अस्तित्व भाग - 8

Marathi Story
अस्तित्व भाग - 8

मागच्या भागात आपण वाचले आकाशने समजावल्यामुळे दिलीपराव माधवरावांना आपला निर्णय कळवल्यानंतर मंजिरिताई आपल्या घरी जाण्याचे ठरवतात. आता पुढे...

"हे बघ शालिनी आता जे काही ठरलंय ते आपलं नशीब समज. अगं आता माझ्या पसंतीची मुलगी या घरात आली असती तर माझ्या एवढा आनंद कोणाला झाला असता का?
पण आपल्या नशिबात तसं नव्हतं. उगाच आता तोंड पाडून बसू नको आणि सारखं सारखं मला सांगशील का असे म्हणत त्या मुलाच्या ही मागे लागू नको. तू मोठी आहेस तुलाच आता समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामागे ऑफिसची ही बरेच कामे असतात उगाच कटकट करून परिस्थिती बिघडू नकोस."
मंजिरी ताई शालिनीताईंना समजावत होत्या. यावर शालिनीताईनीं काही प्रतिसाद दिला नाही हे पाहून मंजिरी ताई पुढे म्हणाल्या.

"काय म्हणते मी येतय ना लक्षात?"
"हो ताई साहेब आले लक्षात. असेही मी काही म्हंटले तरी कोणाला काय फरक पडतो."

"झालं असं बोलले की संपले सगळे. नाही ना काही फरक पडत मग कशाला उगाच कटकट करायची."

"झालय का तुझे? निघायचे का?"
माधवरावांनी आपल्या बहिणीला विचारले.

"हो ...तुझीच वाट बघत होते. मी कधीची तयार आहे."

"आकाश कुठे गेलाय? त्याला माहित होते ना तू जाणार आहे ते."
माधवराव म्हणाले.

"अरे त्याचे काम होते विचारूनच गेलाय मला चल निघू आपण."

माधवराव आणि मंजिरी ताईं गेल्या.शालीन ताई घरी एकट्या होत्या.घडलेल्या गोष्टी मुळे नाराज होत्या.

' नवरा तर नवरा पण मुलगा सुद्धा मला काही सांगत नाही.'
स्वतःशीच बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.

तेवढ्यात दरवाजवरची बेल वाजली.
' कोण असेल आत्ता. आकाश असेल का '
हा विचार करत त्यांनी दरवाजा उघडला आणि समोर बघून,
"अग बाई, सुलभा तु तर उद्या येणार होतीस ना."
आत येत शालिनीताई म्हणाल्या.

त्यांच्या मागोमाग सुलभा ही आली.
सुलभा ताई अनेक वर्षापासून शालिनी ताईंकडे घरकाम करत होत्या. पंधरा - वीस दिवसांच्या सुट्टी नंतर त्या आज आल्या होत्या.

" मग कसं झालं पुतणीच लग्नं."

"चांगल झालं.आव आवरलं सारं समद्यांनी लवकर म्हणून मग आलो लवकर.एक तासभर झाला येऊन म्हणलं आधी एक चक्कर मारून तुम्हासणी सांगावा उद्यापासन येईन मी कामावर म्हणून आले."
एवढं बोलून सुलभा पुढे म्हणाली
" पर तुमाला काय झालं..चेहरा कमुन उतरलाय."

काही नाही , डोकं दुखतंय जरा आता आलीस आहे तर जा एक कप कडक चहा करून आण बघू."

"आत्ता आणते."

