अस्तित्व भाग 12

अस्तित्व - मराठी कथा

अस्तित्व भाग 12

मागच्या भागात आपण वाचले राकेश आणि समीर मध्ये मनाली विषयी चर्चा होते त्यानंतर सरगम ग्रुपचे पुढच्या कामाचे नियोजन होते....आता पुढे

राकेशने घरी जात असताना मनालीला विचारले
" मनू तू कॉल बद्दल आई बाबांना काही सांगितले आहे का?"
यावर मनाली लगेच म्हणाली,

"अजिबात नाही आणि तू ही काही बोलू नकोस. उगाच त्यांना परत टेन्शन येईल. तसही आकाश ने सगळं क्लियर केले आहे."

"हो पण त्याच्या बोलण्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये हे मी पण तुला क्लियर करतो."
राकेश जरा चिडून म्हणाला.

यावर मनाली शांत बसली.
थोड्यावेळात दोघे घरी पोहचले. जेवण आटोपल्यावर चौघही गप्पा मारत बसले होते. त्याचवेळेस आकाश च्या बाबांचा माधवरावांचा दिलीप रावांना फोन आला. दहा ते पंधरा मिनिट दोघांचे ही बोलणे झाले. दिलीप रावांनी फोन खाली ठेवला आणि कांचन ताईंनी घाईघाईने त्यांना विचारले,

" काय झालं? कशासाठी आला होता त्यांचा कॉल?"

दिलीपराव सांगू लागले,
" उद्या त्यांनी आपल्या दोघांनाही त्यांच्या घरी बोलावले आहे लग्नाची तारीख पक्की करण्यासाठी.त्यांच्या ओळखीतल्या ब्राह्मण काकांना बोलावले आहे तारीख काढण्यासाठी."

" अरे पण अचानक येवढ्या घाईने का ?" याबद्दल आकाश मला काहीच म्हणाले नाही. संध्याकाळी तर कॉल झाला आमचा."

यावर राकेश लगेचच
" बघा, मी तर म्हणतो परत एकदा विचार करा.मला तर गडबड वाटते आहे."

"गप्प बस रे तू. उगाच काहीतरी बडबडत असतो.गडबड कसली.आकाश रावांचे सुट्टीचे प्रॉब्लेम आहेत आणि लग्न जमवलं आहे तर कशासाठी थांबायचे म्हणून म्हणाले.आणि बरोबरच आहे त्यांचे."
दिलीपराव चिडून म्हणाले.

पुढे ते कांचन ताईंना म्हणाले
" उद्या संध्याकाळी पाच वाजता जायचे आहे त्यांच्याकडे ..वेळेवर आवरून ठेव."

कांचन ताईंनी यावर होकारार्थी मान हलवली आणि दोघेही झोपायला गेले. ते दोघे गेल्यानंतर मनाली विचारात पडली.तिला असे विचार करताना पाहून राकेश तिला म्हणाला,

" तू पण तोच विचार करते आहे ना जो मी करतोय."

त्याच्या या बोलण्याने मनाली आपल्या विचारातून बाहेर आली आणि तिने त्याला विचारले,
" काय विचार करताय आपण बंधुराज."

"हेच की हा आकाश दिसतो तसा सरळ नाहीये.नक्कीच काहीतरी गडबड आहे. काल एका व्यक्तीचा कॉल येतो आणि आज लगेच त्याच्या घरचे लग्नाची तारीख पक्की करण्यासाठी फोन करतात.नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय ."

राकेश आपले दोन्ही डोळे बारीक करत मनालीच्या आजूबाजूला फिरत फिरत हे बोलत होता.

" मला अजूनही हे पटत नाहीये की, तो कॉल त्याच्या मित्राने केला होता.तो साफ खोटं बोलतोय."
मनाली च्या अगदी कानाजवळ येऊन राकेश म्हणाला,
"बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये; नीट विचार कर आपण उद्याही त्याला नाही म्हणून सांगू शकतो आणि तू दिसायलाही बरी आहे तर दुसरा मुलगा तुला मिळू शकेल."

त्याचे हे शेवटचे वाक्य ऐकून मनाली,
"काय म्हणालास, मी बरी दिसते काय" म्हणत
उठून त्याला मारायला त्याच्या मागे धावायला लागली.राकेश हसत पुढे पळत होता तर मनाली त्याच्या मागे.
पाच मिनिटांचा दोघांचा पाठशिवणीचा खेळ झाल्यावर दोघेही दमून सोफ्यावर बसले तसे राकेश परत तिला म्हणाला,
" जोक्स अपार्ट, पण खरंच मला त्याच्यावर विश्वास नाहीये."

" तू ना तुझं डिटेक्टिव्ह डोकं चालवणे जरा बंद कर. उगाच टेन्शन देतोस.जा जाऊन झोप."
मनाली शक्य तितक्या शांत स्वरात म्हणाली.

"आणि तू काय करणारे .... माझं सोड तू जास्त विचार न करता जाऊन झोप नाहीतर लनाच्या वेळेसच डोळ्याखाली काळी वर्तळू तयार होतील."

" गप रे तू."... यावेळी मात्र मनाली काहीशी वैतागून म्हणाली.
" ठीक आहे, मला काय मी जातो झोपायला.तू बस आकाश स्वच्छ आहे का अंधारलेलं याचा विचार करत."
मनालीला राकेश च्या बोलण्याचा रोख समजला होता.तिने फक्त राकेश कडे एक कटाक्ष टाकला आणि आपल्या रूममध्ये झोपायला गेली.
इकडे आकाश आणि माधवराव गप्पा मारत बसले होते.

" तुला नक्की विश्वास आहे ना, जे तू ठरवले आहे तेच होईल."

माधवरावांच्या बोलण्यावर आकाश त्यांच्याकडे प्रश्नार्थक कटाक्ष टाकतो.त्याचा बघण्याचा रोख लक्षात घेऊन माधवराव पुढे म्हणाले,
"नाही म्हणजे उद्या तो तुझ्या ऑफिस मधला तुझा सहकारी बदलून पडला मग......विश्वास आहे ना तुला नाहीतर तेल गेले , तूप गेले आणि हाती धुपाटणे आले !
असं व्हायचं आपलं."

"नाही हो बाबा, तुम्ही त्याची काळजी करू नका. फक्त लग्नाची लवकरात लवकर तारीख काढा; म्हणजे सगळं वेळेत होईल."
क्रमशः
काय कारण असेल की आकाश लवकर तारीख काढायला सांगतोय. राकेश म्हणतोय ते बरोबर असेल का?
जाणून घेण्यासाठी वाचत रहा अस्तित्व...
********
सुजाता इथापे




🎭 Series Post

View all