई बाबा पण सोबतच आहे, आम्ही संध्याकाळ पर्यंत येऊ." कबीर म्हणाला.

"कबीर, लवकर ये... मला तुझ्याशी खुप महत्वाचं बोलायचं आहे आणि खरं तर मला आता तुझी खुप गरज आहे. मी खुप मोठ्या प्राॅब्लेम मध्ये आहे. तुझ्याशी बोललो तर काहीतरी मार्ग निघेल असं वाटतंय मला!" ऋग्वेद म्हणाला. त्याचा तो गंभीर स्वर ऐकून कबीरला सुद्धा टेन्शन आले. तो काही बोलणार तोच पलीकडून ऋग्वेद बोलला.

"कबीर, आता तुझ्यासोबत सगळेच आहे त्यामुळे प्लीज तू मला काहीच विचारू नकोस. आपण प्रत्यक्ष भेटल्यावरच बोलू. आता तू काही विचारलं तर मावशी आणि काकांना पण प्रश्न पडतील." ऋग्वेद म्हणाला तसं कबीरने फक्त हुंकार भरला आणि फोन कट केला. आता कबीरलाही टेन्शन आले होते. त्याच्या मनात ऋग्वेदचेच विचार चालू होते.

ऋग्वेद नेमकं कसल्या टेन्शनमध्ये असेल हाच विचार त्याच्या डोक्यात चालू होता. काही केल्या त्याच्या डोक्यातून तो विचार जात नव्हता.

क्रमशः

लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिर्घ कथेचा पहिला भाग कसा वाटला ते नक्की सांगा, भेटूया पुढील भागात.
0

🎭 Series Post

View all