Login

अस्तित्व भाग १३ अंतिम

श्रावणी लोखंडे



(वकिल येतात दोन्ही मुलं त्यांच्या सुना तिथेच बसलेल्या असतात.मोठ्या मुलाला तर धीरच नसतो कारण आजीआजोबांची संपत्ती खूप असते.

शीतल चहा टेबल वर ठेऊन जातचं असते की...... वकील तिला थांबवून घेतात.)आता पुढे



शीतल थांबते.वकील मृत्यूपत्राचा वाचन करतात.

मी दामोदर रावजी मालुसरे माझी सगळी संपत्ती माझ्या दोन्ही मुलांच्या नावे करीत आहे. त्यात माझा हा राहता बंगला, गावची शेती,आणि गोव्यामध्ये घेतलेली जागा याचे समान दोन भाग करून माझ्या दोन्ही मुलांच्या नावे करीत आहे. तरी माझ्या आणि माझ्या पत्नीच्या नावे दादर मध्ये असलेला फ्लॅट  मी स्वइच्छे शीतल च्या नावे करीत आहे.

स्वरा च्या नावे काही रोख रक्कम बँकेत फिक्सडिपॉजिट मध्ये आहे तरी ती  कागदपत्रे स्वराच्या वयाच्या अठराव्या वर्षानंतर तिच्या सुपूर्त करावी.



मृत्यूपत्राच वाचन झाल्यानंतर वकील ती कागदपत्रांची फाईल आजोबांच्या मोठ्या मुलाच्या हातात देतात आणि निघून जातात.शीतल मात्र खूप मोठ्या पेचात पडते.कारण आजोबांच्या मोठ्या सूनबाईंना हा निर्णय फार काही रुचलेला नसतो.त्या नुसत्या चरफडत असतात."कोण कुठली मोलकरीण........ तिला संपत्तीमध्ये भागीदारी दिलीच कशी".म्हणून मोठ्या सुनबाई बडबड करत असतात. रागाच्या भरात त्या शीतल आणि स्वरा ला मध्यरात्री घरातून हाकलून देतात. आजोबांच्या घरी कामाला बाई  असते.... तीच नाव लता ........ तिचा नवरा बाजूच्या सोसायटीमध्येच वॉचमनची नोकरी करत होता. त्याने शीतल आणि स्वरा ला रात्री रस्त्यावरून जातांना पाहिले.त्याने शीतल ला आवाज देऊन थांबवलं....तेंव्हा शीतल ने घडला प्रकार त्यांना सांगितला. हे ऐकून तर त्याला रागच आला पण नोकर माणसं काय करणार म्हणून तो गप्प बसला. त्याने तडक बायको ला निरोप पाठवून बोलावून घेऊन शीतल आणि स्वरा ला त्यांच्या घरी राहण्याची विनंती केली. शीतल पण एवढ्या रात्री विचार करत बसण्यापेक्षा लगेच त्यांच्या सोबत गेली.दुसऱ्या दिवशी सकाळी शीतल उठली स्वराच सगळं आवरलं आणि घरातून बाहेर पडली. आजोबांच्या ओळखीने शीतलने स्वतःच घर घेतलं होतं आणि आजीआजोबांच्या ७५ व्या लग्नाच्या वाढदिवशी ती त्या घरात शिफ्ट होणार होती पण त्या आधीच दोघे तिला पोरकं करून गेले होते.शीतलने तिकडे जाऊन बिल्डरशी बोलून घेतलं आणि येत्या दोन दिवसांतच शिफ्ट होण्याबाबत सांगितलं. शीतलने उरलेले दोन दिवस सगळ्या लागणाऱ्या वस्तूंची खरेदी केली आणि लता ताईंच्या छोट्याश्या घरात आणून ठेवली. दोन दिवसांनी शीतल स्वरा सोबत तिच्या घरी शिफ्ट झाली. शीतल,स्वरा,लता ताई त्यांचा नवरा आणि आजीआजोबांच्या जवळच्या मित्रपरिवारातील काही जवळचे लोक अश्या थोडक्याच माणसांच्या उपस्थितीत गणेश पूजन करून घरात प्रवेश केला. शीतल गणेश पूजनाचे आमंत्रण करायला बंगल्यावर गेली असता मोठ्या आणि धाकट्या सुनबाई तिला दारातूनच हाकलून देतात.

शीतल तिच्याकडे असलेला आजीआजोबांचा फोटो मोठा करून घेते आणि तिच्या नव्या घरी लावते.दोन दिवसांनी ती त्याच वकिलांना बोलावून संपतीबाबत हक्कसोड पत्र तयार करून घेते आणि आजीआजोबांच्या इस्टेटीमधून स्वतःच आणि स्वराच नाव काढून टाकते आणि त्याच्या वाट्याला आलेली प्रॉपर्टी पुन्हा आजीआजोबांच्या मुलांच्या नावे करून ती स्वतः वकिलांसोबत बंगल्यावर जाऊन ती कागदपत्रे त्यांच्या सुपूर्त करते.

