Login

अस्स सासर नको ग बाई(भाग १)

कथा.. लॉकडाऊन मधे थकलेल्या गृहिणींची


"चला चला... आजच निघा. पाहिजे तर सोबतच जाऊया." महेश त्यांच्या शेजाऱ्यांना बोलत होता.

महेश त्याची बायको गीता आणि दोन मुली अस चौकोनी सुखी कुटुंब.. त्यांचे शेजारी जितेंद्र. नुसते शेजारी नाही, पक्के.. शेजारी. दोन्ही घरात गोडी डाळ असेल तरी या घरातली वाटीभर डाळ त्या घरात गेलीच पाहिजे. तर जितेंद्र याच्या घरी त्याची बायको सीमा.. आई..भाऊ जयेश आणि नुकतच लग्न ठरलेली बहिण मानसी.

"अहो नको, एवढं काही लॉकडाऊन लागणार नाही. न्यूजला पण काही दिवस लॉकडाऊन सांगितल आहे त्यामुळे सुटेल दोन दिवसात." जितेंद्र
जितेंद्र ची बायको कधी टीव्ही वर लागलेल्या न्यूज कडे तर कधी महेश भाऊंकडे गोंधळलेल्या अवस्थेत बघत होती. तशी जितेंद्रने तिला एक टपली दिली.

"तू काय इकडे तिकडे बघते चल आत.." जितेंद्र मस्करीत बोलला. तशी सीमा खुन्नस ने बघत आत गेली.

"अहो राहुद्या ना.. आजच तर लागलं आहे लॉकडाऊन. बघू थोडे दिवस. काही वाटल तर जाऊया ना" गीता काकुळतीला येऊन बोलत होती.

"तू गप बावळट. तुला काय समजतंय? तू बॅग भर. ओ जितेंद्र भाऊ चला तुम्ही पण उगाच रिस्क नका घेऊ. आत्ताच जाऊया. चला.. ओ वहिनी.. चला बॅग भरा.. ऐका माझं." महेश काकुळतीला येऊन बोलत होता.

"अहो नाही होणार एवढं काही. माझं ऐका तुम्ही पण उगाच ये जा करू नका पोरांना घेऊन." जितेंद्र

"हो ना.. मी पण तेच बोलते पण आमचं साँग काही ऐकत नाही. त्यांना काय जात चल बोलायला. माझं याड निघत तिकडे गेल्यावर." गीता त्रस्त होऊन बोलत होती.

"तू आलीस परत? जा बॅग भर आधी. पाच वाजता जनता कर्फ्यु संपला की निघुया लगेच. चल पटपट आवर आणि तोंड चालवण्यापेक्षा हात चालव. ओ जितेंद्र भाऊ बघा अजून पण आणि निघा आमच्यासोबत." महेश पुन्हा पुन्हा तेच सांगत होता पण जितेंद्र काही ऐकायला तयार नाही. जितेंद्रची बायको गावी जायचं म्हंटल की एका पायावर तयार असायची कारण तिला मुंबईपेक्षा गाव जास्त आवडायचं. गीताच मात्र उलट होत. तिला गाव म्हंटल की नको असायचं आणि तिच्या सासरी गोतावळा खूप मोठा.

हो नाही करता करता नाईलाजाने गीता बॅग भरून निघाली. महेश अजूनही चला चला म्हणून पाठी लागत होता. जितेंद्र मात्र त्याच्या निर्णयावर ठाम होता. पाच वाजता जनता कर्फ्यु संपला आणि महेश त्याच्या फॅमिली सोबत निघाला. गीताचा चेहरा मात्र उतरलेला होता कारण तिला जायचच नव्हत.

दोन तासांतच न्यूजला बातमी झळकली. कोरोना पेशंटची वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाऊन वाढवून पंधरा दिवसांच करण्यात आलं आहे. जितेंद्रने डोक्यावर हात मारून घेतला आणि त्याची बायको त्याच्यावर चिडली.

"तरी..महेश भाऊ बोलत होते चला म्हणून आता बसा इथेच. आलो असतो पंधरा दिवस जरा गावी जाऊन पण नाही." सिमाच्या तोंडाचा पट्टा अखं....ड चालू होता. शेवटी जितेंद्र चिडला तेंव्हा ती गप्प बसली.

आता तासाभरात निघायला तर पनवेल च्या पुढे निघालेल्या गाड्या फक्त सोडत होते बाकी गाड्यांना पाठी फिरवलं जात होत. न्यूजला दाखवत होते सगळे हायवे जाम झाले होते. आठ च्या नंतर सगळी ये जा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. आता इकडची पब्लिक तिकडे आणि तिकडची इकडे अस झालं होत. होळीच्या सणासाठी सासरी गेलेले जावई सासरी अडकले होते म्हणून माहेरवाशिण खुशीत होती पण सासरी अडकलेली सून मात्र आणखी टेन्शन मधे आणि ज्यांना जायचं नव्हत तरी गेलीत त्यांची स्थिती गीता सारखी झाली होती.
क्रमशः. .
@श्रावणी लोखंडे

🎭 Series Post

View all