Login

अशी जुळली गाठ. भाग - ३

कबीर आणि सान्वीची कहाणी
अशी जुळली गाठ. भाग - ३

डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घ कथालेखन स्पर्धा

दार उघडावे की नाही हाच विचार कबीर करत होता. तोच पुन्हा बाहेरून आवाज आला.

"ऋग्वेद, दार उघड... मुहूर्ताची वेळ झाली आहे. बाहेर सगळे पाहुणे जमले आहे." बाहेरून ऋग्वेदच्या बाबांचा म्हणजेच जयवंतरावांचा आवाज आला. कबीर कसं बसं उठला आणि दार उघडलं. जयवंतराव लगेच ऋग्वेदला आवाज देत आत आले पण त्यांना तो कुठेच दिसेना. ऋग्वेद दिसला नाही म्हणून त्यांंना त्याची काळजी वाटू लागली.

"कबीर, ऋग्वेद कुठे आहे? बाहेर गुरूजी कधीपासून त्याची वाट बघताय." जयवंतराव म्हणाले.

"काका, तो इथेच जवळपास गेलाय. मी लगेच त्याला घेऊन येतो. तोपर्यंत तुम्ही पुढे व्हा!" कबीर म्हणाला तसं जयवंतराव बाहेर गेले. ते गेल्यावर कबीर किती तरी वेळ ऋग्वेदला फोन करत होता पण ऋग्वेद त्याचा फोनच उचलत नव्हता. आता काय करावं हेच त्याला कळेना, मग तो बाहेर गेला आणि ऋग्वेद ज्या रस्त्याने त्याला जाताना दिसला होता. त्या रस्त्यावर गाडी घेऊन जाऊन बघू लागला. पण ऋग्वेद काही दिसला नाही. त्याला जयवंतराव आणि विक्रम सारखे फोन करत होते. शेवटी नाईलाजाने कबीर मागे फिरला आणि लग्नाच्या ठिकाणी गेला.

कबीर तिथे जाईपर्यंत ऋग्वेद गायब झाल्याची बातमी सगळीकडे पसरली होती आणि लोकांमध्ये कुजबुज सुरू होती. कोणी ऋग्वेदला नावं ठेवत होते तर कोणी नवऱ्या मुलीला सान्वीला दोष देत होते. ती सगळी कुजबुज कबीरच्या कानावर पडत होती. तो येताना दिसताच विक्रम, सविता, नलिनी आणि जयवंतराव धावतच त्याच्याकडे आले.

"कबीर, ऋग्वेद बद्दल काही कळलं का? तो कुठे गेला आहे याबद्दल तुला काही माहिती आहे का?" निलिमाने त्याला विचारलं.

"मावशी, ऋग्वेद कुठे गेला आहे हे मला खरंच नाही माहिती. माहित असतं तर मी त्याला घेऊन आलो असतो ना!" कबीर म्हणाला.

"असं कसं नाही माहित तुला, इथे आल्यापासून तोच तुझ्या सोबत होता ना... मग तुला तो बाहेर पडताना कसा दिसला नाही." जयवंतराव जवळ जवळ चिडतच त्याला बोलले. त्यांचंही बरोबरच होतं. कारण हा दोन्ही घरांच्या इज्जतीचा प्रश्न होता. हे लग्न झालं नाही तर गावातले लोक त्यांना दुषणं देतील हे त्यांना माहीत होते.

"काका, मी त्याच्यासोबत होतो, पण त्याने मला काहीच सांगितलं नाही. एक महत्वाचं काम आहे असं सांगून तो गेला. महत्वाचं काम आहे म्हटल्यावर मी पण त्याला अडवू शकलो नाही. पण मला खात्री आहे तो येईलच." कबीर म्हणाला.

"अरे पण त्याचं लग्न आहे हे तुला माहीत होतं ना... मग तू त्याला जाऊच कशाला दिलं? त्याच्याऐवजी तू का नाही गेला ते काम करायला?" सविता पण आता त्यालाच ओरडली.

