अस्तित्व भाग-6

Marathi Story
अस्तित्व भाग-6

मागच्या भागात आपण वाचले दिलीप रावांचा फोन आल्यावर आकाश त्यांना भेटायला त्यांच्या घरी जाण्यासाठी निघतो आता पुढे.....

आकाश मनालीच्या घरी पोहोचला होता. सर्वजण हॉलमध्ये बसले होते. बोलायला कुठून आणि कशी सुरुवात करायची हाच प्रश्न आकाश आणि मनालीच्या फॅमिलीच्या मनामध्ये होता. त्यामुळे आकाश आल्यानंतरही पाच दहा मिनिट सर्वजण शांत बसले. बाबा काहीच बोलत नाही हे पाहून राकेशने सुरुवात केली

"आकाश मी डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालतो.
सरळ सरळ गोष्ट आहे मनालीला गाण्यात करिअर करायचं आहे आणि तिची जर ही इच्छा लग्नानंतरपूर्ण होणार नसेल तर हे लग्न होणार नाही."

राकेश चे हे डायरेक्ट बोलणं ऐकून दिलीपराव म्हणाले
"राकेश थांब जरा."

"अहो बाबा... आत्ताच काय ते स्पष्ट बोललेल बरं नंतर प्रॉब्लेम नको."
राकेश आकाश कडे बघत म्हणाला.

"बरोबर आहे तुझं. म्हणूनच सगळे स्पष्ट करायला मी इथे आलो आहे. काल मनाली चा फारच मोठा गैरसमज झाला."

हे ऐकून म्हणाली लगेच म्हणाली

"गैरसमज.... असं कसं म्हणू शकता तुम्ही. तुमच्या आत्या मला सरळ सरळ गाणं गाण्यासाठी नाही म्हणत होत्या. आणि तुम्हीही काही बोलले नाही. तरीही तुम्ही म्हणतात माझा गैरसमज झाला."

"मनाली जरा शांततेत ऐकून घेशील. तुझं म्हणणंही मला पटतंय, पण तूच जरा विचार कर तुला हे कोण म्हणाले आई किंवा बाबा म्हणाले का? तर नाही माझ्या आत्या म्हणाल्या. ज्या फक्त पाहुणे म्हणून आल्या आहेत. आपले लग्न झाल्यावर त्या त्यांच्या घरी जाणार. त्यांच्या बोलण्याचा तू एवढा सिरीयसली विचार करू नकोस.
आमच्या घरात आत्याचा सर्वच जन आदर करतात त्या तुला असं म्हणाल्यावर त्यांना उलट बोलणं बरं वाटलं नसतं. म्हणून मी आत्याच्या बोलण्यावर काहीच म्हणालो नाही. त्यांना वाईट वाटलं असतं. शेवटी मोठ्यांचा आदर करणे लहानांचे कर्तव्य असते. हो की नाही बाबा."
दिलीप रावांकडे बघत आकाशने आपले म्हणणे स्पष्ट केले.

"ते ठीक आहे पण लग्नानंतर नक्की तिला तिचं गाणं चालू ठेवता येईल ना."
दिलीप रावांनी अडखळतच विचारले.

"हो बाबा माझ्या आई-बाबांना काही प्रॉब्लेम नाहीये.
आणि तुम्ही सगळेजण एक गोष्ट का विसरता , मी मनाली ला पहिल्यांदा भेटलो ते गाण्याच्या कार्यक्रमातच ना. तिचे गाणे ऐकून तर मी तिला लग्नाची मागणी घातली. मग मी तिचं गाणं कसं बंद होऊ देईल."
आकाश विश्वासाने म्हणाला.

"तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण कालच्या प्रकारामुळे जरा चिंता वाटत होती."
कांचन ताई म्हणाल्या.

हे ऐकून आकाश मनाली ला म्हणाला
" मनाली माझ्या आत्या या जुन्या विचारांच्या आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचे मत मांडले,पण त्यानुसारच सगळे घडेल असे नाही ना. आणि असेच असते तर मुळात आई-बाबाही या लग्नाला का तयार झाले असते."

