Login

Astro With सर्वेश... भाग १

Information
नमस्कार मंडळी,

'astro with सर्वेश' या नवीन सदरात तुम्हा सर्वांचे स्वागत...

खूप दिवसापासून ईरावर काहीतरी लिहिण्याचे मनात होते, पण कथा-मालिका वगैरे लिहिण्यास इतका वेळ नसल्याने, म्हटले आपला आवडता विषयच लिहून पाहूया.

तर सदराची सुरुवात आपण राशीपासून करूया.

राशी म्हणजे काय? आकाशात असलेल्या तारकांचा विशिष्ट समूह म्हणजे राशी, आणि आपल्या जन्माच्या वेळी ज्या 'राशी समूहात' चंद्र असतो, ती आपली जन्मराशी. उदा. आज ४ ऑक्टोबर २०२५ ला चंद्र कुंभ राशीत आहे, म्हणून आज जन्मलेल्या मुलाची जन्मराशी कुंभ असणार.

आकाशात चंद्र एकूण बारा राशींमध्ये सतत फिरत असतो. पूर्वीच्या काळात या जन्मराशीवरूनच माणसाला नाव दिले जायचे आणि त्यावरूनच त्याची जन्मराशी कोणती आहे हे ओळखले जायचे.

असे म्हणतात की राशीवरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व, त्याची स्वभाव वैशिष्ट्ये, भावनिक प्रवृत्ती आणि जीवन जगण्याची पद्धत याची माहिती मिळते. इतकेच नव्हे तर राशीनुसार शिक्षण, करिअर, नातेसंबंध, लग्न आणि आरोग्यासारख्या जीवनातील विविध पैलूंचा अंदाज वर्तवता येतो. आज विज्ञानाच्या दृष्टीने हे जरा हसण्यासारखे वाटले तरी, जन्मराशी आणि मनुष्याच्या जीवनातले वरील पैलू अचूक जुळताना सहज दृष्टीस पडतात.

मग, खरंच असेल का या जन्मराशींचा आपल्या जीवनाशी संबंध?

तर 'astro with सर्वेश' मध्ये सुरुवातीला मी तुम्हाला जन्मराशी आणि त्या संबंधित किस्से सांगणार आहे. काही विनोदी, काही गमतीदार, काही गंभीर.

माझ्या घरी या राशींचा खेळ खूप पिढ्यांपासून चालत आला आहे. आमच्या घरात तसे कोणी ज्योतिषी, पंडित वगैरे नाहीत, तरीही पणजोबा आणि आजोबांचा या विषयावर अतिशय दांडगा अभ्यास होता, असे गावातील लोक सांगतात. आमच्या गावात अजूनही असे लोक आहेत, जे मला सांगतात की अमुक-तमुक व्यक्तीबद्दल तुझ्या आजोबांनी असे-असे सांगितले होते आणि ते तसेच घडले.
माझ्या वडिलांनाही थोडेफार राशी, नक्षत्र, पंचांग, कुंडली याबद्दल सहज सांगता येते.

आमच्या घरी पंचांग आणि 'astrology' संबंधित पुस्तकांचे ढिगच होते. तसे अजूनही ते आहेत. माझे वडील त्या पुस्तकांबद्दल खूप sentimental आहेत. ते त्या पुस्तकांना कोणाला हात लावू देत नसत, पण माझ्यात वाचनाचा किडा असल्याने, लपून-छपून का होईना, मी त्यातली खूप पुस्तके कितीतरी वेळा वेड्यासारखी वाचून काढली. सुरुवातीला मी फक्त माझीच राशी, माझेच नक्षत्र याबद्दल पहायचो आणि त्या पुस्तकांमुळेच थोडाफार का होईना, मलाही 'astrology' मध्ये हळूहळू रस येऊ लागला आणि आपोआप त्यातल्या अगदी basic गोष्टी मला समजू लागल्या.

म्हणून जे मला माहित आहे, तेच मी तुम्हाला सांगणार आहे.

तर आपल्या राशीचक्रात एकूण बारा राशी आहेत:
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन.

या बारा राशी चार तत्वांमध्ये विभागल्या आहेत.

पहिले अग्नि तत्व: अग्नितत्त्वात तीन राशी आहेत, मेष, सिंह आणि धनु. या तत्त्वातल्या राशीचे लोक एकदम धाडसी आणि प्रेरक असतात. या राशींच्या व्यक्तींकडे ऊर्जा आणि उत्साहाचा साठा असतो, त्याचबरोबर कोणालाही एका क्षणात अग्निसारखे भस्मसुद्धा करण्याचा, या राशींच्या लोकांचा स्वभाव असतो.

दुसरे पृथ्वी तत्व: पृथ्वी तत्वामध्ये तीन राशी आहेत, वृषभ, कन्या आणि मकर. या राशीतले लोक पृथ्वीसारखे अगदी स्थिर आणि दृढ असतात. या तत्वातील लोक चोख, नीटनेटके, संयमी आणि अत्यंत व्यावहारिक असतात.

तिसरे वायु तत्व: या तत्वातल्या राशी आहेत मिथुन, तुला आणि कुंभ. या राशीतले लोक अत्यंत बुद्धिमान असतात. त्यांच्याकडे संवाद कौशल्य असते. सामाजिक कार्यात हे लोक नेहमीच पुढे असतात. हे लोक कुठेही adjust होतात , एकदम flexible, पण जरासे वाऱ्यासारखे चंचल सुद्धा असतात.