शीतल पुन्हा तिचे क्लास चालू करते.स्वराची शाळा तिचा अभ्यास आणि तीच काम या सगळ्यात कधी स्वरा मोठी झाली कळलंच नाही. महेश ला पण पश्चाताप झाला होता पण शीतल च्या निर्णयापुढे त्याच काही च चालत नव्हतं.अशातच शीतल ची आई गेली.पण काका काकूंनी तिला शेवटचं आई ला बघूही नाही दिल...... उलट तिलाच नको नको ते बोलल्या.शीतल तिथून निघून आली.त्यानंतर तिने काही झालं तरी खचायचं नाही असं ठरवलं.शीतलने स्वरा ला स्वतःच्या पायावर उभं राहता येईल एवढं शिकवलं.स्वरा आता एका खाजगी कंपनीत चांगल्या पदावर कामाला लागली होती.तिच्याच कंपनीत आनंद नावाच्या मुलाचं तिच्यावर प्रेम होतं.त्याने तस स्वरा ला सांगितल होत पण स्वराने आई ला विचारून मग सांगेन अस उत्तर दिलं.

आनंद पण अनाथ होता. आश्रम मध्ये राहून त्याने स्कॉलरशिप च्या जोरावर स्वतःच शिक्षण पूर्ण करत ही नोकरी मिळवली होती.मोठ्या टॉवर मध्ये स्वतःच्या मालकीचा फ्लॅट होता. सगळ्या सुख सुविधा होत्या आणि मुख्य म्हणजे निर्व्यसनी आणि शांत स्वभावाचा होता.

स्वरा घरी गेल्यावर शीतल ला सगळं सांगते.शीतल आधी आनंद ला भेटल्यावर मग बघू काय ते अस स्वरा ला बोलते. शीतल तिच्या एका ओळखीच्या व्यक्तीकडून आनंद विषयी सगळी माहिती घेते. त्यात तिला आनंद खूप चांगला आणि सगळ्यांना मदत करणारा मुलगा आहे आणि त्या आश्रमात तो अजूनही इतर लहान मुलांना भेटायला जातो अस समजतं.मनोमन शीतल सुखावते आणि मग आनंद ला भेटून तिची त्या दोघांच्या लग्नाला संमती दर्शवते.

स्वरा तिच्या वाढदिवसाच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे पप्पांना माफ करण्याचा हट्ट करते. आणि शीतल नेहमीचं तीच उत्तर देते " नाही ".......

कारण काही जखमा या खूप खोलवर आघात करतात ज्या भरल्या तर जातात पण त्यांचे व्रण तसेच असतात.

सहा महिन्यांनी स्वराच्या लग्नाची तारीख निघते आणि शेवटी तो लग्नाचा दिवस उजाडतो.आनंदची ईच्छा असते की,त्याच लग्न आश्रमात व्हावं कारण एवढ्या सगळ्या मुलांना हॉल वर घेऊन जाणं शक्य नव्हतं.शीतल पण त्याला परवानगी देते.आश्रम मध्ये पण आनंद सगळ्यांचा लाडका असतो आणि स्वराला पण सगळेच ओळखत असतात त्यामुळे आश्रमाला सगळे मिळून खूप छान सजवतात. आनंद सगळ्या मुलांसाठी कपडे घेतो.लग्नाच्या दिवशी सगळे जण छान तयार होऊन आले असतात.

महेश पण बाप म्हणून कुठेच कमी पडत नाही. एकत्र राहणं नाही पण लेकीचं कन्यादान तरी दोघांनी एकत्र करा अशी शेवटची इच्छा स्वरा व्यक्त करते आणि शीतल सुद्धा या साठी तयार होते.स्वरा च लग्न लागतं..... बोट धरून चालणारी स्वरा आता नवऱ्यासोबत आयुष्याचा प्रवास करायला निघाली होती. स्वराची पाठवणी होते सगळे लग्नाचे विधी आटोपत शीतल पण नव्या जोडप्याला घरी पाचपरतावणाला बोलावते.सगळं झाल्यावर घराच्या किल्ल्या आणि कागदपत्रे जी तिने स्वराच्या नावे केली असतात ती फाईल स्वरा आणि आनंद दोघांच्या हातात देते आणि पुढील आयुष्य आनंदच्या आश्रम मध्ये त्या मुलाबाळांसोबत घालवायच ठरवते.

महेश ला भेटायचा तेवढा एकटेपणा भेटला होता.आता त्याच्या पण आयुष्यात कुणीच नव्हतं.भाऊ होता पण तो बायकोच्या तालावर नाचणारा एक बाहुला झाला होता.म्हणून तो वेगळा राहत होता आणि शीतलने तीच अस्तित्व तिचा मान सन्मान स्वकष्टाने कमावला होता त्यामुळे पुन्हा महेश शी नातं जोडून तिला सगळं गमवायच नव्हतं.

समाप्त.......

 माझ्या काही वयक्तिक कारणांमुळे कथेचा शेवटचा भाग पोस्ट करायला थोडा वेळ लागला त्यासाठी क्षमस्व...... तुम्ही कथेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे मनापासून आभार. अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी मला फॉलो करत राहा.... धन्यवाद.????????

श्रावणी लोखंडे.


0

🎭 Series Post

View all