Login

Astro With सर्वेश... भाग ५

Information Of Cancer
नमस्कार मंडळी,
'Astro with सर्वेश' आजच्या भागात तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत.

मंडळी, आतापर्यंत आपण तीन राशींचा आढावा घेतला.
आजची आपली राशी आहे, कर्क.

कर्क राशीचे चिन्ह आहे खेकडा.

हा खेकडाच या राशीबद्दल अर्धी माहिती देतो.

आता खेकडा म्हटला की, तुमच्या डोक्यात काय विचार येतो?
एकमेकांचे पाय खेचणे? नाही, तसे मुळीच नाही.

खेकड्याचे शरीर बाहेरून कठीण कवचाने झाकलेले असते, पण आतून तो मऊ आणि संवेदनशील असतो. कर्क राशीचे लोक अगदी तसेच असतात. दिसायला मजबूत, कठोर दिसतात, पण मनाने अत्यंत कोमल, भावनाशील आणि प्रेमळ असतात. हे लोक खेकड्याप्रमाणेच आपल्या भावना जगापासून लपवतात; ज्यांच्यावर या लोकांचा पूर्ण विश्वास असतो, त्यांच्याच पुढे हे लोक आपले मन उघडतात.

तुम्ही खेकड्याची चाल कधी बघितली आहे का? खेकडा कधीच सरळ चालत नाही; तो बाजूने चालतो. हे कर्क राशीच्या लोकांच्या वागणुकीचे प्रतीकच आहे असे समजा. ते थेट बोलत नाहीत, विषयाभोवती फिरत राहतात, पण शेवटी योग्य ठिकाणी पोहोचतात.
खेकड्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, खेकडा जी गोष्ट पकडतो, ती कधीही सोडत नाही.

कर्क राशीच्या लोकांचा अधिक स्वभाव जाणून घेण्यासाठी आपण नेहमीप्रमाणे एक छोटीशी कथा वाचूया.


"हेतल, नैवेद्याचा प्रसाद तू करते ना? की मी करू?" सासूबाईंनी हेतलला विचारले.
"नाही सासुबाई, मीच करते." असे म्हणत हेतल नैवेद्य करायच्या तयारीला लागली.

हेतल ही आपली कर्क राशीची सून. मनाने खूप चांगली, प्रामाणिक, आपल्या कुटुंबासाठी झटणारी, सर्वांना खुशीत ठेवणारी.
तिच्या सासूबाई सुद्धा खूप चांगल्या होत्या. हेतल पण त्यांना आपल्या आईसारखी वागवत असे. सासूबाई कधीकधी रागावल्या, तरी हेतल त्यांना समजून घेत असे. हेतलसाठी आपले घर आणि घरातील माणसे हे सर्वात महत्त्वाचे होते, म्हणून ती छोट्या-मोठ्या भांडणाकडे दुर्लक्ष करत असे.

नैवेद्याची तयारी करत असतानाच तिच्या शेजारणी संध्याचा तिला फोन आला. आवाजावरून ती खूप घाबरलेली भासत होती.

"काय झाले गं संध्या? तू अशी घाबरलेली का वाटतेस?" हेतलने तिला विचारले.
"अगं काय करु, तेच कळत नाही. तुला माझ्या सासूबाईंचा स्वभाव माहीतच आहे. मला वाटते आज मला खूप बोलणी ऐकाव्या लागणार आहेत."
"अगं, पण नक्की काय झाले आहे?"
"अगं, सासूबाईंच्या बहिणी येणार आहेत."
"अरे वा! हो का, मजा आहे तुझी. काय काय पदार्थ बनवणार आहेस?"
सध्यापेक्षा हेतलच्या चेहऱ्यावर जास्त आनंद दिसत होता.
"तू इतकी खुश का होत आहेस?"
"अगं, सासूबाईंनी मला साखरभात बनवायला सांगितले आहे. पण मला बनवताच येत नाही."
"अगं, मी सांगते ना."
"नाही, तसा मला जमणार नाही. मी YouTube वर बघून पाहिला. प्रयत्न केला, काहीतरी बिघडले तर सासूबाई तिच्या मैत्रिणीसमोर मला बोलणार."
"बरं, मग मी येऊ का तिथे तुला मदत करायला?"
"नको नको, तुला काय वेड लागले आहे? तुला इथे पाहिले तर ह्या मला उभ्या चिरून खाणार."
"मग करणार तरी काय?"
"तेच मला कळत नाही."
"बरं, मी एक काम करते. मी इकडे साखरभात बनवते आणि डब्यात भरून खिडकीतून तुला देते. तू काळजी करू नकोस."

