Login

अस्तित्व..

सासूबाई आणि पूर्ण घराला सुनेच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी ही कथा.
सकाळची वेळ होती.

स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज, वाफाळणारा चहा, आणि मधूनच सासूबाईंचा ओरडा — “रश्मी, अजून पोळ्या का नाही झाल्या?”

तिचा नवरा अनिलही खोलीतून तिला हाक मारत होता, अगं, रश्मी माझे मोजे सापडत नाही.

रश्मी शांतपणे काम करत होती. तिच्या कपाळावर घाम, पण चेहऱ्यावर तीच ओळखीचं सौम्य स्मित.

तेवढ्यात नेहा आत आली. ती नुकतीच ऑफिसला जाण्यासाठी आवरून आली होती.
रश्मीकडे बघून म्हणाली—
“वहिनी, तुम्ही दिवसभर घरातलं सगळं काम करता, सकाळपासून रात्रीपर्यंत एक क्षणही विसावा घेत नाही .. तरीसुद्धा सगळे तुम्हालाच बोलतात. कुणालाच तुमच्या कष्टाची किंमत नाही!”
"मीं पण ऑफिसच्या गडबडीत तुमची इतकी काही मदत नाही करत. "

रश्मीने नेहाकडे पाहत हलकंसं हसून म्हटलं—
“नेहा, मी तुझ्यासारखी शिकलेली नाही गं. माझं बोलणं कुणी ऐकणारच नाही. घरात शांतता राहावी म्हणून गप्प बसते.”

नेहाला राग आणि दुःख दोन्ही झालं.


तिचं लग्न महिनाभर पूर्वीच घरातला धाकटा मुलगा म्हणजे सुनीलसोबत झालं होतं.आणि रश्मी तिची मोठी जाऊ होती म्हणजे सुनिलच्या मोठ्या भावाची बायको.


नेहा आल्यापासून बघत होती रश्मी सकाळपासून रात्री पर्यंत सगळ्यांची कामे करत असायची पण तरी ही तिला घरात कोणी किंमत देत नव्हते.
ती म्हणाली—
“वहिनी , हीच तुमची चूक आहे. तुम्ही गप्प बसता म्हणून सगळे तुमच्यावर चढून बोलतात. स्त्री जर स्वतःसाठी उभी राहिली नाही, तर कुणीच तिच्यासाठी उभं राहत नाही. तुम्ही खूप समजूतदार आणि गुणी आहात, पण आता थोडं स्वतःसाठी जगायला शिका. मी आहे ना तुमच्यासोबत.”

रश्मीने दीर्घ श्वास घेतला. तिच्या डोळ्यांत थकवा होता.
“मी काय करू नेहा? इथले लोक मला माहेरी जायलासुद्धा परवानगी देत नाहीत.
म्हणतात—" तू गेलीस तर घराचं काम कोण करणार?"

नेहाने रश्मीचा हात धरला.
“वहिनी , आता वेळ आलीये सगळ्यांना धडा शिकवायची. तुम्ही फक्त माझं ऐका .तुमचा अस्तित्व काय आहे या घरात सगळ्यांना कळायला हवं.”


रात्री नेहा आणि रश्मीने काहीतरी ठरवलं.

दुसऱ्या दिवशी सकाळीच स्वयंपाकघरात जोरात आवाज झाला. “धडाम!” आणि लगेच रश्मीची हळवी किंकाळी.

सगळे धावत आत आले. रश्मी जमिनीवर पडलेली. भांडी इकडे तिकडे पडलेली .

विमलाबाई ओरडल्या—
“अगं उठ लवकर! एवढंही नीट बघता येत नाही का? किती काम पडलंय!”

नेहा म्हणाली—
“सासूबाई, वहिनीला उठता येतं नाही.आणि तुम्हाला अजूनही कामाचीच चिंता आहे? थोडा तरी बघा ना!”

रश्मी उठण्याचा प्रयत्न करत होती पण ती पुन्हा कुरकुरली.
नेहा ओरडली—“दादा , वहिनीला खोलीत घेऊन जा ना.”

अनिलने आईकडे बघितलं जसं की तो परवानगी घेतोय.
विमलाबाई म्हणाल्या—“उचल रे, इथे पडून काय करणार ती !”


रश्मीला खोलीत झोपवलं आणि म्हणाला —" मीं निघतो, मला उशिर झालंय.थोड्याच वेळात सुनील पण कामाला निघाला.

मग नेहा रश्मीकडे गेली.
हळू आवाजात म्हणाली—
“वहिनी,आता आपल्या नाटकाची सुरुवात झाली. मी जे सांगेन तेच करायचं. आता सगळ्यांना तुमचं खरं महत्त्व कळलं पाहिजे.”

थोड्या वेळाने सासूबाई आत आल्या.
“आता घरचं सगळं काम कोण करणार?”

नेहा म्हणाली—“सासूबाई, काळजी नका करू. मी ऑफिसमधून सुट्टी घेते, वहिनीला डॉक्टरकडे घेऊन जाते. परत आल्यावर मी बाकी कामं करते.”

विमलाबाई थोड्या सैल झाल्या, “बरं झालं नेहा, तू आहेस म्हणून घर चालेल. ही रश्मी तर रोजचं काहीना काही बिघडवते.”

रश्मी शांत पडून होती. पण तिच्या मनात समाधानाचं हास्य उमटलं — “आता कळेल सगळ्यांना माझं महत्त्व.”