असे म्हणून सुलभा किचन मध्ये गेली.
***********
इकडे मंजिरी ताईंना सोडवायला जाताना माधवरावांनी आकाश चा विषय काढला होता.मंजिरी ताईंनी त्यांना जे घडले ते सांगितले होते.
" असे आहे तर सगळं, पण त्याला हे आम्हाला सांगायला काय झाले होते."
माधवराव मंजिरीताईंना म्हणाले

" हे बघ मुलं प्रत्येक गोष्ट आईवडिलांना सांगत नाही पण बाहेरच्यांना सांगतात."......मंजिरी ताई

"तू कधीपासून बाहेरची झाली.".....माधवराव

"तेच रे ...समजून घे.मी सांगितले ना तुला फक्त शालिनिला काही इतक्यात सांगू नकोस एकदा लग्नं पार पडल्यावर त्याचं ऑफिसच काम झाल्यावर सांग."

"चला म्हणजे या लग्ननाने काहीतरी तरी चांगलं घडेल.मला वाटलं होतं सगळीकडून आपले हात रिकामेच राहतील."

पुढे ते म्हणाले

"आकाश तसा त्याच्या करीयरच्या बाबतीत खूप सिरियस आहे हे मला माहीत होते पण तो असं काही करेल अस वाटलं नव्हतं."

"अरे आजकालची मुलं ही.लगेचच लढायला उठतात. थोडा सुद्धा कमीपणा घेत नाहीत."
त्या पुढे म्हणाल्या
"माधवा हे सगळं जाऊदे पण आता लग्न जोरदार झालं पाहिजे हां."

"हो तर जोरदारच करणार."
माधवराव हसत म्हणाले.
********
"बाईसाहेब आज कोणी पाहुण आलते काय ? लई भांडे पडलेत म्हणून ईचारलं ."
सुलभा शालिनी ताईंना म्हणाली.

"हो ...ताईसाहेब आल्या होत्या.दोन- तीन दिवस होत्या,आत्ताच गेल्या आहेत.साहेब त्यांनाच सोडायला गेले आहेत."

"असं व्हय."

"बरं चहा झाल्यावर भांडे घासून टाक आणि जा घरी. आज मी आणि आकाशच आहे जेवायला.जास्त काही करायचे नाहीये.उद्या सकाळी लवकर ये."

"बरं ..बर.."
एवढं बोलून सुलभा किचन मध्ये जाणार तेवढ्यात परत बेल वाजली...

"आकाश असेल"..... शालिनीताई

" मी बघते " म्हणत सुलभा दार उघडण्यासाठी गेली.

" अरे सुलभा मावशी ....तुम्ही कधी आल्या"
आकाश सुलभाला पाहून म्हणाला.

"आत्ताच आले."

एवढं बोलून आकाश वरती त्याच्या रूम मध्ये जाण्यासाठी निघाला तेवढ्यात त्याचे लक्ष शालिनी ताईंकडे गेले.तो परत मागे वळून शालिनीताईंकडे गेला.

" आई, काय झाले तुला अशी का बसली आहेस."

"काय होणार आहे मला..डोकं दुखतंय जरा म्हणून शांत बसले आहे..तू जा तुझ्या रूम मध्ये ..काम असतील तुला
माझ्याशी बोलायला इथे कोणाला वेळ आहे."

"आई ..असं का बोलतीस? लग्नाबद्दल सोडून बाकीचे काहीही बोल माझ्याकडे वेळच वेळ आहे."
आकाश आईच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाला.

मांडीवर लेकाने डोकं ठेवताच शालिनीताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.नकळत त्यांचा राग गळून पडला आणि त्यांचे मायेचे हात आकाशच्या केसातून हळूवार फिरू लागले.

आईने हात फिरवल्याबरोबर आकाश ने डोळे मिटून घेतले आणि तो म्हणाला

"आई आधी करत होती तशी चंपी करून दे ना आज डोक्याची."

"बरं देते.."
असे म्हणून शालिनीताईनीं सुलभाला तेलाची बॉटल आणायला सांगितली.

क्रमशः
शालिनीताई वेळ बघून विचारतील का आकाशला की आपल्या चतुराईने आकाश आईची समजूत काढेल वाचू पुढील भागात...
वाचत रहा "अस्तित्व"
******
सुजाता इथापे.


🎭 Series Post

View all