हेतलने संध्यासाठी मोठ्या आनंदाने साखरभात बनवला आणि तिच्या घरी जाऊन, तिला खिडकीतून डबा दिला आणि घरी आली.

शेजारणीला संकटात मदत केली, याचे तिला खूप समाधान झाले होते.

"कुठे गेली होतीस गं हेतल?" सासूबाईंनी विचारले.
"संध्याच्या घरी गेले होते." हेतलने उत्तर दिले.
"मग नैवेद्याचा प्रसाद झाला का?" सासूबाईंनी प्रश्न केला.
यावर हेतल गप्पच राहिली. सासूबाईचे समजायचे ते समजली.

ही कथा वाचून तुम्हाला कर्क राशीच्या लोकांचा स्वभाव समजलाच असेल.



या लोकांना दुसऱ्यांना आनंदी पाहायला आवडते. म्हणजे आपली कामे बाजूला ठेवून, हे लोक दुसऱ्याला मदत करायला जातात. त्यांच्या या स्वभावामुळे सर्वांना हे लोक आवडतात. सर्वांना हे हवे हवेसे वाटतात. त्यामुळे कर्कवाल्यांचा मित्रपरिवार खूप मोठा असतो.

कर्क राशीच्या लोकांना पाहुण्यांना आपल्या घरी आमंत्रित करायला खूप आवडते. ते पाहुण्यांची मनापासून सेवा करतात, सोयीस्कर, आरामदायी आणि प्रेमळ वातावरण देतात. घरात चांगले जेवण बनवतात, त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारतात.


या राशीचा स्वामी चंद्र आहे.

चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. त्यामुळे हे लोक भावनेत आणि आपल्याच कल्पनेच्या विश्वात रमतात. चित्रकला, संगीत, लेखन यात ते बुडून जातात. चंद्र जसा दर दिवशी आपले रंग बदलतो, तसेच कर्क राशीचे लोक सुद्धा क्षणोक्षणी भावना बदलतात. एका क्षणी ते आनंदी असतात, आणि दुसऱ्याच क्षणी शांत किंवा दुखी होतात. म्हणजे त्यांचा “mood swing” होत राहतो.

ते जुन्या आठवणींना, नात्यांना आणि माणसांना विसरू शकत नाहीत.

हे लोक खूप प्रामाणिक आणि दयाळू असतात, पण त्यात कधीकधी विरोधाभासही आढळतो. जर समोरची व्यक्ती त्यांच्या मनासारखी वागली नाही, तर हे लोक त्याची निंदा करतात.

कर्क राशीचे लोक खूप स्वाभिमानी असतात, त्यांना आदर-सन्मान हवा असतो. कर्कच्या लोकांना कोणीही त्यांना मूर्ख बनवू शकत नाही. यांना दुसऱ्याच्या मनातील भावना आणि विचार बरोबर ओळखता येतात.


कर्क राशीचे तत्व आहे जल.

या तत्वाच्या राशीचे लोक सहज भावुक होतात, इतरांच्या दुखःत रडतात, आनंदात हसतात. पाणी जसे वाट मिळेल तसे धावते, तसेच हे लोक सुद्धा कधी कधी भावनांच्या भरात कसेही वाहून जातात.


आता या राशीचे काही दुर्गुण जाणून घेऊया.

एक दुर्गुण म्हणजे यांना दुसऱ्यांच्या जीवनात काय चालले आहे, यात जास्त रस असतो.

