अस्तित्व भाग 7

Marathi Story
अस्तित्व भाग 7

मागच्या भागात आपण वाचले आकाश घरी आल्यावर माधवराव आणि शालिनी ताई चिडतात त्यामुळे मंजिरी ताई वाद वाढू नये म्हणून आकाशला आपल्या रूम मध्ये समजावण्यासाठी घेऊन जातात. आता पुढे

बराच वेळ झाला तरी आकाश चे आणि आत्याचे बोलणे चालू होते. त्या दोघांमध्ये काय बोलणे चालू आहे हे समजत नसल्याने माधवराव आणि शालिनीताईंची अस्वस्थता वाढत होती.
" हा आपलाच मुलगा आहे ना ओ."..... शालिनीताई
चिडून माधव रावांना म्हणाल्या.

" म्हणायचे काय तुला? स्पष्ट बोल."....माधवराव

" आपल्यापासून लपवून ठेवण्यासारखं असं काय आहे? एवढा वेळ झाला दोघांचाही पत्ता नाही.कमीतकमी ताई साहेबांनी तरी आपली घालमेल समजून घ्यायला नको का?"

"मग तुला काय वाटतं काय करते आहे ती. नशिब समज तो तिच्याशी तरी बोलतोय.मला माझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास आहे. ती बरोबर त्याला समजून सांगेन."
माधवरावांच्या या बोलण्यावर शालिनी ताईंनी नाक मुरडले आणि पुढे काहीही न बोलता शांत बसल्या.
*********
इकडे मनाली कडे आकाश गेल्यानंतर आता काय निर्णय घ्यायचा याची चर्चा चालू होती.
अजूनही राकेश ला आकाश च्या बोलण्यावर विश्वास नव्हता.तो म्हणाला
"मला नाही वाटत आकाश खरं बोलतोय. तो फक्त आत्ताची ही वेळ मारून नेतो आहे असं वाटतं."

"कशावरून? उगाच काहीतरी शंका काढू नको आता. एवढं सगळं स्पष्ट सांगितले ना त्याने आणि असही त्याचं काय नुकसान होणार होते हे लग्न मोडल असत तर उलट आपल्यालाच लोकांना जास्त उत्तर देत बसावे लागेल.आणि या लग्नासाठी तो खोटं कशाला बोलेल असं काय आहे आपल्याकडे की ज्याच्यामुळे त्याला हे लग्न करायचे आहे."

"तेच तर समजत नाही ना बाबा पण नक्की काहीतरी हिडन आहे."
राकेश आपले डिटेक्टिव्ह डोकं चालवत म्हणाला.

"राहू दे जे हिडन असेल ते हिडनच राहू दे. आता अजून चर्चा नको.मनू तू सांग काय करायचे तू जे म्हणशील तस आपण करू."
कांचन ताई लेकीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या.

"काही समजत नाही काय करू. खरं तर आत्ता जे काही त्याने सांगितले ते मला पटलं आहे."
मनाली तिघांकडे बघत म्हणाली.

"पटले ना,झाले तर मग. अहो आधी माधवरावांना फोन करून सांगा जसे ठरले आहे तसे सगळे करू."

" माधवरावांना काय फोन लावायला सांगतेस आधी आता आकाशलाच लावू नंतर त्यांच्याशी बोलतो."

" ठीक आहे तसं करा." .... कांचनताई
*********
"तू ना आकाश एक नंबरचा हट्टी आणि काय म्हणता ते इगो का काय तो ना तुझ्यामध्ये एवढा भरलाय ना.आता तुला काय बोलावे तेच मला समजत नाही."

"आत्या तुझ्यावरच गेलोय बरका इगो च्या बाबतीत आणि हा इगो नाही ग , तुला माहिती आहे मला कोणासमोर हरायला आवडत नाही. ऑफिस मध्ये कलिग बरोबर तर नाहीच नाही.सगळ्यांपेक्षा जास्त एफर्ट्स घेतो मी ऑफिसमध्ये त्यामुळे ही संधी मलाच मिळायला पाहिजे."