"आई, मला नव्हतं माहिती तो परत यायला एवढा उशीर करेल." कबीर म्हणाला. त्यानंतर सगळेच ऋग्वेदला फोन करत होते पण आता त्याचा नंबर बंद येत होता. आता सगळ्यांकडे वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

नवरी मुलगी सान्वी तयार होऊन बसली होती. ऋग्वेद निघून गेला ही बातमी तिच्यापर्यंत आणि तिच्या आई बाबांपर्यंत पोहचली. ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. सान्वी तर रडायलाच लागली होती. तिची आई सीमा तिचे बाबा प्रभाकर पाटील यांना तर खुप टेन्शन आले. ते जयवंत रावांकडे गेले आणि त्यांच्याकडे विनवणी करू लागले.

"जयवंतराव, मी तुमच्यापुढे हात सोडतो पण तुम्ही तुमच्या मुलाला काही करून शोधून काढून काढा. नाही तर आमची अब्रू जाईल ओ... माझ्या सोन्यासारख्या मुलीच्या आयुष्याची वाट लागेल. हे लग्न मोडलं तर तिच्याशी कोणीच लग्न करणार नाही." प्रभाकर पाटील जयवंतरावांसमोर हात जोडून गयावया करत होते. त्यांची अवस्था तिथे उपस्थित असलेल्या कोणालाच बघवत नव्हती. जयवंतरावांना पण त्यांच्या डोळ्यात पाणी बघून खुप वाईट वाटत होते.

"पाटील साहेब, तुम्ही टेन्शन घेऊ नका... ऋग्वेदला त्याची जबाबदारी कळतेय. तसंच काही असल्याशिवाय तो जाणार नाही. आपण अजून थोडा वेळ त्याची वाट बघू." जयवंतराव प्रभाकररावांना धीर देत होते पण आतून त्यांच्याच धीर खचत चालला होता.

सगळेच ऋग्वेदची वाट बघत होते पण दुपार उलटून गेली तरी तो आला नव्हता. आता प्रभाकर पाटील यांचा राग वाढला होता. त्यांना लोकांची कुजबुज आणि आपल्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू सहन होत नव्हते.

"जयवंतराव, आम्ही खुप विश्वासाने तुमच्याशी संबंध जुळवले होते पण तुम्ही आमचा विश्वासघात केला. जरा कान उघडे ठेवून ऐका... हे इथे जमलेले लोक काय बोलताय. तुमचा मुलगा भर लग्नातून पळून गेला आहे. चुक त्याचीच आहे तरी सुद्धा इथे बसलेले अर्धे लोक माझ्या मुलीला नावं ठेवताय. आता काय करायचं तुम्हीच सांगा." प्रभाकर पाटील रागाने बोलत होते. जयवंतराव फक्त खाली मान घालून उभे होते. त्यांच्याकडे बोलायला काहीच शब्द नव्हते.

"पाटील साहेब, या लग्नात तुमचा जेवढा खर्च झाला आहे तो सगळा मी देईल. तुम्ही टेन्शन घेऊ नका." जयवंतराव म्हणाले.

"खर्च द्याल हो तुम्ही, पण आमच्या अब्रूचं काय? ती कशी परत मिळवून देणार आहात तुम्ही? आणि हे लोक माझ्या मुलीला दुषणं देताय त्याचं काय? जरा माझ्या मुलीकडे बघा, रडून रडून तिची अवस्था काय झाली आहे. आज या भर मंडपात तिचं लग्न मोडले तर कोण लग्न करेल तिच्याशी. आम्हाला दुसरी पण मुलगी आहे. एकीबरोबर दुसरीचं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त होईल, याचा विचार करा तुम्ही." प्रभाकर पाटील बोलत होते आणि जयवंतराव, निलिमा खाली मान घालून ऐकत होते. कबीर सारखा ऋग्वेदला फोन करत होता पण त्याचा फोन अजूनही बंद येत होता.

