Login

अस्स सासर नको ग बाई (भाग २)

कथा लॉकडाऊन मधे थकलेल्या गृहिणींची


"हॅलो..जितेंद्र भाऊ पोचलो आम्ही." रात्री साडे बारा ला महेश ने फोन करून पोचलेल्याचा निरोप फोन करून कळवला.

"वहिनी आणि पोरी ठीक आहेत ना? त्यांना काही त्रास झाला नाही ना?" फोन स्पीकर वर असल्याने सीमाने लगेच प्रश्न केला.

"अहो काय सांगू? तिघी पण उलट्या करत आल्या. कितीवेळा गाडी थांबवली काही विचारू नका... वैतागत महेश बोलला.

"लवकर पोचलात तरी? " जितेंद्र बोलतो.

"हो.. पनवेल पर्यंत लै जाम होत त्यानंतर मात्र गाडी रेमटवली त्याने म्हणून आलो लवकर. सांगत होतो निघा आमच्यासोबत तर नाही निघालात. आता पंधरा दिवस लॉकडाऊन केलं आहे. "महेश

"हो.. जाऊदे आता. घरात बसून दिवसभर खायचं आणि झोपा काढायच्या." जितेंद्र बोलत होता आणि सीमा मात्र रागाने धुसफूसत होती.

"बर बर.. चालेल. तरी बघा.. निघायला जमल तर निघा लगेच कारण हे लॉकडाऊन लगेच संपले अस वाटत नाही. उगाच वेळ घालवू नका." महेश काळजीने बोलत होता.

"हो हो.. बघतो कस काय ते. चला काळजी घ्या आणि आराम करा..घरी विचारलं सांगा सगळयांना." जितेंद्र फोन ठेवतो.

"तरी सांगत होते जाऊया आपण सुध्दा..पण नको. फुकटची भरपगारी सुट्टी मिळत होती तर नको झाली. आता बसा इथेच. चांगले काजू बिजू खाल्ले असते गावी जाऊन आता बसा इथेच चार भिंतींच्या आत." सीमा रागाने तणतण करत होती.

"अग.. एक गीता वहिनी.. सासरी जायला नको म्हणत होत्या आणि एक तू.. सासरी नाही नेल म्हणून चिडते आहेस. अजब आहे बाबा." जितेंद्र कशी बशी तिची समजून काढत होता.

जनता कर्फ्यु च्या दुसऱ्या दिवशी पासून तिकडे गीताची आणि इकडे सीमाची तारेवरची कसरत सुरू झाली.

"उठा उठा सकाळ झाली चहा नाश्त्याची वेळ झाली. उठा उठा सकाळ झाली गावी जायची वेळ झाली." जितेंद्र सकाळी सकाळी सीमा ला डिवचत होता.

"ए दादा.. झोप ना रे. साडे सात वाजलेत आत्ताशी." मानसी डोळ्यावर पांघरून घेत बोलली. तीच बोलण पूर्ण होईस्तोवर जितेंद्र ने होम थिएटर ला भोजपुरी गाणी लावली देखील.


"लगावे लू जब लीपिश्टिक..हीलेला अरहा डिस्ट्रिक्ट.
तू लगावे जब लिपिष्टिक.. हिलेला अरहा डिस्ट्रिक्ट
जिला टॉप लागेलू.. ओ जिला टॉप लागेलू..
कमरिया, कमरीया...
कमरिया.. करे लपालप.. लॉलीपॉप लागेलू
कमरिया करे लपालप...लॉलीपॉप लागेलू.."


"अरे यार..काय फालतू गाणी लावली आहेत बंद कर आणि गप झोप ना जरा.. सकाळ सकाळ डोकं उठवलय नुसत."मानसी चिडतच बोलली आणि तिने कानावर उशी ठेवली.

"अरे जितेंद्र.. बंद कर ती गाणी. सूर नाय शेंडा सकाळ सकाळ नुसती भनभन..लावली आहे. "आई पण चिडली होती.

"बहुतेक लॉकडाऊन वाढल्याने दादाच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. " जयेश मस्करी करत बोलला.

"आधीच डोकं फिरल आहे त्यात तू नको आणखी गरम करू नको.. गप्प बस.. मानसी जयेश वर उशी भिरकावत बोलली.

सकाळ सकाळ सगळ्यांची मस्ती सुरू होती. जितेंद्र पण सीमाशी मस्ती करत तिला उठवत होता. शेवटी अर्ध्या तासाने सगळे उठले. फक्त तोंड धुवून पावडर थापून परफ्यूम मारून असे फ्रेश झाले जस काय आंघोळ्या केल्या आहेत. सीमा आणि मानसी दोघींनी तेवढ्या आंघोळ केल्या बाकी तिघे नंतर करू वेळच वेळ आहे म्हणून वेळ मारून नेत होते.

सीमाने मस्त आल काळीमिरी घालून कोरा चहा ठेवला. इकडे दुकान आणि भाजी मार्केट सकाळी फक्त दोन तासासाठी सुरू होत होती. बातम्यांना सारखं एकच सांगत होते. गरम पाणी प्या, ए.सी बंद ठेवा,घराच्या खिडक्या उघड्या ठेवा.. मोकळी हवा घ्या काढा पित रहा..पौष्टिक खात रहा, अंडी उकडून खावा.. बातम्यांना दाखवणारे सगळे नियम सगळेच जण नेटाने पाळत होते.

असेच चार दिवस निघून गेले पाचव्या दिवशी मात्र सीमा वैतागली. सकाळी आठला चहा बिस्कीट.. दहाला काहीतरी नाश्ता.. बारा वाजता काहीतरी तोंडात टाकायला पुन्हा यांना डब्बे शोधून द्या..कपडे भांडी आवरतात नाही तोवर यांना पुन्हा जेवण द्या.. नाही चार वाजतात तर पुन्हा चहा बिस्कीट..पुन्हा स्नॅक्स म्हणून मॅगी किंवा इतर काहीतरी आणि नऊ वाजता जेवण. सीमाला कंटाळा आला होता तेच तेच करून उठल्यापासून रांधा वाढा उष्टी काढा.. अशी गत झाली होती तिची. सासू आणि नणंद आयत बसून खात होत्या. जरा म्हणून कशात मदत नाही. दिवसभर भांडी घासून वैतागलेल्या सीमाला मनोमन गीता वहिनीचा हेवा वाटू लागला. गावी सगळी माणस कामाला मदत करतात. मिळून मिसळून काम करतात. सीमाला वाटत होत गावी गेलो असतो तर बर झालं असत.
न राहवून शेवटी सीमाने गीताला फोन केला.

"हॅलो.. " थकून थकलेला क्षीण आवाज तिच्या कानावर पडला.

"काय ओ वहिनी.. बर नाही का?" सीमाने काळजीने विचारलं.

"काय सांगु तुला... नको म्हणत होती गावी यायला तरी ऐकल नाही. मरमर काम करून थकले आहे तरी कोणाला त्याची पडलेली नाही. बर आहे तुझ.. तू तिकडे आहेस. निदान तुझ्या मदतीला मानसी आणि आई तरी आहेत."इकडे गीताला सीमाचा हेवा वाटत होता.

"ओ वहिनी.. तुम्हाला वाटत तस काही नाही." सीमा आणखी वैतागत बोलली.
क्रमशः..
@श्रावणी लोखंडे