Login

असतील शिते तर जमतील भूते..

असतील शिते तर जमतील भूते..
असतील शिते तर जमतील भूते..

आटपाट नगर होतं. त्या नगरात माधव नावाचा एक युवक राहत होता. माधव सधन कुटुंबातला होता. वडिलोपार्जित गडगंज संपत्ती लाभल्याने त्याला भविष्याची काहीच चिंता नव्हती. दिवसभर फक्त झोपा काढणं, मित्रांसोबत भटकत राहणं आणि बाहेर हॉटेलमध्ये खाणंपिणं इतकाच त्याचा दिनक्रम होता. वाईट मित्रांच्या संगतीने त्याला बरीच व्यसनंही लागली होती. खिशात पैसा खुळखुळत होता त्यामुळे कायम त्याच्याभोवती मित्रांचा गरडा घातलेला असायचा. त्याचे मित्र त्याच्या तोंडावर खोटी स्तुती करायचे, त्याच्या मोठेपणाच्या फुशारक्या मारायचे आणि त्याच्याकडून पैसे उखळायचे. माधवही त्यांच्या त्या खोट्या स्तुतीला, फुशारक्यांना भुलून जायचा. त्यांच्यावर अजून जास्त पैसे उडवायचा; पण असा पैसा किती दिवस पुरणार? हळूहळू त्याच्याच सवयीमुळे त्याची संपत्ती कमी होऊ लागली. राजेशाही थाटात राहण्याची सवय लागल्याने जवळचा होती नव्हती सारी संपत्ती त्याने विकून टाकली. आता त्याच्याकडे काहीच पैसे शिल्लक राहिले नव्हते. त्याच्या जवळचे पैसे संपताच त्याचे मित्रही हळूहळू त्याच्यापासून दूर जाऊ लागले. त्याची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली होती. इतके दिवस ‘तुझ्यासाठी जीव पण देईन’ असं म्हणणारे मित्र त्याला पाहून तोंड फिरवून जाऊ लागले. ज्यांना त्याने कित्येकदा उसणे पैसे दिले होते ते परत मागताच मैत्री तोडून त्याला टाळू लागले. माधव निराधार झाला. नैराश्याच्या गर्तेत जाऊ लागला. ऐशोरामात राहायची सवय लागलेली असल्याने कष्टाची त्याला सवयच नव्हती. त्यामुळे दिवसेंदिवस त्याची परिस्थिती अजूनच बिकट होत चालली होती. अक्षरशः आता त्याच्यावर भीक मागण्याची वेळ आली होती.

त्याच गावात राघव नावाचा एक युवक राहत होता. आजवर माधवची श्रीमंती पाहिलेल्या राघवला माधवची आताची हलाखीची परिस्थिती पाहून खूप वाईट वाटलं. एक दिवस तो त्याच्या घरी आला आणि त्याला म्हणाला,

“मित्रा, काही वर्षांपूर्वी माझीही परिस्थिती अगदी तुझ्यासारखीच झाली होती. तेंव्हा तुझ्या बाबांनी मला काही रक्कम देऊन माझी मदत केली होती. त्यांनी दिलेल्या पैश्यातून मी एक छोटासा उद्योग सुरू केला. अपार कष्ट करून मी माझ्या धंद्यात जम बसवला. आणि आता मी थोडा फार स्थिरावलो आहे. तुझ्या वडिलांनी आमच्या कुटुंबावर खूप मोठे उपकार केलेत. त्या उपकाराची परतफेड तर कधीच होऊ शकत नाही; पण ती रक्कम आज मी तुला परत करून तुला मदत करणार आहे. हे घे.. हे पैसे गुंतवून तुही छोटामोठा उद्योग सुरू करू शकतोस आणि ही परिस्थिती नक्कीच बदलू शकतोस.”

असं म्हणत राघवने माधवच्या हातात पैशांचं पुडकं ठेवलं. माधवचे डोळे ओसंडून वाहू लागले. कृतज्ञता मनात दाटून आली. भरल्या डोळ्यांनी तो राघवकडे पाहत म्हणाला,

“आजवर मी माझ्या मित्रांना अनेकदा पैशांची मदत केली. त्यांच्यावर खूप पैसे उधळले; पण कोणीच माझ्या मदतीला आलं नाही. सगळे पाठ फिरवून निघून गेले. राघव, तू मला मदत केलीस. तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही.”

त्याच्या खांद्यावर हात ठेवत राघव म्हणाला,

मित्रा, उपकार वैगरे नाही रे.. तुझ्या वडिलांची पुण्याई म्हण हवंतर की, ही सु्बुद्धी मला सुचली. माधव, मी तुला एक फुकटचा पण मोलाचा सल्ला देतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ‘असतील शिते तर जमतील भूते..’ आपल्याजवळ जर पैसा असेल तर अशी भूते कायम आपल्या भोवती घुटमळत राहतील. आणि जेव्हा पैसा नसेल तर कोणीच तुला विचारणार नाही. म्हणून सांगतो, पैसा खूप महत्वाचा आहे. तो जपून वापरावा. कष्ट करून तो वाढवावा. तोंडावर गोड बोलून मागे निंदा करणाऱ्या स्वार्थी मित्रांपासून सावध राहावं. एक परखडपणे आपल्या हिताचं सांगणारा चांगला मित्र ओळखावा. बघ, पटलं तर घे.. ”

आता माधवला त्याची चूक चांगलीच लक्षात आली होती. त्याने सद्गदित होऊन राघवला मिठी मारली. त्याच्या डोळ्यातून निरंतर पाणी वाहत होतं..