" अरे ते सगळं ठीक आहे पण यासाठी तू तुझं उभ आयुष्य या मुलीबरोबर घालणार का?"

"आत्या ,एवढी पण ती मुलगी काही वाईट नाहीये. दिसायलाही छानच आहे की. उलट त्या दिवशी तर तिच्याशी बोलण्यासाठी माझ्या ऑफिसमधले सहकारी स्पर्धा करत होते."

" ते पण आहेच म्हणा.दिसायला चांगली आहे पण ते गाणं तेवढं अडचणीचं. दुसरं नेऊ आपण निभावून."

" आत्या तू ते गाण्याचं सोड आणि आई - बाबांना कसं समजावयचे त्याचा विचार कर."

"ते मी बघते. तुझ्या आईला नको इतक्यात सांगायला उगाच त्या मुलीच्या समोर बोलून जायची सगळे. माधव शी मी जाताना बोलते."

"जाताना ...म्हणजे तू जाणार आहेस."

"आता ठरले ना सगळे, येईल लग्नाला ."

"हो पण अजून फोन कुठे आलाय त्यांचा. मी माझ्या परीने नीट समजावले आहे पण ....."

एवढे बोले पर्यंत आकाश च्या मोबाईलची रिंग वाजली

"आला..."

मोबाईल आत्याला दाखवत आकाश म्हणाला.
त्याने फोन उचलला.

"हा, बाबा बोला ना."

"आकाश राव तुमचे म्हणने पटले आहे आम्हाला.एकदा माधवरांशी बोललो असतो म्हणजे पुढचे ठरवायला बरे. ते आहेत का तिथे?"
दिलीपराव जरा संकोच करत म्हणाले.

" बाबा ना आहेत ना देतो त्यांच्याकडे."
हे बोलत असताना आकाशने आत्याला खाली चल म्हणून खुणावले होते.
दोघेही खाली आले.

आकाश मोबाईल म्युट करत माधवरावांना म्हणाला
" बाबा मनालीच्या वडिलांचा फोन आहे. बाकी काही विचारू नका. फक्त हो म्हणा."

हे बोलणं ऐकल्यावर माधवरावांनी कपाळाला हात लावत मोबाईल आपल्याकडे घेतला
" बोला दिलीपराव..."

" नमस्कार माधवराव, काल जरा गैरसमज झाला होता पण आकाश रावांनी तो मिटवला आहे तर ठरल्याप्रमाणे सगळे करू."

"नक्की ना आता तर काही शंका नाही ना मनात."

"नाही,काही शंका नाही."

"ठीक आहे मग पुढचे बोलू नंतर.."
एवढे बोलून माधवरावांनी फोन कट केला.

"झालं समाधान."
आकाश कडे मोबाईल देत माधवराव म्हणाले.

"अरे काय चाललंय काही समजेल का मला"
शालिनीताईंनी आकाशला विचारले.

"शालिनी , आता यावर जास्त चर्चा नको. झालय ना सगळं सुरळीत."
आत्या शालिनीताईंना म्हणाल्या.

"अहो पण ताईसाहेब...."

"पण नाही बिन नाही. माधवा मला निघावे लागेल सगळे काम अर्धवट टाकून आले होते.जायला हवे."

"हे काय तुम्ही लगेच जाणार."
शालिनी ताई आश्चर्याने म्हणाल्या.

"अग अजून वेळ आहे ना लग्नाला. तोपर्यंत माझे सगळे काम आवरून राहायलाच येते दोन-तीन महिने.
काय आकाश चालेल ना तुला न तुझ्या बायकोला."

"चालेल नाही आत्या पळेल."
आकाश हसत म्हणाला.

"माधव तू चल माझ्याबरोबर उद्या ये परत."

"हो ठीक आहे. एक तासाभरात निघू."
***********
क्रमशः
आकाश ने आत्याला तर खरं कारण सांगितले पण मंजिरी ताई (आत्या) सांगतील का आपल्या भावाला
वाचू पुढील भागात.
"अस्तित्व"
सुजाता इथापे.



🎭 Series Post

View all