आकाश सगळ्यांना पटवून सांगण्यात यशस्वी झाला होता.आकाश चे बोलणे ऐकून दिलीपराव आणि कांचन ताईंच्या चेहऱ्यावरचा तणाव दूर झाला होता.

दिलीपराव म्हणाले
" ठीक आहे, तुमच्यावर विश्वास ठेवतो.माफ करा पण हे सगळं स्पष्ट होणे गरजेचे होते तुम्हाला त्रास झाला..."

दिलीप रावांना मध्येच थांबवत आकाश म्हणाला

"मला त्रास नाही झाला पण लगेच बाबांना फोन करण्याआधी मनाली ने माझ्याशी बोलायला पाहिजे होते."
तो मनालीला पुढे म्हणाला
" तुला अजून काही विचारायचे आहे का?"

"नाही ."
मनाली ने एकच शब्दात उत्तर दिले.

"ठीक आहे .येतो मी ...तुमचा जो काही निर्णय असेल तो कळवा."
एवढे बोलून आकाश निघाला.
घरी पोहचल्यावर लगेचच शालिनी ताई त्याला म्हणाल्या
" काय झाले ..काय म्हणत होते तुझे होणारे सासरे."

"अग आधी त्याला बसू तर दे.किती ती घाई...जा पाणी आण त्याच्यासाठी."
मंजिरी ताई म्हणाल्या.

माधवराव तिथेच फोन वर बोलत होते.बोलून झाल्यावर त्यांनी आकाशला विचारले

" काय ठरले.... आम्ही लग्नाची तयारी करायची का दुसरी चांगली मुलगी बघण्याची."
यावर आकाश म्हणाला,

" बाबा, मला जे सांगायचं होते ते मी सांगितले आहे बघू आता ते काय निर्णय घेताय."

"म्हणजे,अजूनही काही बाकी आहेच का? तू कशासाठी गेला होता? आता ही वेळ आली आहे की आपण कोणाच्या तरी निर्णयाची वाट बघत बसायची."
माधवराव चिडले होते.

"बाबा, असे काही नाहीये.त्यांना एकमेकांशी बोलून काय निर्णय घ्यायचा असेल तो घेतील. फोन करून कळवा असे मी सांगून आलो आहे."

तेवढ्यात शालिनी ताई म्हणाल्या,

"गरजच काय आहे त्यांच्या फोन ची वाट बघायची. अहो तुम्ही फोन करून सांगा आम्हाला हे लग्न मान्य नाही."

"आई काहीतरीच काय बोलते. मी तिथे काय सांगून आलो आहे आणि तू."
"अरे पण तुला त्याच मुलीशी का लग्न करायचे आहे हे तरी सांगशील का आम्हला?"
माधवराव म्हणाले.

"बाबा , मी म्हणालो ना सांगेन वेळ आल्यावर."

"ती वेळ कधी येणार ? तोपर्यंत आम्ही कोणाच्याही हातातली कटपुतली व्हायचं का?"

"असे का बोलता बाबा ...जरा तरी समजून घ्या ना."
आकाश आणि माधवराव दोघांचाही आवाज चढला होता.
वातावरण बरेच तापलेले पाहून मंजिरी ताई मध्येच म्हणाल्या,

" आकाश तू चल माझ्या रूम मध्ये.जरा शांततेत बोलू आपण."
पुढे त्या माधवराव आणि शालिनी ताईंना उद्देशून म्हणाल्या
"तुम्ही दोघं जरा वेळ शांत बसा."

आकाश आणि आत्या बराच वेळ दोघेच बोलत होते.
माधवराव आणि शालिनी ताईंना काय चालले आहे काही कळत नव्हते.

क्रमशः

काय बोलणे झाले असेल दोघांमध्ये? दिलीपराव काय निर्णय घेतील वाचू पुढील भागात.
**अस्तित्व**
**************
सुजाता इथापे.



🎭 Series Post

View all