दुसरा दुर्गुण सांगण्याआधी मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो.

प्रेरणाच्या गावात विठोबाची पालखी यायची असते. गावातले सगळे लोक आपापले दार सजवत होते.

"प्रेरणा, जरा मला रांगोळी घालायला मदत कर ना. आमची रांगोळी घालून झाल्यावर, मी तुमची रांगोळी घालायला तुला मदत करते," एक शेजारची बाई प्रेरणाला सांगते.

आता आपली प्रेरणा कर्क राशीची, तिला मदत करायला खूप आवडते. ती तशीच शेजारणीकडे रांगोळी घालायला जाते.
शेजारणीची सुंदर रांगोळी घालून पण होते. रांगोळी घालून झाल्यानंतर शेजारीण प्रेरणाला म्हणते,
"अगं, मला सासूबाई आत बोलवत आहेत. सॉरी हं, मी तुला रांगोळी घालायला मदत करायला येऊ शकत नाही. प्लीज राग धरू नकोस हं."

दुसऱ्यासाठी खूप करतात, त्यांना आपल्याला जमेल तशी मदत करतात, पण दुसऱ्या व्यक्तीची गरज भासते आणि तो माणूस मदत करत नाही, तर हे कर्क लोक खूप दुःखी होतात. ते जरा जास्तच मनाला लावून घेतात, दिवस-रात्र तोच विचार करतात आणि अशाने घरातले वातावरण पण बिघडते.

खूप जणांच्या गळ्यातले हे ताईत असतात, पण स्वतःच्या घरी लक्ष न दिल्यामुळे घरात भांडणे होऊ शकतात. पहिल्या कथेत तुम्ही बघितले, शेजारणीमुळे हेतलचा नैवेद्य बनवायचा राहून गेला. तिच्या सासूबाईऐवजी दुसरी एखादी सासू असती, तर काय घडले असते, जरा कल्पना करा.

एका अर्थी हे लोक भावनेच्या भरात कर्तव्यापासून भरकटत जातात असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

कर्क राशीच्या व्यक्तीला मनातल्या गोष्टी बोलून दाखवायला अवघड जाते. राग, दुखः, ताण, सगळे आतच साठवून ठेवतात.


आरोग्याबद्दल बोलायचे झाल्यास, कर्क राशीच्या लोकांना मधुमेह, रक्तदाब, वात, अपचन, आतड्याचे विकार, हृदय विकार, छातीशी संबंधित विकार होतात. अपचन, मळमळ, असिडिटी, मानसिक त्रासामुळे निद्रानाश हे सर्वसामान्य त्रास होतात.

कर्क लोकांचे मीन राशीसोबत खूप चांगले संबंध जुळतात. दोन्ही राशी अतिशय भावनाशील आणि संवेदनशील आहेत. त्यामुळे एकमेकांच्या भावना सहज समजू शकतात.


मित्रांनो, शेवटी सांगायचे झाल्यास, कर्कच्या व्यक्ती, विशेषतः स्त्रिया खूप प्रेमळ, गृहकृत्यदक्ष, धार्मिक वृत्तीच्या, घरगुती कलांमध्ये निपुण असलेल्या, स्वयंपाक घरावर फार प्रेम करणाऱ्या, सतत कसल्या ना कसल्या घरकामात गढून गेलेल्या, स्वच्छतेची (विशेषतः स्वयंपाकघराची) आवड असलेल्या, स्वतःपेक्षा नवऱ्याच्या, मुलांच्या आवडीनिवडीकडे लक्ष देणाऱ्या, सणवार किंवा धार्मिक कार्यात उत्साहाने भाग घेणाऱ्या, घर योग्य पद्धतीने सांभाळणाऱ्या अशा असतात. यांना फक्त चांगल्या जोडीदाराची किंवा समजून घेणाऱ्या व्यक्तीची गरज असते.

तर ही झाली कर्क राशीची थोडक्यात माहिती.

तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.

परत भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत प्रेम असू द्या.