थोड्या वेळाने नेहा म्हणाली—
“सासूबाई, आम्ही डॉक्टरकडे जातो. तुम्ही तोपर्यंत दुपारचं जेवण बनवा.”

विमलाबाई कुरकुरल्या—
“माझ्याकडून होणार नाही हे सगळं, सवय लागलीये सगळ्यांना तयार जेवण खायची.”

टॅक्सीमध्ये बसताच दोघींच्या चेहऱ्यावर खोडकर हसू आलं.
“वहिनी, आता खरी मजा येणार आहे,” नेहा म्हणाली.



नेहाची मैत्रीण डॉक्टर होती. तिनं तिला सगळं सांगून ही मदत करायला सांगितलं होतं. ती पण सहजपणे तयार झाली.

दोन तासांनी त्या घरी आल्यावर रश्मीच्या पायाला प्लास्टर होतं.


नेहा गंभीर चेहऱ्याने म्हणाली—
“सासूबाई, डॉक्टर म्हणाले महिनाभर पूर्ण विश्रांती.”

“काय? महिनाभर?” विमलाबाईंचा चेहरा उतरला.
“मग घरातलं सगळं कोण करणार?”

नेहा म्हणाली—
“मी पण ऑफिसला जाते सासूबाई, थोडं मी करीन, बाकी तुम्हालाच बघावं लागेल.”
विमलबाई म्हणाल्या —"मीं कामं पण करू आणि रश्मीला पण बघू. मला नाही जमणार. "

संध्याकाळी दोन्ही मुलं ऑफिसवरून घरी आले. त्यांना विमलाबाईंनी सगळा संगितलं.
विमलाबाई अनिलला हळूच म्हंटल्या —" रश्मीला महिनाभर माहेरी सोडून ये तिचा. "
नेहा म्हणाली —"त्या काम करत होत्या, तेव्हा तुम्हाला ते पाहिजे होत्या घरात. आता ते काही करू शकत नाही तर लगेच माहेरी पाठवता. असं तर जाऊ नाही देत तुम्ही त्यांना.
हे बरोबर नाही वाटत ना. "

विमलताई सुनिलला म्हणाली —" तुझ्या बायकोला समजून सांग. हे माझं घर आहे. मीं सांगेन तेच होईल. "

सुनीलने नेहाला गप्प बसायला सांगितलं.

रश्मीने हे सगळं ऐकला. तिला खूप वाईट वाटला. ती रडत म्हणाली —" जाऊ दे नेहा. मीं माहेरीच जाते."

अनिल दुसऱ्या दिवशी तिला माहेरी सोडून आला.


काही दिवस गेले. घर अस्तव्यस्त झालं. स्वयंपाकघरात पसारा , कपडे न धुतलेले, वेळ न पाळलेला. नेहा दमून घरी यायची, ती जेवढं होईल तेवढं करायचं प्रयत्न करायची.पण सगळं सांभाळणं अवघड झालं.

एके दिवशी अनिल त्रस्त होऊन म्हणाला—
“आई , रश्मी होती तेव्हा घर नीट चालायचं. आता काहीच वेळेवर नाही.”
सुनील पण म्हणाला —"वहिनी असल्यावरच घर आणि आपण व्यवस्थित असतो."

विमलाबाईंचा आवाज कोमल झाला,
“हो रे, आपण तिला किती बोललो आणि तिला कधी सन्मान नाही दिला. पण तीच या घराची आत्मा आहे .”



महिनाभरांनी, रश्मी बरी झाली. सगळे तिला आणायला माहेरी गेले.

दारात उभी रश्मीला बघून सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आलं.
विमलाबाई म्हणाल्या—
“रश्मी, आम्हाला माफ कर. तुझ्याशिवाय घर घरच नव्हतं.”

रश्मीने हलकंसं स्मित करत म्हटलं—
“सासूबाई, मी सगळ्यांसाठी आहे, पण आता मी स्वतःलाही थोडं महत्व देणार आहे.”

नेहा पुढे आली आणि रश्मीच्या कानात हळूच हसत म्हणाली—
“वहिनी , आता घरात कामाला बाई ठेवली आहे . तिचा पगार आम्ही सगळे मिळून देऊ. आणि तुम्हालाही सगळे मिळून तुमच्या खर्चासाठी पैसे देण्याचे ठरवले आहे.”

रश्मीच्या डोळ्यांत आनंदाश्रू चमकले.
ती म्हणाली—“नेहा, तू नसतीस तर मी कधीच धाडस केलं नसतं.जाऊ असूनही तू बहिणीसारखी काळजी दाखवली.”

नेहा हसत म्हणाली—
“आता अजून थोडं नाटक करा वहिनी — दोन दिवस लंगडत चाललं पाहिजे, नाहीतर आपलं रहस्य सगळ्यांना कळेल !”

दोघी जावा खळखळून हसल्या.

त्या दिवसानंतर सगळं घर बदललं. विमलाबाई रश्मीला “सून ” म्हणताना खऱ्या प्रेमाने बोलायच्या, अनिल पण रश्मीने बोललेलं ऐकायचा.

घर पुन्हा उजळलं, पण आता त्या उजेडात रश्मीचं अस्तित्व चमकत होतं —
शांत, पण मजबूत.



शांतता म्हणजे कमकुवतपणा नसतो , संयम असतो.
0