अस्तित्व भाग 2

Marathi Story
अस्तित्व भाग 2

मागच्या भागात आपण मनाली आणि तिच्या परिवरा विषयी वाचले आता पुढे.....

"बाई, बाई काय घाई झाली होती लेकाच्या लग्नाची फोन करून सुद्धा विचारावेसे वाटले नाही तुम्हा दोघांना.आणि मी मेली उगाचच ज्याला त्याला भावाचे आणि भाच्याचे कौतुक सांगत बसते."
आकाशच्या आत्याला ( मंजिरी ताई ) येऊन एक तासही झाला नव्हता तर त्यांचा तोंडाचा पट्टा चालू झाला होता.

"अहो ताईसाहेब इथे माझं कोण ऐकतय.किती मागे लागले होते यांच्या आणि आकाशच्या. एकदा ताई साहेबांना बघून जाऊदे मुलगी नंतर पुढचं ठरवू पण नाही तुमचा भाचा गुढग्याला बाशिंग बांधून बसला होता.काय बघितलं काय माहीत तिच्यात."

"अग ताई आकाश म्हणाला केलं तर त्याच मुलीशी लग्न करेन म्हणून मग तुझी येण्याची वाट बघितली नाही पण त्यासाठीच तर तुला दोन महिने आधी बोलवल.तुझ्या सवडीने घे मुलीला बोलून आणि हवं ते विचार."
आकाश चे वडील माधवराव बहिणीची समजूत काढत म्हणाले.

"ते तर मी करेलच रे पण निदान एखादी कमावणारी मुलगी बघायची.ही काय गाणारी बघितली."
मंजिरी ताई तणतणत म्हणाल्या.

"तुमच्या भाच्याला त्याच्यापेक्षा वरचड मुलगी नको होती."
शालिनी ताई चहाचा कप मंजिरी ताईंच्या हात हातात देत म्हणाल्या.

"वरचड कशाला त्याच्यापेक्षा कमी कमावणारी ही मिळाली असती ना."

"तुझ सगळ बरोबर आहे पण हे तुझ्या भाच्याला कोण समजावणार ."
माधवराव चहाचा घोट घेत म्हणाले.

यावर हात झटकत मंजिरी ताईंनी शालिनी ताईंना विचारले
" किती वाजता येणार आहे तुझा लेक."

"सात वाजेपर्यंत येईल.त्यालाच विचार मग.मी लागते स्वयंपाकाला.तुम्ही थोडा आराम करा."

"आराम कसला करते आता. आण भाजीबिजी निवडायची असल तर देते निवडून."

मंजिरी ताई माधवरावांची मोठी बहीण.लग्न झाल्यावर एक दोन वर्षातच त्यांचे यजमान एका अपघातात गेले तेव्हापासून त्यांच्यामागे सगळा कामाचा व्याप मंजिरी ताईंनीच सांभाळला होता. त्यांच्या घरी त्यांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ होती.सगळा आर्थिक व्यवहार त्याच्या हातात होता.त्यामुळे माधवराव ही आपल्या बहिणीला सांगुनच सगळ्या गोष्टी करत.मंजिरी ताईंना मुलं- बाळ नव्हते.आकाश त्यांचा लाडका भाचा होता. पण माधवरावांनी आकाश चे लग्नं त्यांच्या परस्पर ठरवले होते. म्हणून मंजिरी ताई नाराज होत्या.

'आकाश आल्यावर त्याला चांगला फैलावर धरते.'
असा मनात विचार करत मंजिरी ताई एकीकडे रागा रागाने भाजी निवडत होत्या.

तेवढ्यात
"पेहला पेहला प्यार है
पेहली पेहली बार है"

हे गाणं गुणगुणत आकाश आत आला आणि हॉल मध्ये असलेल्या जिन्याने वरती जाऊ लागला.

किचन मधुन वरती गुणगुणत जाणाऱ्या आकाश ला आत्याने बघितले आणि मोठ्याने म्हणाल्या,

"वा वा...सुनेने तर घरी येण्याआधीच सगळ्यांना आपल्या तालावर नाचायला लावलेले दिसते.नाही नाही चुकलंच नाचायला नाही गायला. शालिनी ढोलकी घे तू वाजवायला."

हे एकूण वरती जाणारा आकाश तिथेच थांबला आणि
अरे आत्या तू खालीच आहेस तर असे म्हणत पळतच जिना उतरला आणि किचन मध्ये जाऊन आत्याच्या गळ्यात पडला.
"कशी आहेस आत्या तू?"

भाच्याच्या मिठीने आत्याचा राग जरा कमी झाल्यासारखा वाटला.

"मी चांगली आहे रे पण तुला काय झालंय असं वागायला."

"काय झाले आत्या आणि तू इथे किचन मध्ये काय करते आहे मी तर वरती तुझ्या रूम मध्ये जाणार होतो तुला भेटायला.तुझ्यासाठी तुझी आवडती मटकी भेळ पण घेऊन आलो आहे."

" लबाड आहेस हो.आत्याचा राग काय लगेच भेळीने जाणार नाही. आधी तुझ्या होणाऱ्या बायकोला घेऊन ये."

"एवढंच ना .उद्याच येतो तिला घेऊन."

एवढं बोलून आकाशने भेळीच पॅकेट आईकडे दिले आणि म्हणाला
"आई हे बघ भेळ घेऊन आलो आहे ती काढून ठेव नाहीतर मऊ पडेल मी आलोच फ्रेश होऊन."

"लवकर ये रे तू आल्यावरच खाऊ एकत्र."
मंजिरी ताई लाडक्या भाच्याला म्हणाल्या.

माधवराव आणि शालिनी ताई मात्र एकमेकांकडे बघत हाच विचार करत होते की लेकाला बरोबर आत्याचा राग काढता येतो.

थोड्यावेळात आकाश खाली आला.आपल्या परीने त्याने आत्यांची मनधरणी केली आणि उद्याच मनालीला भेटायला घेऊन येण्याचे प्रॉमिस त्याने आत्याला केले.
क्रमशः

कशी होईल मनाली आणि आत्याची पहिली भेट वाचू पुढील भागात.


🎭 Series Post

View all