असतील शिते तर जमतील भूते _अंतिम भाग

कथा
भाग ३

साहिल फार अस्वस्थ झाला होता. काही मार्ग निघतो का साहिल समोर...पाहुया.

साहिल समोर पैशांचा प्रश्न कायम होता. पण किरण मात्र हरली नाही. तिने रविकांतच्या अपघातानंतर स्वतः रविकांतच्या बिझनेस मध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे सगळं कसं व्यवस्थित सुरू होत. रविकांत आणि किरणच्या चांगुलपणामुळे ऑफीसमध्ये प्रत्येकाने प्रामाणिकपणाने काम केले होते आणि त्यामुळे कंपनीचा कारभार सुरळीत सुरू होता.

किरण आणि रविकांतने आधीच ऑफीसमधील सगळ्यांना सांगून ठेवले होते. काहीही झाले तरी साहिलला मदत करू नका आणि करायची असेल तरी फार कमी अशी मदत करा. त्याच्याशी बोलतांना सुध्दा तुम्ही टाळाटाळ करा.

परंतु,ऑफीसमध्ये कोणालाच हे मान्य नव्हते. पण रविकांत आणि किरणच्या सांगण्यावरून ते असे वागण्यास तयार झाले.

दुसऱ्याच दिवशी साहिल सकाळीच ऑफीसमध्ये गेला. पण रविकांत आणि किरणच्या सांगण्याप्रमाणे साहिलला फार काही मदत मिळाली नाही. शेवटी निराश होऊन तो घरी परतला.

इकडे दोन महिन्यांच्या उपचारानंतर, डॉक्टर बोलले. "हे बघा त्यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत आहे. त्यामुळे मी त्यांना सुट्टी देत आहे. पण बघा, तुम्हाला त्यांची चांगली काळजी घ्यावी लागेल." असे डॉक्टरांनी सांगितले.

रविकांतला सुट्टी होत आहे. हे बघुन दोघांनाही खूप आनंद झाला होता.

"आई, आता कसं होणार आपलं. बाबांची औषध , आपला घरखर्च ... माझी तर काही बचत पण नाही आणि मित्रांनी तर पाठच फिरवली. आज माझ्या या परिस्थितीत एक तरी मित्र सोबत असायला हवा होता. पण सगळे खायला जमत होती. जोपर्यंत माझ्याकडे पैसा होता. तोपर्यंतच माझ्या अवतीभोवती मुंगळ्याप्रमाणे जमत होती. पण, आज माझ्याजवळ पैसे नाहीत आणि मित्रही नाही."

"साहिल रडू नकोस बाळा."

"आई कोणाचा आवाज आहे." साहिल

"तुच बघ जरा मागे वळून."

"बाबा, तुम्ही." साहिल आश्चर्यकारक नजरेने बघू लागला. " बाबा तुम्ही अचानक कसे उठले, चालायला लागले." साहिल

"थांब साहिल, आम्हाला माहिती आहे. बाबांना असे बघितल्यानंतर तुझ्या मनात अनेक प्रश्न पडतील." किरण

"साहिल बाबांचा अपघात झाला आणि सगळंच गणित चुकल. पैशाचं नियोजन, आपलं रोजचं दैनंदिन नियोजन. आपण दवाखान्यात खरोखर भरपुर पैसा खर्च केला आणि डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश आलं.
माझा देवावर पुर्ण विश्वास होता आणि सगळ्यांच्याच मनासारखं घडलं ‌. तुला आठवत डॉक्टरांनी बाबांना घरी घेऊन जायला सांगितले होते. त्याचवेळी बाबांच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली होती. होती फक्त कमजोरी. त्यामुळे पुढचे पंधरा- वीस दिवस तरी डॉकटरांनी संपूर्ण आराम करण्यासाठी सांगितले होते. पण आम्ही ही गोष्ट तुझ्यापासून नव्हे जगापासून लपवून ठेवली. तू काॅलेजला गेल्यानंतर बाबा हळूहळू चालण्याचा सराव करत होते. त्यामुळे आज बरीच सुधारणा झाली आहे. पण, या गोष्टीमुळे कदाचित आज तुला पैशाच महत्व कळल. लोकांचा ढोंगीपणा लक्षात आला."

"पण निदान मला तरी सांगायचे ना ! की बाबा बरे झालेत म्हणून."

"मुद्दामच.. हो. मुद्दामच." रविकांत

"माझ्या अपघातानंतर किरणने सगळी जबाबदारी सांभाळली. घर, ऑफीस, माझी तब्येत सगळं काही उत्तमरित्या पार पाडली. तू निराश झाला होता आणि तुझ्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून किरणने चेहऱ्यावर टेन्शन असुनही कधीच निराशा दाखवली नाही. पण तुला मात्र फार टेन्शन आले होते. त्यामुळे शेवटी तिनेच तुला मित्रांची मदत मागण्यासाठी पाठविले होते. पण तू रिकाम्या हाताने परत यायचास. शिवाय मी तुझे अतिलाड केले. जे मागेल ते तुला देत गेलो. मरा वारंवार किरण सांगत होती. पण, मी दुर्लक्ष करत होतो. पण जेव्हा एखादं संकट आ वासून उभं राहत . तेव्हा खरी परीक्षा असते. म्हणून आता हे सत्य जास्त दिवस लपवून ‌ठेवू शकलो नाही. कारण , तुला पैशाची किंमत आणि मैत्रीचं नातं कसं असतं हे लक्षात आणून द्यायच होते आणि तुला ते कळलेच असेल. म्हणून मैत्री असावी. पण जिवाला जीव देणारी. पैशाच्या जोरावर विकत घेण्यासारखी नसावी. तुझा मित्रांवर असलेला विश्वास किती सार्थकी लागला हे कळलेच असेल."

"आई, बाबा मला माफ करा. खरोखरच मी आजपर्यंत काहीच बचत केली नाही. मित्रांबरोबर मजा करीत राहीलो. पण मित्र कसे असतात हे मला चांगलेच कळले."

म्हणजे 'असतील शिते तर जमतील भुते." किरण

कळलं.

"हो आई म्हणजे आपल्या जवळ जोपर्यंत पैसा असतो तोपर्यंतच मित्रांची वाण असते. पैसा संपला तर सगळेजण पाठ फिरवून पळ काढतात.

©® आश्विनी मिश्रीकोटकर





🎭 Series Post

View all