अस्तित्व भाग 11

मराठी कथामालिका अस्तित्व

अस्तित्व भाग 11

मागच्या भागात आपण पाहिले होते की आकाशला फोन करणाऱ्याचे नाव समजत नाही. मनाली तिच्या सरगम ग्रुपला भेटणार असते...आता पुढे

संध्याकाळचे सहा वाजले होते. बरोबर नियोजित वेळेत मनाली त्यांच्या ठरलेल्या कॅफेमध्ये पोहोचली. समीर तिथे आधीच आलेला होता.
"हाय समीर , बाकीचे अजून आले नाहीत. मला वाटलं मलाच उशीर झाला आहे."

"नाही; मी पण आत्ताच आलोय."
समीरने उत्तर दिले.

तेवढ्यात राकेश तिथे पोहोचला.
"बापरे;काय ट्राफिक होतं. ब्रेक दाबून दाबून माझा पाय दुखायला लागलाय."

"इथे हे नेहमीचे आहे रे."
समीर म्हणाला.

"म्हणूनच मी आज गाडी आणली नाही."
मनाली आपल्या बॅगमधून एक डायरी काढत म्हणाली.
तेवढ्यात तिचा फोन वाजला. आकाश चा फोन होता. मोजकेच बोलून तिने फोन ठेवला. त्यामुळे राकेशने विचारले,
"काय झालं?कशाबद्दल बोलत होता तो?"

"तेच कालच्या कॉल बद्दल.".... मानसीने उत्तर दिले

"कॉल बद्दल काय म्हणाला?"
समीरने उत्सुकतेने विचारले.

"तेच ते मित्रांनी चेष्टा केली होती."

"मला ना अजूनही या आकाश वर विश्वास नाही."

"बस मला आता यावर चर्चा नको आहे." मनाली चिडून म्हणाली.
तेवढ्यात तिथे निशा पोहोचली.
"ये तुम्ही ऑर्डर दिली आहे का?"

"नाही अजून, तुझीच वाट पाहत होतो."
समीर म्हणाला.

" मनू चल आपण ऑर्डर देऊन येऊ; मला खूप भूक लागली आहे."

मनालीआणि निशा ऑर्डर देण्यासाठी काउंटर वर गेल्या.
तोपर्यंत इकडे राकेश एकसारखा समीर कडे बघत होता.
समीरच्या ते लक्षात आले
"बोल काय बोलायचे आहे तुला."
समीर राकेश ला म्हणाला.

"कालपासून एक विचार डोक्यात चालू आहे."
राकेश बाईकची चावी फिरवत म्हणाला.

"आधी ती चावी फिरवणं बंद कर आणि मग बोल."
समीर म्हणाला.
राकेशने चावी खाली ठेवली आणि म्हणाला

"मला असं वाटतंय हा कॉल तू तर केला नाहीस ना."

यावर समीर हसायला लागला.
"तुला खरंच असं वाटतंय."

"हो म्हणजे बघ ना हे लग्न जर मोडलं तर तुलाच फायदा होईल."
राकेशने आपला मुद्दा स्पष्ट केला.

"हो खरंतर मला आनंद झाला असता असं झालं असतं तर.... पण माझ्या नशिबात ती नाही; हे मी स्वतःला समजावल आहे. त्यामुळे तुझे हे डिटेक्टिव डोकं आहे ना ते चालवणे जरा बंद कर."

"सम्या ,तुझ्यासारखा मूर्ख माणूस मी बघितला नाही. मला वाटलं होतं तू तिला प्रपोज करशील; पण तू शांत बसला आणि मलाही काही बोलू दिले नाही."
राकेश रागाने म्हणाला.

"अरे कस बोलणार होतो.माझ्याकडे ना चांगली नोकरी आहे ना स्वतःचं घर.याउलट आकाश वेल सेटल आहे.त्याची घरची परिस्थिती देखील चांगली आहे. असं असल्यावर त्याचा विचार सोडून काका - काकू तरी मनालीचा हात माझ्या हातात द्यायला तयार झाले असते का ? तू मित्र आहे म्हणून विचार करतोय आणि तसे बघायला गेले तर मनाली ने ही या लग्नाला होकार दिला आहे. मला आता कमीत कमी तिचा एक चांगला मित्र म्हणून राहायचे आहे उगाच दुसरा विचार तिच्या डोक्यात टाकून मैत्रीमध्ये दुरावा नको."

निशा आणि मनाली ला येताना पाहून दोघेही शांत झाले.
तोपर्यंत ग्रुपचे बाकीचे मेंबर ही पोहोचले. सर्वजण आल्यावर मनालीने गायकवाड सरांनी दिलेली माहिती सगळ्यांना सांगितली.पुढे ती म्हणाली,
" आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे, सर म्हणालेत की, आपण गायनाच्या जिथे जिथे कॉम्पिटिशन असतील त्यामध्येही पार्टिसिपेट केले पाहिजे ज्यामुळे आपल्याला अजून चांगल्या संधी मिळू शकतील."

" ही आयडिया छान आहे.यामुळे आपल्या नवीन ओळखी पण होतील.
निशा म्हणाली.
" हे कॉम्पिटिशनचे सिंगर वाले बघा ...आम्हाला फक्त आपल्या ग्रुप प्रोग्रॅम चे सांगत जा."
राकेश म्हणाला.

"ठीक आहे मग ...प्रॅक्टिस साठी भेटू .उशीर झाला आहे आता निघू.."
निशा म्हणाली.
क्रमशः


🎭 Series Post

View all