चौथे जल तत्व: या तत्त्वांमध्ये उरलेल्या तीन राशी म्हणजे कर्क, वृश्चिक आणि मीन. या तत्त्वाशी संबंधित राशींचे लोक दयाळू, संवेदनशील, शांत आणि भावूक असतात. काही मनाविरुद्ध झाले, तर लोक लगेच दुखावतात, म्हणजेच अगदी आपल्या तत्त्वासारखेच डोळ्यावाटे जलनिर्माण करतात.

तर, या तत्त्वाप्रमाणे राशींचा स्वभाव ठरतो.


आता आपण एक उदाहरण पाहूया


एका घरात सिंह राशीची सासू आणि मीन राशीची सून असेल तर काय होईल?

सिंह राशी ही अग्नि तत्त्वाची आणि मीन राशी जलतत्त्वाची.

सिंह राशीची सासू नेतृत्वगुणी, आत्मविश्वासी, स्वतःच्या मतांवर ठाम असेल. तिने कुटुंबात स्वतःचा अधिकार प्रस्थापित केलेला असणार. ती सर्वांना आपले ऐकवून घ्यायला लावणारी असणार आणि तिच्या कोणत्याही गोष्टीचा विरोध ती सहन करणार नाही.

याउलट मीन राशीची सून जलतत्त्वाची असल्याने भावनिक, संवेदनशील असणार. आपले मन दुखावले, तर गप्प बसणार आणि कुठेतरी जाऊन रडत बसणार. ती सगळ्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न करणारी असणार.

यामुळे कोण कोणावर वरचढ ठरणार हे ईरावरच्या कथा वाचणाऱ्यांना सांगायची गरजच नाही.

याच सासु सुनेचा एक किस्सा पाहू

सासू: (तापट) अगं सुनबाई! तुला पोळ्या गोलसर करता येत नाही काय? माझ्या माहेरच्या लोकांनी असल्या पोळ्या बघितल्या, तर शेण घालतील माझ्या तोंडात.

सून: (शांतपणे) आई, मी खूप प्रयत्न करते हो… पण… (वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच डोळ्यात गंगा जमूना येतात.)

सासू: झाले! जरा काही हिला सांगायला गेले की हिचे रडणे सुरू. हिने जन्मताच कुणा रडक्याचे तोंड बघितले होते, देवच जाणे.

सून: सासूबाई, मी उद्या पोळ्या गोल करण्याचा प्रयत्न करेन.

सासू: प्रयत्न नाही. गोलच व्हायला पाहिजेत. आज पर्यंत या घरात कधीही वेड्यावाकड्या पोळ्या बनलेल्या नाहीत.

तात्पर्य: या सूनेने कितीही ठरवले तरी, ही सून सासूला आपल्या तालावर नाचवू शकणार नाही.


आपण कोणाचे मित्र आणि कोणाचे शत्रू होणार, हे सुद्धा या तत्त्वाद्वारेच ठरलेले असते.


दुसरे उदाहरण:
जर नवरा कुंभ राशीचा आणि बायको वृश्चिक राशीची असेल तर काय होईल?

कुंभ नवरा म्हणजे आकाशात भटकणारा ढग, आणि वृश्चिक बायको म्हणजे पाण्याखालचा भोवरा. त्यांचे वैवाहिक जीवन गटांगळ्या खातच राहणार.

कुंभ राशीचा पुरुष वायु तत्वाचा, अर्थातच स्वतंत्र, स्वच्छंद विचारांचा, सामाजिक दृष्टिकोन असलेला, चंचल आणि बंधनात राहायला न आवडणारा.
वृश्चिक स्त्री जलतत्त्वाची म्हणजेच, भावनिक, अतिशय संवेदनशील, पझेसिव्ह. तिला नाते खूप महत्त्वाचे. नाते जपण्यासाठी ती काहीही करणार. उघडपणे काही बोलू शकत नसल्याने, तिच्या डोक्यात संशयाची सुई फिरतच राहणार.

कुंभ राशीच्या पुरुषाला स्वातंत्र्य आवडणार आणि वृश्चिक बायको त्याला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे तणाव निर्माण होणारच.

आता यांचा एक किस्सा सांगतो

नवरा आपल्या मोबाईलवर मित्रांशी रात्री चॅटिंग करत असतो. वृश्चिक राशीची बायको त्याचा मोबाईल बंद होईपर्यंत कधीही झोपणार नाही. हळूच ती एका डोळ्याने त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघणार. चुकून जरी त्याच्या चेहऱ्यावर हास्याची लकीर आली, तर हिच्या डोक्यात संशयाची सुई गतीने हलणार.

ती टोमणा मारेल:
"इतक्या रात्री कोणाशी चॅट करत बसला आहात? त्यांना झोप वगैरे येत नाही का? जी कोण चॅट करत आहे, तिला सांगा, रात्रीचे साडेबारा वाजले आहेत."

वायु तत्वाचा कुंभ नवरा चंचल आणि अति बुद्धिमान. तो तिला असे उत्तर देईल की ती पुढचा प्रश्न न विचारताच रडत राहेल.

सांगायचे झाल्यास राशींची ही तत्त्वे मनुष्याचे जीवनात खूप महत्त्वाचे काम बजावतात.

तर मंडळी, उद्यापासून आपण एक एक राशीबद्दल जाणून घेऊ.

परत भेटू ‘astro with सर्वेश’च्या पुढच्या भागात...तोपर्यंत प्रेम असू द्या.