थोड्या वेळातच प्रभाकर पाटलांचे भाऊबंद पण आले आणि ते सुद्धा जयवंतरावांना नाही नाही ते बोलू लागले. त्यांच्या आयुष्यात आतापर्यंत त्यांनी कधीच कोणाचं एवढं ऐकून घेतलं नव्हतं एवढं आता त्यांना ऐकायला लागत होते. त्यांनी आपल्या डोक्यातला फेटा काढला आणि प्रभाकर पाटलांच्या पायाशी ठेवून ते त्यांची माफी मागू लागले. ते निलिमाला सहनच झालं नाही. ती लगेच सविताकडे आली आणि तिला बडबड करू लागली.

"ताई, हे सगळं तुझ्या कबीर मुळे होतंय. त्यानेच ऋग्वेदला इथून काढून दिलंय, म्हणून तर दार बंद करून आतमध्ये बसला होता. आता आम्हाला हे सगळं ऐकावं लागतंय, त्याला जबाबदार फक्त आणि फक्त तुझा मुलगा आहे. आज त्याच्यामुळे आमची मान खाली गेली." निलिमा सविताला वाटेल तसं बोलत होती. ते ऐकून कबीर तिला समजावू लागला.

"मावशी, जे काही घडलं त्यात माझी खरंच काही चुक नाहीये. ऋग्वेद स्वतःहून गेला आहे, मी त्याला खुप अडवायचा प्रयत्न केला पण तो नाही थांबला." कबीर म्हणाला.

"मग तू तेव्हाच का नाही सांगितलं! आज तुझ्यामुळे पहिल्यांदा मी माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी पाहिलं आहे. ते कधीच कोणापुढे झुकले नाही पण आज त्यांना झुकावं लागतंय. हे फक्त तुझ्यामुळेच झालंय." निलिमा रागाने म्हणाली. तिच्याही डोळ्यातले अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते.

"मावशी, तुम्ही सगळे शांत व्हा... आपण सगळे मिळून यातून काही तरी मार्ग काढू." कबीर म्हणाला.

"आता अजून काय मार्ग काढणार आहे तू?" निलिमाने रागाने विचारलं. त्याचवेळी विक्रम भोसले पुढे आले आणि ते बोलू लागले.

"या सगळ्यात आता एकच मार्ग आहे." विक्रम मोठ्या आवाजात बोलले तसं तिथे असलेले सगळेच त्यांच्याकडे बघू लागले. प्रभाकर पाटील तर खुप आशेने त्यांच्या जवळ आले.

"काय मार्ग आहे साहेब, सांगा ना..." प्रभाकर बोलले तसं आता विक्रम पुढे काय बोलताय याकडेच सगळ्यांचे लक्ष होते. सगळे अगदी नजर लावून त्यांच्याकडे बघू लागले.

"आता दुपार तर कधीच उलटून गेली आहे त्यामुळे ऋग्वेद येईल असं वाटत नाही आणि हे लग्न मोडलं तर मुलीच्या आयुष्याचं नुकसान होईल." विक्रम म्हणाले.

"ते आम्हाला पण माहितीये, तुम्ही मार्ग सांगणार होता ना तो सांगा." प्रभाकर पाटील म्हणाले.

"हे लग्न आताच इथे या ठिकाणी होईल फक्त ऋग्वेद ऐवजी कबीर नवरा मुलगा म्हणून उभा राहील." विक्रम म्हणाले तसं सगळेच त्यांच्याकडे एकटक बघू लागले. प्रभाकर पाटलांच्या चेहऱ्यावर आशा दिसू लागली, पण विक्रमचं ते वाक्य ऐकून कबीरच्या पायाखालची जमीनच सरकली. आपले बाबा असं काही बोलतील याची त्याला कल्पना सुद्धा नव्हती.

क्रमशः

लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all